'बेडसे' पवना खोऱ्यातील कातळ सौंदर्यशिल्प


बऱ्याचदा आपण कामकाजानिमित्ताने सह्याद्रीमधील घाट ओलांडीत असतो किंवा कुतूहलाने आणि उत्सुकतने एखाद्या किल्याची वाट चढत असतो किंवा घाटवाटेने वरच्या पायवाट तोडत जात असतो अश्यावेळेस दम लागल्यावर विश्रांतीसाठी कडेच्या एखाद्या दगडावर बसून आजूबाजूला पाहू लागतो तोच एखाद्या कड्याच्या पोटामध्ये पिंपळपानासारखी कमान दृष्टीस पडते किंवा एखादी सुंदर मूर्ती आपल्या डोळ्यांचे लक्ष वेधून घेते तेव्हा आपण चकित चित्ताने स्वतःला विचारतो हे धर्मकृत्य कोणाचे? कोण्या अनामिकाने हे केले असावे? कधी केले असावे? ही मूर्ती कोणाची? काय भावना असेल ही मूर्ती करताना? त्या अनामिक कारागिराचीअश्या आडवाटेवर हे शिल्प का कोरण्यात आले? असे सर्व प्रश्न अश्याच काही आडवाटा धुंडाळत असताना पडतात अश्या या सुंदर कलाकृती मनाला अनेक प्रश्न पाडतात तेथील निरव शांतता आपल्याला एका वेगळ्या इतिहासाच्या जगात घेऊन जाते. अश्याच एखाद्या आडवाटेवर जर भटकंती करायची असेल तर पवना खोऱ्यामध्ये ' बेडसे ' नावाचे एक कातळ सौंदर्यशिल्प लपलेले आहे. 


लोहगड - विसापूर - तुंग - तिकोना या चार बलदंड मावळच्या पहारेकऱ्यांच्या मध्यभागी ' बेडसे ' नावाचे एक सुंदर कातळशिल्प कोरण्यात आलेले आहे. मुंबई पुणे येथील लोकांना कार्ले, भाजे, कोंडाणे यांसारख्या प्रसिद्ध लेण्या माहिती आहेत परंतु फार कमी लोकं या ' बेडसे ' लेण्यांकडे वाट वाकडी करून फिरकतात. कार्ले - भाजे सारखी गर्दी या सुंदर लेण्यामध्ये आजिबात नसते. पुणे जिल्ह्याच्या पवना नदीच्या खोऱ्यात ' सुमती डोंगरावर ' साधारणपणे १०० मीटर अंतरावर ही लेणी कोरलेली आहेत. कामशेत या गावापासून साधारणपणे ८ ते १० कि.मी. अंतरावर ' बेडसे ' लेणी आहेत. कामशेत वरून पवना धरणाकडे जात असताना उजव्या बाजूच्या डोंगरामध्ये एक मोठा गोल खड्डा दिसतो हा खड्डा म्हणजे ' बेडसे लेणीचे ' मुख्य चैत्यगृह होय. ' बेडसे लेणी ' समूह हा भातराशी ह्या डोंगराच्या अगदी शेजारी कोरलेला आहे. 


'बेडसे लेणी' बघायची असल्यास कामशेत गाव गाठावे. कामशेत गावामधून पवना धरणाकडे जाण्यासठी मार्गस्थ व्हावे किंवा कामशेत येथून काळे कॉलनी किंवा पवना नगर अश्या बस किंवा जीप मिळू शकतात. पायथ्याच्या बेडसे गावामुळे या लेण्यांना ' बेडसे ' असे नाव मिळालेले दिसते. ' बेडसे लेण्या ' या ' बेडसे ' गावातून पहिल्या तर एखाद्या संन्यासा प्रमाणे व्रतस्थ असलेल्या दिसतात. बेडसे गावापासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर आतमध्ये ही सुंदर हीनयान पंथीय कातळशिल्प कोरलेली आहेत. बेडसेची ही सुंदर सौंदर्यशिल्प पुणे गटाच्या लोणावळे उपगटातील प्रमुख लेणी आहेत. या सुंदर कोरीव लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरातत्व खात्याने पायऱ्या तयार केलेल्या आहेत तरी पुरातन काळातील काही खोदीव पायऱ्या या तेथे आपल्याला बघावयास मिळतात. साधारणतः अर्ध्या तासात आपण पायऱ्याचढून वर पोहोचतो. 


उत्सुकतेपोटी आपण लेण्यांच्या पायऱ्याचढून वर जातो तसे समोर आपल्या साधारण २०० मीटर लांबीच्या 'सुमती' डोंगराच्या आडव्या कातळात कोरलेला शिल्पपट पाहिल्यावर आपले मन मोहून जाते आलेला थकवा क्षणार्धात नाहीसा होतो. सह्याद्रीतील ही प्राचीन लेणी म्हणजे ज्ञात धर्मक्षेत्रे. अत्यंत सुंदर अशी कातळकोरीव ' बेडसे ' लेणी आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. बेडसे लेण्यांचा हा शिल्पपट हा पूर्वाभिमुख कोरलेला आहे. समजा फोटोग्राफी करायची असल्यास सकाळी लवकर आलात तर सूर्यकिरणे ही संपूर्ण लेणी आपल्या प्रकाशाने उजळवून टाकतात जणू संपूर्ण लेणी ही सुवर्ण प्रकाशाने नाहलेली असते. अश्या ह्या न्हालेल्या सुवर्णकांतीमध्ये या शिल्पपटातील चैत्यगृह जे लेणीचे मुख्य आकर्षण आहे ते वेगळेच भासते. बेडसे लेणीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कलते खांब, झुकलेल्या भिंती, चैत्याकार गवाक्षांची आणि वेदिकांची रचना स्तुपावर असलेली विस्तीर्ण लाकडी हार्मिका ही सर्व प्राचीन हीनयान पंथीय लेण्यांची रचना या बेडसे लेण्यांच्या संपूर्ण रचनेमध्ये आपल्याला पहावयास मिळते. इ.स.पू. १ ल्या शतकातील उत्तरार्धात या लेण्या खोदल्या गेल्या आहेत. या लेण्याची आजचे नाव जरी बेडसे या नावावरून पडले असले तरी या लेण्यामध्ये एका शिलालेखात या लेण्याचे नाव ' मारकुड ' असे होते असे आपल्याला लेणीच्या शिलालेखाच्या उल्लेखात पहायला मिळते. बेडसे लेण्यांच्या प्राचीनत्वाचा शोध घेत एक एक दालन धुंडाळत निरखून घेत बघावयास सुरुवात करावी. 


बेडसे लेण्यांमधील चैत्यलेणे हे संपूर्ण बेडसे लेण्याच्या समूहात एकुलते एक लेणे समजण्यात येते. हे चैत्यगृह सुमारे १५ मीटर लांब आणि ७ मीटर रुंद आणि १० मीटर उंच असे बांधलेले आपल्याला बघावयास मिळते. चैत्यगृहाचा समोरील व्हरांडा किंवा आगाशी सुमारे १० मीटर लांब आणि ५ मीटर रुंद आहे या आगाशीला बांधलेले सुंदर कोरीव खांब आपले डोळे दिपवून टाकतात. हे खांब बांधताना दोन्ही बाजूला दोन खांब आणि मध्यभागी दोन खांब या पद्धती मध्ये बांधलेले आहेत. ह्या खांबांचे वैशिष्ट्य म्हणजे मधले दोन खांब पूर्ण स्वरूपाचे आहेत आणि दोन्ही बाजूचे दोन खांब हे अर्धस्तंभ आहेत. या दर्शनी खांबांच्या आधारावर असलेला व्हरांडा तसेच त्याच्या बाजूला चिटकून असलेल्या खोल्या आणि या खांबांच्या मागे कातळात खोदलेले सुंदर चैत्यगृह यापेक्षा सर्वात जास्त मनाला भुरळ घालतात ते या शिल्पाचे आकर्षक स्तंभांवर. बेडसे लेण्यांचे आगळे वेगळे वैशिष्ट्य दर्शवणारे हे सुंदर स्तंभ पायापासून थेट छताला चिटकलेले आपल्याला आढळतात. या स्तंभाच्या पायथ्याला चौरसाकृती चौथरा त्याच्यावर कोरलेले सुंदर घट आणि त्याच्यातून वर आलेले अष्टकोनी खांब. वरच्या बाजूस उमललेल्या कमळाची रचना यामधील संपूर्ण पाकळी आणि पाकळी आपल्या डोळ्याचे पारणे फेडते इतके बारीक कोरीव काम केलेले आपल्याला पहायला मिळते. या पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस चौरंगाच्या पायांसारखे चार दगडी ' अँँगल ' बसवलेले आपल्याला पहायला मिळतात परंतु ते ' अँँगल ' एकाच कातळात एकसंधपणे कोरून काढलेले आहेत. त्या ' अँँगल ' वर एक हार्मिकेच्या चौरसा सारखा चौरस बांधून त्याच्यावर हत्ती, घोडा, बैल यांसारखे पशू व्यवस्थित कोरून त्यावर स्त्री-पुरुषांच्या जोड्या स्वार असल्याचे आपल्याला पहायला मिळते. हे संपूर्ण स्त्री - पुरुष तसेच पशू अत्यंत बारीक निरीक्षण करून कोरलेले आपल्याला पहायला मिळतात. 


यातील उजव्या बाजूच्या अर्धस्तंभशीर्षावर नीलगाय असून त्यावरच्या स्त्री - पुरुष अत्यंत प्रमाणबद्ध कोरलेल्या आपल्याला पहायला मिळतात. या स्तंभांंच्या हत्तींना सुळे नसून त्याजागी खोबणी आहेत पूर्वी त्या खोबण्यांंच्या जागेवर हस्तिदंत बसवत असावेत असा कयास आहे. येथील कोणत्याही घोड्याच्या पाठीवर खोगीर नाही तसेच घोडेस्वाराच्या हातात लगाम देखील दिसत नाही. येथील स्तंभावरील प्रत्येक पुरुषाच्या डोक्यावर शिरस्त्राण दिसते. या संपूर्ण मूर्ती जणू या लेण्या सजीव बनवतात. या मूर्ती प्राचीन महाराष्ट्राची संस्कृती आणि पेहेराव आपल्याला दर्शवतात. बेडसे लेणी मधील हे सुंदर कातळ कोरीव स्तंभ काहीजणांना ' पर्सीपोलिटन ' स्तंभांसारखे वाटतात. बेडसे लेण्याच्या आगाशीमधून पुढे आले असता आपल्याला मुख्य चैत्यगृह पहायला मिळते. या आगाशीच्या संपूर्ण भागावर सुंदर चैत्यकमानी कोरलेल्या असून त्याच्या आजूबाजूस वेदिकापट्टी देखील आपले लक्ष वेधून घेते. सह्याद्रीच्या काळ्या कातळात एकसंध कोरलेले हे व्हरांडे अक्षरशः डोळे दिपवतात. या व्हरांड्याच्या भोवतीच्या भिंतीत डाव्या बाजूला दोन आणि उजव्या बाजूला दोन अश्या खोल्या काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यातील डावीकडील एका खोलीचे काम अपुरे असल्याचे पहायला मिळते. उरलेल्या दोन्ही खोल्या या एकदम व्यवस्थितरित्या तासून बांधलेल्या आपल्याला दिसतात त्यातील एका खोलिच्या द्वारपट्टीवर एक शिलालेख कोरलेला आपल्याला बघावयास मिळतो. तो शिलालेख पुढीलप्रमाणे:-


‘नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं’

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

"नाशिकचा कोणीतरी श्रेष्ठी आनंदच्या मुलाने याचे दान दिले आहे". या शिलालेखात नाशिकचा प्राचीन उल्लेख आपल्याला मिळतो. यातील 'श्रेष्ठी  म्हणजेच व्यापारी असल्याचे आपल्याला दिसते तसेच याच ' श्रेष्ठी ' या शब्दावरून आजचा शेठ हा शब्द तयार झाल्याचे देखील समजते. 

मुख्य चैत्यगृहाच्या बाहेरील भिंतीवरील पिंपळपानाची मोठी कमान फारच सुरेख आहे. या पिंपळपानाच्या खाली परत काही चैत्यकमानी कोरलेल्या आपल्याला पहायला मिळतात. यातील मधल्या आणि डावीकडच्या सुंदर कातळात कोरलेल्या चैत्यकमानीतून जाण्यासाठी एक कोरीव दरवाजा आहे यातून आपल्याला आतमध्ये जाता येते. येथील भिंतीच्या उजव्या बाजूस छान फुलांच्या नक्षीकाम केलेले काही झरोके देखील आपले लक्ष वेधून घेतात. दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर आतील चैत्यगृह आणि त्याचे झुकते खांब एक वेगळीच रचना दर्शवतात. मुख्य चैत्यगृह हे २६ झुकत्या खांबांवर उभे केलेले आहे. चैत्यगृह हे अत्यंत साधेच आहे. येथील स्तुपाची लाकडी हार्मिका आजही लक्ष वेधून घेते. स्तूपाच्या उजवीकडील खांबांवर चक्र, त्रिरत्न, कमळ ही बौद्ध चिन्हे आपल्याला बघावयास मिळतात. चैत्यगृहाच्या छताला पूर्वी आतमध्ये लाकडी फासळ्या होत्या परंतु काही लोकांनी त्या चोरून नेल्या हे आपले दुर्दैवच म्हणवे लागेल. 
बेडसे लेण्यांच्या या चैत्यगृहातून बाहेरच्या बाजूस आले असता चैत्यगृहाच्या डाव्या बाजूस आपल्याला एक खांब बांधून काढलेली खोली दिसते ती खोली अर्धवर्तुळ आकारात तयार केलेली आपल्याला पहावयास मिळते तसेच या खोलीत पाण्याचा चर देखील पहायला मिळतो. या खोलीच्या बाजूस अर्धवट खोदलेले बाकडे दिसते तसेच त्याच्या बाजूस एक पाण्याचे टाके बघावयास मिळते तसेच त्याच्या शेजारी अजून एक पाण्याचे टाके बघावयास मिळते त्या टाक्यावर एक ब्राम्ही शिलालेख आपल्याला पहावयास मिळतो तो शिलालेख पुढीलप्रमाणे:- 


'समादिनिका महाभोजा मामदवी महारथीनी अपादेवंका'

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

“महाभोयची कन्या, आपदेवणक याची पत्नी महादेवी महारथीनी सामदिनिका हिची ही पुण्यकारक देणगी आहे”.

या पाण्याच्या टाक्याच्या शेजारी एक स्तूप बांधलेला असून त्या स्तूपाच्या मागे एक ब्राम्ही शिलालेख कोरलेला आपल्याला पहायला मिळतो तो शिलालेख पुढीलप्रमाणे:- 


' थूप अरनक पेडपट्टीका गोभूती मारकुडा अमतेवासीन असलमिता '

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

“मारकुडवर रहाणाऱ्या, भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूतीचा हा आषाढमित्र भट्टाने बाांधलेला स्तूप आहे”. या शिलालेखावरून असे समजते कि बेडसे लेणीचे पूर्वीचे नाव 'मारकुड' असे होते. 

या स्तूपाच्या शेजारी वर जाण्यासाठी काही पावट्या खोदायचा प्रयत्न केलेला दिसतो तसेच फिरून परत आपण चैत्यागृहाच्या समोर उभे ठाकतो. या चैत्यागृहाच्या उजव्या बाजूस आपल्याला एक सुंदर खोली पहायला मिळते तसेच या खोलीला चिटकून एकसंधपणे सुंदर विहार कोरलेले आहे. बेडसे येथील विहार हे गजपृष्ठाकार आहे. या विहारमध्येच जवळपास अकरा खोल्या खोदलेल्या असून त्यांच्यावर सुंदर कोरीव काम केले आहे तसेच या खोल्यांमध्ये झोपायला बाक देखील आहेत. या विहाराच्या उजव्या बाजूस देखील दोन जोड खोल्या खोदलेल्या दिसतात. तसेच विहाराच्या उजव्या बाजूने साधारण ५० फुट उंच गेल्यास दोन छोट्या लेण्या खोदल्या आहेत परंतु त्यामध्ये कोणत्याही सुविधा दिसत नाहीत. संपूर्ण लेणे नीट बघितले असता भिक्षुंसाठी अध्ययन आणि अध्यापनासाठी इथे बऱ्याच सोयी केलेल्या आहेत असे पहावयास मिळते.


लेण्यांचा थोडासा मागोवा घेतला तर बेडसेची लेणी ही ख्रिस्तपूर्व १ ले शतकात बांधलेली आहे. भाजे लेण्यामधून बेडसे लेण्यामध्ये जाण्यासाठी ' विसापूर किल्याचा ' वापर होत असे हे विसापूर किल्याच्या पाण्याच्या टाक्यांमधील शिलालेखांवरून समजते. तसेच ह्या लेण्यांसंबंधी एक अत्यंत वाईट घटना जी घडली ती घटना ' सह्याद्री ' या कै. स.आ. जोगळेकर यांच्या ग्रंथात त्यांनी १७९ पानावर नमूद केली आहे ती पुढीलप्रमाणे:-

"इ.स. १८६१ सालापर्यंत बेडसे येथील चैत्याचे छत व स्तंभांवर बुद्ध व त्याचे साठी सेवक यांची चित्रे रंगवलेली होती. कोणी बडे इंग्रज अधिकारी ही लेणी पहायला येणार म्हणून स्थानिक इंग्रज अधिकाऱ्याने रंगीत खरपुड्या खरवडून काढल्या आणि सारा भाग सफेदीचा हात देऊन स्वच्छ केला. संपूर्ण लेण्याचीच सफाई झाली. एका प्राचीन मौलिक ठेव्याला आपण मुकलो." याचा अर्थ असा कि अजिंठ्या सारखी रंगीत चित्रे या लेणीमध्ये देखील होती परंतु अधिकारी येणार म्हणून संपूर्ण लेणी गिलाव्याने रंगवली गेली आणि महत्वाच्या पुराव्यांना आजही आपण मुकत आहोत. 


बेडसे लेणीचा परिसर अत्यंत हिरवागार आहे या 'सुमती डोंगरावर' सागाची भरपूर झाडे आढळतात. तसेच कांचनाची झाडे आणि रुई देखील विपुल प्रमाणावर आढळते. भर पावसामध्ये या लेण्यांच्या परिसरातील हिरवाई आकर्षक असते. कार्ले-भाजे-कोंडाणे या लेण्या बघायला खूप सारे भटके येतात पण बेडसे लेणी ही मात्र तशी उपेक्षितच राहते म्हणूनच या उपेक्षित 'बेडसे लेणीची' निरव शांतता मनाला हवीहवीशी वाटते.   

_____________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) Cave Temples of India:- James Burges and James Fergusson. 1880.
२) लेणी महाराष्ट्राची:- दाउद दळवी.
३) Report on Bedse Caves:- James burges.

कसे जाल:-

पुणे - चांदणी चौक - हिंजेवाडी - तळेगाव - कामशेत - बेडसे.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा   

Comments

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

Popular posts from this blog

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'