गिर्यारोहकांचा सखा आणि गुरु: 'सह्याद्री'


|| सह्याद्री सारखा नाही रे सोयरा ||
|| गुरु सखा बंधू मायबाप ||


महाराष्ट्राचे नाव घेतले तर त्याबरोबर आपसूक नाव येते ते 'सह्याद्रीचे'. 'सह्याद्री' हा महाराष्ट्राचा निर्माता आहे तसेच सह्याद्री हेच महाराष्ट्राचे भौगोलिक सत्व आहे. एकदा का या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर फिरायला लागले कि या सह्याद्रीमधील अनेक गोष्टींची आपल्याला नव्याने ओळख होते. नवी नवी भूरूपे, सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या छोट्या छोट्या नद्या, शिखरे, आव्हान देणारे विविध सुळके, सह्याद्रीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर उभारेले विविध किल्ले, मंदिरे, सह्याद्रीच्या एकसंध पाषाणामध्ये घडवलेल्या लेण्या या सर्व ठिकाणावरून सह्याद्रीची आपल्याला विविध रुपात ओळख होते आणि मग सुरुवात होते ती सह्यभटकंतीची.

सह्याद्रीच्या याच दऱ्या-खोऱ्यांमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. किल्यांवर भटकताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात तेथील जनमानसातील माणुसकीचे येणारे अनुभव तुम्हाला कधी शहरात येणार नाही. सह्याद्री फिरणे आणि अनुभवणे यामध्ये खूप फरक आहे. प्रत्येक सह्यभ्रमंती मध्ये हा 'सह्याद्री' हा गुरु आपल्या बरोबर आपल्याला साथ द्यायला असतो. कधी रस्ता चुकलो तर कधी पाणी हवे असेल तर कधी आपला सखा म्हणून आपल्याला या सह्याद्रीचे विविध अनुभव आणि गावांमधील माणुसकीचे दर्शन घडते ते या मित्र, गुरु, भाऊ असलेल्या जिवाभावाच्या सह्याद्रीमुळेच.


सह्यभटकंती मध्ये बऱ्याच गोष्टी या आपल्याला कळून येतात. शाळेत शिकलेल्या भूगोलाची आणि  इतिहासाची उजळणी हि फक्त सह्याद्रीमध्येच होते. सह्याद्रीमध्ये फिरताना दिसणारे प्राणी, पक्षी वेगवेगळे छोटे मोठे कीटक यांच्यामुळे शास्त्राची देखील उजळणी होते तसेच सह्यभटकंती करताना प्रत्येक गावा-गावा मध्ये जी मराठी भाषा बोलली जाते त्यामुळे मराठी भाषा कोणत्या प्रकारात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतात हे देखील आपल्याला समजते. जे काही शाळेत शिकवले जाते त्याचे जणू प्रात्यक्षिक हे सगळे आपल्याला फक्त शिकवतो तो सह्याद्री.

सह्याद्रीच्या या शाळेमध्ये माणुसकी या नात्याने प्रत्येक माणसाला कशी मदत करायची वेळप्रसंगी कसे निर्णय घ्यायचे एकमेकांच्या मदतीने कसे पुढे जायचे निसर्गामधून मिळणारे  निरनिराळे अनुभव कसे मुक्तपणे शिकायचे हे सर्व शिकवतो ते सह्याद्री. या सह्याद्रीच्या शाळेमध्ये कोणतीही बंधन नाहीत सर्व भटक्या विद्यार्थ्यांना मुक्तपणे वावर आहे कोणीही कधी या सह्याद्रीच्या शाळेमध्ये येऊ शकते आणि ज्याला जो विषय आवडेल त्याचा अभ्यास करू शकतो अशी हि सह्याद्रीची शाळा छायाचित्र (फोटोग्राफी) काढायला देखील शिकवते. अश्या या सह्याद्रीच्या शाळेमध्ये जाऊन या 'सह्याद्री' नावाच्या गुरूच्या सावलीमध्ये शिकायला कोणाला नाही आवडणार ??

शिक्षक दिनानिमित्त  या 'सह्याद्री' नावाच्या गुरुसाठी आपण खूप काही देणे लागतो परंतु सह्याद्रीच्या आजूबाजूची जी जंगलतोड मोठ्याप्रमाणामध्ये चालू आहे ती थांबवून देशी झाडे लावून आपण या 'सह्याद्री' या गुरुचे नक्कीच थोडेफार प्रमाणात ऋण फेडू शकतो आणि सह्याद्रीच्या शाळेमध्ये मुक्त पणे वावरु शकतो. अश्या या सह्याद्रीच्या शाळेत शिकायचे असेल तर नक्कीच सह्यभ्रमण चालू करून 'सह्याद्री' या गुरूच्या छत्रछायेखाली नवीन गोष्टी आत्मसात करायला नक्कीच घराच्या बाहेर पडा, गुरु सह्याद्रीच्या या शाळेमध्ये तुम्हाला नक्कीच नवीन विषय शिकायला आणि आत्मसात करायला मिळतील.        


______________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा.
         

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage