'सह्याद्री निवासिनी'


नुकतेच गणपती संपलेले आहेत. यंदा पाउस देखील जास्त झाल्यामुळे बळीराजा देखील आनंदी आहे शेतामधील पिके देखील सुंदर भासत आहेत अश्यामध्ये गणपती नंतरचे पंधरा दिवस संपून सर्व महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये चाहूल लागली आहे ती नवरात्राची. नवरात्राचे नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण असते. हेच प्रसन्नतेचे वातावरण अनुभवण्यासाठी सह्याद्रीमधील 'सह्यनिविसिनी' असलेल्या गडदेवतांचे दर्शन कसे नाही घेऊन चालणार या आडवाटांवर आणि विविध किल्यांच्या माथ्यावर किंवा गुहेमध्ये विराजमान असलेल्या सह्याद्रीतील 'गडमाथ्यांवरच्या देवींच्या' दर्शनाला जायचे असेल तर घरातून सह्ययात्रेला बाहेर पडावे. 

राजगड किल्यावरची गडदेवता पद्मावती देवी. 

सह्ययात्रेमध्ये आपल्याला गडदेवींचे विविध रुपामध्ये दर्शन घडते त्यामध्ये देवीची रूपे हि अनघड तांदळ्यामध्ये तर कधी अष्टभुजारुपात तर कधी सप्तमातृकारुपात तर कधी लेणीमध्ये कोरलेल्या शिल्प रुपांमध्ये या देवतांचे जे दर्शन आपल्याला दर्शन होते ते एक वेगळीच उर्जा प्राप्त करून देते. या गडदेवतांना आजही पंचक्रोशीमध्ये तेवढेच ,महत्व आहे जेवढे पुरातन काळामध्ये होते किंवा मध्ययुगामध्ये होते. हिंदूदेवतांमध्ये जशी देवीची विविध रूपे आपल्याला बघायला मिळतात तशीच वेगवेगळी रूपे हि आपल्याला बौध्द धर्मामध्ये देखील बघायला मिळतात.

सुधागड निवासिनी भोराई देवी.

आदिशक्तीची विविध रूपे हि आपल्याला अनुभवायची असतील गड, किल्ले आणि लेण्या यांची फिरस्ती करावी फारशी प्रसिद्ध नसलेली हि सह्याद्रीमधील श्रद्धास्थाने पाहताना मनाला शांती नक्कीच मिळते. फुलांनी सजलेला सह्याद्री आणि त्याचे मुकुट असलेल्या गडकिल्यांवर असलेल्या आदिशक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या जणू प्रेरणास्रोत. मग ती जीवधन ची जीवाई असो डूबेरगडावरची सप्तशृंग रूपातली किंवा नारायणगडवर स्थानापन्न असलेली हस्ताबाई किंवा मानमोडी डोंगररांगेत वसलेली अंबा अंबिका असो अश्या विविध देवी आपल्याला या नवरात्रातील सह्ययात्रेदरम्यान बघायला मिळतात.

नारायणगडावर विराजमान असलेली हस्ताबाई.

शिवनेरी किल्यावर तांदळा रुपामध्ये दर्शन देणारी शिवाई देवी.

इतिहास शोधायला गेले तर या देवींची स्थापना कोणी केली कधी केली याचा मात्र पत्ता लागत नाही परंतु गडकिल्यांच्या या एकेकाळच्या आदिशक्ती या सर्वत्र अनगड ठिकाणी वसलेल्या आहेत. या सह्याद्री निवासिनी गडांवर मुक्काम करून तिच्या भक्तांना आजही आशीर्वाद आणि प्रेरणा देत विविध शस्त्रांनी सज्ज आहेत. यातले तोरण्याच्या मेंगाई चे रूप हे महिषासुर मर्दिनी आहे तर राजगडवर असलेल्या पद्मावतीचे रूप लोभस आहे प्रतापगडावरील तुळजाभवानीचे रूप तर डोळ्यांसमोरून जात पण नाही इतके सुबक कोरलेले आहे.

रतनगड किल्यावर अनघड रुपात दर्शन देणारी रत्नाई देवी.

या सह्याद्री निवासिनी आज ज्या गड किल्यांवर आहेत त्यांच्या नावांवरून देखील गड किल्यांना नाव ठेवलेली आपल्याला बघायला मिळतात. तसेच काही किल्यांवर या देवींचे असलेले वास्तव्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. तुंग किल्यावर असलेली तुंगी देवी हिची कोणतीही मूर्ती आपल्याला आढळून येत नाही जे काही दगड आहेत ते शेंदूर लावून रंगवलेले दिसतात परंतु गडावर हि देवी वास्तव्य करून आहे तुंगवाडी गावातील लोकांची या तुंगी देवीवर श्रद्धा आहे अश्याच पद्धतीमध्ये रतनगडावर विराजमान असलेली रत्नाई देवी हि रतनगडावरील एका सुंदर गुहेमध्ये अनघड रुपामध्ये बसलेली आढळते तर तिकोना किल्यावरील गडदेवता हि एका लेण्यात स्थानापन्न असून डोंगरभटक्यांना आशिर्वाद देत आहे.

महिषासुर रुपामध्ये दर्शन देणारी कर्नाळा किल्यावरची कर्णाई देवी.

डोंगर भटक्यांचा लाडका प्रदेश म्हणजे जुन्नर या जुन्नर शहरामध्ये असलेली शिवनेरी किल्याच्या एका लेण्यामध्ये विराजमान असलेली शिवाई देवी म्हणजे जिच्या साक्षीने स्वराज्याचे निर्माण झाले हि शिवाई देवी आलेल्या प्रत्येक भक्ताला आनंदाने नवीन हुरूप देण्याचे काम करते तसेच जवळच असलेल्या चावंड किल्यावरील चामुंडा देवीला कोण बरे विसरेल हि चावंड वरील चामुंडा आजही गडाचे रक्षण करत उभी आहे. शिवनेरी जवळच असलेल्या मानमोडी लेणी समूहात अंबा आणि अंबिका या दोन देवी विराजमान असून आजूबाजूच्या पंचक्रोशीमधून त्यांची पूजा केली जाते.

शस्त्रसज्जरुपामध्ये असलेली कोराईगडाची कोराई देवी.

सह्याद्रीच्या कडेकपारीत निवास करणाऱ्या या देवतांबद्दल ग्रामस्थांकडे अनेक कथा प्रचलित असतात. त्यातून आजूबाजूच्या गड किल्यांवर विराजमान असलेल्या या देवींबद्दल अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात मग त्यामध्ये बऱ्याचदा दोन गडांवर असलेल्या देवी या एकमेकांच्या बहिणी असतात हि सर्वत्र प्रचलित आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकांमुळे आपल्याला मात्र आजूबाजूच्या गावातील ग्रामीण संस्कृती समजायला मदत होते.

रामसेज किल्याची रक्षणकरती देवी.

महाराष्ट्रातील गडदेवता पाहताना मात्र मन इतिहासात रमून जाते प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात या देवींचे विविध उत्सव गडकिल्यांवर किती मोठ्या प्रमाणात साजरे होत असतील याची कल्पना आपल्याला नक्की येते रायगडावर असलेली शिर्काई देवी पाहून आपल्याला या गडकिल्यांवर नवरात्रात होणाऱ्या उत्सवाची भव्यदिव्यता आणि नवरात्रात गडावर चालणारे विविध कार्यक्रम हे कसे होत असतील त्याचे स्वरूप काय असेल हे सगळे अनुभवायचे असेल तर महाराष्ट्रातील या गड किल्यांवर विराजमान असलेल्या देवतांची स्वरूप पाहण्यासाठी सह्याद्रीमध्ये उभारलेल्या किल्यांची या नवरात्रामध्ये आडवाट जरूर फिरा आणि गडकिल्यांवर असलेल्या देवींचे सुंदर रूप अनुभवा. 


पेमगिरी किल्यावर वसलेली पेमाई देवी.

अहिवंत गडावर निवास करून असलेली आणि खानदेशाची रक्षणकरती सप्तशृंग देवी.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

  

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage