एक उपेक्षित दुर्ग नारायणगावचा 'नारायणगड'


महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्रातील एक मोठा वारसा. हा दुर्गांचा वारसा महाराष्ट्राइतका कोणत्या इतर राज्याला मात्र लाभलेला नाही. मुळातच महाराष्ट्राची भौगोलिक जडण-घडण बघता महाराष्ट्रात जे काही किल्ले उभारले गेले त्या प्रत्येक किल्याचे काहीना काही दुर्गस्थापत्याचे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते अश्याच काही किल्यांपैकी एक किल्ला उभारलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे-नाशिक महामार्गावर पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर आणि  नारायणगाव या गावापासून पूर्वेस ५ किलोमीटर अंतरावर दोन सुळके वजा डोंगर आपल्याला पुणे-नाशिक महामार्गावरून खुणावत असतात ते सुळकेवजा डोंगर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून 'नारायणगड' नावाचा एक उपेक्षित आणि दुर्लक्षित किल्ला आहे.


गडाच्या वाडीकडून नारायणगडावर येणारा रस्ता.

'जुन्नर' हे नाव प्राचीन काळापासून महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. या संपूर्ण शहर आणि परिसरात किल्यांचे एक जाळेच विणले आहे आणि यातील सर्व किल्ले हे एका पेक्षा एक सरस उभारले गेले आहेत. याच किल्यांच्या यादीत नाव येते ते 'नारायणगड' किल्याचे. 'शिवनेरी' किल्यापासून २५ किलोमीटर लांब परंतु शिवनेरी किल्याच्या प्रभावळीत वसलेला हा अभेद्द्य नारायणगड मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्रसपाटीपासून ८७६ मीटर म्हणजेच २८७४ फुट उंचीवर बांधलेला हा किल्ला गिर्यारोहकांना खूणावतो ते त्याच्या अभेद्य नैसर्गिक कड्यांमुळे. मुळातच नैसर्गिक कडांची तटबंदी लाभली असल्यामुळे नारायणगडावर आपल्याला फारशी तटबंदी पहावयास मिळत नाही मात्र ज्या ठिकाणी तटबंदी उभारली आहे ती तटबंदी मात्र अभेद्य अशी आहे. हे या नारायणगड किल्याचे मुख्य वैशिष्ट्य.

नारायणगडाच्या  ' पायथ्याला नुकतेच जीर्णोद्धार केलेले मुक्ताई देवीचे सुंदर मंदिर आहे.

फारसा परिचित नसलेला 'नारायणगड किल्ला' दुर्गभटक्यांना कायमच खुणावत असतोनारायण गडास जाण्यासाठी नारायणगावापासून किंवा नारायणगाव बसस्थानकापासून 'गडाची वाडी' नावाचे गाव गाठावे लागते. गडाची वाडी ते नारायणगाव  हे अंतर ५ किलोमीटर आहे. नारायणगाव हे महामार्गाला लागून असल्यामुळे येथे वाहनांची वर्दळ सतत चालू असते त्यामुळे नारायणगड किल्याच्या पायथ्याला खाजगी वाहने आणून सोडतात. 'गडाच्या वाडीच्या' ठिकाणी आपल्याला चालत देखील पोहोचता येते. येडगाव धरणाच्या कालव्यावरून चालत जाऊन आपण गडाची वाडी साधारणपणे १५ ते २० मिनिटात गाठू शकतो. नारायणगडाच्या कुशीमध्ये वसलेले 'गडाची वाडी' हे गाव अतिशय सुंदर आणि रम्य आहे. आजूबाजूची शेते आणि दुरवर दिसणारे जुन्नर परिसरातील किल्ले मन मोहवून टाकतात. 

 कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात.

'नारायणगडाच्या' पायथ्याला नुकतेच जीर्णोद्धार केलेले मुक्ताई देवीचे सुंदर मंदिर आहे तेथे पाण्याची मोठी टाकी देखील बसवलेली आहे. येथे पोहोचल्यावर मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन आजूबाजूच्या  परिसरात मोठ्या प्रमाणात आपल्याला पक्षी दिसतात. हिवाळ्याच्या काळात येथे विविध ठिकाणांवरून आलेले पक्षी देखील 'रुडी शेल डक' सारखे पक्षी देखील दिसतात. 'गडाची वाडी' येथून दुरवर दिसणारे शिवजन्मस्थान 'शिवनेरी' आणि त्याच्या समोरील बाजूला असणाऱ्या बौद्ध आणि जैन संस्कृतीची धर्मकृत्य ज्या डोंगराच्या  पोटामध्ये खोदून काढले आहे अश्या 'मानमोडीचा किंवा मानमुकुट' डोंगर उठून दिसतो.

खोडद जी.एम.आर.टी. येथील दुर्बिण आणि नारायणगाव परिसर. 

मुळातच 'जुन्नर' या गावचा इतिहास अत्यंत प्राचीन त्याच्या शेजारी असलेला नारायणगड हा किल्ला मध्ययुगातील आहे. असे अनुमान आपण लावू शकतो. 'मुक्ताई' मंदिराच्या मागून गडावर जायला सुंदर पायवाट आहे. नारायणगडावर जाताना जास्त झाडी आजिबात नसल्याने गड थोडासा उजाड असल्यासारखा वाटतो. किल्याच्या पायवाटेवर बोरीची झाडे आणि बाभळीची झाडे आपल्या स्वागताला तयार असतातच. यावाटेवरून थोडे पुढे गेले असता आपल्याला कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 

कातळात कोरलेल्या एकसंध पायऱ्या.

या कातळात खोदलेल्या पायऱ्यांची साथ आपल्याला शेवट पर्यंत मिळते. या पायऱ्यांपासून सुमारे १० ते १५ मिनिटे वाटचाल केली गडाच्या भग्न दरवाज्यात आपण पोहोचतो. याठिकाणी गडाच्या दरवाज्याच्या अगदी थोडक्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात. भौगोलिक दृष्ट्या 'नारायण गडाकडे' पहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे परंतु किल्याला चारही बाजूने नैसर्गिक कातळकडा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे जास्त तटबंदी किल्याला दिसत नाही. परंतु किल्याच्या भग्न दरवाज्यातून वर गेले असता आपल्याला बुरुजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुणा देखील पाहायला मिळतात. 

नारायणगडासमोर असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुरवर पोटामध्ये लेण्या बाळगलेला मानमोडी डोंगर.

किल्यावर पूर्वी 'नारायणाची' मूर्ती होती असे काही उल्लेख देखील मिळतात. संपूर्ण किल्ला पहात पाहत एकदाचे किल्याच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर समोरची दृश्य बघण्यासारखी असतात. सकाळच्या वेळेत जर गडावर गेला तर दुरवर दिसणाऱ्या अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे स्थान असणाऱ्या 'ओझरचा तलाव' आणि त्यावर असलेली धुक्याची झालर विलोभनीय दिसत दिसते . तसेच किल्याच्या माथ्यावरून ' शिवनेरी ' धुक्यातून हळूच मान वर काढून 'जुन्नर' या प्राचीन आर्थिक राजधानी वर लक्ष देत असताना आपल्याला बघायला मिळतो. या गडमाथ्याच्या येथून दोन पायवाटा फुटतात एक पायवाट डाव्या बाजूला वर चढत जाते आणि दुसरी पायवाट उजव्या हाताला जरा झाडीत वळते. 

नारायणगडाचा पसरलेला विस्तार. 

'नारायणगडाच्या' माथ्यावर सगळीकडे खुरटे गवत मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु लोकांच्या येण्याजाण्यामुळे याठिकाणी पाउलवाटा पडलेल्या आहेत. आपण या मुख्य वाटेवरून चालत गेले असता आपल्याला एक पाण्याचे कोरडे टाके दिसते. आज हे टाके जवळपास बुजलेल्या अवस्थेत आहे. येथून अगदी पाच ते दहा पावले चालल्यावर आपण एका उंचवट्यावर उभे राहतो तेथून किल्यावर नजर टाकली तर किल्याचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. येथून  पुढे चालत गेल्यावर गडाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे 'हस्ताबाई' या देवीच्या मंदिरात जाऊन पोहोचतो मंदिरातील 'ह्स्ताबाई' या देवतेची मूर्ती अत्यंत देखणी आहे. 

नारायण गडावरील अभेद्य बुरुज.

दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा गावात भरते. हस्ताबाईची मूर्ती हि शस्त्रसज्ज असल्याची आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर एक जुनी दगडी दीपमाळ देखील बघण्यासारखी आहे. 'हस्ताबाई' या गडदेवतेची दसरा आणि पंचमीला मोठी जत्रा असते. पंचक्रोशी मधील भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात गडावर असते या यात्रेला जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव येथून अनेक लोकं या यात्रेला येतातया गडदेवतेचे दर्शन घेऊन या मंदिराच्या मागे जाऊन उभे राहिले कि जो काही 'जुन्नर आणि सह्याद्रीचा' नजारा बघायला मिळतो तो कितीही डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला तरी तो कमीच असतो. तेथे काहीवेळ छायाचित्रण करण्यास चांगला वाव आहे. 

नारायणगड येथील गडदेवता 'ह्स्ताबाई मंदिर'. 

तेथून थोड्यावेळात परत कोरड्या पाण्याच्या टाक्या पर्यंत यावे आणि डाव्या हाताच्या झाडीत शिरावे  तेथे काही चौथऱ्यासारखे बरेचसे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या चौथऱ्याच्या धाटणी वरून हे नक्की समजते कि ते राजवाड्याचे अवशेष असावेत. हे सर्व अवशेष पाहून गडाच्या पूर्वेकडून आपण चालायला सुरुवात केली तर कातळात खोदलेले मोठे घडीव टाके आपल्याला बघावयास मिळते. या टाक्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे. 

हस्ताबाईची शस्त्रसज्ज रूपातील मूर्ती.

या खोदीव मोठ्या टाक्या शेजारून गडाच्या नैसर्गिक तटबंदीवरून चालू लागल्यास अजून एक कातळात खोदलेले एक सुंदर टाके बघायला मिळते. या किल्यावर अनेक छोटे मोठे चढ उतार बघायला मिळतात आणि त्याच्यावर वाढलेल्या गवतामुळे किल्याचे बरेचसे अवशेष हे गवतामधून शोधावे लागतात. येथून पुढे चालत गेले असता एक अप्रतिम खोदीव सुंदर टाके आपल्याला बघायला मिळाले जमिनीशी समतल असलेले हे पाण्याचे टाके 'नारायण टाके' म्हणून सगळीकडे ओळखले जाते. या टाक्याच्या मागच्या बाजूस एक देवनागरी शिलालेख देखील बघायला मिळतो परंतु हा शिलालेख अत्यंत दयनीय अवस्थेत आहेहे 'नारायण टाके' दगडी कातळात अत्यंत सुंदर खोदलेले आहे.  या नारायण टाक्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे. हेच पाणी सर्वजण गडावर आल्यावर वापरतात.  

ह्स्ताबाई मंदिरासमोरील दगडी दीपमाळ.

हे नारायण टाके पाहून झाल्यावर गडाच्या पूर्व दिशेला काही अवशेष आहेत ते पाहण्यास पुढे थोडे अंतर चालत जावे लागते त्या बाजूस सलग पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळातो अत्यंत सुंदर जोड खोदीव पाण्याच्या टाक्यांचा हा समूह 'चावंड' किल्यावरच्या टाक्यांच्या समूहाची आठवण आपल्याला नक्कीच करून देतो. परंतु दुर्दैवाने आजही हि सगळी टाकी ओहोरलेली असून ती बुजत चालली आहेत सध्या या किल्यावर 'शिवाजी ट्रेल' या संस्थेमार्फत दुर्गसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. याच्या पुढे उंचावर अजून एक टेकडी आहे परंतु या टेकडीवर गडाचे कोणतेच अवशेष उपलब्ध नसल्याने आपण परत गडाच्या दरवाजाच्या ठिकाणी चालू लागायचे. 


नारायणगडावरील वाड्याचे अवशेष.

संपूर्ण गड फिरायला आपल्याला दोन तासांचा अवधी मात्र नक्की हवा. यातून आपल्याला गडाचे इत्यंभूत माहिती बघत गडफेरी पूर्ण करता येते. तसेच अवशेष देखील गडावर शोधावे लागत असल्याने तेवढा वेळ आपल्याला गडफेरी पूर्ण करण्यासाठी द्यावीच लागते. 

गडावरील वाड्याच्या दरवाज्यावरील गणेशपट्टिका.

गडाच्या इतिहासावर जर नजर टाकली तर जुन्नर परगण्यामध्ये नारायणगड आणि खोडद यांचा समवेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरु झाला. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडात बांधली गेली. गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. 

नारायणगडावर वाड्याच्या अवशेषांच्या येथे असलेले 'शरभ शिल्प'. 

पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवे पदाची सूत्रे बाजीरावा कडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्याला दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. पहिला बाजीराव आणि निजाम यांच्या संघर्षामध्ये इ.स. १७२८ मध्ये निजामाने जुन्नर प्रांतावर स्वारी केली होती. इ.स. १७२८ च्या फेब्रुवारी महिन्यात चिमाजी आप्पा पुरंदर किल्यावर होते आणि त्यांचे निजामाच्या हालचालीवर लक्ष होते. नारायणगडाबद्दल चिमाजी आप्पा यांनी पहिल्या बाजीरावास एक पत्र देखील पाठवले असून त्यामध्ये नारायणगडाबाबत बरीचशी माहिती मिळते. या पत्रामध्ये चिमाजी अप्पांनी 'नारायणगड' परिसरातील निजामाच्या स्वारीची माहिती बाजीरावास सविस्तर कळवली आहे. नानासाहेब उर्फ बाजीराव बाळाजी बाजीराव पेशव्याच्या कालावधीत नारायणगडाच्या दगडी तटबंदीचे बांधकाम चालू होते. दगडी काम करणारे पाथरवट होते. या गडावर काम करणाऱ्या पाथरवटांंना महिन्यातून अमावस्या आणि पौर्णिमेला या दोन दिवशी सुट्टी हवी होती. मात्र आपला सुट्टीचा पगार कपात करू नये अशी त्यांनी नानासाहेब पेशवे यांना विनंती केली आणि ती विनंती नानासाहेब पेशवे यांनी मान्य केली. त्याप्रमाणे नारायणगडाचा हवालदार अंताजी काटकर यास नानासाहेबाने पत्र लिहून वरील दोन दिवशी पगारी सुट्टी देण्यास सांगितले.

नारायणगड किल्यावरील ओहरलेले पाण्याचे टाके.

जुन्नर परगण्यामधील जुन्नरच्या पूर्वेकडील गावांचा वार्षिक महसूल नारायणगडावर गोळा केला जात असे. नारायणगड किल्याजवळ निमगाव सावा हे गाव आर्थिक दृष्ट्या खूप सधन होते. निमगाव सावा येथील पाटील आणि निमगिरी किल्याच्या पायथ्याचे गाव निमगिरी या  गावातील पाटील यांचे आर्थिक कारणांवरून भांडण झाले. निमगाव येथील पाटलास बेड्या घालण्यात आल्या हि बातमी नानासाहेब पेशवे यांना समजली असता त्यांनी निमगिरी येथील पाटलाची जहागिरी जप्त केली आणि त्याला नारायणगड येथे कैदेत ठेवले. नारायणगड आणि परिसराचा आर्थिक कारभार नारायणगडाचा किल्लेदार 'अंताजी काटकर' याच्याकडे सोपविण्यात आला. त्यावेळी खालील गावांचा महसूल हा नारायणगडावर भरण्याचे आदेश देण्यात आले. त्या गावांची नावे पुढील प्रमाणे:-

१) बाभूळवाडे तर्फे गांजीभोयरे.
२) बेलापूर तर्फे ओतूर.
३) चिल्हेवाडी तर्फे ओतूर.
४) बोरी तर्फे आळे.
५) शिरोली तर्फे आळे.
६) मौजे आणे तर्फे बेल्हे.
७) जांबूत तर्फे आळे.
८) वडनेर तर्फे गांजीभोयरे.
९) गांजीभोयरे.
१०) मौजे वडज तर्फे हवेली.
११) मौजे आंबेगव्हाण तर्फे ओतूर.

नारायणगडावरील 'नारायण टाक्या' वरील पूसट झालेला देवनागरी शिलालेख.

हि सर्व आर्थिक टिपणांची नोंद नानासाहेबांंच्या रोजनिशी मध्ये लिहिलेली आहे. इ.स. १७४७ मध्ये नारायणगडावर कामासाठी पहारा करण्यासाठी काही सैनिकांचा भरणा करण्यात आला. त्याविषयी नानासाहेब पेशवे यांनी अंताजी काटकर यास पत्र लिहून कळवले आणि त्यात त्यांनी सैनिकांना सेवेत घेण्यास सांगितले. तसेच नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत एका गुजराती स्त्रीला या किल्यावर गुलाम म्हणून बंदिवासात ठेवल्याचे उल्लेख देखील मिळतात. या गुजराती स्त्रीचा मालक कों होता याबद्दल माहिती नव्हती म्हणून तिला कृष्णाजी हरि फडणीस यांना चाळीस रुपयांना विकले. हे चाळीस रुपये किल्यातील पगारखात्यामध्ये भरण्यास सांगितले.




नारायण गडावरून दिसणारे दृश्य.

आपल्याकडे नवीन वास्तूची वास्तूशांत करणे हि बाब सामन्य मानली जाते. इ.स. १७४७ मध्ये नारायणगड किल्याच्या राशीला दुष्ट ग्रह लागल्याचा उल्लेख आहे. त्या दुष्ट ग्रहाची शांती करावी असा उल्लेख नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशी मध्ये आढळतो.

इतिहासाचा हाच सुगंध आजही उपेक्षित 'नारायणगडावर' दरवळत आहे ह्याचा अनुभव घेऊन आणि आजूबाजूच्या परिसरातील माहिती बघून या छोटेखानी उपेक्षित किल्याची गडफेरी पूर्ण करावी. निसर्गाचा एखादा वेगळाच अनुभव घ्यायचा असेल तर उपेक्षित आणि दुर्लक्षित नारायणगडाला जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरून जाताना थोडिशी वाट वाकडी करावी हा उपेक्षित दुर्ग काहीतरी वेगळा अनुभव नक्कीच देतो.

नारायणगडावरून दिसणारा दूरवरचा ओझर तलाव आणि परिसर.
________________________________________________________________________________________________

संदर्भ ग्रंथ:- 
१) बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी:- गणेश चिमाजी वाड (खंड २)
२) शाहू महाराज यांची रोजनिशी:- गणेश चिमाजी वाड  (पृष्ठ ४६)

कसे जाल:-
पुणे – चाकण – राजगुरूनगर  – मंचर  – नारायणगाव – गडाची वाडी.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

2 comments:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage