गिर्यारोहकांच्या आवडत्या मुंब्रा कड्यावरची निवासिनी 'मुंब्रा देवी'


'श्रीस्थानक उर्फ ठाणे' शहर हे महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई जवळ असलेले एक महत्वाचे शहर. हजारो लोकं रोजचे या शहरातून ये जा करत असतात बऱ्याच नवीन कंपनीची ऑफिस या ठाणे शहराच्या आजूबाजूला उभारली गेली असल्याने या शहराचे रूप मात्र वर्षानुवर्षे पालटत गेले. प्राचीन काळातील 'श्रीस्थानक' या नावाचा अपभ्रंश होत 'ठाणे' या शहराचे नामकरण झाले. मुळातच 'ठाणे उर्फ श्रीस्थानक' या प्राचीन शहराला लाभलेले निसर्गाचे वरदान आणि आजूबाजूच्या डोंगररांगा आणि नद्यांमुळे लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे प्राचीन काळापासून ठाणे शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. या ठाणे शहराच्या आजूबाजूस उंच सखल डोंगर रांगा असल्याने देशातून कोकणात उतरणारे प्राचीन मार्ग मात्र भरपूर आहेत. याच ठाणे शहराजवळील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या सानिध्यामध्ये वसलेली आहे ती 'मुंब्रा देवी'

मुंब्रा देवीचा डोंगर.

तसे पहायला गेले तर ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूला डोंगरावर फारशी मंदिरे दिसून येत नाही. प्राचीन काळापासून महत्व असलेल्या या महाराष्ट्राच्या औद्योगिक नगरीमध्ये पूर्वेला एक डोंगर आपल्याला दिसून येतो पूर्वी ठाणे शहरापासून अगदी १० कि.मी. अंतरावर असणारा पूर्वेकडे असलेला 'मुंब्रा डोंगर' आपल्याला खुणावत असतो हा 'मुंब्रा डोंगर' मुंबई पुणे महामार्गावरून येताना आणि रेल्वे मधून देखील स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यामुळे  आपल्याला खुणावतो तो सुळका म्हणजे आजूबाजूला आणि संपूर्ण गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेला 'मुंब्रा सुळका' म्हणून ओळखला जातो.

वाटेवरून दिसणारे मंदिर.

याच 'मुंब्रा डोंगराच्या' कड्याच्या पोटामध्ये प्राचीन काळात एक लेणे खोदले असून या लेण्यामध्ये विराजमान आहे ती 'मुंब्र्याची मुंब्रा देवी' मुंब्रा हे पायथ्याचे गाव असल्याने या डोंगराला मुंब्रा डोंगर हे नाव मिळाले असून या डोंगराच्या पोटामध्ये जे लेणे खोदलेले आहे त्या लेण्यामध्ये 'मुंब्रा देवी' ही कोळी बांधवानी स्थापन केलेली आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात लोकल सेवा ही महत्वाची असल्याने जेव्हा केव्हा लोकल मधून जाताना 'मुंब्रा देवीचे' कातळात खोदलेले मंदिर बघायला मिळते तेव्हा मात्र मन सुखावून जाते.

मुंब्रा देवीला जाताना दिसणारे खाडीचे दृश्य.

मुंब्रा देवीला जायचे झाल्यास ठाणे, कल्याण, डोंबिवली या महत्वाच्या मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकावारून सारखी गाड्यांची ये जा चालू असते तेथून मुंब्रा या रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षेने आपल्याला सरळ सरळ मुंब्रा देवीच्या पायथ्याला सोडले जाते. त्यामुळे वाहतुकीचा तसा प्रश्न उद्भवत नाही. आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असलेली मुंब्रा देवी ही 'मुंब्रा' गावाची ग्रामदेवता. या प्राचीन ग्रामदेवतेला जाण्यासाठी आता सध्या सरळसोट पायऱ्या या मंदिराच्या ट्रस्टद्वारे बांधण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या काळात सुंदर जंगलवाटेद्वारे या या ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाता येत असे.

मुंब्रा देवीच्या वाटेवरून दिसणारे ठाणे शहर.

मुंब्रा देवीच्या पायऱ्या चढून मध्य्भागावर आले असता पायथ्याशी असलेले मुंब्रा गाव त्याच्या पलीकडे दिसणारी ऐतिहासिक आणि प्राचीन काळापासून महत्वाची असणारी कल्याण खाडी आणि तिच्या आजूबाजूचा दिसणारा विहंगम प्रदेश मन सुखावून जातो. मनामध्ये एकच गोष्ट येते प्राचीन काळामध्ये कल्याण हे मुख्य बंदर असल्याने व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अश्या या चौकी पहाऱ्यांंची महत्वाची जागा ही नक्कीच मुंब्रादेवीचा जो डोंगर आहे तिचे महत्व मोठ्या प्रमाणात असणार हे मात्र आपल्याला समजून येते.  मुंब्रा डोंगराच्या उंच कड्याला भली मोठी आगीन माश्यांची पोळी मात्र लक्षवेधी आहेत.

ठाणे शहर आणि परिसर.

प्राचीन मुंब्रा देवीच्या दर्शनाला जात असताना मधूनच उडणारी ब्राम्हणी घार, मोरकंठी, स्विफ्ट असे छोटे मोठे पक्षी आजही थोडेसे जंगल असल्याने आपल्याला मधून दर्शन देऊन जातात हे मात्र सुखावून जाते आजूबाजूच्या प्रस्तारांवर शनिवार रविवार मध्ये मुंबई मधील बरेचसे गिर्यारोहक हे प्रस्तरारोहणाची प्रॅॅक्टिस करताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचे महत्वाचे कारण असे आहे कि मुळात सह्याद्री मध्ये जे अनेक सुळके आहेत ते या गिर्यारोहकांना आव्हान देतात त्या सर्वांवर चढून जाण्याची जिद्द ही या प्रस्तरारोहणामधून होते. मग मुंबई मधील गिर्यारोहकांना आपलासा वाटणारा सुळका म्हणजे हा मुंब्रा येथील सुळका हा या डोंगराच्या बाजूलाच असल्याने येथे गिर्यारोहकांची देखील रेलचेल मोठ्या प्रमाणात असते.

वाटेवर असलेला देव.

संपूर्ण परिसर फिरत आपण मुंब्रादेवीला शरण जातो. ऐन मुंब्रा डोंगराच्या कड्याच्या पोटात देवी विराजमान आहे. या देवीच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यावर आलेला थकवा क्षणार्धात पळून जातो. लेणीमध्ये स्थापन असलेली ही मुंब्रा देवी तांदळा रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देत प्राचीन काळापासून येथे विराजमान आहे. मुंब्रा देवीचे एकूण नऊ तांदळे आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये हे नऊ तांदळे म्हणजे विविध देवी रूपे असून यामध्ये आपल्याला मुंब्रादेवी, सिद्धीमंत्री, कालरात्री, चंद्रघंटा, महागौरी, कात्यायनी, स्कंदमाता, शैलपुत्री, कुष्टमांडा अश्या नऊ देवी येथे स्थानापन्न झालेल्या आपल्याला पहायला मिळतात. मुंबईची मुंबा देवी आणि मुंब्रा येथील मुंब्रा देवी या दोघी सख्या बहिणी आहेत असे येथील आजूबाजूचे कोळी लोकं मानतात.

तांदळा स्वरूपातील 'मुंब्रा देवी'.
या देवींचे दर्शन घेऊन घटकाभर लेणी रूपातील मंदिरामध्ये बसून इतिहासातील घटनांना उजळा देत आजूबाजूचे भौगोलिक महत्व बघत आणि आजूबाजूला दिसणारे ठाणे उर्फ श्रीस्थानकाचे बदलते रूप डोळ्यात साठवत या प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणांंचा मागोवा घेत 'मुंब्रा देवीची' यात्रा सुफल संपूर्णम करावी. 

   
मंदिरातून दिसणारे विहंगम दृश्य.
______________________________________________________________________________________________________________

कसे जाल-
पुणे - तळेगाव - कामशेत - लोणावळा - वाशी - मुंब्रा.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage