महाराष्ट्र देशामध्ये अनेक गड किल्ले यांची रेलचेल आपल्याला दिसून येते. हे सर्व किल्ले महाराष्ट्राचे मुकुटमणी असून ह्या किल्यांमुळे महाराष्ट्राला एक थोर इतिहास लाभलेला आहे. याच थोर इतिहासाची माहिती देत पुणे-अकोले मार्गावर शहाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'पेमगिरी' नावाचा एक छोटेखानी पण सुंदर किल्ला बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला आहे. हा किल्ला दिसायला जरी छोटेखानी असला तरी या किल्याच्या साथीने निजामशाही वाचवुन आपले स्वतंत्र असे प्रस्थापित राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या शहाजी महाराजांनी जो लढा दिला होता तो या 'पेमगीरी' किल्ल्यावरुनच.

‘पेमगिरी’ किल्ला हा प्रथमदर्शनी आपणास बुचकळ्यात पाडतो.
अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात संगमनेर-अकोले मार्गावर एक छोटेसे पण
अपरिचित ‘पेमगिरी’ नावाचे दुर्गरत्न 'कळस' या गावापासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर
लपलेले आहे. या आडवाटेवर असलेल्या ‘पेमगिरी’ या दुर्गरत्नावर जायचे असल्यास पुण्यावरून
पुणे-संगमनेर-अकोले अशी बससेवा उपलब्ध आहे अपरिचित ‘पेमगिरी’ किल्ला इतिहासाची अत्यंत महत्वाची साक्ष देत उभा आहे. महाराष्ट्राचे
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील यांनी स्वराज्य स्थापनेची जी स्वप्न
पहिली त्या स्वराज्य स्वप्नातील पहिले पाउल म्हणजे पेमगिरी किल्ला होय.

किल्याची मार्गदर्शन करणारी पाटी.
पुणे-संगमनेर-कळस असा मजल दरमजल प्रवास करत पेमगिरी या गावात यावे. पेमगिरी
गावातून किल्याकडे जात असताना हा अत्यंत छोटेखानी ‘पेमगिरी’ किल्ला हा
प्रथमदर्शनी आपणास बुचकळ्यात पाडतो. त्याचे कारण म्हणजे ह्या किल्याच्या आजूबाजूचे
एकसारखे दिसणारे पाच डोंगर याठिकाणी आहेत आणि त्यांचे वैशिष्टय म्हणजे ते डोंगर
एकाच रांगेत उभे आहेत. त्यापैकी ‘पेमगिरी’ कोणता हा देखील संभ्रम मनाला पडतो.
पेमगिरी या किल्याच्या पायथ्याला ग्रामदेवतेचे देऊळ पांढऱ्या रंगाने रंगवलेले आहे.
याच ग्रामदेवतेच्या मंदिराशेजारून ‘पेमगिरी’ या किल्यावर जायची वाट सुरु होते.

पेमगिरी किल्याचे प्रथम दर्शन.
सुमारे २७७२ फुट ‘पेमगिरी किल्ला’ हा एखाद्या शिवपिंडीसारखा भासतो. हा किल्ला तिन्ही बाजूने माथ्याकडे गोलाकार तासलेला आहे. किल्याच्या विरुद्ध बाजूच्या सोंडेवरून गडाचा मार्ग गेलेला आहे. गडाची अधिष्ठात्री ‘श्री पेमाई देवी’ ही गडदेवता पंचक्रोशीचे दैवत असल्यामुळे गावकऱ्यांनी वरपर्यंत व्यवस्थित डांबरी गाडीरस्ता केलेला आहे. गडाच्या वाटेवर ठिकठिकाणी पांढऱ्या रंगानी खुणा केल्या आहेत त्यामुळे कुठेही चुकण्याचा धोका नाही. जसेजसे वर चढत असतो तसे तसे बाळेश्वर डोंगररंगांचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सुंदर रूप न्याहाळत सध्या केलेल्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फोडलेल्या डोंगराच्या मधून आपण जात असतो. पायथ्यापासून साधारणतः अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात आपण गडमाथ्यावरती पोहोचतो.

जुने पेमाई देवी मंदिर.
डोंगर चढून जात असाल तर अगदी शेवटच्या कातळटप्यात २५ पायऱ्या खोदलेल्या आहेत. त्यावरून चढाई करून
जाताच आपण गडदेवता ‘ श्री पेमाई देवी ’ मंदिरासमोर येतो. या पेमाई देवी
मंदिरासमोरच सलग चार आयताकृती पाण्याची टाकी खोदलेली आपणास दिसून येतात. या
टाक्यांची रचना ही एखाद्या मोठ्या खंदकाप्रमाणे आहे. याच टाक्यांना लागून पुढे
अगदी थोड्या अंतरावर कातळात कोरून काढलेला हौद आहे परंतु यातील पाणी पिण्यायोग्य
नाही.

पेमाई देवी मंदिरासमोरील सलग खांब टाके.
पेमगिरी हा किल्ला दक्षिणोत्तर एखाद्या धनुष्याच्या आकारासारखा पसरला आहे.
किल्याच्या दक्षिणेकडील टोकावर एक जुन्या वाड्याची उध्वस्त भिंत ही काही काळापर्यंत इतिहासाची साक्ष देत उभी होती परंतु आपणास आता फक्त चौथरा पहावयास
मिळते. गडाचा माथा बराचसा सपाट आहे. जुन्या काळी किल्यावर बरीच बांधकामे असावीत
असे दिसते. कारण जागोजागी घरांच्या जोत्यांचे बांधकाम आजही शिल्लक असलेले आपणास
बघावयास मिळते. किल्याच्या उत्तर टोकाकडेही मोठा वाडा असावा असे अवशेषांवरून
वाटते. गडदेवता ‘पेमाई देवीचे’ मंदिर देखील आत्ताच्या काळातील आहे तसेच अजून एक नवीन ‘पेमाई देवीचे’ नवीन बंधलेले मंदिर आहे. आत्ताच्या
छोट्या देवळात देवीचा शेंदरी तांदळा व त्याच्या मागे अलीकडच्या काळातील ऑईल पेंटने
रंगवलेली मूर्ती आहे. किल्यावर आज एकही इमारत शिल्लक नसल्याने शहाजी महाराजांनी
कोणत्या इमारतीत ‘मुर्तीजा निजामशहाला’ मांडीवर घेतले व स्वराज्य स्थापनेचा
समारंभ साजरा केला याचा अंदाज लागत नाही.

किल्यावरील पाण्याचे टाके.

नवीन मंदिरातील पेमाई देवीची मूर्ती.
पेमगिरी हा किल्ला गावच्या पंचक्रोशी मध्ये पेमगिरी, पेमगड, भीमगड, आणि शहागड
अशा चार नावांनी आजही ओळखला जातो. संपूर्ण गड भटकंती करायची शहाजी महाराजांच्या
स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांच्या पुढे नतमस्तक होऊन गड उतरून पेमगिरी गावात परत
आले असता गावामध्ये असणारी एक सुंदर ‘बारव’ आणि अत्यंत मोठे आणि साधारणतः २ ते ३ शतके जुना 'महाकाय वटवृक्ष' बघणे हा आपल्या भटकंतीमधला बोनस असतो. पेमगिरी गावातील ‘बारव’ ही इ.स. १७०६ साली बांधण्यात आली आहे. या ‘बारव’ मध्ये उतरण्यास पायऱ्या
बांधण्यात आल्या आहेत. या ‘बारवमध्ये’ कोपऱ्यात एक शिलालेख देखील कोरण्यात आला
आहे.

पेमगिरी किल्यावरील पाण्याचे टाके.
खुद्द पेमगिरी किल्ला व आजूबाजूच्या डोंगरात वृक्षराजी आजिबात नाही. म्हणून
थोड्याफार प्रमाणत पाउस झाल्यांनतर मात्र पेमगिरी नावाचे ऐतिहासिक दुर्गरत्न हे
हिरवा शेला पांघरून बसल्यासारखे दिसते. अशा वेळी आडवाटेवर दुर्लक्षित असलेल्या पेमगिरी किल्यावर आल्यास
पेमगिरी किल्ला एका वेगळ्या दिमाखात त्याच्या इतिहासाची साक्ष देत असतो. म्हणून
पाउस सुरु झाल्यावर एकदातरी आडवाटेवरच्या पेमगिरीच्या सुखद दर्शनाने हरखून जायचे आणि सुखद आठवणीने नव्या भटकंतीचे इमले रचत आपल्या परतीच्या ठिकाणी परतायचे. एकदा तरी हिरवाईची शाल पांघरलेला 'पेमगिरी किल्ला' पाहण्यासाठी नगर जिल्ह्यामधीलया दुर्लक्षित किल्याची वाट धरायला हवी.

पेमगिरी गावातून दिसणारा 'पेमगिरी किल्ला'
________________________________________________________________________________________________
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र):- वि.का.राजवाडे.
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र):- वि.का.राजवाडे.
कसे जाल:-
पुणे – चाकण – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – आळेफाटा – बोटा – संगमनेर – कळस – पेमगिरी
टीप:-
संगमनेरवरून येथे येण्यासाठी सकाळी १० दुपारी ३ आणि सायंकाळी ७.३० अश्या ए.स्.टी बस थेट आहेत. इतर वेळी कळस या गावी येऊन अकोले किंवा संगमनेर ला जायला एस.टी. किंवा जीप उपलब्ध आहेत. तेथून संगमनेर किंवा अकोले मधून थेट पुणे बस उपलब्ध आहेत.
______________________________________________________________________________________________
टीप:-
संगमनेरवरून येथे येण्यासाठी सकाळी १० दुपारी ३ आणि सायंकाळी ७.३० अश्या ए.स्.टी बस थेट आहेत. इतर वेळी कळस या गावी येऊन अकोले किंवा संगमनेर ला जायला एस.टी. किंवा जीप उपलब्ध आहेत. तेथून संगमनेर किंवा अकोले मधून थेट पुणे बस उपलब्ध आहेत.
______________________________________________________________________________________________
महत्वाचे:-
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment
Thank You For Comment...!!! :)