किल्ल्ले, लेणी, मंदिरे यांमध्ये सापडणारे वैशिष्ट्यपूर्ण ' गणपती '


आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन दैवते जास्त लोकप्रिय आहेत एक म्हणजे महादेव आणि दुसरा याच शिवकुळामधील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत म्हणजे गणपती संपूर्ण महाराष्ट्रात या देवतांचा अधिवास हा महाराष्ट्रातील किल्ले आणि शिखरांवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रतनगड, हडसर, सिंदोळा, राजगड, धोडप, हरिश्चंद्रगड, तुंग, संतोषगड अश्या विविध किल्यांवर या गड-किल्यांवर गणपती ही देवता पहावयास मिळते तसेच गणपती देवता आपल्याला विविध रूपामध्ये देखील आढळते. याच वेगवेगळ्या किल्यांवर, लेणी, मंदिरे, यांमध्ये वेगवेगळ्या रुपात आढळणाऱ्या गणपतींचा घेतलेला हा आढावा.  

संपूर्ण भारतामध्ये पूजनीय मानल्या जाणाऱ्या 'गणपती' या देवतेची उपासना प्राचीन काळापासून केली जाते परंतु गणपती हि देवता आपल्याला प्रतिमारुपात आणि शिलालेखीय पुरावे या रुपामध्ये साधारणपणे इ.स. ४ थ्या किंवा ५ व्या शतकापासून सापडते. गणपतीच्या प्रतिमा या आपल्याला गुप्तकाळापासून  सापडण्यास सुरुवात होते. असे विविध कालखंडात गणपतीचे पुरावे आपल्याला मिळतात आणि हजार वर्षांचा प्रवास देखील बघायला मिळतो. अशी हि गणपती देवता सगळ्यांचीच लाडकी देवता आहे. महाराष्ट्रामध्ये या देवतेचे महत्व देखील मोठे आहे. असेच काही वैशिष्ट्यपूर्ण गणपती हे आपल्याला काही किल्यांवर देखील आढळतात.    

महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव हा एक मोठा उत्सव आहे. नुकताच श्रावण संपलेला असतो संपूर्ण निसर्ग हिरवाईने बहरलेला असतो आणि श्रावण संपताना सगळ्यांना वेध लागतात ते आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे जसे जसे गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात तशी तशी थोऱ्या - छोट्यांबरोबर सर्वजण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताला सज्ज होतात. संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण हे गणपती बाप्पामय झालेले असते या गणपती बापाची अशीच विविध रूपे अनुभावयाची असतील तर महाराष्ट्रातील दऱ्या डोंगरात भटकंती नक्कीच करायला हवी.

निसर्गसंपन्न महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गड-किल्यांवर तसेच सह्याद्रीच्या कपारींमध्ये म्हणजेच एखाद्या गुहेमध्ये 'गणपती' विराजमान आहेत.  ह्या सुंदर गणेशमूर्ती आपल्याला कधी एखाद्या घाटात तर कधी एखाद्या झाडाखाली तर कधी किल्याच्या दरवाजावर किंवा एखाद्या गुहेच्या पट्टीवर अश्या विविध रुपात गणेशाच्या या मूर्ती आपल्याला बघावयास मिळतात. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्ती बऱ्याचदा वेगवेगळ्या कालावधीत कोरलेल्या असून प्रत्येक गणेशमूर्तींच्या हातात वेगवेगळी शस्त्र बघायला मिळतात.

प्रसिद्ध गणपतीची स्थाने सर्वांना परिचित असतात परंतु आडवाटेवर असलेले हे गणपती नेहमीच आपल्या मनाला भावतात. अश्या आडवाटा धुंडाळताना किल्यांवर वसलेले हे गणपती हे एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला भासतात. असे विविध गड आणि किल्यांवर असलेले गणपती मनाला भावतात तिथे मिळणारी निरव शांतता मनाला एका वेगळ्या भावविश्वात आपल्याला  घेऊन जाते. घरांमध्ये किंवा मंडळांमध्ये पूजला जाणारा गणपती हा गडकिल्यांवर मात्र वेगवेळ्या रुपात आपल्याला बघायला मिळतो. अश्या या गडकिल्यांवर असणाऱ्या गणपतींचे दर्शन घ्यायचे असेल तर एखाद्या दुर्गम किल्याला या गणपती मध्ये नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. चला तर मग महाराष्ट्रातील दुर्लक्षित किल्यांवर वर्षानुवर्षे विराजमान असलेल्या गणपतींच्या भेटीला..!!!

१) राजगड किल्यावरील प्रसिद्ध सुवेळा माचीमध्ये स्थानापन्न असलेला गणपती:-

स्वराज्याची २२ वर्षे राजधानी असलेला राजगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या राजगडाच्या ज्या प्रसिद्ध असलेल्या तीन माच्या आहेत त्यातील सुवेळा माचीच्या तटामध्ये हा गणपती विराजमान आहे या गणपतीच्या वरच्या डाव्या हातामध्ये परशु दिसून येतो तर वरच्या उजव्या बाजूच्या हातामध्ये देखील परशु आपल्याला बघायला मिळतो. हे परशु कानामागे लपलेले दिसते. खालच्या बाजूचा डावा हात रिकामा असून मुद्राअवस्थेत पाहायला मिळतो आणि उजव्या हातामध्ये मोदक धरलेला असून तो सोंडेने पकडलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा गणपती एका शिळेमध्ये कोरून एका कोनाड्यात बसवलेला आपल्याला पहावयास मिळतो.


२) सह्याद्रीच्या रत्नांपैकी एक रतनगड किल्याच्या हनुमान दरवाज्यावर विराजमान असलेला गणपती:-

सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील रतनगड हा किल्ला म्हणजे जणू सह्याद्रीचे रत्न. निसर्गाने नटलेला सर्वांगसुंदरअसलेल्या या किल्याच्या हनुमान दरवाज्यावर एक सुंदर गणेशमूर्ती कोरलेली आपल्याला पहावयास मिळते. हि गणेशमूर्ती दरवाज्याच्या उजव्या बाजूस असून ह्या गणेशमूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूस रिद्धीआणि सिद्धी बघायला मिळतात अशी मूर्ती बाकी कोणत्याही गडावर आढळून येत नाही.


३) देखण्या कोरीगड किल्यावरील लेण्यामध्ये कोरलेला गणपती:-

लोणावळा आणि खंडाळा हि पुणेकर आणि मुंबईकरांची आवडती ठिकाणे पावसाळ्यात भिजायला असो किंवा विकेंड आला कि जवळपास भटकायला आवडते ठिकाण म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. याच लोणावळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर कोरीगड नावाचा एक देखणा किल्ला असून या किल्याच्या पेठ शहापूर गावातून जाणाऱ्या वाटेवर निम्या वाटेत एक कोरलेली लेणी आपल्याला पाहायला मिळते या लेणीमध्ये विराजमान झालेला गणपती लक्ष वेधून घेतो. हि गणपती मूर्ती अगदी देखणी आहे. या गणपतीच्या डोक्यावरील मुकुट बघण्यासारखा असून या कोरीव गणपतीच्या वरच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही हातामध्ये परशु आपल्याला बघायला मिळतात तसेच खालचा उजवा हात आशिर्वाद देणारा असून डाव्या हातामध्ये मोदक पहावयास मिळतो.


४) सातारा जिल्ह्यातील चंदन वंदन या जुळ्याकिल्यांपैकी वंदन किल्याच्या दारावरील श्रीगणेश:- 

स्वराज्याची तिसरी राजधानी असलेले सातारा हे ऐतिहासिक शहर या सातारा शहराच्या आजूबाजूला अनेक दुर्गम किल्ले उभे आहेत सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर दोन जुळे बलाढ्य आणि दुर्गम किल्ले लपलेले आहेत त्यांची नावे अनुक्रमे चंदन आणि वंदन अशी असून यातील वंदन किल्याचा दरवाजा आजही चांगल्या स्थितीमध्ये शाबूत असून त्याच्यावर गणपती विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वंदन किल्यावरील या गणपतीचे हे सुंदर शिल्प रंगविण्यात आले आहे. वंदन किल्यावरील हि मूर्ती पहिली असता या मूर्तीच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशु आणि डाव्या हातामध्ये डमरू आपल्याला पहावयास मिळतो. तर खालचा डावा हात मांडीवर ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. तर उजवा हात हा सोंडेला चिकटलेला असून उजवा पाय वर उचलेला आहे असे आपल्याला दिसते.


५)  सातमाळा डोंगररांगेतील बलाढ्य धोडप किल्याच्या पाण्याच्या टाक्यावर विराजमान गणपती:-

सातमाळा डोंगररांग ही महाराष्ट्रातील एक अजस्त्र डोंगर रांगापैकी एक डोंगररांग या डोंगररांगेमध्ये एका पेक्षा एक सरस किल्ले उभारले गेले या किल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे धोडप किल्ला. सातमाळा डोंगररांगेतील सर्वात उंच शिखर असलेला धोडप किल्यावर गणेश टाके नावाचे पाण्याचे टाके असून या पाण्याच्या टाक्यावर मधोमध गणपती उत्कृष्टरित्या कोरलेला  आपल्याला बघायला मिळतो. ह्या गणपतीच्या डाव्या आणि उजव्या वरच्या दोन्ही हातांमध्ये आपल्याला परशु दिसून येतात आणि खालील डाव्या हातामध्ये मोदक दिसून येतो आणि उजवा हात मांडीवर ठेवलेला आपल्याला पहावयास मिळतो.


६) पर्वत उर्फ हडसर किल्यावरील देखणी गणेश मूर्ती:- 

जुन्नर हे नाव घेतले कि पहिले नाव समोर येते ते शिवनेरी किल्याचे आणि शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे या शिवनेरी किल्याच्या प्रभावळीमध्ये अनेक जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी यांसारखे  बलाढ्य किल्ले उभारले गेले यातील हडसर हा किल्ला शिवनेरी किल्यापासून अगदी जवळ असणारा परंतु भक्कम किल्ला या किल्याच्या शिखरावर जे शंकराचे मंदिर आहे त्या मंदिराच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणपतीचे शिल्प बघायला मिळते. चतुर्भुज असलेली हि मूर्ती देखणी आहे. या मूर्तीच्या डाव्या वरच्या हातामध्ये परशु आणि उजव्या हातामध्ये देखील परशु बघायला मिळतो तसेच डावा हात हा डाव्या मांडीवर ठेवलेला आढळतो आणि उजव्या हातातील मोदक सोंडेने खाताना आपल्याला दिसते या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या चारही हात, पाय, आणि मुकुटावर माळांची नक्षी आपल्याला बघावयास मिळते. तसेच डोक्यावर नागाचा फणा देखील कोरण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो.


७) निसर्गसंपन्न राजमाचीवरील धान्यकोठाराच्या  पट्टीवर कोरलेला गणपती:-

राजमाची हे नाव कोणाला माहिती नाही अगदी प्राचीन काळापासून बोरघाट आणि परिसरावर लक्ष ठेवणारा हा सुंदर किल्ला आजही भटक्यांचे भटकंतीचे लाडके ठिकाण आहे या प्राचीन किल्याच्या मध्यावर काही धान्य कोठारे असून यातील एका धान्य कोठाऱ्याच्या पट्टीवर सुंदर गणपती कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. शिल्प जुने झाल्यामुळे त्या गणेश मूर्तीवरील अलंकार फारसे दिसते नाहीत तसेच शस्त्रेही फारसे समजून येत नाही.  


८) दुर्लक्षित सिंदोळा किल्याच्या बुरुजावरील गणपती:-

जुन्नर तालुका म्हणजे निसर्गाने संपन्न असलेल्या तालुक्यांपैकी एक अश्यातच त्याला साथ मिळाली ती इतिहासाची प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यात सिंदोळा नावाचा एक सुंदर दुर्लक्षित किल्ला लपलेला आहे या किल्याचे ठिकाण अगदी माळशेज घाटाच्या डोक्यावर असून या किल्याच्या बुरुजामध्ये गणपती विराजमान आहेत. अश्या या सुंदर ठिकाणी आपले वास्तव्य करून बसलेल्या गणरायासमोर आजही गावातील मंडळी दिवा बत्ती करते. अश्या आडवाटेवर वास्तव्य करून असलेले गणराय किल्याच्या भग्न दरवाजामधून आतमध्ये जाताच दर्शन देतात अश्या अचानक दर्शनाने आलेला थकवा मात्र विसरायला हे गणरायाचे शिल्प नक्कीच भाग पाडते.


९) महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन नाणेघाट या घाटवाटेवरील गुहेमध्ये स्थानापन्न असलेला गणपती:-

जुन्नर या प्राचीन आर्थिक राजधानी पासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राचीन नाणेघाटाच्या सुरुवातीला एक छोटी गुहा असून या गुहेमध्ये गणपती वास्तव्य करून आहेत. आजही हा प्राचीन नाणेघाट लोक देशामधून कोकणात जाण्यायेण्यासाठी वापरतात या घाटाच्या सुरुवातीला असलेल्या गुहेतील हा गणपती जरा ओबडधोबड रुपामध्ये आपल्याला दिसून येतो. जास्त घडीव मूर्ती नसल्याने ह्या मूर्ती मधले शस्त्र आणि अलंकार पटकन ओळखू येत नाही परंतु प्राचीन घाटवाटेवर आढळणाऱ्या या गणपती बाप्पांचे दर्शन मात्र मनाला सुखावून जाते.      


१०) मावळातील पहारेकरी उत्तुंग असलेल्या तुंग किल्यावरील गणपती:-  

लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना  हे किल्ले सर्व भटक्यांमध्ये सर्वश्रुत असलेले किल्ले अश्याच मावळ भागावर नजर ठेवणाऱ्या प्रसिद्ध किल्यांपैकी तुंग किल्यावर गणपती मंदिर आपल्याला आढळते. सुंदर दगडी मंदिरात गणपतीची ओबडधोबड असलेली मूर्ती मात्र चांगला घडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. या घडीव मूर्तीमध्ये गणपतीचा आकार आपल्याला समजून येतो परंतु आपल्याला शस्त्र आणि अलंकार ओळखू येत नाही अत्यंत सुंदर दगडी मंदिरात असलेली हि मूर्ती मात्र चित्त वेधून घेते.


११) भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिरातील गणपती:-  

भोरगिरी महाराष्ट्रातील एक सुंदर आणि निसर्गरम्य गाव. या गावामधील छोटेखानी भोरगिरी किल्ला हा भटक्यांच्या आवडता किल्ला. राजगुरुनगर येथून जाणारा रस्ता वाडामार्गे थेट आपल्याला भोरगिरी या शेवटच्या गावामध्ये नेऊन पोहचवतो. डोंगरभटक्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या भोरगिरी ते भीमाशंकर या भटकंतीची सुरुवात या भोरगिरी किल्यापासून होते. याच गावात भीमा नदीच्या काठाशी कोटेश्वर नावाचे मंदिर आहे हे मंदिर साधारणपणे ९ व्या १० व्या शतकातील असावे असे तेथील अवशेषांवरून आपल्याला दिसते. याच 'कोटेश्वर' मंदिराच्या आवारात गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस एक सुंदर गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आगळी वेगळी 'वेशभूषा' हि मूर्ती उभी असून दीड फुट उंचीची आहे. या गणपतीची वेशभूषा मात्र आकर्षक आहे या गणपतीला जे वस्त्र दाखवले आहे ते 'वल्कल(स्कर्ट)' घातलेले दाखवले आहे. हे या मूर्तीचे वैशिष्ट्य ठरते. हि गणपतीची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातामध्ये परशु दाखवलेला आहे आणि वरच्या डाव्या हातामध्ये एक फळ असून त्याची सोंड हि त्या फळाला टेकलेली आपल्याला बघायला मिळते. वल्कल नेसलेली हि गणपतीची हि मूर्ती त्याच्या या वेशभूषेमुळे अत्यंत वेगळ्या रुपात आपल्याला बघायला मिळते.      


१२) भुलेश्वर येथील स्त्री रूपातील वैनायकी गणपती:-

पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले भुलेश्वर सर्वदूर प्रसिद्ध आहे ते त्याच्या कलाकुसरीमुळे. या सुंदर मंदिरात इतर वेळेस फारशी वर्दळ जरी नसली तरी श्रावणामध्ये मात्र आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक भुलेश्वराच्या दर्शनाला मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शिल्पसौंदर्याने नटलेले हे भुलेश्वराचे मंदिर त्याचे सौंदर्य खुलवते ते त्या मंदिराच्या आत कोरलेल्या शिल्पांनी याच शिल्पांच्या मध्ये एक महत्वाचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते ते म्हणजे 'स्त्री रूपातील गणपती' या गणपतीला 'वैनायकी' असे म्हटले जाते. या 'वैनायकी' बाबत जी माहिती मिळते त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते कि प्रत्येक देवतेची शक्ती हि जर मूर्तीरुपात दाखवायची असेल तर ती मूर्ती हि स्त्रीरुपात दाखवतात. 'विनायकाची' शक्ती म्हणून ती 'वैनायकी' तसेच यामध्ये 'गणेशी' आणि 'लंबोदरी' हि देखील नावे आपल्याला बघायला मिळतात.  भुलेश्वर येथे असलेली हि 'वैनायकी' रूपातील गणपतीची मूर्ती आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर बघायला मिळते तीन मातृकांच्या या वैनायकीचा समावेश केलेला आपल्याला आढळतो. हि 'वैनायकी' पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहे.   अश्या प्रकारची मूर्ती हि वेरूळच्या कैलास लेणी येथे देखील आहे आणि आंबेजोगाई येथील मंदिराच्या कोनाड्यात साडी नेसलेल्या रुपात आहे. या मूर्तीच्या खाली आपल्याला मूषक देखील बघायला मिळतो.  अशी हि 'वैनायकी' रूपातील गणेश मूर्ती हि भुलेश्वरला गेल्यावर नक्कीच बघायला हवी.          


१३) पन्हाळे काजी लेण्यांमधील गणपती:-

महाराष्ट्रामध्ये जसे किल्यांवर गणपतीच्या मूर्ती आढळतात तश्याच काही मूर्ती या लेण्यांमध्ये देखील आढळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पन्हाळे काजी लेण्यांमधील गणपती. पन्हाळे काजी लेणी मध्ये नाथपंथीय लेण्यांमध्ये आपल्याला गणपती मूर्ती पाहायला मिळते. लेणी क्रमांक २१ मध्ये असलेली हि मूर्ती अत्यंत सुंदर आहे. इ.स. ८ व्या शतकापासून गणपतीचा गाणपत्य पंथ देखील उदयाला आला याचे उदाहरण हे आपल्याला पन्हाळे काजी लेणीमध्ये आपल्याला मिळते. बौद्ध लेण्यांमधील हा गणपती गाणपत्य पंथाचा असून या चतुर्भुज असलेल्या या गणपतीच्या हातामध्ये आपल्याला वरील डाव्या  हातामध्ये परशु बघायला मिळतो तसेच खालील उजव्या हातामध्ये देखील मोदक बघायला मिळतो आणि त्याची सोंड हि मोदकाला टेकलेली दिसते.


______________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा.

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage