दुर्गम आणि डौलदार तटबंदी असलेला दुर्ग 'विसापूर'


लोणावळा ! महाराष्ट्रातील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. वर्षाचे बारा महिने येथे पर्यटकांची गर्दी असते. पावसाळा हा ऋतु असेल तर मग काय विचारायलाच नको असंख्य पर्यटक लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरात भटकंती करायला येतात. लोणावळ्याच्या ह्या परिसरावर निसर्गकृपा एवढी आहे कि या लोणावळ्याच्या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची यांसारखे बलदंड किल्ले, उल्हास, पवना यांसारख्या नद्यांच्या पात्रातील विपुल जलसंपत्ती, तसेच कार्ले डोंगरातील कार्ल्याची प्रसिद्ध लेणी आणि एकविरा देवी तसेच विसापूर किल्याच्या पोटातील सुंदर प्रसिद्ध भाजे लेणी तसेच अल्पपरिचित  पाटण लेणी आणि निसर्गनिर्मित ' नागफणी सुळका ' म्हणजेच ट्रेकर्स लोकांमध्ये प्रसिद्ध असलेला ' ड्युक्स नोज ' चा सुळका यांंसारखी प्रसिद्ध ठिकाणे ही लोणावळा आणि त्याच्या जवळची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 

याच लोणावळा शहरात जात असताना पुणे-मुंबई हमरस्त्यावर मळवली गावाच्या बाजूला आपले लक्ष एक दुर्गद्वयी वेधून घेते ही दुर्गद्वयी दुसरी तिसरी कोणती नसून ' लोहगड आणि विसापूर ' हे किल्ले लक्ष वेधून घेतात. यामध्ये आपल्याला दक्षिणेकडे दुरवर आडवा पसरलेला जो डोंगर दिसतो तो म्हणजे ' विसापूर किल्ला ' आणि या विसापूर किल्याच्या थोडेसे मागे उजव्या बाजूस पाहिल्यास ' लोहगड किल्ला ' आपल्याला खुणावतात. सहज सोप्या चढाईमुळे ' लोहगड किल्ला ' पर्यटकांच्या आवडता किल्ला बनलेला आहे त्यामुळे ' लोहगड ' किल्यावर येणारे पर्यटक हे नेहमी जास्त असतात. मात्र त्याच्या शेजारी असणारा ' विसापूर किल्ला ' मात्र आजही उपेक्षित आहे. बऱ्याचदा असे होते कि लोहगड बघायला आले आणि तिथे बाजूला विसापूर नावाचा किल्ला आहे हे लोकांना समजते परंतु तोपर्यंत लोकांकडे वेळ शिल्लक राहत नाही म्हणून ' विसापूरचे ' खालच्या खाली दर्शन घेऊन लोकं निघून जातात. 



' विसापूरचा किल्ला ' हा अत्यंत देखणा आणि अवशेष पूर्ण किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून १०९० मीटर उंचीवर असलेल्या या किल्याचे देखणेपण संपूर्ण निराळेच आहे. या भरभक्कम विसापूर किल्यावर दुर्गअवशेष हे भरभरून आहेत. गडाची डौलदार आणि भक्कम तटबंदी या तटबंदीमध्ये उभारलेले भव्य बुरुज तसेच फांज्या ह्या आपले लक्ष वेधून घेतात. गडावर कोरलेले हनुमानाची चित्र आणि सहा ब्राम्ही शिलालेख असलेली पाण्याची टाकी आणि इतर पाण्याची टाकी हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तसेच गडावर चुन्याचा घाणा आणि जाते बघण्यासारखे आहेत.  


विसापूर किल्यावर  जायचे असल्यास पुणे स्टेशन वरून लोकल पकडून लोणावळ्याच्या एक स्टेशन अलीकडे असलेल्या मळवली स्टेशनमध्ये उतरावे. स्टेशन मध्ये उतरताच समोरील बाजूस ' लोहगड - विसापूर ' ही दुर्गद्वयी आपले स्वागत करते. मळवली स्टेशन वरून ११ नंबरची बस पकडून एक्सप्रेस हायवे वरील उड्डाणपूल वरून चालत २ कि.मी. अंतरावरील ऐतिहासिक भाजे गावात यावे या भाजे गावातील लेण्यांच्या पायऱ्यांंवरून उजव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने डोंगर चढायला सुरुवात करायची. भाजे लेण्यांच्या दरवाज्या शेजारून जाणाऱ्या या वाटेने आपल्याला दीड ते दोन तास लागतात. साधारण पणे ४५ मिनिटात आपण एका पठारावर येतो त्या पठारावर दोन धनगरांचे झाप आपल्याला पहायला मिळतात. येथून समोरील बाजूस आडदांड पसरलेल्या ' विसापूर ' किल्याची तटबंदी आपल्याला खुणावत असते. याच ठिकाणी आपल्याला पाटण गावातून येणारी वाट देखील आपल्याला येऊन मिळते. 


या धनगरांच्या झापांच्या येथून सरळ डोंगरधार पकडून आपण किल्यावर चढाई करायला सुरुवात करायची विसापूर किल्याचा बुरुज उजवीकडे ठेवून जंगलातील वाटेवरून किल्याकडे कुच करायचे. बऱ्याचदा या वाटेवर चुकायची शक्यता असते आणि बरेच लोकं याठिकाणी आत्तापर्यंत चुकलेले आहेत त्यामुळे पुरेशी खबरदारी घेऊन यावाटेने गडावर चढावे. येथून थोडे पुढे गेले असता आपल्याला काही खोदीव पायऱ्या लागतात तसेच उजव्या बाजूस एक पाण्याचे टाके देखील लागते. येथून थोडे वर गेले असता इंग्रजांनी तोडलेल्या पायऱ्या आणि भग्न दरवाज्याच्या अवशेषांमधून आपण वर येतो कातळात खोदलेल्या या पायऱ्या आपले मन मोहवून टाकतात. भाजे लेण्यांच्या दरवाज्या शेजारून जाणाऱ्या या वाटेने आपल्याला दोन तास लागतात.


या पायऱ्यांवरून वर येताना आपल्याला रस्त्यात काही अवशेष दिसतात ते पाहात आपण एका कातळात खोदलेल्या धान्यकोठीपाशी पोहचतो. या धान्यकोठ्या दगडी प्रवेशद्वाराने बंदिस्त आहेत. याच कोठ्यांच्या दरामध्ये एक मारुतीची सुंदर मूर्ती कातळात कोरलेली आहे. या मारुतीच्या मूर्तीवर शेंदूर लावल्यामुळे ती चटकन नजरेत भरते ह्या मारुतीच्या मूर्तीची शेपूट डोक्याकडे वरच्या बाजूस वळवली असून मारुतीच्या मूर्तीला शेंडी बांधलेली पहावयास मिळते तसेच मारुतीच्या हातामध्ये आपल्याला भाला बघावयास मिळतो. तसेच येथील दुसऱ्या कोठीच्या दरवाज्यावर कोरलेले ' कमळ आणि गणेशपट्टिका ' पहावयास मिळते. 



येथून थोडेसे पायऱ्यांनी वर चढले असता आडवा तिडवा पसरलेला विसापूर किल्ला आपले मन मोहवून टाकतो. गडाच्या पठारावरून एकसंध बांधलेली तटबंदी अक्षरशः मंत्रमुग्ध करते. येथून थोडसे म्हणजे साधारणपणे २०० ते ३०० पावले गेले असता पाण्याची खोदीव टाकी पहायला मिळतात यातील दोन पाण्याच्या टाक्यांवर ४ ब्राम्ही शिलालेख आहेत तसेच तेथील पाचव्या टाक्यावर आपल्याला त्रिरत्न आणि धर्मचक्र कोरलेले आपल्याला पहायला मिळते. येथून गडाच्या तटबंदीवरून चढून गडाच्या उजव्या बाजूने गड फेरीस सुरुवात करायची आणि मनसोक्तपणे गडाच्या भव्यतेला नहाळायला सुरुवात करायची साधारणपणे पाच ते सात मिनिटे चालल्यावर आपल्याला २ ते ३ पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला मिळतो. त्या पाण्याच्या टाक्यांमधील पाणी चांगले नाही येथून पुढे चालत आपण तटबंदीच्या उत्तरेस गेल्यास आपल्याला तेथे परत ४ पाण्याच्या टाक्यांचा समूह बघायला मिळतो तिकडेच थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा आणि त्याच्या पायऱ्या पहायला मिळतात. या चोर दरवाज्याच्या बाजूस आपल्याला दुहेरी तटबंदी पहायला मिळते. येथून समोरील बाजूस चालत गेले कि वाड्याची भरभक्कम वास्तू आपल्याला पहायला मिळते. या वास्तूचे फक्त छप्पर शिल्लक नाही. येथून पुढे गेल्यास आपल्याला कचेरी पहायला मिळते. 



कचेरी पाहून परत तटबंदी वरून पुढे चालू लागावे थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे खोदीव टाके दिसते या टाक्याच्या वरील बाजूस हनुमंताचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथून पुढे चालत गेले असता गडाच्या पुरातन खुणा दर्शवणारी पाण्याची टाकी आपल्याला पाहवयास मिळतात. ही सर्व टाकी एकसलग खोदलेली  असावीत असे यांच्या रचनेवरून दिसते. अश्याच पद्धतीची टाकी आपल्याला चावंड किल्यावर देखील पहावयास मिळतात. या टाक्यांच्या येथून फिरून थोडे पुढे गेले असता आपल्याला चुन्याचा घाणा आणि जाते आपल्याला बघावयास मिळतो. 



हे सर्व बघून पुढे गेल्यावर दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवावा येथे आपल्याला एक भले मोठे पाण्याचे टाके पहायला मिळते तेथून पुढे गेले असता बुजलेली दोन पाण्याची टाकी मिळतात या पाण्याच्या टाक्यावर ब्राम्ही शिलालेख कोरलेला आहे. तेथूनच एक रस्ता खाली लोहगडवाडी मध्ये जातो लोहगड आणि विसापूर या दोघांना जोडणारी ही खिंड गायमुख खिंड म्हणून ओळखली बऱ्याचदा लोहगड मार्गे येणारे लोकं या मार्गाने विसापूरकडे येतात. यामार्गाने येताना सांबर किंवा हरीण हे दिसू शकतात. तसेच गडावर आपल्याला एक जुनी दगडी दीपमाळ महादेवाचे मंदिर तसेच दोन नंदी पहायला मिळतात. गडावर असलेली तोफ बघण्यासारखी आहे. गडावरची तोफ किती साली बनवली हे देखील त्यावर लिहिलेले आहे. 


विसापूर किल्ला पाहिला तर ह्या किल्याचे वैशिष्ट्य म्हणजे गडाची तटबंदी परंतु या गडाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संपूर्ण विसापूर किल्यावर असलेले तब्बल ६ ब्राम्ही शिलालेख. हे ब्राम्ही शिलालेख इ.स.वी सनाच्या दुसऱ्या शतकातील आहेत. ह्या सर्व शिलालेखांचे वाचन ' कै.डॉ.शोभना गोखले ' यांनी केलेले आहे. यातील एक ब्राम्ही शिलालेख अत्यंत महत्वाचा पुरावा आपल्याला देतो तो ब्राम्ही शिलालेख पुढीलप्रमाणे:-

" सातवाहन राजा वासिष्ठीपुत्र पुळूमावी याच्या कारकीर्दीतील पंचविसाव्या वर्षी "

असे वर्णन आपल्याला या शिलालेखातून समजते. म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला विसापूर किल्याचे आयुष्य समजते तसेच विसापूर किल्यावरुन भाजे आणि बेडसे लेणे जवळच आहेत म्हणजे कार्ल्यावरून येणारे बौद्ध भिक्षु बेडसे लेणीमध्ये जात असताना ते विसापूर किल्याच्या माथ्यावरून जात असत हे आपल्याला समजते. ह्या बौद्ध भिक्षुंची पिण्याच्या पाण्याची सोय करणे तत्कालीन राजाचे कर्तव्यच होते हा पुरावा वरील लेखावरून मिळतो यातील सहा ब्राम्ही लेखांमधील बाकीचे चार ब्राम्ही शिलालेख हे अर्धवट आहेत आणि दोन ब्राम्ही शिलालेख हे पूर्ण आहेत.  हे या विसापूर किल्याचे पुरातन असल्याचे अस्तित्व दाखवणारे सगळ्यात मोठे पुरावे आहेत. 


विसापूर किल्यावरुन दिसणारा नजारा हा बघण्यासारखा आहे समोरील बाजूस सतत दिसणारे तुंग आणि तिकोना तसेच सख्खा शेजारी असलेला लोहगड आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतात. तुंग आणि तिकोना यांच्यामध्ये असलेले पवना धरण आणि अगदीच समोर दिसणारे भातराशी आणि बेडसे लेण्यांचे डोंगर मन मोहवून टाकतात. पावसाळ्यात येथील आजूबाजूच्या डोंगरांची हिरवाई तसेच पाऊस पडून गेल्यानंतर दिसणाऱ्या वातावरणातील मुक्त रंगाची उधळण मन खिळवून टाकते. 

विसापूर किल्याचा इतिहास पहावयास गेले तर वरील ब्राम्ही शिलालेख त्याला मुख्य पुरावे आहेत याचा अर्थ किल्याच्या माथ्यावर पहिले पाण्याची टाकी खोदली गेली आणि नंतरच्या काळात 'विसापूर किल्ला' बांधला गेला. तसेच विसापूर किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात होता कि नव्हता याला मात्र काही पुरावा नाही. सातवाहन काळात विसापूरच्या डोंगराच्या माथ्यावर फक्त पाण्याची टाकी असावीत असा अंदाज लावता येतो तसेच कार्ले, भाजे या लेण्यांमधून बेडसे लेण्यांना जाण्यासाठी या किल्याच्या माथ्याचा उपयोग केला जात असे समजते. महाराजांच्या आज्ञापत्रानुसार हा किल्ला बांधण्यात आलेला आपल्याला पहावयास मिळतो. इ.स.वी. सन १६५८ साली विसापूर किल्ला स्वराज्यात आला.  इ.स.वी. सन १७०९ सालापर्यंत गडावर कोणताच राबता नव्हता.पेशव्यांच्या काळात तुळाजी आंग्रे यांचा मुलगा विसापूर किल्यामध्ये काही काळ कैदेत होता असे उल्लेख पत्रांमध्ये आढळतात परंतु कालांतराने तो येथून पळून गेला. इ.स.वी. सन १७५३-५४ मध्ये विसापूर किल्यावर दुखण्याची साथ आली होती त्यावेळेस दुर्गाजी नावाचा एक सरदार विसापूर किल्यावर हवालदार म्हणून काम करत होता. इ.स.वी. सन १८१८ मध्ये कर्नल प्राॅॅथरने ' विसापूरचा ' किल्ला जिंकून घेतला आणि किल्याचे महत्व कमी झाले.


विसापूर किल्याबाबतीत एक दंतकथा सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे:-

लोहगड किल्यावर शेख उमर नावाचा एक अवलिया होता त्याची कबर आपल्याला पहायला मिळते. सध्या ही कबर मुसलमान लोकांकडे देखभालीला असून आजूबाजूच्या पंचक्रोशीत ' लोहगड किल्ला ' हा ' मळवलीचा पीर' म्हणून प्रसिध्द आहे. याच पिराबाबत एक दंतकथा सांगतात ती अशी:-

शेख उमर आपल्या सहा भावांसह अरबस्थानातून भारतामध्ये आला. मलंगगडावरचा बाबा मलंग, व पुण्याचा शेख सल्ला हे त्यापैकीच एक होते. हा शेख उमर भारतात बाबर यायाच्याही आधी भारतातील लोकांना इस्लामची दीक्षा देण्यासाठी आपल्या भावांबरोबर आला. तो जेव्हा लोहगडावर येऊन पोहोचला तेव्हा त्याला लोहगडावर एक साधुपुरुष बसलेला दिसला. त्यावेळी त्या साधुपुरूषाचे वास्तव्य लोहगडावरच होते. मग शेख उमर त्या साधुपुरूषाजवळ आला आणि त्या साधुपुरुषाचा एक पाय धरला आणि त्याला गरागरा फिरवून जवळच्या विसापूर किल्यावर फेकून दिले. हा साधूपुरुष विसापूर किल्यावर ज्या ठिकाणी पडला त्या स्थानाला ' विसापूरचा वनदेव ' असे नाव दिले गेले. आजही स्थानिक लोकं त्या ' वनदेवाची ' पुजा करतात. या वनदेवाची पुजा करणारे पुजारी कोळी होते. आणि दरवर्षी पौष महिन्यातील पौर्णिमेला ' वनदेवाची ' मोठी जत्रा भरत असे.


असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला विसापूर किल्ला डोंगरभटक्यांना खुणावत असून वर्षानुवर्षे आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत  पवन मावळवर लक्ष देत आजही उभा ठाकला आहे. महाराष्ट्रातील दुर्गम किल्यांपैकी एक हा अभेद्य विसापूरचा किल्ला आजही डोंगरभटक्यांना त्याच्या बुलंद तटबंदीनिशी स्वागत करायला आणि आपला इतिहास सांगायला डोंगरभटक्यांची वाट पाहत उभा आहे. अश्या या उपेक्षित दुर्गवैभवाला लोणावळ्याच्या जवळ गेलात तर नक्की भेट द्या.                


     लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

_____________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) शिवकालीन दुर्ग आणि दुर्गव्यवस्था:- महेश तेंडूलकर.
२) मध्ययुगीन कालखंड:- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
३) Visapur Inscriptions Research Paper:- Dr. Shobhana Gokhale. 


कसे जाल:-
पुणे - चांदणी चौक - हिंजवडी - तळेगाव - कामशेत - मळवली.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा   
    



         

1 comment:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage