राजगुरूनगर मधील 'दिलावरखान गुंबज'


आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जिथे  विविध कालखंडातील इतिहासाच्या पाऊलखुणा लपलेल्या आहेत अश्याच इतिहासाच्या पाऊलखुणांचा माग घेत आपण येऊन पोहोचतो ते पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेल्या 'राजगुरूनगर' या गावामध्ये. या 'राजगुरुनगर' गावाचे जुने नाव हे 'खेड' होते प्राचीन काळामध्ये या गावाचा उल्लेख खेटक असा येतो तर याच गावातील 'सिद्धेश्वर' मंदिरामध्ये असलेल्या एका शिलालेखात 'खेट' असा उल्लेख सापडतो. 

खेड हे गाव हुतात्मा 'राजगुरू' यांचे जन्मस्थान देखील आहे त्यामुळेच 'खेड' गावाचे नाव आता 'राजगुरुनगर' असे करण्यात आले आहे. याच गावामध्ये निजामशाही काळात सेनापती 'दिलावर खान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी असून त्यावर एक उत्कृष्ट घुमट बांधलेला आहे. हाच घुमट आज संपूर्ण राजगुरुनगर परिसरात 'दिलावरखान गुंबज' किंवा 'हजरत दिलावरखान दर्गाह' या नावाने ओळखला जातो.   


निजामशाही काळातील वास्तूकलेचे उदाहरण  असलेला 'दिलावरखान गुंबज' 

राजगुरुनगर मधील हि ऐतिहासिक वास्तू जर पाहायची असेल तर राजगुरुनगर बस  स्थानकापासून हि वास्तू अगदी जवळ आहे. साधारणपणे ४०० वर्षे जुनी असलेली हि वास्तू आज 'आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया' यांच्या देखरेखीखाली आहे. निजामशाही सेनापती 'दिलावरखान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी या सुंदर वास्तुमध्ये आपल्याला पहायला मिळतात. या निजामशाही कालीन वास्तूच्या प्रवेश द्वाराच्या चौकटीवर आपल्याला फारसी लेख पहायला मिळतो. या लेखाची सुरुवात हि 'ला इलाही इल्लाहलाह मुहमद रसुलुल्लाह' या वाक्याने झालेली आपल्याला पहायला मिळते.

तसेच त्याखाली असलेल्या लेखामध्ये आपल्याला 'रहमतके हक शुद बर खजा दिलावरखाना मुक्काम दरमयानी मिसरबाग व बहकजुई' अशी वाक्य आपल्याला दिसतात. याचा अर्थ पुढीलप्रमाणे उद्यानात पाण्याचा पाट जसा कायम वाहत असतो, तशी या बागेत विसावणाऱ्या दिलावरखानावर परमेश्वराची कृपा कायम राहो'. या वरील शिलालेखातील काळाचा उल्लेख हा हिजरी सन १०२२ म्हणजे इ.स. १६१३ मध्ये हि वास्तू बांधली असावी असे दिसून येते. दिलावर खानाच्या गुंबजाची जागा ही पाच एकर परिसरात आहे. 


'ला इलाही इल्लाहलाह मुहमद रसुलुल्लाह' आणि 'रहमतके हक शुद बर खजा दिलावरखाना मुक्काम दरमयानी मिसरबाग व बहकजुई' अशी वाक्य आपल्याला दिसतात.

निजामशाही कलास्थापत्यामधील ही एक सुंदर वास्तू आपल्याला राजगुरुनगर येथे बघायला मिळते. अत्यंत सुंदर असलेल्या या घुमटाच्या भोवती केलेले कोरीवकाम लक्षवेधी आहे. या वास्तू मध्ये वेलबुट्टी केलेले नक्षीकाम जास्त भावते. तसेच पूर्वी येथे बाग देखील असावी हे तेथील अवशेषांवरून आपल्याला समजते. तसेच या गुंबजाच्या आजूबाजूने बांधलेली मध्ययुगीन ढासळलेल्या तटबंदीचे अवशेष देखील आपल्याला दिसून येतात. दिलावर खानाच्या गुंबजाच्या बाजूला बांधलेले छोटे मिनार हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

दिलावर खान गुंबजाच्या आतील बाजूस जास्त काही नक्षीकाम आढळून मात्र येत नाही. या संपूर्ण पाच एकर असलेल्या परिसरातील देखण्या वास्तूभोवती आपल्याला बावडी देखील दिसून येते. 'आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया मुंबई सर्कल प्रोटेक्टेड हिस्टोरिकल मोनुमेंट' यांच्या नियमानुसार ही वास्तू मुंबई सर्कल यांच्या अंतर्गत १८ क्रमांकावर असून एवढ्यातच या वास्तूचे थोडेफार संवर्धन केलेले आहे. निजामशाही काळातील अप्रतिम वास्तुकलेचे उदाहरण असलेला हा 'दिलावरखान गुंबज' आजही उपेक्षित आहे.

'दिलावरखान' आणि त्याचा भाऊ यांच्या कबरी
____________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुंबई गॅझेटीयर (Bombay Presidency) खंड १८, भाग ३ रा इ.स. १८८५.
२) The political geography of the Deccan Sultanates prevented it to flourish and exist in rigid isolation. (Research Paper)
३) मध्ययुगीन कालखंड- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ.
४) Protected Historical Monuments:- Press Information Bureau Government of India Ministry of Culture.

कसे जाल:-

पुणे - नाशिकफाटा - भोसरी - चाकण - राजगुरुनगर.

टीप:- 
पुणे येथील शिवाजीनगर बस स्थानकामधून रोज पुणे - नाशिक जाणारी बस हि राजगुरुनगर येथे थांबते तसेच पुण्यामधून कार्पोरेशन येथील स्थानकावरून पुणे - राजगुरुनगर अशी पी.एम.पी ची बससेवा देखील उपलब्ध आहे.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा
          

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage