महाराष्ट्राचा 'महावृक्ष'


महाराष्ट्र देशात अनेक किल्ले, कोरीव गिरीशिल्पे (लेणी) यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे आणि शिवाय नैसर्गिकता हि सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अजून विविधता आणते पावसाळा सुरु झाला कि हे सह्याद्रीतील अलंकार भटक्यांना मोठ्या प्रमाणात खुणावयाला लागतात तसेच उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या भौगोलिक रूपांची विविध रूपे आपणास बघावयास मिळतात. बऱ्याचदा सह्याद्रीमध्ये असलेले हे अलंकार कुठे अजस्त्र पाणलोट धबधब्याच्या रुपाने कोसळताना दिसतात तर ही सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर निर्गाने निर्मिती केलेले चमत्कार भटक्यांना साद घालत असताना दिसतात ह्याच सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक पेमगिरी किल्याच्या पायथ्याला आजही सुमारे २ ते ३ शतकांपासून आपले अस्तित्व टिकवून उभा राहिलेला महाराष्ट्राचा महावटवृक्ष शांत, निवांत परिसरात एखाद्या आजोबासारखा बसलेला आहे.

वटवृक्षाच्या रस्त्यावरून दिसणारा पेमगिरी किल्ला.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांपैकी ऐतिहासिक वारसा लाभलेले एक गाव म्हणजे संगमनेर तालुक्यातील 'पेमगिरी’ हे गाव. या गावाची ऐतिहासिक ओळख म्हणजे 'पेमगिरिचा किल्ला अथवा भीमगड / शहागड. पेमगिरी किल्ला हा जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी हि पेमगिरी गावाची दर्शवतो तशीच वनस्पती अभ्यासकांना आणि देशी विदेशी पर्यटकांना तसेच ट्रेकर्स लोकांना किल्याबरोबर आकर्षित करण्यासारखे ठिकाण म्हणजे येथील 'महाकाय वटवृक्ष'. वनस्पती अभ्यासकांना पेमगिरी येथील हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कायमच अप्रूप बनलेले आहे.

वनस्पती अभ्यासकांना महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कायमच अप्रूप बनलेले आहे.

संगमनेर पासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेमगिरी उर्फ भीमगड उर्फ शहागड किल्याजवळील दोन किलोमीटर अंतरावर पेमगिरी गावामध्ये मोरदरा नावाच्या भागात हा विशाल वटवृक्ष आजही शतकानुशतके उभा आहे वादळ वाऱ्याला तोंड देत अनेक वर्षांपासून पेमगिरी गावाची एक वेगळी ओळख हा 'महाकाय वटवृक्ष' करून देत आहे सुमारे चार एकर पेक्षा जास्त परिसरात हा 'महाकाय वटवृक्ष' पसरलेला आहे त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे त्याच्या एकूण पारंब्या ९० पेक्षा जास्त आहेत झाडाचा उत्तर दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे

या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही लोक दैवते आहेतया लोकदैवतांची दंतकथाही फार सुंदर आहे आणि या महाकाय वटवृक्षा बाबतीत पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबाची आणि जाखाई यांची. 'जाकमतबाबा आपल्या शेळ्या चरण्यासाठी या जागेवर आले होते. दुपारच्या सुमारास एका वाघाने शेळ्यांवर हल्ला केला. शेळ्यांना वाचविण्यासाठी जाकमतबाबांनी वाघाला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आपल्या भावाची म्हणजेच जाकमतबाबांची आरडाओरड ऐकून त्यांची बहिण जाखाई तेथे आल्या. जाकमतबाबा वाघाच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच जाखाई यांनी  स्वत: वाघाशी लढा दिला. या संघर्षात वाघ, जामकतबाबा व जाखाई यांनी अखेरचा श्वास घेतला. 


'जाकतबाबा व जाखाई' यांची मूर्ती तसेच काही अनघड देवतांचे शेंदूर फसलेले दगड.

या दोघांनी लढताना हत्यार म्हणून वापरलेल्या कु-हाडीचा दांडही या वृक्षात खोचलेला आपल्याला दिसतो' असे पेमगिरी येथील गावकरी सांगतात. पुढे या जागेवर रामोशांनी जाकमतबाबा व जाखाई यांच्या मूर्तीची स्थापना येथे केली. मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. यामध्ये अजून एक आख्यायिका येथे सांगितली जाते ती अशी 'कुणी जाणीवपूर्वक फांद्या तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी लोकांना अद्दल घडली गेली', असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आज या महाकाय वटवृक्षाच्या मध्यभागी काही शेंदूर फासलेले काही दगड,वीरगळ ठेवलेले आहेत तसेच 'जाकमतबाबा व जाखाई' यांची देखील मूर्ती पाहायला मिळते याचबरोबरीने या झाडाखाली हनुमंताची देखील मूर्ती आपणास पहावयास मिळते. या महाकाय वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे.  

महाकाय वटवृक्ष येथील ग्रामस्थांनी केलेली वटराई.

या महाकाय वटवृक्षाची कारणं काहीही असोत, पण हा 'महाकाय वटवृक्ष' या स्थानिक लोककथांमुळे आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याने दिवसेंदिवस विस्तारत गेला. जेव्हा केव्हा पेमगिरी किल्ला, अकोले येथील मंदिरे आणि भंडारदरा या परीसरामधे भटकंती करायला जाल तेव्हा या पेमगिरी गावातील वटवृक्षाला नक्की भेट द्या परंतु आजमितीस हा महाराष्ट्रातला सर्वात 'महाकाय वटवृक्ष' आहे, हे नक्की.   


महाकाय वटवृक्ष आणि त्याच्या पसरलेल्या पारंब्या.
_______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) NATURAL AND AGROBASE TOURIST CENTERS IN AHMEDNAGAR DISTRICT:- शोधगंगा.कॉम
२) अहमदनगर जिल्हा गॅझेटियर:- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.   

कसे जाल:-
पुणे – चाकण – राजगुरुनगर –  मंचर – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – संगमनेर – पेमगिरी

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

5 comments:

 1. छान माहिती मिळाली ...

  ReplyDelete
 2. अदभुत
  प्रत्येक पावलाला नवीन गोष्टीमिळतात

  ReplyDelete
 3. अदभुत
  प्रत्येक पावलाला नवीन गोष्टीमिळतात

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage