पुण्यनगरीमधील कलात्मक शिल्प मंदिर 'त्रिशुंड गणपती'


महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांच्या प्रदेशात अनेक लहानमोठ्या गावांमध्ये असलेली प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राचे वेगळेपण दर्शवतात. महाराष्ट्रातील ही प्राचीन मंदिरे आपल्याला अनेक लहान मोठ्या गावांमध्ये बघायला मिळतात. ही  मंदिरे जणू या गावांचा इतिहास सांगत आजही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला आपला प्राचीन इतिहास सांगत असतात आणि इतिहासाच्या पाउलखुणा जपत असतात तसेच संस्कृती देखील टिकवून ठेवण्यास मदत करतात.  अश्याच जुन्या मंदिरांपैकी एक सुंदर शिल्पांनी अलंकृत असलेले एक सुंदर मंदिर पुणे शहराच्या भरवस्तीत वसलेले आहे.

पुणे हि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तसेच पुणे हे मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या पुण्याच्या परिसरात अशी बरीच छोटी मोठी असंख्य राउळे आपल्याला बघायला मिळतात यातील काही मंदिरे हि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत अश्याच वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक संपूर्ण कातळात केलेले कोरीव काम असणारे आणि १७ व्या शतकाची ओळख जपणारे एक ऐतिहासिक 'त्रिशुंड गणपती' मंदिर पुण्यातील सोमवार पेठेमध्ये भरवस्तीमध्ये आजही मोठ्या दिमाखात उभे आहे.

त्रिशुंड गणपती मंदिर.

त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यात राहूनही बऱ्याचश्या लोकांना आजही परिचित नाही. उत्तर पेशवाई मधील हे सुंदर मंदिर म्हणजे जणू शिल्पांचा खजिनाच. मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेली हि अलंकृत शिल्पे आणि वैशिष्ट्यपूर्ण तीन सोंडा असलेली गणेश मूर्ती आपले डोळे दिपवून टाकतात. जणू काही आपण एखादे सुंदर लेणे बघत आहोत कि काय असा आपल्याला भास होतो इतक्या सुंदर पद्धतीमध्ये त्रिशुंड गणपती मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वार अलंकृत केलेले आहे.

भैरवाचे शिल्प.

त्रिशुंड मंदिराला भेट द्यायची असल्यास नव्या पुलाकडून साततोटी पोलीस चौकी शेजारून जो रस्ता कमला नेहरू हॉस्पिटल कडे जातो तेथे जाऊन रस्त्यामध्ये एक पार लागतो या पाराशेजारून उजवीकडे वळले असता थेट आपल्याला त्रिशुंड गणपती मंदिराच्या समोर नेऊन उभा करतो. भरवस्तीत असलेले हे शिल्पजडित मंदिर आपल्या मनाला मोहिनी घालते. या मंदिराच्या परिसरात आजूबाजूला असणाऱ्या इमारती मंदिराच्या सौंदऱ्याला बाधा आणतात. मंदिराच्या अगदीच जवळ जवळ इमारती असल्यामुळे त्रिशुंड गणपतीचे मंदिर झाकोळून गेलेले आहे तरीही ह्या संपूर्ण मंदिराची रचना या सगळ्यात उठून दिसते.

मंदिरावरील कृष्ण.

पुरुषभर उंच असलेले मंदिराचे जोते आणि त्याच्यावर उभे केलेले पूर्वाभिमुख मंदिर खरोखरच देखणे आहे. या जोत्यावर पुणे महानगर पालिकेने एक माहितीदर्शक फलक उभे केलेले आहे. मंदिराच्या बह्याभागावर नजर फिरवली असता काही शिल्प आपल्याला अक्षरशः खुणावतात. यामध्ये एक बंदुकधारी इंग्रज शिपाई याने गेंड्याला साखळदंडाने पकडून ठेवलेले आहे हे शिल्प पहिले असता त्याकाळातील परिस्थितीचे वर्णन केलेले आपल्याला या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पातून दिसून येते. शिल्पातील वर्णन दुसरे तिसरे काही नसून प्लासीच्या लढाई मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने लॉर्ड क्लाइव्ह याच्या नेतृत्वाखाली बंगाल आणि आसाम या प्रदेशावर कब्जा मिळवला तीच ईस्ट इंडिया कंपनी येथील राज्यकर्ती झाली याकडे लक्ष वेधले आहे. अश्याच पद्धती मध्ये उजव्या बाजूच्या भिंतीवर देखील हेच शिल्प कोरलेले आपल्याला दिसते.

प्लासीची लढाई याचे शिल्प.

या शिल्पांमध्ये गेंड्याला ज्या साखळदंडाने बांधलेले आहे ते साखळदंड अतिशय सूक्ष्म रित्या कोरलेले आपल्याला बघावयास मिळतात. तसेच दोन्ही बाजुंच्या खालच्या शिल्पपटात एकमेकांशी झुंजणारे हत्ती कोरण्यात आलेले आहेत. हे हत्ती म्हणजे महाराष्ट्रातील सत्तांचे प्रतिक होय. वरील शिल्पपटातील इंग्रजांच्या वेशभूषा बंदुका अगदी हुबेहूब कोरलेल्या आहेत. हे संपूर्ण शिल्पपट बऱ्याचश्या तत्कालीन गोष्टींचा इतिहास आपल्याला सांगून जाते.

भैरव शिल्प.

त्रिशुंड गणपतीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल कोरलेले आहेत हे द्वारपाल अत्यंत देखणे आहेत. द्वारपालांच्या बाजूला दोन खांब अत्यंत सुबकरित्या कोरलेले आहेत या खांबांवर असलेल्या घंटा आणि त्यांच्यावर केलेले घट-पल्लव शिल्पकाम नजर भारावून टाकते. तसेच मंदिराच्या कोनाड्यां मधील शिल्पे देखील नजरेत भरतात. प्रवेशद्वाराच्या वरती गणेशपट्टीका कोरलेली असून त्यावरील गणेशाची सुबक मूर्ती कोरलेली आहे. या गणेशपट्टीकेच्यावर दोन बाजूंना दोन हत्ती असणारे गजलक्ष्मी सुंदर रित्या कोरलेली आहे. हे शिल्प आपल्या डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. 

या गजलक्ष्मीच्या शिल्पाच्या वरच्या बाजूस आपल्याला शेषशाही विष्णू कोरलेला बघायला मिळतो. या शेषशाही विष्णूच्या महिरपिच्या बाजूस कोरलेली माकडे आणि पोपट अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि बारीक नजरेने कोरलेली आपल्याला दिसतात. या शिल्पांच्या वर आपल्याला दशअवतार , यक्ष तसेच किन्नर देखील बघायला मिळतात. अश्या पद्धतीत वरच्या बाजूस केलेले कोरीव काम डोळे दिपवून टाकते अत्यंत बारीक गोष्टी या कारागिराने टिपलेल्या आपल्याला पहावयास मिळतात.

मंदिरावरील द्वारपाल.

एखाद्या लेण्याप्रमाणे कोरलेले हे मंदिर मनाला भुरळ घालते. या मंदिराच्या शिल्पपटात काही शिल्प हि बघण्यासारखी आहेत त्यापैकी एक शिल्प हे  लिंगोद्भव रूप असून या शिल्पामध्ये शिव अग्नीस्तंभाच्या रूपात प्रकटतात तेव्हा ब्रह्मदेव हंसरूपाने व विष्णू वराहरूपाने त्या अग्नीस्तंभाचा आदिअंत शोधायचा अयशस्वी प्रयत्न करतात, हि  आख्यायिका  या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला  कोरलेली दिसते. या मंदिरात एक पुरुषाकृती कोरलेली असून तिच्याभोवती दोन स्त्रिया आहेत हे सुंदर शृंगारिक शिल्प लक्ष वेधून घेते. 


लिंगोद्भव रूप  असलेले शिल्प.

नटराज शिल्प.

इंदूर येथे असलेल्या धामापूर या गावातील संपन्न गोसावी भिमगिरजी यांनी या सुंदर मंदिराचे बांधकाम इ.स. १७५४ मध्ये पूर्ण केले संपूर्ण दगडात उभारलेल्या या मंदिराचा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून राजस्थानी वास्तुशैलीचा मंदिर उभारणीसाठी उपयोग केला गेला असल्याचे दिसून येते. पेशव्यांच्या कालखंडात बांधेलेले हे सुंदर मंदिर संपूर्ण दगडात उभे केलेले आहे या मंदिरामध्ये कोठेही आपल्याला लाकडी कलाकुसर असलेले खांब बघावयास मिळत नाही. मंदिराचा सभामंडप देखिल सुंदर बांधून काढलेला आहे. सभा मंडपातून आत गेले असता छोटेसे अंतराळ कोरून काढलेले आपल्याला बघावयास मिळतात मंदिराच्या आतील बाजूस कमानीवर आपल्याला दोन शिलालेख पहावयास मिळतात ते शिलालेख पुढीलप्रमाणे:-

पुण्यनगरी पुरी
|| श्री गणेशाय नम: ||श्री||
|| सरस्वत्यै नम: ||श्रीगुरु ||
|| दक्षिणामुर्तये नम:||स||
|| संवत्  १८०१ तथा नृपशाली |
 || वाहन शके १६७६ भावाना | 
|| म संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल
||  सौम्यवासरे शुभवेला ||
|| यां अस्य स्थाने श्री महका ||
|| ल रामेश्वर प्रतिष्ठीतं सु  ||
|| तिष्ठीतमस्तु || श्री देवदत्त ||
|| इह स्छान शुभं भवतु श्रीरस्तु  

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

हे मंदिर रामेश्वर शिवाचे असून याची स्थापना विक्रम संवत् १८०१ या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबर १७५४ या दिवशी करण्यात आली.असे या शिलालेखात सांगितलेले आपल्याला बघायला मिळते.

मंदिराच्या आतील शिलालेख.

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-


|| श्री गुरुदेव ||
|| दत्त ||
|| श्री गणेशाय नम: महेशा ||
|| त्रापारो देव महिम्नो नाप ||
|| रा स्तुती: || अघोरात्रापारो ||
|| मंत्रो नास्ति तत्वं गुरोः परं ||
|| जयंती मंगला | काली भद्र 
|| काली कपालिनी || दुर्गा 
|| क्षमा शिव धात्री स्वाहा 
|| स्वधा नमोस्तु ते || सर्व मंग
|| ल मांगल्ये शिवे सर्वार्थसा 
|| धके || शरण्ये त्र्यंबके गौ 
|| री नारायणी नमोस्तु ते ||
|| यत्र योगेश्वर: कृत्सनो यत्र पा 
|| र्थो धनुर्धरः || तत्र श्रीर्विजयो
||भूतिर्धृवा नी नीतिर्मतिर्मम ||   

तसेच या मंदीरात एक फारसी शिलालेख देखील बघावयास मिळतो.  तो फारसी शिलालेख पुढीलप्रमाणे:-

१) ई मकान गुरुदेवदत्
२) फुकरा की तारीख हफ्तुम
३) शहर जूकअद रोज चहार श्बदेह  
४) सनह ११६७ तश्मीर नमूद शुद 

शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

हे घर फकीर गुरुदेव दत्त यांचे असून २६ ऑगस्ट १७५४  हि तारीख यामध्ये बघायला आपणास मिळते. हे शिलालेख आजही चांगल्या अवस्थेमध्ये असून त्यांच्यावरची अक्षरे आपल्याला ठळकपणे वाचता येतात.


मंदिराचे देवकोष्ठ.

त्रिशुंड गणपती मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस काही कोरीव काम आपल्याला बघावयास मिळत नाही. मंदिराच्या पश्चिमेस आणि उत्तरेस आपल्याला सुंदर देवकोष्ठे पहावयास मिळतात. या देवकोष्ठ्यात आपल्याला ' नटराजाची मूर्ती ' पहावयास मिळते तर दुसऱ्या देवकोष्ठ्यात ' लिंगोद्भव रुप ' आपल्याला पहावयास मिळते तसेच गाभाऱ्याच्या पश्चिमेस असलेल्या देवकोष्ठ्यात ' चतुर्भुज भैरवाची ' मूर्ती पहावयास मिळते. मंदिराच्या उंबऱ्यामधील कीर्तिमुख अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.

सभामंडप द्वारशाखा.

द्वारशाखेवरील शंकराचे शिल्प.

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली गणेश मूर्ती अत्यंत सुंदर आहे ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य  म्हणजे या गणेशमूर्तीला एक मुख, तीन सोंडा, सहा हात आणि मोरावर आरूढ असलेली हि सुंदर मूर्ती नेत्रदीपक आहे. हि मूर्ती संपूर्ण शेंदुर्चर्चीत आहे या मूर्तीमध्ये शेजारी रिद्धी देखील बसलेली दाखवली आहे. या गणेशमूर्तीला तीन सोंडा दाखवल्या असून एक सोंड हि मोदकपात्रास स्पर्श करताना दिसते, दुसरी सोंड हि पोटावर रुळताना दिसते तिसरी सोंड हि रिद्धीच्या हनुवटीवर आहे असे आपल्याला दिसून येते. या सुबक गणेशमूर्तीस सहा हात असून वरच्या बाजूच्या डाव्या हातात परशु धरलेला आपल्याला दिसतो, खालच्या उजव्या हाताकडे पाहिले असता मोदकपात्र धरलेले आपल्या पहावयास मिळते, मधल्या उजव्या हातामध्ये शूल बघायला मिळते, वरच्या उजव्या हातामध्ये अंकुश बघायला मिळतो, मधल्या डाव्या हातामध्ये पाश बघायला मिळतो, तसेच खालचा डाव्या हाताने डाव्या बाजूच्या मांडीवर बसलेल्या रिद्धीला आधार दिलेला आपल्याला पहावयास मिळतो. अशी हि सुंदर गणेशमूर्ती अक्षरशः भुरळ पाडते.

मंदिराची गणेशपट्टी.

त्रिशुंड गणपती मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या त्रिशुंड गणपतीच्या मूर्ती खाली असलेले तळघर. या मंदिराच्या तळघरात श्री दत्तगुरू गोसावी यांची समाधी आहे. तसेच या गणेशमूर्तीचा अभिषेक केला  जातो तेव्हा या मुर्तीवारचे पाणी या समाधी वर पडते. तसेच या तळघराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या तळघरात एक जिवंत पाण्याचा झरा आहे वर्षाचे १२ महिने ह्या झऱ्यामधील पाणी हे या तळघरात साठत राहते. हे तळघर साधारणपणे ५ मीटर खोल आहे. हे तळघर इतर दिवशी कधीही उघडे नसते ते फक्त गुरुपौर्णीमेला उघडले जाते तेव्हा तळघरातील समाधीचे दर्शन घेता येते. या सुंदर गणेश मंदिरामध्ये गणेशमूर्तीच्या पाठीमागच्या बाजूच्या भिंतीमध्ये गणेशयंत्र देखील कोरलेले आपल्याला पाहायला मिळते.

त्रिशुंड गणपती आणि मागे शेषशायी विष्णू.

अत्यंत सुंदर आणि शिल्पाअलंकृत असलेला हा ठेवा आपण नक्कीच जपायला हवा इथली शिल्प हि या मंदिराची शोभा द्विगुणीत करतात इतके वैशिष्ट्यपूर्ण मंदिर महाराष्ट्रामध्ये सापडणे फारच दुर्मिळ आहे. अश्या या ऐतिहासिक त्रिशुंड मंदिराचा हा वारसा पुण्यातील आणि बाहेरच्या लोकांनी नक्की जाऊन बघावा असा आहे.

गजव्याल शिल्प. 
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ-
१) मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात – श्री. महेश तेंडूलकर.


कसे जाल:-
पुणे(शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन) – सोमवार पेठ

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा   

3 comments:

  1. मागील वेळेस धावती भेट झाली होती. आता तर हे स्थळ नक्की बघेल.

    ReplyDelete
  2. khup chan ahe he ganpati mandir ani background madhi je song ahe te khup chan vatle thank you for information

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage