नांदुरी येथील अपरिचित पराक्रमाचे साक्षीदार असलेले 'वीरगळ'


महाराष्ट्रामध्ये इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा लपलेल्या आहेत अश्या अनेक पाऊलखुणा या आपल्याला प्रत्येक गावोगावी दिसतात. या पाऊलखुणा कधी गावाच्या वेशीवर तर कधी कधी गावाच्या एखाद्या मंदिराच्या आवरात किंवा गावातल्या एखाद्या पारावर तसेच नदीच्या काठी या इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या असतात. अश्यामध्ये बऱ्याचदा काही दगड हे शिल्पांनीयुक्त असतात. हे दगड गावामध्ये आजही लोकं पूजतात त्यामुळे ह्या इतिहास जपणाऱ्या पाऊलखुणा आपल्याला गावागावांमध्ये पाण्यास मिळतात. अश्याच गावांपैकी एक गाव म्हणजे 'नांदुरी' हे ऐतिहासिक गाव 'सप्तशृंग' गडाच्या आणि 'शिडका किंवा मोहिंद्री' किल्याच्या कुशीमध्ये वसले आहे. 

महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास लाभला आहे तर काही गावे हि आजही उपेक्षित आहेत. या उपेक्षित गावांमध्ये असलेल्या नांदुरी गावात वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आपल्याला बघायला मिळतात. हे अपरिचित वीरगळ नांदुरी गावाच्या वेशीवर शेंदूर लेपन केलेल्या रूपामध्ये गावाच्या मुख्य चावडीवर उभे आहेत. आता यांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर हे वीरगळ चारही बाजूने वेगवेगळ्या आकारात कोरलेले बघायला मिळतात.

नांदुरी येथे असलेल्या वीरगळांपैकी एक वेगळ्याच धाटणी मधील वीरगळ.
  
हे वीरगळ पाहण्याआधी वीरगळ म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून स्मारके बनवली जात आहेत. यामध्ये आपल्याला घुमटी, स्तंभ, तुळशी वृंदावन, सतीशिला, छत्री वीरगळ यांंसारखे कोरीव दगड आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या व्यक्तीस किंवा शूराला युद्धभूमीवर किंवा रणांगणावर वीरगती प्राप्त झाली तर त्या वीराच्या स्मृतीप्रीत्यर्थ काही चित्रण हि दगडांवर कोरली जातात त्याला 'वीरगळ' असे संबोधतात. दक्षिण भारतामधून हा शब्द प्रचलित होत संपूर्ण भारतामध्ये आला. कन्नड भाषेमध्ये 'कल्लू' म्हणजे 'दगड' असे म्हटले जाते या 'कल्लू' शब्दावरून 'वीर-कल्लू' असा शब्द प्रचलित झाला पुढे महाराष्ट्रामध्ये त्याला 'वीर-कळ' यावरून 'वीरगळ' हा शब्द पुढे रूढ झाला. इंग्रजी मध्ये याला 'हिरो स्टोन' किंवा 'स्टोन इमेज' असे देखील म्हणतात.

असे अनेक वीरगळ हे महाराष्ट्राच्या विविध गावांच्या वेशीवर किंवा गावांमध्ये बघायला मिळतात. नांदुरी गावातील वीरगळ जरा वेगळे असल्याने ते उठून दिसतात. तसेच या वीरगळांंच्या आजूबाजूला जुन्या मंदिराचे खांब त्यावरील काही यक्ष तसेच गणपती देखील ठेवलेले आपल्याला आढळतात. नांदुरी येथील हे वीरगळ पाहता आपल्याला असे लक्षात येते कि आजूबाजूला जे किल्ले आहेत त्या किल्यांच्या परिसरात कायमच लढाया होत आल्या असल्याने येथे या गावांना पूर्वीच्या काळी खूप महत्व असावेत या गावांच्या रक्षणार्थ या वीरांनी आपला प्राण गमावला आणि त्यांच्या स्मरणार्थ गावातील त्यांच्या वंशजांनी येथे वीरगळ उभारले असावेत.


वीरगळ क्रमांक १:-

साधारणपणे ५ फुट उंच असलेली हि वीरगळ चारही बाजूंनी कोरलेली आहे. या वीरगळ मध्ये आपल्याला वीरगळाच्या वरच्या दालनात चंद्र आढळून येतो. पाच दालनात कोरलेली हि वीरगळ आपल्या विविध विरांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. या वीरगळ मध्ये दोनच ठिकाणच्या दालनामध्ये वीर हा लढताना दाखवला आहे. काहींच्या हातात तलवारी दाखवल्या आहेत तर काहींच्या हातात तलवारी नाहीत हे स्पष्टदिसून येते. इतकी सुबक वीरगळ हा चारही बाजूने कोरलेला आपल्याला बघायला मिळतो.

गुजरात हे राज्य येथून जवळ असल्याने गुजरात मध्ये वीरगळांना  'पलिता' असे संबोधतात त्या धाटणी मध्ये
हे वीरगळ आपल्याला बघायला मिळतात.

वीरगळ क्रमांक २:- 

यातील दुसऱ्या क्रमांकाची वीरगळ हि देखील जवळपास ५ फुट उंचीची असून या वीरगळ मध्ये सर्व वीर हे युद्ध करताना आपल्याला पहावयास मिळतात. यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व वीर हे एकाच पद्धतीमध्ये कोरलेले आहेत आणि सर्वजण हे एकाच रूपात आहेत. चार दालन असलेली हि वीरगळ चारही बाजूने एकाच रूपात कोरलेली आहे आणि प्रत्येक वीरगळवर सूर्य कोरलेला दिसून येतो.

वीरगळ क्रमांक ३:-

घुमटीसारखी दिसणारी हि वीरगळ अर्धीच असून याचा काही भाग हा मात्र तेथे सापडला नाही. हि वीरगळ दोन दालनात दिसून येते येथील वीर देखील शस्त्रसज्ज असून यांच्या हातातील तलवारी स्पष्ट दिसून येतात. हा वीरगळ समोरील बाजूस कोरलेला असून बाकी बाजू रिकाम्या आहेत.

वीरगळ क्रमांक ४:-

या वीरगळाचा वरचा भाग नसल्याने खालचे दालन स्पष्ट दिसते यामध्ये वीर हा घोड्यावर बसलेला असून त्याच्या हातातील तलवार स्पष्टदिसते यातील घोडा मात्र सुबकरीतीने कोरलेला आपल्याला बघायला मिळतो.


वीरगळ क्रमांक ५:-

साधारणपणे ३ फुट उंच असलेली हि वीरगळ समोरील बाजूस असून या वीरगळ मध्ये तीन दालने आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये तिसऱ्या दालनात वीर हा दोन व्यक्तींशी लढताना दिसतो तर बाकीच्या दोन दालनांमध्ये दोन वीर तलवार चालवत असताना पहायला मिळतो. वरील दालनांमध्ये कोरलेल्या वीरांच्या अंगावरच्या कपड्यांचे घेर मात्र ठळकपणे दिसतात तसेच हातातील तलवारी देखील ठळक बघायला मिळतात.वीरगळ क्रमांक ६:-

साधारणपणे ४ फुट उंच असणारी हा वीरगळ तीन दालनात कोरलेली असून यातील खालच्या दालनातील वीर हा लढाई करताना स्पष्ट दिसतो आणि वरील दोन्ही दालनामधील वीर हे घोड्यावर बसून युद्धाला निघाले असलेले बघायला मिळतात कदाचित जागा नसावी म्हणून युद्ध करताना हे वीर दाखवले नसावेत मात्र दोन्ही दालनांची धाटणी मात्र सारखी आहे.

वीरगळ क्रमांक ७:-

साधारणपणे तेवढ्याच ४ फुट उंचीचा असलेला हा वीरगळ चार दालनात कोरलेला असून खालच्या दोन दालनात वीर युद्ध करताना दाखवले आहेत आणि वरील दोन्ही दालनामधील वीर हे शेजारी जो वीरगळ आहे त्याप्रमाणे हुबेहूब घोड्यावर बसून युद्धाला निघाले असलेले बघायला मिळतात.

वीरगळ क्रमांक ८:-

हा वीरगळ शेंदूर लावलेला नसून नेहमीच्या कोरीव रूपामध्ये आहे. हा वीरगळ अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून यामध्ये एकच दालन आपल्याला बघायला मिळते यातील वीर हा तलवारीने युद्ध करत आहे असे आपल्याला दिसून येते.


पूर्वी 'नांदुरी' या प्राचीन गावामध्ये एखादे हेमाडपंथी मंदिर असावे याचे कारण म्हणजे मंदिराच्या असणाऱ्या या खुणा मंदिरामधील नंदी शिवलिंग, काही यक्ष आणि गणपतीची असलेली हि मूर्ती ज्या चौथऱ्यावर ठेवली आहे तेथे कोणतेतरी मंदिर असावे यांच्या खुणा हे सर्व अवशेष दर्शवतात. पूर्वी या भागात अभिर राजांची सत्ता होती. तसेच नाशिकच्या या भागांमध्ये आढळणारे हे वीरगळ मात्र साधारणपणे १२ ते १३ व्या शतकातले असू शकतात. हे मात्र या वीरगळांच्या धाटणीवरून आपल्याला समजते. 

वीरगळांचा प्राचीन वारसा जपत असलेले नांदुरी गाव मात्र हे आपले प्राचीनत्वाची गमक आपल्याबरोबर वर्षानुवर्षे सांभाळून आहे. आजूबाजूच्या मोठ्या किल्यांचा सहवास लाभलेले हे गाव मात्र आपला इतिहास जतन करून पुढील पिढीला सांगायचे काम मात्र गेली अनेक वर्षे झाले करत आहे.


________________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे – चाकण – राजगुरूनगर  – मंचर  – नारायणगाव – आळेफाटा –संगमनेर –सिन्नर –नाशिक –दिंडोरी –नांदुरी.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

2 comments:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage