पुरंदर किल्याच्या पायथ्याला वसलेल्या प्राचीन नारायणपूर गावाचा 'नारायणेश्वर'


महाराष्ट्रामध्ये 'नारायण' या नावाने बरीचशी छोटी छोटी गावे वसलेली आहेत यापैकी काही गावांना बराच जुना इतिहास लाभलेला आहे. अश्याच काही 'नारायण' नावाच्या अक्षराने सुरु होणारे एक नारायणपूर नावाचे प्राचीन गाव हे पुरंदर आणि वज्रगड या ऐतिहासिक किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले आहे. या नारायणपूर गावाचे मूळ नाव हे 'पूर' असे होते. या 'पूर' गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर सासवड पर्यंतच्या परीसरामध्ये 'नारायणेश्वर' या नावाने प्रसिद्ध आहे.

नारायणेश्वराचे मुख्य मंदिर.

 नारायणेश्वर मंदिराचे आवार.

एकेकाळी समृद्ध शिल्पांनी नटलेले हे गाव असणार हे नक्की हे या गावाच्या धाटणी आणि मंदिराच्या प्राचीनतेवरून लगेच लक्षात येते. नारायणपूरच्या या ‘नारायणेश्वर’ मंदिराचे दर्शन घ्यायचे असल्यास स्वतःच्या गाडीने किंवा स्वारगेट एस.टी. स्थानकातून 'नारायणपूर' या एस.टी. ने पोहोचता येते तसेच कापुरव्होळ आणि ऐतिहासिक नगरी सासवड येथून खाजगी जीप देखील आपल्याला मिळू शकतात. पुण्यावरून ऐतिहासिक कात्रज घाटामार्गे कापुरव्होळ येथून सासवड फाट्यावरून डावीकडे वळले कि पहिले दर्शन होते ते अभेद्य पुरंदर किल्याचे. पुरंदर किल्याच्या दिशेने जात असताना इतक्यात झालेले केतकावळे गावाचे बालाजीचे मंदिर देखील तुम्ही बघू शकता. 


नारायणेश्वर मंदिराची द्वारपट्टी आणि गणेशपट्टी.

द्वारपट्टीवर असलेले विष्णूमूर्ती .

आपली गाडी एकदा का सासवड रस्त्यावर लागली कि पुरंदर आणि वज्रगड किल्याच्या परिसरात बरीच छोटी छोटी ऐतिहासिक गावे लपली आहेत त्या प्रत्येक गावाचे महत्व नारायणपूर या गावाएवढेच आहे त्याचे कारण म्हणजे पुरंदर किल्याची जी ऐतिहासिक लढाई झाली होती तेव्हा त्या संपूर्ण परिसरात मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेरखान यांची छावणीच या संपूर्ण प्रदेशात उभारली गेली होती. असे हे संपूर्ण ऐतिहासिक महत्व असलेल्या पुरंदर किल्याच्या परिसरात बरीच आडवाटेवर असलेली ऐतिहासिक ठिकाणे लपलेली आहेत या सर्व गोष्टींचा मागोवा आपल्याला नारायणेश्वरला जाताना नक्की घेता येतो. 

यादवकालीन मंदिर शैली.

भूमिज शैलीमध्ये असलेले नारायणेश्वर मंदिराचा बाह्य भाग.

कापुरव्होळ वरून मजल दरमजल करीत आणि बलदंड पुरंदर किल्याला चारही बाजूंनी निरखत आपण सरळ येऊन पोहोचतो ते ऐतिहासिक आणि प्राचीन 'पूर' म्हणजेच आत्ताच्या 'नारायणपूर' गावामध्ये. पुरंदर किल्याच्या बरोबर पायथ्याशी 'नारायणपूर' हे गाव वसले आहे. याच 'नारायणपूर' गावातून प्राचीन ‘नारायणेश्वर मंदिराशेजारून’ एक सरळ सोट रस्ता आपल्याला पुरंदर किल्यावर घेऊन जातो. नारायणपुरच्या अत्यंत रम्य असणाऱ्या परिसरात हे सुंदर हेमाडपंथी यादव कालीन मंदिर उभारले गेले आहे. किमान ८०० वर्षे जुने असलेले हे यादवकालीन मंदिर अत्यंत सुरेख आहे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. 

नारायणेश्वर मंदिरातील भूमीज शैलीमधील स्तर रचना.

वैशिष्ट्यपूर्ण रचना.

नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या मंदिराच्या आवारामध्ये सिन्नरच्या 'गोंदेश्वर' मंदिराच्या आवारात जसा रांजण बघायला मिळतो तसाच कलाकुसर असलेला रांजण हा येथील मंदिराच्या आवारात असलेल्या एका पारामध्ये पुरून ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या आवारात आपल्याला काळ्या पाषाणात खोदलेली चपेटदान मारुतीची मूर्ती देखील बघायला मिळते या मूर्तीची उंची जवळपास साडे सहा फुट आहे ती मंदिराच्या आवारात गेल्यावर डाव्या बाजूला बघावयास मिळते.

आवारातील वीर मारुती मूर्ती.

 मंदिराच्या आवारात असलेला रांजण.

संपूर्ण मंदिराच्या आवारामध्ये प्राचीन मंदिरांचे अनेक पुरावे बघायला मिळतात. त्यामध्ये पुष्करणी मधील दोन देवकोष्ठातील देव आपल्याला सुस्थितीत पहायला मिळतात.  नारायणेश्वर मंदिराच्या परिसरात मंदिराचे जुने यादवकालीन खांब देखिल बघावयास मिळतात. मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे हि मूर्ती थोडीशी भंगलेली असून नंदिवरची कलाकुसर बघण्यासारखी आहे. या मंदिरातील नंदी बाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे या मंदिरात नंदी घडविण्याचा प्रयत्न केला तर मंदिरामधील नंदी भग्न पावतो असे सांगितले जाते. मंदिराच्या दरवाज्यावरची गणेशपट्टी आपले लक्ष वेधून घेते तसेच मंदिराच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष देखील बघायला मिळतात. या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली विविध नर्तिकांची शिल्पे तसेच काही अप्सरांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत. तसेच काही विष्णूच्या मूर्ती देखील मंदिराच्या मागच्या बाजूला कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारली आहे. 

मंदिराच्या आवारातील रामेश्वराचे देऊळ.


संपूर्ण मंदिर हे २० खांबांवर उभारले गेले आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला एका खांबावर शिलालेख देखील बघायला मिळतो. तो शिलालेख खांबाच्या बरोबर मध्यभागी कोरलेला आहे. त्यावरील शब्द पुढील प्रमाणे. ‘चांगा वटेश्वराच (T). असा बघायला मिळतो तसेच आपल्याला दुसरा शिलालेख रंगमंडपात शिरताच डावीकडील खांबावर बघायला मिळतो. हा शिलालेख आतील खांबाच्या थोडासा खाली असून मंदिरामध्ये पुरेसा प्रकाश नसल्याने बॅटरी घेऊन त्याचे वाचन केले असता तो व्यवस्थित वाचता येतो. या शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे ‘चांगा वटेश्वराचा श्रीधर जोगी’ असा हा शिलालेख असल्याचे आपणास पहावयास मिळते. 

नारायणेश्वर मंदिराच्या आतील भागातील खांब आणि कोरलेले कासव.

  भूमिज पद्धतीमध्ये असलेल्या खांबांची रचना.

मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत. तसेच या रेखीव मंदिरात अजून एक शिलालेख लपलेला असून हा शिलालेख दरवाजाच्या चौकटीच्या उजव्या ठिकाणी आहे. या शिलालेखाचा अर्थ ‘अच्यतध्वज’ असा आहे. यातील पहिले दोन शिलालेख हे तेराव्या शतकातील म्हणजे यादव काळातील आहेत तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे. या वरील सर्व शिलालेखांवरून असे लक्षात येते कि चांगदेव महाराजांचा या परिसरात वास्तव्य होते असा अंदाज आपण लावू शकतो. या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे जे मिळतात त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णूमंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे या मंदिरामध्ये विष्णूची भव्य हरिहर रूपातील एक मूर्ती होती जी सध्या मुंबई येथील 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम' म्हणजेच आजचे 'छत्रपती राजा शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय' येथे आहे. याच ऐतिहासिक मंदिराच्या आवारात सुट्या शिळेवर शके १२०७ म्हणजे इ.स. १२८५ या सालामधील रामचंद्र यादवाचा शिलालेख असलेला गद्धेगाळ होता. तो गद्धेगाळ  आज पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात जपून ठेवला आहे.   

