पाषाणयुगातील 'महाराष्ट्र'


आपला महाराष्ट्र हा मुळातच 'दगडांचा देश' आहे. महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहता येथे कोणताही माणूस हा आकृष्ट होईल. म्हणूनच पाषाणयुगीन माणूस हा देखील आपल्या महाराष्ट्राकडे आकृष्ट झालेला असावा महाराष्ट्रातील पुरातत्वीय उत्खननावरून किंवा ठिकठिकाणी पाषाणयुगीन मानवाच्या हत्यारांवरून आपल्याला समजते. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये पाषाणयुगामध्ये मानवाने जी हत्यारे बनवली आहेत ती वेगवेगळ्या कालखंडातील हत्यारे खूप मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.  

मुळात पाषाणयुगीन मानवाचे अस्तित्व किंवा वास्तव्य हे महाराष्ट्रात होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न हा जवळपास १२५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष हे संशोधकांनी शोधण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील पाषाणयुगाचा पहिला पुरावा हा इ.स. १८६३ साली मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी वसलेले 'मुंगी पैठण' या गावी 'वायने' (Wayne) यांना सापडला . या 'मुंगी पैठण' या गावामध्ये त्यांना 'अकिक' वर्गाच्या पाषाणाच्या छीलक्या मध्ये  तयार केलेले एक हत्यार सापडले. हे सापडलेले हत्यार हे सुमारे ७ से.मी. लांब आणि २.५ से.मी. रुंद होते. हे हत्यार थोडेसे वक्र असून त्याचे एक टोक बहिर्वक्र होते. याचे दुसरे एक टोक हे दांड्याच्या स्वरुपात असून हे हत्यार हे हत्यार हाडाच्या किंवा लाकडाच्या तुकड्यात बसवून त्याचा वापर चाकूसारखा केला जात असावा असे 'वायने' यांनी मत मांडले. 


डेक्कन कॉलेज भेटीच्या वेळेस घेतलेले छायाचित्र.

या शोधानंतर जवळपास ४० वर्षानंतर दुसरा शोध हा इ.स. १९०४ साली पैठणजवळ गोदावरी नदीकाठी घट्ट वाळूच्या थरामध्ये जंगली हत्तीचे अश्मीभूत झालेले अवशेष सापडले. हा हत्ती प्रचंड आकाराचा होता असे त्याच्या अवशेषांवरून समजते. या हत्तीचा जो सुळा  सापडला तो तब्बल १४५ से.मी. एवढा होता. अश्याच प्रकारचे अवशेष हे महाराष्ट्रात पैनगंगा नदीच्या किनारी सापडले त्यामध्ये विविध प्राण्यांचे अश्मीभूत झालेले अवशेष सापडले. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जे 'नांदूर-माधमेश्वर' हे ठिकाण आज पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याठिकाणी पाणघोड्याची अश्मीभूत हाडे आणि जंगली हत्तीचे अवशेष सापडले आहेत. हा हत्ती देखील प्रचंड आकाराचा होता हे त्याच्या परिघावरून सिद्ध झालेले आहे. 

'पिलीग्रम' यांनी जे मत मांडले त्यामध्ये त्यांच्या मतानुसार या हत्तीची उंची हि ५ मीटर असावी आणि नाशिक जिल्ह्यातील जे 'नांदूर-माधमेश्वर' येथील  हत्ती आणि 'पैठण' येथील हत्ती यांचे हे 'एलफेस अँन्टीकस' या वर्गांचा असावा असे त्यांनी म्हटले आहे. गोदावरी काठी सापडलेली पाषाणाची हत्यारे आणि प्राण्यांची अश्मीभूत हाडे यावरून असे सिद्ध होते कि महाराष्ट्रात प्राचीन अश्मयुगीन माणसाचे अस्तित्व असावे हे अनुमान प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ 'श्री. ह.धी.सांकलिया' यांनी केले.


पाषाणयुगीन मानवाची हत्यारे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

महाराष्ट्रामध्ये जी पाषाणयुगीन मानवाची स्थळे सापडली आहेत त्याचे संपूर्ण श्रेय हे पुरातत्वशास्त्रज्ञ 'श्री. ह.धी.सांकलिया' आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे कारण त्यांच्यामुळे आपल्याला पाषाणयुगातील मानवाच्या वास्तव्याच्या जागा त्यांच्या संशोधनामुळे माहिती झाल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी पाषाणयुगातील मानव हा जी हत्यारे बनवत होता ती हत्यारे बनवण्याच्या जागांचा शोध पुरातत्वशास्त्रज्ञ 'श्री. ह.धी.सांकलिया' आणि त्यांच्या सहकाऱ्यांना' मिळाला. तापी,गोदावरी, प्रवरा, भीमा, मुळा, घोड, कृष्णा, पूर्णा, पैनगंगा, वैनगंगा, कन्हान, मांजरा, इत्यादी नद्यांच्या परिसरात आणि नाल्यांमध्ये या सर्व पाषाणयुगीन मानवाच्या वास्तव्याच्या जागा  सापडल्या आहेत तसेच खूप  मोठ्या प्रमाणात हत्यारे देखील सापडली आहेत.

महाराष्ट्रातील पाषाणयुगाचा आढावा घेताना महाराष्ट्रामध्ये कोकणकिनारपट्टीवरील कुलाबा आणि रत्नागिरी हे प्रदेश सोडल्यास सर्व नद्यांच्या खोऱ्यामध्ये पूर्व-पुराश्मयुगातील हत्यारांचा पुरावा मोठ्या प्रमाणात सापडलेला आपल्याला बघायला  मिळतो. जास्तकरून नाशिकजवळ गोदावरी नदीच्या काठावर असलेले गंगापूर, नगर जिल्ह्यात नेवाश्या जवळ चिरकी-नाला, पुण्यामध्ये मुळे-मुठे काठी डेक्कन कॉलेज परिसरात आणि आजच्या सिंहगड रोडजवळील दत्तवाडी परिसरात तसेच धुळे जिल्ह्यातील धाबरपाडा याठिकाणी सापडलेल्या अवशेषांमुळे हि सर्व ठिकाणे फार पुरातत्वीय संशोधने महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण ठरतात.

प्राण्यांच्या हाडापासून बनवलेली हत्यारे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

चिरकी-नाला याठिकाणी सापडलेली हत्यारे हि हातकुऱ्हाड, फरश्या, तासण्या आणि तोडहत्यारे हि सर्व पाषाणयुगातील मानवी जीवनाची निदर्शक हत्यारे हे सुचवतात कि याठिकाणी पाषाणयुगातील मनुष्य वास्तव्य करून होता असे सूचित होते. या सर्व प्राण्यांच्या अवशेषांवरून आणि मानवी हत्यारांवरून महाराष्ट्रातील पूर्व-पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सुमारे एक ते दीड लाख वर्षपूर्व असावे असे अनुमान शास्त्रज्ञांनी काढले आहे. हि संपूर्ण माहिती पहिली असता आपल्याला महाराष्ट्रातील पाषाणयुगीन मानवाचे असलेले अस्तित्व समजते आणि त्याची जीवनपद्धती देखील समजण्यास मदत होते. 

पाषाणयुगीन मानवाने बनवलेली हत्यारे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 
________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) महाराष्ट्रातील पुरातत्व:- ह.धी.सांकलिया आणि म.श्री.माटे., महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, १९७६. 
२) महाराष्ट्राचा प्रागैतिक इतिहास:- शां.भ.देव., महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, २००२. 
३) पुरातत्वविद्या:- शां.भ.देव., १९७९.
  
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

तीन छायाचित्र आंतरजालावरून घेतली आहेत.
लिखाण आणि एक छायाचित्र © २०१७ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage