मंचर गावातील ऐतिहासिक वारसा 'चौदाव्या शतकातील बारव'


पुणे नाशिक या हमरस्त्यावर बरीच ऐतिहासिक गावे वसलेली आहेत अश्याच ऐतिहासिक गावांपैकी एक गावं म्हणजे पुणे- नाशिक महामार्गावरचे एक प्रमुखगाव 'मंचर' हे होय. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल की 'मंचर' गावामध्ये काय इतिहास दडलेला आहे किंवा काय ऐतिहासिक गोष्ट झाली आहे असे अनेक प्रश्न नक्कीच तुम्हाला पडतील.  'मंचर' या गावामध्ये दडलेली आहे एक ऐतिहासिक 'चौदाव्या शतकातील बारव'. हि ऐतिहासिक 'बारव' मंचर गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.

'मंचर' हे गाव आंबेगाव तालुक्यात येत असून या गावाची नोंद हि बदामीच्या चालुक्य राजा 'विनयादित्य' यांच्या इ.स. २९ एप्रिल ६९० च्या ताम्रपटात आलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये 'मंचर' या गावाचा उल्लेख हा 'मचोह' असा आलेला आपल्याला दिसतो तसेच अभ्यासकांचे देखील मत हेच आहे की हे गाव म्हणजे 'मंचर' असावे याबाबत एकमत आहे.

'मंचर' या गावाच्या पश्चिमेला हि सुंदर बारव इ.स. १३४४ मध्ये बांधली असून या बारवे मध्ये आपल्याला एक संस्कृत शिलालेख देखील बघायला मिळतो. ह्या बारवे बद्दल माहिती पाहण्याआधी आपण बारव स्थापत्या बद्दल थोडी माहिती करून घेणे नक्कीच गरजेचे आहे त्याच्यावरून आपल्याला बारव का बांधीत असत हे समजण्यास आणि त्याचे स्थापत्य समजण्यास मदत होईल. 


महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनामध्ये बारव स्थापत्याला खूप  महत्व आहे. महाराष्ट्रात इ.स. ८ व्या ते १२ व्या शतकाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात मंदिरांची उभारणी झाली हि सर्व मंदिरे महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिरे म्हणून परिचित आहेत. याच कालखंडात मोठ्या प्रमाणात बारव स्थापत्य देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत केले गेले आपल्याला दिसते. पाण्याचे महत्व आपल्याकडे प्राचीन काळापासून दिसून येते तसेच पाणी हे मानवाची मुलभूत गरज असल्याने मानवी जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. 

अगदी सुरुवातीच्या कालखंडात जेव्हा लेण्यांची निर्मिती केली गेली तेव्हा लेणी निर्मिती बरोबर पाण्याच्या टाक्यांची देखील तेथे निर्मिती केली गेली त्याला 'पाणपोढी' म्हणजे पिण्याचे पाणी साठवण्याची टाकी आणि 'न्हानकोढी' म्हणजे स्नानासाठी तसेच इतर अन्य उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या. किल्याची निर्मिती होत असताना सगळ्यात पहिले जलस्रोतांचा शोध घेतला गेला आणि मग त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या तसे कूप खोदले गेलेले आपल्याला पहायला मिळतात. गोदावरी, मांजरा, कृष्णा, चंद्रभागा अश्या नद्यांच्या काठावर ज्या ठिकाणी प्राचीन काळापासून मानवी वसाहती निर्माण झाल्या तेथे नद्यांवर घाट उभारले गेले ह्या घाटांची निर्मिती हि 'सातवाहन' कालखंडापासून होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसते. 


महाराष्ट्रातील अन्य भूभागात नवीन नगरे वसवताना भूगर्भामधील पाण्याचा शोध घेऊन त्या शहरांमध्ये किंवा नगरांमध्ये आड, विहिरी, बारव, तसेच पुष्करणी किंवा पोखरणी यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली गेली. या सर्व स्थानांवर राहत असलेल्या लोकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी विविध राजवटी मध्ये विविध कालखंडात मोठ्या प्रमाणात 'बारव' उभारल्या गेल्या तसेच अश्या बारवांची निर्मिती होत असताना पुण्यप्राप्तीविषयक संकल्पना देखील जनमानसात रुजवली गेली असे दिसते. कोणतीही बारव पाहताना हे बारव स्थापत्य समजून घेणे आपल्याला महत्वाचे ठरते. अशीच ऐतिहासिक बारव आपल्याला मंचर गावामध्ये पहायला मिळते.

मंचर गावामध्ये पश्चिमेच्या बाजूला असलेली ऐतिहासिक बारव वैशिष्ट्यपूर्ण ठरते ती त्याच्या संस्कृत शिलालेखामुळे. 'मंचर' येथील बारवेमध्ये एका देवकोष्ठामध्ये हा संस्कृत शिलालेख बसवलेला आहे. या संस्कृत शिलालेखासाठी हे देवकोष्ठ या बारवेमध्ये तयार केल्याचे आपल्याला दिसून येते. या देवकोष्ठामधील लेखाची भाषा हि संस्कृत असून लिपी हि  देवनागरी आहे. २५ ओळींचा हा महत्वपूर्ण लेख बारव स्थापत्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा लेख ठरतो. या शिलालेखाचा डाव्या बाजूला सूर्य आणि उजव्या बाजूला चंद्र कोरलेले आपल्याला पहावयास मिळतात. तसेच लेखशिलेवरील मजकुरात आपल्याला 'रसवैलोचनमहि' असा काळाचा उल्लेख देखील आढळतो.


हा संस्कृत शिलालेख पुढीलप्रमाणे:-

१. दायक: सुकृतस्या - ळ - प्रभागिने
२. लब्धं यदुपदेशेन स्वेष्टापूर्त (सुकृत्फलं) |
३. || श्री गणेशाय नम: | नौमी (स्वभुज) दौर्द्दण्डकृतकोदण्डख
४. ण्डनं वैदेहीहृदयानंदंचंदनं रघुनंदनं | १ | अमरगिरीमही
५. ध्राद्दक्षिणंं वीक्षणीयं मणिचरिमिति संज्ञायस्य (त्त्वार्थ)
६. सारं | नगरमतुवीरै (श्वारू) कैलासकल्प पुरमथनमनो
७. (ज्ञंं) निर्मिमे विश्वकर्मा | २ | तत्राभवत्प (ज्ज) नुषा कुलाम्ये प
८. ....... नंदरिती प्रसिद्ध: | अलं चकार स्वकुलं गुणौघैै :
९. क्त पितु:व्द कुलंं रत्नकरैैरिवेंदु: | ३ | कूर्माभिधस्तत्तनुजो ह्यनूनगु (णाकर)
१०. ...... सेवकोभूत् | पुरा (ग्नपं) कच्छ्पमीशमीक्ष  यो भूमीभारं सुमुषो ब
११. क्तभार | ४ | व्द तदगंजो देवगणैै: प्रदत्त देवेंद्रसंज्ञो वसुधानिवास: | अभिष्ठत
१२. (का) मदुघोधिकामं यतस्स देवेंद इवापरोभूत् | ५ | कुलक्रमायातगु
१३. (णै) रनून: पट्टैैलवर्यस्तु कडित्तुनामा | तत्सूूनुरासीद्रुणरत्नराशिराहा
१४. ...... करीव काम: | ६ | अभूदभूमि: प्रतीपक्षैैर्गुणानुरागेण परा
१५. क्रमेण - तदगंज: सद्रुणसंम्प्रदाय: श्रीलादिदेवष्कुलकीर्त्तिधुर्य: | ७ |
१६. धर्मार्थ मार्गे क्षणशीलचारस्वरूप सम्पज्जितचारुमार: | कृतस्वल
१७. (क्ष्या) त्सदसव्दिचार: स्वकंधरे सद्गुणकीर्तिहार: | ८ | मही तमीशानगणं क
१८. दाचिन्मोदाय ...... निशिसुप्तमीक्ष्य | त्वसंगतिंं संततमीक्षमाणा स्थाये
१९. त्र योषिव्द पुषेत्युवाच | ९ | इतिप्रबुद्धस्तु निशावसाने स्वप्नानुभूतं मुहुरू
२०. (त्स्म) रन्स: | ग्रामान्तिकासन्नमकालमेव संदृष्टवान्मीनमिवान्यदम्भ: || १० || तव्दा
२१. (स) रं कर्त्तुमशेषदोषशोषाय तोषाय च सज्जनानांं | शंभोष्कपर्दप्रतिमानक्तरु
२२. पीं चव्दकार वापीं निहततृृतापींं || ११ || स्वस्तिश्री रसवैरिलोचनमहीतुल्ये 
२३. ...... मासि (बुधौ) तिथविषुमिते पक्षे तु शुक्ले ध्रुवे | योगे भेसु 
२४. ...... दिने (यु) ग्लाख्यलग्ने कृत: प्रारंभ: सुकृतोत्तमस्य विदु 
२५. ...... वेन वै | १२ | शिवमस्तु जगत:

या संपूर्ण शिलालेखाचे वाचन हे इ.स. २००२-२००३ मध्ये श्री. गिरीश मांडके, डेक्कन कॉलेज पुणे यांनी केलेले असून या शिलालेखाच्या वाचनामुळे मंचर गावातील या ऐतिहासिक वारसा असलेल्या बारवेचे महत्व या लेखामधून स्पष्ट समजून येते.

या शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

ज्याच्या उपदेशावरून हे इष्टपूर्तरूपी पुण्यकर्माचे फळ मिळाले, त्याला या पुण्यकर्माच्या फळातील वाटा मिळो. श्रीगणेशाला वंदन असो.
ज्याने स्वत:च्या बलदंड अशा बाहूदंडाने शिवधनुष्याचे खंडन केले त्या सीतेच्या मनास चंदनाप्रमाणे आनंद देणाऱ्या रघुनंदनाला मी नमस्कार करतो || १ ||

अमरगिरी नामक पर्वताच्या दक्षिणेस प्रेक्षणीय असे स्वत:चे नाम सार्थ असलेले मणिचर नावाचे बलाढ्य वीरांनी युक्त असे, इंद्रदेवालासुद्धा सुंदर  वाटावे असे, सुंदर कैलासासमान नगर विश्वकर्मा याने निर्माण केले ||२||

तेथे ज्याप्रमाणे चंद्रमा रत्नकिरणांनी आपल्या पित्याच्या कुळास म्हणजे समुद्रास शोभा आणतो, त्याप्रमाणे ... नंदी नावाच्या आपल्या गुणांनी निम्न अशा अलंकारभूत झालेल्या अशा व्यक्तीने जन्म घेतला. अनेक गुणांची खाण असलेला त्याचा कुर्म नावाचा मुलगा होऊन गेला || ३ ||

पृथ्वीपती परमेश्वराने कुर्मावतारात पृथ्वीचे रक्षण केलेले पाहून त्याने प्रसन्न वदनाने भूमीचा भार वाहिला || ४ ||

त्याला देवगणांनी देवेंद्र असे नाव दिल्यामुळे तो देवेंद्र या नावाने प्रसिद्ध झाला. कामधेनुपेक्षा देखील अधिक योग्य अशा दानामुळे तो जणू काही प्रती देवराज इंद्रच झाला || ५ ||

त्याचा मुलगा गुणरत्नांच्या राशींनी  युक्त असून कुलक्रमाने (आनुवंशिक) आलेल्या गुणांमध्ये कमी नव्हता. तो पट्टेलवर्य असून त्याला कडि्डत्तु असे नाव होते || ६ ||

त्याचा मुलगा श्रीलादिदेव हा कुलकीर्तीवाढवणारा असा होऊन गेला. तो परंपरागत (आलेल्या) सद्गुणांनी युक्त असून त्याच्या गुणानुरागामुळे आणि पराक्रमामुळे त्याच्या भूमीवर प्रतिपक्षी म्हणजे वैरी पाय ठेवू शकले नाहीत || ७ ||

तो धर्म आणि अर्थ या दोन्ही मार्गाांमध्ये विचारवंत असून सुंदर मदनाला देखील त्याने स्वरूप संपत्तीने जिंकलेले होते. उद्दिष्टांंबद्दल तो विवेकपूर्ण विचार करीत असे. त्याने सद्गुणांमध्ये (सुंदर दोऱ्यामध्ये) गुंफलेला कीर्तिरूप हार खांद्यावर धारण केला || ८ ||

कदाचित एकदा तो रात्री सुखनिद्रा घेत असताना दैवीगुणांनी युक्त असलेल्या त्याला पाहून मही म्हणजे पृथ्वी म्हणाली की सतत तुझ्या संगतीची अपेक्षा करून मी स्त्री रुपाने येथे राहीन || ९ ||

रात्र संपल्यावर जागा होऊन स्वप्नात अनुभवलेली गोष्ट हळूहळू स्मरण करताना त्याला असे आढळून आले की, दुष्काळ (उन्हाळा) असून देखील गावाच्या जवळच एके ठिकाणी जणू दुसरा मासाच आहे असे स्वच्छ (किंवा चकाकणारे) पाणी वाहत आहे || १० ||

त्यानंतर त्याने त्या दिवशीच सर्व दोषांचा नाश व्हावा आणि सज्जनांचा आनंद मिळावा अशी शंभू (महादेवा)च्या कवडीप्रमाणे दिसणारी आणि तिन्ही तापांचा नाश करणारी वापी (विहीर) खोदण्यास सुरुवात केली || ११ ||

स्वस्ति श्री (मंगलकारक) अशा बाराशे सहासष्ट (या वर्षी)... या महिन्यात शुद्ध पक्षातील पंचमी या तिथीस... या योगावर मिथुन (?) लग्नावर या उत्तम  व पुण्य अशा कार्याला प्रारंभ झाला.


हा संस्कृत शिलालेख या बारवेच्या पश्चिमेकडील भिंतीवर असून याच्या अक्षरपद्धती या खोदीव आहेत. यामध्ये भाषा ही संस्कृत वापरली असून या तलावाचे प्रयोजन हे आपल्याला तलाव बांधल्याची स्मृती जपणे म्हणून हा शिलालेख कोरला आहे असे दिसून येते. यामध्ये वर्ष हे १२६६ असून तारणाम संवत्सर शुद्ध पंचमी असल्याचे दिसून येते. इंग्रजी कालखंडानुसार याची तारीख आणि साल हे इ.स. १३४४ - ४५ असे दिसून येते. हरपालदेव यादव म्हणजे रामदेवराय यादव याचा जावई याच्या कारकीर्दीत ही बारव बांधली असावी. तसेच 'मंचर' या गावाचा उल्लेख यामध्ये आपल्याला 'मणिचर' असा दिसून येतो. तसेच या शिलालेखात आपल्याला नंदी, कूर्म, देवेंद्र, कडि्डत्तु, लादिदेव ही महत्वपूर्ण व्यक्तीनामे दिसून येतात.

मंचर गावातील बारववर असलेला हा शिलालेख राजकीयदृष्ट्या महत्वाचा नसला तरी सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. या शिलालेखामध्ये 'पट्टलवर्य' असा जो उल्लेख आला आहे तो उल्लेख म्हणजे गावातील स्थानिक नेता किंवा गावाचा 'पाटील' हा महत्वाचा शब्द आपल्याला या शिलालेखात सापडतो. 'लादिदेव' याच्या वडिलांचा उल्लेख हा 'पट्टलवर्य कडि्डत्तु' असा आलेला आपल्याला पहायला मिळतो. या शब्दावरून 'पाटील' या अधिकाऱ्याचा संदर्भ हा जवळपास चौदाव्या शतकापर्यंत मागे जातो असे दिसते.


या शिलालेखामध्ये आपल्याला श्लोक ३ ते ७ मध्ये लादि देवाची वंशावळ आलेली असून यामध्ये कडि्डत्तु हे वडील असून देवेंद्र आजोबा आहेत आणि कूर्म हे पणजोबा तर नंदी हे खापरपणजोबा असल्याचे आपल्याला या संपूर्ण शिलालेखात दिसते. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात जुन्नर आणि पैठण या महत्वाच्या व्यापारी शहरांना जोडणाऱ्या मार्गावर मंचर हे गाव वसलेले असल्यामुळे अनेक व्यापारी आपला माल हा मंचर येथून नेट असत तेव्हा या व्यापारी मार्गावरून व्यापारी मालाची वाहतूक करणाऱ्या लोकांसाठी ही बारव बांधलेली असावी.

ही बारव उत्तर यादवकालीन बारवस्थापत्याच्या दृष्टीकोनातून फार महत्वाची आहे. बारवेच्या चारही बाजूनी दगडी घडीव बांधीव पायऱ्या असून त्या तलावाच्या दिशेने दोन टप्प्यांमध्ये कमी कमी होत गेलेल्या आपल्याला पहायला मिळतात. पाण्यापर्यंत आतमध्ये जाण्यासाठी पूर्वबाजूने जागा आहे. तसेच पश्चिमेकडे भिंतीवर हा शिलालेख बसवलेला आहे. वरील शिलालेख ज्या लेखशिलेवर कोरलेला आपल्याला दिसतो ती लेखशिला ही ३ फुट x २ फुट म्हणजे ६ इंच आहे. तसेच ही शिला (९१.५ से.मी. x ७६.२४ से.मी.) या मोजमापाच्या कोनाड्यात बसवलेली आहे. तसेच या शिलेच्या दोन्ही बाजूच्या कोनाड्यातील खांब हे अलंकृत केलेले आपल्यला पहायला मिळतात.

अश्या ऐतिहासिक 'मंचर' गावाच्या ऐतिहासिक वारसा असलेली हि 'चौदाव्या शतकातील बारव' हि आजही आपले अस्तित्व टिकवून आपल्याला मानवी जीवनातील पाण्याचे महत्व नक्कीच पटवून देत आहे अशी हि 'चौदाव्या शतकातील बारव' भटक्यांना आणि इतिहास अभ्यासकांना साद घालत आजही आपले अस्तित्व दाखवत खुणावत आहे. 


______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) महाराष्ट्र - इतिहास - प्राचीन काळ (स्थापत्य व कला ) खंड १ भाग २:- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ
२) महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन:- डॉ. अरुणचंद्र पाठक.
३) मराठी संस्कृत शिलालेखांच्या विश्वात:- महेश तेंडूलकर.
४) अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद शोध निबंध संग्रह (प्राचीन) अधिवेशन ११ वे, चांदवड २००२ - २००३, पृष्ठ ५३ रिसर्च पेपर (शिलालेख वाचन) श्री. गिरीश मांडके:- (प्रिंट कॉपी) अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद शोध निबंध संग्रह (प्राचीन) अधिवेशन ११ वे, चांदवड .

कसे जाल:- 
पुणे- नाशिक फाटा - चाकण - राजगुरुनगर -मंचर  

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि  छायाचित्र © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा
              

             
                      
    

            
       

12 comments:

 1. वा! आणखी एका ऐतिहासिक स्थळाची माहिती मिळाली.

  ReplyDelete
 2. वरील शिलालेखातील श्री लादिदेव या नावातील आलेले दोन्ही" द" ही अक्षरे भिन्न वाटतात. पहिले " दि " हे अक्षर "हि" असे वाटते , कारण शिलालेखातील अन्य "ह" अक्षरांसारखे ते आहे.
  त्याच काळात प्रातांत "लाहि ** " नावाची एक ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली ,आणी त्यांचे वंशज अजूनही त्याभागात राहतात.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद सर, आपल्या कॉमेंट बद्दल आभारी आहे :). परंतु या शिलालेखाचे जे वाचन झाले आहे आणि रिसर्च पेपर प्रकाशित झाला आहे त्यानुसारच दिले आहे यात पुढे काही नवीन संशोधन झाले तर नक्कीच छान वाटेल :). वरील शिलालेखाचे संदर्भ दिलेले आहेत ते देखील एकदा पहावेत :)

   Delete
 3. ऐतिहासिक वारशांची ओळख आणि त्यामागील पुराव्यासह माहिती मिळणे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. मी या गावचा असूनही या बारवेचा इतिहास अन संदर्भ माहिती नव्हता. नव्याने मंचरच्या बारव या ऐतिहासिक ठेव्याची ओळख झाली. धन्यवाद टीम महाराष्ट्राची शोधयात्रा!

  ReplyDelete
 4. अशी एकच बारव आमच्या मंचर मध्ये नसुन त्यांची संख्या जास्त आहे.. गोमुख सुद्धा आपणास पहावयास मिळेल.. या बारवेचं जतन बजरंग दल आंबेगाव तालुका यांनी केल आहे.

  ReplyDelete
 5. thanks sir, I am trying to study groundwater states for Geo-archaeology.

  ReplyDelete
 6. Sir, you can more barav or wells information like Manchar Village.

  ReplyDelete
 7. HYAA SAGLYAA GOSHTEENCHAA PRACHAAR PRASAAR KARAAYLAA,LAGNAARAA NEEDHEE PURAWNYASATHI PUNYACHYAA AAMDAR,KHAASDAR,PALAK MANTRYANCHAA AANI MAHARASHTRA PARYATAK WIDHWANS MAHA MANDALACHAA JEEV KAA JAATO?

  ReplyDelete
 8. थँक्स शोधयात्रा, अत्यन्त उपयुक्त माहिती त्याचबरोबर आपल्या येथील स्मशानभूमीत असलेली बारव, तसेच या बारव शेजारील लहान बारव यांचीही माहिती चे संशोधन होणे गरजेचे आहे

  ReplyDelete
 9. सूर्य आणि चंद्र जो उल्लेख आज शिलालेखात तो माझ्या वाचनात आला होता बारव बांधकाम सूर्य उगवल्या पासून चंद्र येस पर्यन्त बारव चे काम पूर्ण झाले असे दर्शवत आहे

  ReplyDelete
 10. इतक्या वेळा मंचरवरून गेलो असेन पण हे माहित नव्हते. कल्पनातीत सुंदर. भिमाशंकर वरील बारव आणि हरिश्चंद्रगडावरील पुष्करणीची आठवण झाली. जयंत कुलकर्णी (रांजणीकर )

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage