नाशिक येथील ' दुधसागर ' धबधबा

महाराष्ट्रामध्ये जसे किल्ले, किल्ले, लेण्या, मंदिरे याचा जसा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच भौगोलिक वारसा देखील लाभला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक वारसा पाहायचा असेल तर थोड्या आडवाटेवर फिरस्ती करत आजूबाजूचा भूप्रदेश न्याहाळला पाहिजे अश्याच छोट्या मोठ्या आडवाटेवर निसर्गातील बऱ्याच गोष्टी त्यांचे अस्तित्व टिकवून उभ्या असतात या अश्याच नैसर्गिक आणि भौगोलिक गोष्टी आपले लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतात.

ह्या नैसर्गिक आणि भौगोलिक गोष्टी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आजूबाजूच्या परिसरातील धबधबे, नदीचा डोह, रांजण खळगे, नैसर्गिक गुहा, गरम पाण्याचे झरे अश्या वेगवेगळ्या भौगोलिक वारसा समृद्धीने महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून येते. असाच एक भौगोलिक महत्व असलेला 'दुधसागर' धबधबा हा गोदावरी नदीच्या प्रवाहामुळे नाशिक येथे तयार झाला आहे.

नाशिक शहर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शहर. नाशिक शहराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या आजूबाजूला असणारी उत्तुंग गिरीशिखरे, लेण्या, मंदिरे आणि किल्ले याबरोबर काही भौगोलिक आश्चर्ये या नशिक शहराच्या परिसरात आहे. असाच एक नैसर्गिक 'दुधसागर धबधबा' हा नाशिक जवळील सोमेश्वर या मंदिराच्या परिसरात आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे 'सोमेश्वर शिवालय' आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत रम्य आहे.

फेसाळणारा 'दुधसागर धबधबा'

नाशिक शहरापासून साधारणपणे ८ किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रामध्ये हा दुधसागर धबधबा गोदावरी नदीच्या प्रवाहामुळे तयार झाला आहे. या धबधब्याचे वर्षाचे १२ महिने दुधासारखे फेसाळणारे पाणी असल्यामुळे या धबधब्याचे नाव ' दुधसागर ' असे पडले आहे. साधारणपणे आडवा ४० फुट लांब पसरलेला हा धबधबा अत्यंत सुंदर आहे. या धबधब्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात तयार झालेले रांजण खळगे आपल्याला बघायला मिळतात.

या धबधब्याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या धबधब्याच्या ओघामुळे गोदावरी नदीमधून मोठे मोठे लाल निळ्या चंदेरी रंगांचे सुंदर मासे वाहत येताना दिसतात आणि ते मासे या धबधब्याच्या ओघात आजूबाजूला उद्या मारताना पाहायला मिळतात. गोदावरी नदीच्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे दुधसागर धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सोमेश्वर मंदिरापासून या दुधसागर धबधब्याकडे जायला सुंदर वाट आपले मनमोहवून टाकते. दुधासारखा फेसाळत वाहणारा सोमेश्‍वर येथील ' दुधसागर धबधबा ' आपल्या निसर्गसौंदर्याकरिता नाशिककरांमध्ये  प्रसिद्ध आहे.

या सुंदर दुधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या देखील उभारल्या आहेत अश्या या धबधब्याजवळ जाताना व्यवस्थित काळजीपूर्वक जाणे आणि स्वतःची संपूर्ण काळजी घेणे नक्कीच आवश्यक आहे. अश्या या नैसर्गिक दुधसागर धबधब्याचा परिसर पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करतो. नाशिक परिसरात सफर करायला कधी गेलात तर हा दुधसागर धबधबा साद घालत वर्षानुवर्षे भटक्यांची आणि पर्यटकांची वाट पहात उभा आहे.
_______________________________________________________________

कसे जाल :-

पुणे- चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव - आळेफाटा - संगमनेर - सिन्नर  नाशिक  सोमेश्वर.
_______________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 
लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

Comments

Popular posts from this blog

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

अंधेरी येथील भौगोलिक आश्चर्य 'गिल्बर्ट हिल'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'