'अच्यतध्वज' असे नाव असलेला शिलालेख. 

चांगा वटेश्वराच (T)’ असे नाव असलेला शिलालेख.

चांगा वटेश्वराचा श्रीधर जोगी’ असे नाव असलेला शिलालेख.

मंदिरातील शिवपिंड अत्यंत सुंदर असून पिंडीच्या मागे आपल्याला गंगेचे शिल्प पहावयास मिळते. तसेच गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला गणपतीची मूर्ती देखील बघायला मिळते. ह्या मंदिराच्या आजूबाजूला पोपटांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी लवकर गेल्यास संपूर्ण मंदिराचा परिसर हा पोपटांनी गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण मंदिर परिसरात पोपटांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे हे पोपट आपले लक्ष नक्कीच वेधून घेतात. सध्या नारायणपूर हे प्रसिद्ध आहे ते एकमुखी दत्तमंदिरासाठी या दत्त मंदिरामुळे 'नारायणपूर' येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु आजही या दत्तमंदिरामुळे होणाऱ्या गर्दी मध्ये भरवस्तीमध्ये असलेले 'नारायणेश्वराचे' हे यादव काळातील अप्रतिम कलाकुसर अंगाखांद्यावर बाळगलेले आणि महाराष्ट्रातील प्राचीन वारसा असलेले हे मंदिर आजही मात्र लोकांच्या दृष्टीने उपेक्षितच आहे.


मंदिराच्या आवारातील भग्न नंदी.

  नारायणेश्वर मंदिरातील 'नारायणेश्वराचे' शिवलिंग. 
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१. महाराष्ट्र राज्य गॅॅझेटीयर प्राचीन काल कला आणि स्थापत्य:- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
२. Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27:-  Henry, Cousens, Cosmo Publication, 1987.
३. दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ते ४:- संपादक ग.ह.खरे, पुन: संपादन ब्रम्हानंद देशपांडे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.       

कसे जाल:-
१) पुणे – कात्रज – खेडशिवापूर – नसरापूर फाटा – कापूरव्होळ – केतकावळे – नारायणपूर.
२) पुणे – कोंढवा – बोपदेव घाट – सासवड – नारायणपूर.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

8 comments:

 1. सुंदर माहिती काही तरी नवीन बघायला व वाचायला मिळाले त्याबद्दल मनपूर्वक अभिवादन ....

  ReplyDelete
 2. खूप छान आणि नेटके वर्णन केले आहे। धन्यवाद

  ReplyDelete
 3. सुंदर माहिती फक्त एक लिहायचे राहिले ते लिहा ते म्हणजे मंदिर पश्चिम मुखी आहे कारण शिवमंदिर हे पुवँ मुखी असते बरेच ढिकाणी माझ्या पाहण्यात आल आहे धन्यवाद विरेश दहिवले

  ReplyDelete
 4. खुप सुंदर माहिती ! मी ही मंदिरे पाहिलेली आहे, अप्रतिम आहेत !
  या सुंदर लेखासाठी मनापासून धन्यवाद !

  ReplyDelete
 5. धन्यवाद..
  छान.. अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.

  ReplyDelete
 6. I visit this templ lots of time but I don't know history of it. Thanks too you for given a wonderful information.

  ReplyDelete
 7. Great info.... Please upload new photos of temple after renovation.

  ReplyDelete
 8. I love this temple. I visited this temple several times while on the way of Purandar fort. I could not get opportunity to visit Vajragadh because entry to this fort is prohibited by military force.

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage