अश्मयुगीन माणसाचे वास्तव्य असणारे 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा'


माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जर पहिली तर माणसाचे आयुष्य हे इतिहासाशी निगडीत आहे. माणसाच्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्टीचा संबंध हा इतिहासातील प्रत्येक घटने बरोबर संबधित असतो. इतिहास हा म्हणजे केवळ सनावळ्या किंवा लढाया नव्हे. माणसाच्या इतिहासात बऱ्याच सांस्कृतिक, नैसर्गिक घटनांचा काळ महत्वाचा असतो. यामध्ये आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती, आजूबाजूची भौगोलिक परिस्थती आणि त्यामध्ये घडत गेलेले बदल या साऱ्यांचा अभ्यास आपल्याला इतिहासात करावा लागतो. गावोगावी सापडणारे ताम्रपट आणि शिलालेख हे आपल्याला इतिहासातले महत्वाचे दुवे ठरतात. या विविध दुव्यांवरून आपल्याला माणसांच्या आयुष्यातील घडलेले बदल आपल्याला दिसून येतात. मानवाची प्रगती यामध्ये दिसून येते.

या सर्व इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर आपल्याला सुरुवात ही वल्कल पासून नायलॉन पर्यंत वापरात असलेल्या कपड्यांच्या वापराचा इतिहास हा देखील पाहावा लागतो या गोष्टीला मानवी आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या अश्मयुगापासून असणाऱ्या प्राथमिक गरजा या गरजा भाग्वाण्यासाठी माणसाच्या प्रगतीचे टप्पे महत्वाचे ठरतात अश्याच एका प्रगतीच्या टप्यामधील नैसर्गिक जागा म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी रायगड समोर असणारी नैसर्गिक निवाऱ्याची जागा म्हणजे 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा.'  
आजकाल शाळेतील इयत्ता ३ री च्या इतिहासाच्या पुस्तकाच्या माध्यमातून अश्मयुगाबद्दल माहिती दिलेली असते शाळेतील मुले अश्मयुग म्हणजे काय ? नवाश्मयुग म्हणजे काय ? किंवा ताम्रपाषाण युग म्हणजे काय ह्या गोष्टी पाठ करतात परंतु त्यांना या गोष्टी दाखवणे देखील महत्वाचे असते. या अभ्यासाच्या निमित्ताने लहान मुलांच्या शैक्षणिक सहली अश्या ठिकाणी नेणे नक्कीच महत्वाचे ठरते. अश्मयुगीन गुहेची उत्तम उदाहरणे ही मध्य प्रदेशातील 'भीम बेटका' येथील गुहा आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या अश्या नैसर्गिक गुहेचे उत्तम उदाहरण म्हणजे राजधानी रायगडच्या समोरील 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' ही नक्की सांगता किंवा दाखवता येईल.     

रायगड महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण. दुर्गदुर्गेश्वर रायगडावर सगळे लोक जातात तिथे जाऊन महराष्ट्राच्या आराध्य दैवतासमोर म्हणजेच शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होतात. जगदीश्वराचे दर्शन घेतात आणि राजसभा बघून शिवराज्याभिषेकाला स्मरतात तसेच जुन्या ऐतिहासिक स्मृतींना उजळा देतात आणि मग पर्यटक आणि गिर्यारोहक लोक चित दरवाज्याने रायगडाची यात्रा संपवून रोप वे ने खाली उतरून परतीची वाट धरतात. रायगड समोरील एक प्रागैतिहासिक वास्तू म्हणजे सध्या पर्यटकांच्या प्रकाशझोतामध्ये आलेली 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' या देखण्या आणि अद्भूत ठिकाणाची माहिती घेणे देखील महत्वाचे ठरते.

अश्मयुगामध्ये माणूस भटक्या अवस्थेमध्ये होता त्यावेळेस माणसाला निवाऱ्यासाठी पाण्याच्या आश्रयाने राहणे सोयीस्कर मानत असे कारण पाणी ही मानवाची मुलभूत गरज आहे. तसे पहावयास गेले तर संपूर्ण जगामध्ये मानव हा असा प्राणी आहे कि ज्याला स्वरक्षणासाठी कोणतीही गोष्ट नाही ना मनुष्याला वाघासारखी नखे आहेत किंवा मगरी सारखे दात आहेत मग अश्या वेळेस मनुष्य स्वसंरक्षणासाठी आणि निवाऱ्यासाठी आपल्या टोळीसह अश्या नैसर्गिक गुहा शोधत असे आणि मुक्काम करत असे.    
या मुक्कामाच्या काळामध्ये अश्मयुगीन मनुष्य आसपास उपलब्ध असलेल्या दगडांची हत्यारे करीत असे कारण या काळामध्ये मनुष्य हा एका जागी स्थिर झाला नव्हता नागर संस्कृतीची वसाहत देखील झालेली नव्हती मनुष्य हा शिकारी आणि भटके आयुष्य जगत होता अश्या वेळेस तो दगडी हत्यारे बनवून शिकार करत असे. महाराष्ट्रातील अश्मयुगीन मानवाने त्याच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्रात जो बेसॉल्ट सारख्या अवघड दगडामधून जी हत्यारे बनवली त्यामध्ये या महाराष्ट्रातील अश्मयुगीन माणसांचे बुद्धीकौशल्य आपल्याला नक्कीच दिसून येते. ही अशी सर्व उदाहरण आपल्याला रायगडच्या 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा'  यामध्ये मिळालेल्या गोष्टींवरून दिसून येतात. 
  
'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' या गुहेचा वापर अश्मयुगीन काळापासून होत आहे. या गुहेमध्ये कोअर्स, तासण्या, पाती, माश्यांच्या जुन्या काळातील गळ आणि छोटी हत्यारे अश्या गोष्टी सापडल्या आहेत यावरून आपणास असे दिसून येते कि ह्या अनवट गुहेचा वापर अश्मयुगीन काळापासून होत आलेला आहे. या 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' पाहिल्यानंतर डेक्कन कॉलेज मधील पुरातत्व अभ्यासक श्री. आर. व्ही. जोशी यांना येथे अश्मयुगीन माणूस वास्तव्य करून असावा अशी शंका आली म्हणून त्यांनी 'ट्रायल पिट' - म्हणजेच एक प्राथमिक शोधखड्डा घेतला यामध्ये त्यांना अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. याबद्दलचा शोधनिबंध त्यांनी सादर केला असून हा शोध निबंध डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाकडे बघावयास मिळतो.        

'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' याठिकाणी श्री. आर. व्ही. जोशी यांनी ज्यावेळेस उत्खनन केले त्यावेळेस त्यांना कोअर्स, तासण्या, छिलके, टोकदार पाती, नोक, वेधण, ट्रॅॅपिझ, आणि त्रिकोणी पद्धती मध्ये कोरलेल्या काही अवजारांचा आणि हत्यारांचा भाग मिळाला. या संपूर्ण गोष्टीमुळे ही नैसर्गिक गुहेमध्ये अश्मयुगीन मानव वास्तव्य करून होता हे समजून आले.  ही गुहा अत्यंत सुंदर आहे परंतु या गुहेच्या ठिकाणी एखादा पाण्याचा स्रोत मात्र सापडत नाही. पूर्वी तेथे काही ना काही पाण्याचा स्रोत नक्की असावा.   

रायगडावर येणाऱ्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' इतकी उत्कृष्ट जागा कोणतीही नाही. हि गुहा निसर्ग निर्मित आहे. ह्या गुहेला पाचाडच्या दिशेला दोन तोंडं आहेत. पण तिकडून या गुहेत प्रवेश करता येत नाही. या अश्मयुगीन गुहेत प्रवेश करायला रायगड वाडीच्या दिशेला एक तोंड आहे. पाचाड खिंडीतून देशमुखांच्या हॉटेलच्या मागून या ठिकाणी येण्यास एक छोटीशी सोपी वाट आहे परंतु या गुहेच्या मुखाशी येईपर्यंत आपल्याला या अद्भूत गुहेची कल्पना येत नाही.
या गुहेतून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे भव्य दर्शन घडते. या गुहेतून टकमक टोक, महाद्वाराचा खळगा, आणि गर्द झाडीत लपलेल्या नाणे दरवाजाची जागा अश्या अनेक गोष्टींचे दर्शन आपल्याला होते आणि सह्याद्रीचा धारमाथा येथून उत्तम दिसतो. यावरून आपल्याला असे दिसून येते कि ह्या जागेला किती महत्व शिवाजी महाराजांच्या काळात होते. पाचाड कडून या गुहेकडे पहिले असता वाघाच्या मुखासारखी हि जागा दिसतेतीन तोंडे असणारी ही गुहा अश्मयुगातील ही गुहा सह्याद्री मधील एक सुंदर अलंकार आहे. अश्मयुगीन गुहेचे उत्तम उदाहरण असलेला महत्वाचा भाग आपल्याला भुरळ पाडतो. अश्मयुगीन मानवाच्या गुहेमधील घोंगावणारा वारा आयुष्यात एकदा तरी अनुभवयाचा असेल तर या जागेला कोणतीही हानी न पोहोचवता 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा' येथील मुक्काम जरूर करावा आपल्याला अश्मयुगातील मानवी जीवन काय असू शकेल याची उजळणी मात्र  नक्की करता येईल.


______________________________________________________________________________________________________

संदर्भ:- 
१) श्री. आर. व्ही. जोशी यांचा शोधनिबंध.______________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________

   लिखाण आणि छायाचित्रे  © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage