पुण्याच्या प्रसिद्ध पर्वतीच्या कुशीमध्ये लपलेले कातळशिल्प 'पर्वतीचे लेणे'


'पुणे' हे महाराष्ट्रामधील शांत आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची सर्वत्र ख्याती आहे. जे कोणीहि पुण्यामध्ये राहायला येतात ते मात्र या पुण्याच्या प्रेमात पडतात. अश्या या पुण्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे परंतु विकासाच्या गतीमुळे मात्र जसजश्या पुण्याच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत तसे तसे पुण्यामधील इतिहासाच्या पाऊलखुणा या विकासाच्या नावाखाली कुठेना कुठे काळाच्या पडद्याआड होत चाललेल्या दिसत आहेत. अश्याच काही लपलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुणे आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे सर्व पुणेकरांच्या आवडीची 'पर्वती'. 

आता पर्वतीवर काय आहे असे इतिहासातले लपलेले असा मात्र प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्यामध्ये हे पण नक्की विचारले जाईल कि आजपर्यंत एवढ्यावेळेस पर्वतीला गेलो पण बाकी इतिहासातली कोणती गोष्ट अशी आहे कि ती पर्वतीवर आहे? तर या पुणेकरांच्या लाडक्या पर्वतीवर लपलेले आहे चक्क एक सुंदर कातळ 'लेणे' ज्यांना हे माहिती आहे ते 'पर्वतीची लेणी' असा त्याचा उल्लेख करतात.

पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रकुट कालखंडात काही लेण्या खोदल्या गेल्या अश्या या पुण्याचा प्राचीन इतिहास जपणाऱ्या लेण्या पुणे परिसरात बऱ्याच खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात. खुद्द पुण्यामध्ये असलेल्या या अपरिचित लेण्या मात्र आज उपेक्षेच्या गर्तेत सापडल्या आहेत या लेण्यांना जर भेट द्यायची असेल तर संपूर्ण पुण्याच्या परिसरात आपल्याला एक दिवस भटकंती करून या प्राचीन लेण्यांना भेट देता येईल.

पुण्याच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देण्याचा प्रयत्न करणारी पर्वतीवर असलेली 'राष्ट्रकुट कालीन' लेणी.

पर्वतीच्या लेण्यांना जर भेट द्यायची असेल तर 'शाहु कॉलेजच्या' मागच्या बाजूने जाऊन किंवा 'पर्वती' येथे जी पाण्याची टाकी जेथे आहे तेथे आपल्याला पोहोचणे जरुरीचे आहे संपूर्ण पर्वतीचा परिसर न्याहाळत आपण जसे पर्वतीवर पोहोचतो तेथून पर्वतीच्या पाण्याच्या टाकीची वाट आपण धरायची. या पर्वतीच्या पाण्याच्या टाकीजवळ आले असता या पाण्याच्या टाकीच्या खालच्या बाजूस आपल्याला काही खोदकाम केलेले पहावयास मिळते हे खोदकाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पर्वती वरील राष्ट्रकुट काळात खोदली गेलेली लेणी आहे. 

या लेणीमध्ये डोकावले असता आतमध्ये कोणतेही कोरीव काम आपल्याला पहावयास मिळत नाही अत्यंत साध्या पद्धतीमध्ये असलेला हा तीन दुय्यम लेण्यांचा समूह आहे. या संपूर्ण लेण्याची लांबी ४५ फुट असून रुंदी हि ३० फुट आहे आणि लेण्याची खोली हि ४० फुट आहे. या लेण्याच्या समोरून पाहिले असता आपल्याला या लेण्यांच्या दोन खांबांमुळे या लेणीचे तीन भाग झालेले आपल्याला बघायला मिळतात. या लेण्यांचा आणि पुण्यातील इतर लेण्यांचा संबंध हा आपल्याला या लेण्यांच्या धाटणीवरून समजतो.  शाहू कॉलेज मधल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या लेण्यामधील गाळ काढायचा प्रयत्न १९७६ साली झाला होता परंतु या प्रयत्नाने आतमध्ये कोणतेही प्राचीन अवशेष मात्र मिळाले नाहीत. 

या लेणी बाबत अजून माहिती मिळविण्याचा प्रयत्न झाला याबाबतीतला उल्लेख पुणे नगर संशोधन वृत्त खंड १, आणि पान नंबर ७३ यावर असा आढळून येतो 'पर्वतीच्या दक्षिणेच्या बाजूस टेकडीच्या पोटात एक पूर्वाभिमुख गुंफा कोरलेली आहे. तसेच या लेण्यामध्ये एक पाण्याचे टाके आहे. असा उल्लेख या खंडामध्ये केलेला आपल्याला मिळतो. अशी हि पुण्याच्या प्राचीन इतिहासाची वारसा जपणारी सुंदर लेणी मात्र पुणेकरांच्या धकाधकीच्या जीवनातून मात्र काळाच्या ओघात कधीच नाहीशी झाली असून आपले शेवटचे अस्तित्व टिकवण्याचा आणि पुण्याच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देण्याचा प्रयत्न मात्र हि कातळ लेणी करत आहे.            


______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे नगर संशोधन वृत्त खंड १:-  पान नंबर ७३, भारत इतिहास संशोधक मंडळ, चिं. ग. कर्वे., इ.स. १९४२.
२) पुणे शहराचा ज्ञानकोश:- डॉ. शां. ग. महाजन.        

कसे जाल:-
पुणे - पर्वती
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

2 comments:

  1. आम्ही समजत होतो कि ती घोड्यांची पागा आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. नाही या लेण्या आहेत याचे उल्लेख देखील संशोधकांनी दिलेले आहेत. :)

      Delete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage