सुरक्षित 'गिर्यारोहण'


काल परवाच सगळी कडे एक बातमी आणि त्याचे व्हीडीओ हे प्रसार माध्यमे, फेसबुक, व्हाॅॅट्सएप यांच्या माध्यमातून सगळीकडे फिरत होती कि 'चिंचोटी धबधब्या' मध्ये जवळपास जवळपास २७ पर्यटक मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अडकले. या सर्वांना वाचवायला वसई-विरार पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, महसूल यंत्रणा, पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना या धबधब्यातून वाचवले गेले. मुळात 'चिंचोटी धबधबा' अत्यंत धोकादायक असूनही 'पर्यटक' येथे गर्दी करतात. हेच प्रकार मागच्यावर्षी देखील सध्या सगळीकडे ट्रेंडिंग मध्ये असलेल्या 'अंधारबन आणि देवकुंड' या बाबत झालेले आहेत तरी देखील देवकुंड धबधबा आणि अंधारबन येथे जाणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.    

अश्याच घटना पूर्वी देखील झालेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी 'चंदेरी' किल्ल्या जवळ एक ग्रुप हरवलेला हरवलेला होता. तसेच राजगडावर भटकंती करायला गेलेल्या दोन तरुणांच्या खोडसाळ पणामुळे त्यांना चावलेल्या मधमाश्या. त्याच वर्षी स्वतंत्र पणे 'सोलो' ट्रेक करणाऱ्या गिर्यारोहकाचा कोकणकडा उतरताना मृत्यू तसेच 'साल्हेर' किल्याच्या खिंडीत झालेल्या 'सोलो' ट्रेकरचा मृत्यू आणि मध्यंतरी एक गिर्यारोहक एका किल्यावर गेला असता त्याला किल्याच्या पायथ्याच्या गावातील लोकांनी 'चोर' म्हणून आठ दिवस पकडून ठेवले होते. या सर्व घटना आता दरवर्षी होत आहेत याचे कारण म्हणजे सध्या 'गिर्यारोहण' म्हणजे बऱ्याच लोकांना मजा वाटत आहे असे काहीसे समीकरण झाले असल्यामुळे प्रत्येक वर्षी गिर्यारोहण 'सुरक्षिततेचा' मुद्दा सगळीकडे उचलला जातो. या सर्व घटनांचा विचार केला तर सगळ्या ठिकाणी एकच मुद्दा आपल्या ध्यानी येतो तो म्हणजे गिर्यारोहण करताना घ्यायची 'सुरक्षितता'.  


'चिंचोटी धबधबा' अत्यंत धोकादायक असूनही 'पर्यटक' येथे गर्दी करतात.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

हे अपघात पाहता किंवा यांचा विचार करता आपल्याला लक्षात येईल कि यात निसर्गाची चूक किती किंवा गिर्यारोहकांची चूक किती याचा विचार करणे देखील अत्यंत जरुरीचे आहे. या अपघातांमुळे सर्वसामान्य माणूस पहिले विचार करतो कि गिर्यारोहण कशाला करतात ? हि नकारात्मक भावना सर्वसामान्य लोकांच्या मनात घर करून राहते. या सर्व गोष्टींमुळे सामान्य माणूस गिर्यारोहणाला अनेकदा दुषणे देतात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात गिर्यारोहणाबाबत नकारत्मक भावना निर्माण करतात. त्यामुळे बऱ्याचदा ज्यांना 'दुर्गभ्रमंतीचा' निखळ आनंद घ्यायचा असतो त्यांना त्यांच्या पालकांमुळे या आनंदास अनेकदा मुकावे लागते.

पावसाळा आला कि 'हवशे-नवशे-गवशे' सगळ्यांना वेध लागतात ते सह्यभ्रमंतीचे आणि मग वृत्तपत्रांत विविध संस्थाची सह्यभ्रमंतीची निवेदन छापून येतात. सध्या अशा अनेक संस्था आहेत कि ज्या दुर्गभ्रमंती आणि विविध अॅडव्हेंचर शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करतात. मग या शिबिरांना सर्व प्रकारचे 'ट्रेकर्स' जातात. या विविध दुर्गभ्रमणाला जाणाऱ्या 'विविध ट्रेकर' लोकांची संख्या पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात असते. अश्या या विविध गिर्यारोहण संस्थासोबत फिरताना तुम्ही किती सुरक्षित असता किंवा ज्या संस्थेबरोबर तुम्ही जात आहात  त्या संस्थेकडे  तेवढे 'सेफ्टी इक़्विपमेंट' असतात का ?? याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे ठरते.


अत्यंत धोकादायक असलेला देवकुंड धबधबा, भिरा.
  (छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

आजकाल फेसबुक आणि इंटरनेटमुळे आणि दुर्गभ्रमंती  या विषयावरील पुस्तके बाजारात उपलब्ध असल्यामुळे एखाद्या ट्रेकिंग क्लब बरोबर न जाता बऱ्याच लोकांचा कल हा स्वतंत्र ट्रेकला जाणे याकडे असतो. बऱ्याचदा किल्यांची माहिती हि विविध 'फेसबुक पेजेस' वरून घेतली जाते मग भले त्या फेसबुक पेजच्या अॅडमीनने तो किल्ला केला नसेल पण तो माहिती देणार. दिलेली किल्याची माहिती आणि वास्तविक त्या ठिकाणी उपलब्ध असलेला किल्याचा  रस्ता किंवा किल्याची वाट यामध्ये जमीन अस्मानाची तफावत असते. त्यामुळे ती माहिती कितपत योग्य आहे या सगळ्यांचा विचार करणे आणि पुरेशी काळजी घेऊन एखाद्या अनवट किल्यावर जाणे योग्य ठरते.गिर्यारोहणा व्यतिरिक्त इतरही उपक्रम चालवणाऱ्या अनेक संस्था या रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, क्लायंबिंग या सारखे विविध उपक्रम घेत असतात यातील सर्वच संस्था या अधिकृत आहेत कि नाहीत हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे त्यांचे जे कोणी प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षक उच्च पातळीवरील माउंटेनरिंगचे शिक्षण घेऊन आलेत कि नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा अनेक 'गिर्यारोहकांचे ग्रुप' विविध नावांच्या बॅनर ने फक्त पावसाळ्यापूरते तयार झालेले दिसून येतात. हे गिर्यारोहकांचे ग्रुप फक्त पावसाळ्यात अॅक्टीव्ह असतात. तसेच हे ग्रुप आपल्या विविध मित्र मैत्रिणींना घेऊन दोन ते तीन ट्रेक केल्यावर परत बंद होतात त्यामध्ये बऱ्याचदा हे ग्रुप लीडर्स किंवा ग्रुपचा मुख्य माणूस यांना बऱ्याचदा किल्यांच्या रस्त्याची माहिती नसेल तर स्थानिकाची मदत न घेता ग्रुप अर्धवट वाटेतून देखील परत आणतात आणि साधारणतः ७० ते १०० लोकांच्या संख्येने ग्रुप घेऊन जातात. त्यामध्ये अनेकदा ग्रुप लीडर्सला सदस्य (पार्टीसिपण्ट) जुमानत देखील नाहीत तसेच हे ग्रुप्स लोकांकडून 'सेफ्टी फॉर्म' देखील भरून घेतात. त्यामुळे योग्य ती ग्रुप ची खात्री करून घेणे गरजेचे असते. तसेच ग्रुप अधिकृत आहे कि नाही हे देखील बघणे गरजेचे ठरते. 


'अंधारबन' येथील ओढ्यामध्ये पाऊस मोठ्याप्रमाणात झाला की अचानक पाण्याची लेव्हल वाढते.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

गिर्यारोहणाचे ठिकाण हे नेहेमी आपल्या वेळेत बसण्यासारखे आहे कि नाही हे बघावे, तसेच आपला ग्रुप आणि आपली शाररिक क्षमता तसेच आपल्या ग्रुप मधील ट्रेकर्सची संख्या मर्यादित असणे हे कधीही चांगले असते. बऱ्याचदा उत्साहाच्या भरात बरेच जण दोन दिवसात ८ किल्ले किंवा ४ किल्ले करून आलो असे सांगणारे बरेच जण असतात परंतु ते  त्यांच्या 'फिटनेस लेव्हल' ने ते गिर्यारोहण करतात परंतु ज्यांना शक्य असते त्यांनीच हे करावे प्रत्येकाने आपआपली क्षमता बघावी आणि मग ठरवावे कि आपल्याकडून एवढे किल्ले होतील का किंवा नाही झाले तर किती किल्ले होतील त्याप्रमाणे विचार आणि नियोजन करावे आणि मग दुर्गभ्रमंतीला बाहेर पडावे. उगाचच शाररिक क्षमता बघायची आणि उत्साहाच्या भरात जीव धोक्यात घालू नये.

आपण एखाद्या किल्यावर जात असलो तर तेथील गावकऱ्यांचा एखादा तरी संपर्क आपल्याकडे घेऊन ठेवणे कधीही चांगले असते किंवा आपण किल्याच्या पायथ्याच्या  गावात पोहोचलो तर तेथील गावकऱ्यांशी व्यवस्थित संपर्क साधून किल्याची व्यवस्थित माहिती करून घेणे कधीही चांगले असते. किल्याच्या वाटा आणि ढोरवाटा या तेथील स्थानिक गावकऱ्यांना माहिती असतात. पहिल्यांदा त्या किल्यावर जात असाल तर गावातील एखादा वाटाड्या घेण्यात कधीहि लाज बाळगू नये. 

गिर्यारोहण करताना गावातील एखादा वाटाड्या घेण्यात कधीहि लाज बाळगू नये.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

बऱ्याचदा असे पण  दिसून येते कि जर स्वत: ट्रेकचे नियोजन करून जाणारी जि काही ट्रेकर मंडळी आहे त्यांची स्थानिक लोकांशी संवाद साधायची येणारी अडचण तसेच नेहेमीचे ठरलेले अतिउत्साहाच्या भरातील वाक्य म्हणजे 'वाटाड्या कशाला हवाय आपले आपण रस्ता शोधू शकतो' हि वाक्य अतिउत्साहाला कारणीभूत ठरतात आणि रस्ता चुकतात आणि एखाद्या किल्याच्या पाउल वाटेवर हरवतात आणि मग शेवटी पुण्या-मुंबईतल्या ट्रेकर्स लोकांना फोन करून बोलावून घेऊन 'रेस्क्यू ऑपरेशन' करण्यासाठी धावणे या घटना आता वारंवार होऊ लागल्या आहेत. यासाठी किल्यावर किंवा एखाद्या अनवट वाटेवर स्थानिक वाटाड्या घेऊन जाने कधीही चांगले किंवा ग्रुप मधील एखाद्याने तो किल्ला किंवा अनवट घाटवाट आधी केलेली असेल अशी माणसे आपल्या बरोबर असणे कधीहि चांगले असते. 

यासाठी स्वतंत्र  ट्रेक करणाऱ्यांनी त्या ठीकाणांची योग्य माहिती घेऊन जाणे तसेच गावातील लोकांशी संपर्क करून एखाद्या स्थानिक माणसाला बरोबर घेऊन एखाद्या 'अनवट किल्यावर किंवा घाटवाटेवर' जावे बऱ्याचदा अशा अनवट वाटांवर मोबाईलला रेंज नसते तसेच आपल्याकडील पाणी संपते आणि जवळील पाण्याचा स्रोत हा आपल्याला माहिती नसतो. धुक्यात बऱ्याचदा आपल्याला वाटा सापडत नाहीत अश्या वेळेस स्थानिक गावकरी आपल्याबरोबर असणे गरजेचे आहे या स्थानिक व्यक्तींमुळे आपला 'ट्रेक' देखील व्यवस्थित होतो तसेच आपल्याला म्हणावा तसा निसर्गाचा आस्वाद लुटता येतो आणि होणाऱ्या या अघटीत घटना टाळता येतात.


बऱ्याचदा अनेक जण अवघड ठिकाणी उभे किंवा बसून सेल्फी काढत असतात आजपर्यंत या सेल्फीपायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

बऱ्याचदा गिर्यारोहण करताना काही अनपेक्षित अपघात होतात हे अपघात झाल्यावर ग्रुप लीडर्स आणि पार्टीसिपण्ट हे एकमेकांवर आरोप करतात. मग त्याच्यावर एक्स्पर्ट लोकांची चर्चा होते असे करावे तसे करू नये त्यांचे सांगणे योग्य असते परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून 'अतिउत्साही पर्यटक कि अतिउत्साही ट्रेकर ?' यांना कोण सांगणार ? यांना सांगायला गेले कि यांची उत्तरे असतात आम्हाला काही सांगायची गरज नाहीये ह्यांच्या ऊत्तरांना काय म्हणावे ? बऱ्याचदा अनेक ट्रेक चे ग्रुप लीडर्स सांगतात कि ग्रुप सोडून जाऊ नका किंवा कोणत्याही किल्याच्या पाण्याच्या टाक्यात उतरू नका आणि जर का एखाद्या पार्टीसिपण्टला कोठे जायचे असेल तर ग्रुप लीडर ला सांगून जा किंवा घेऊन असे सांगितले जाते परंतु नियम पाळणार कोण ? कारण ट्रेक ग्रुप बरोबर आलेले बरेच 'पर्यटक उर्फ सो कॉल्ड ट्रेकर्स' हे फक्त मजा आणि पिकनिक या दृष्टीने आलेले असतात त्यांना कोणाचेहि बॉसिंग नको असते. बऱ्याचदा अनेक जण धबधब्यांच्या अवघड ठिकाणी उभे राहून सेल्फीच्या काढत असतात आजपर्यंत या सेल्फीपायी अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

बऱ्याचदा असे पण दिसून येते कि एखाद्याला शारीरिक इजा झाली तर काही ग्रुप्स जे कोणी फक्त 'पावसाळ्या' पुरते तयार झालेले असतात ते त्या इजा झालेल्या व्यक्तीला तसेच ट्रेक ला घेऊन जातात त्यांच्याकडे साधे 'फर्स्ट एड किट' देखील नसते अश्या वेळेस त्या व्यक्तीला हे ग्रुप लीडर्स मदत देखील करत नाहीत. आजकाल गिर्यारोहण हा छंद राहिलेला नसून एक स्पर्धा झालेली आहे; कोण किती लोक ट्रेकला घेऊन जातो यामध्ये स्वतः संस्थाची एकमेकांमध्ये स्पर्धा चालते कि किती पार्टीसिपण्ट आम्ही या किल्यावर नेले किंवा इतर अॅक्टीव्हीटीला नेले हे दाखवून अजून लोकं आकर्षून घेण्याचा प्रयत्न असतो. पण आपण करत असलेले हे गिर्यारोहण हे खरच आपण आपल्यासाठी करतो का कि जगाला दाखवण्यासाठी हे ओळखणे देखील आवश्यक आहे. 


मोठे ट्रेकिंग ग्रुप रजिस्टर्ड आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांच्या अनुभवामुळे ते वॅाटरफॅाल रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, क्लायंबिंग असे मोठे मोठे उपक्रम अनुभवी प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थितरीत्या आणि सुरक्षितपणे पार पाडतात.
 (छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये बरेच मोठे मोठे ट्रेकिंग ग्रुप रजिस्टर्ड आहेत तसेच या क्षेत्रामध्ये अनेक वर्षांच्या या ग्रुप्सच्या दांडग्या अनुभवामुळे ते वॅाटरफॅाल रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, क्लायंबिंग असे मोठे मोठे उपक्रम अनुभवी प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थितरीत्या आणि सुरक्षितपणे पार पाडतात. इतर स्वतंत्र पणे ट्रेक करणाऱ्या ट्रेकर्स ने या गोष्टींमध्ये हात घालणे म्हणजे संकटाला स्वतःहून आमंत्रण देणे असते. 

या सर्व सुरक्षीतते बरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा असतो तो प्रथमोपचाराचा दऱ्या-डोंगर भटकताना विविध अपघातांना कसे तोंड द्यायचे व त्याच्यावर कोणते प्रथमोपचार करायचे याची  योग्य माहिती  असणे त्या ग्रुप लीडरला असणे महत्वाचे आहे. तसेच ज्याठिकाणी आपण जाणार आहोत त्याठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे कि नाही किंवा खाण्याची सोय आहे कि नाही हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. तसेच ज्या किल्यावर किंवा घाटवाटेवर आपण जात आहोत त्याठिकाणचा नकाशा बरोबर असणे देखील गरजेचे आहे. तसेच आपला ग्रुप ज्या किल्यावर किंवा घाटवाटेवर जाणार आहे त्याठिकाणची योग्य माहिती व इतिहास माहिती असणे हे ग्रुप लीडर साठी आणि ग्रुप बरोबर जाणाऱ्या  ट्रेकर्सला माहिती असणे गरजेचे आहे ज्यांना त्या ठिकाणाची माहिती नसेल त्यांना ग्रुप लीडर ने व्यवस्थित माहिती देणे गरजेचे असते. ग्रुप लीडर ने योग्य सूचना देणे देखील गरजेचे आहे.

प्रत्येक गिर्यारोहकाने गिर्यारोहण करताना गिर्यारोहण यात्रेदरम्यान काही महत्वाची साधन-सामग्री आपल्याकडे जवळ ठेवणे महत्वाचे असते काही महत्वाचे साहित्य गिर्यारोहकाने घेण्यास टाळाटाळ केल्यास प्रसंगी जीवावर देखील बेतू शकते. गिर्यारोहण यात्रे दरम्यान ह्या आवश्यक गोष्टी जवळ ठेवणे जरुरीचे असते. त्यातील महत्वाच्या वस्तू घेऊनच एखाद्या डोंगरयात्रेला जाणे योग्य ठरते.


अपघातांना कसे तोंड द्यायचे व त्याच्यावर कोणते प्रथमोपचार करायचे याची  योग्य माहिती  असणे त्या ग्रुप लीडरला असणे महत्वाचे आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.) 

एखादी भटकंती ठरवताना घ्यायची काळजी:-

कोणत्याही सह्यभ्रमंतीला जाताना आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्याची योग्य माहिती हि नेहमी घ्यावी. आजकाल इंटरनेट वरून अनेक माहिती उपलब्ध असते ती माहिती आपल्याकडे ठेवावी. इंटरनेट वरून आडवाटांचा एखादा नकाशा गुगल मॅप्स वरून व्यवस्थित समजून घेऊन त्याची एखादी प्रिंट आपल्याकडे ठेवणे गरजेचे आहे. एखादा 'रोप' जवळ ठेवणे कधीपण चांगले एखाद्या 'रॉक पॅचच्या वेळेस किंवा धबधबा क्रॉस' करताना नक्कीच उपयोगी पडतो. एस.टी. ने  किंवा रेल्वे ने जाणार असाल तर त्यांचे टायमिंग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोणती एस.टी. मुक्कामी आहे ती किती वाजता येते तिचा टायमिंग देखील घेऊन ठेवणे जरुरीचे आहे. 

जेव्हा तुम्ही एखाद्या किल्याच्या पायथ्याला पोहोचाल तेव्हा गावामध्ये मुक्काम करणार असाल तर गावात कोणती शाळा आहे किंवा मंदिर आहे त्या वास्तूचे ठिकाण कोणते हि सर्व माहिती गावकऱ्यांशी व्यवस्थित बोलून आणि त्यांना विचारून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे. आपला त्रास गावातील इतर लोकांना होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तुम्ही किल्यावर जाण्याच्या आधी एखाद्या गावकऱ्याकडून ती वाट समजून घेणे गरजेचे आहे किंवा गावातीलच माणूस घेऊन त्या किल्यावर जाणे कधीही चांगले. 

एस.टी. ने  किंवा रेल्वे ने जाणार असाल तर त्यांचे टायमिंग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)

किल्यावर किंवा अनवट वाटेवर जाताना कधीही निसर्गाशी खेळू नये. कुठल्याही पाना फुलांची हानी करू नये. तसेच वाटेत दिसणाऱ्या माकडांची छेड काढू नये. आपण निसर्गात फिरायला जात असतो त्यामुळे निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटावा. किल्यावर पोहोचल्यावर विश्रांतीची गुहा शोधावी तसेच ती स्वच्छ नसेल तर स्वच्छ करून घ्यावी तसेच आजूबाजूला कोणते प्राणी नाहीत ना हे देखील तपासून घ्यावे बऱ्याचदा या गुहांमध्ये मानवी वास्तव्य नसल्यामुळे साप, विंचू, वटवाघुळे यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एकदा गुहा व्यवस्थित निरखून घ्यावी व मुक्काम करून निसर्गाचा आस्वाद घ्यावा आणि तेथील इतिहासात रमून जावे.

अनवट किल्यावर भटकंती करताना तेथील वस्तूंची तोडफोड करू नये. तसेच कचरा किल्यावर न टाकता आपल्यासोबत बरोबर घेऊन यावा व गावातील कचराकुंडीत टाकावा. निसर्गात भटकंती करताना सुरक्षेची सगळी काळजी घ्यावी.


इंटरनेट वरून आडवाटांचा एखादा नकाशा गुगल मॅप्स वरून व्यवस्थित समजून घेऊन त्याची एखादी प्रिंट आपल्याकडे ठेवणे गरजेचे आहे.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.)
        
गिर्यारोहणयात्रेदरम्यान आवश्यक वस्तू:-

१) हॅट.
२) जाड सदरा.
३) जाड विजार (फुल ट्रॅक पँट).
४) चांगले ट्रेकिंग बूट (उदाहरणार्थ:- अॅक्शन ट्रेकिंग).
५) पायमोजे जोडी.
६) चांगली पाठपिशवी. 
७) पाण्याची बाटली (कमीत कमी ३ लिटर पाणी असणे गरजेचे).
८) उपयोगी खाद्यपदार्थ (तेलकट शक्यतो टाळावे).
९) एक छोटी शिट्टी असणे गरजेचे.
१०) टॉवेल.
११) चालण्यासाठी काठी.
१२) उपयुक्त नकाशा असणे गरजेचे किंवा हाताने रेखाटलेला कच्चा पण योग्य टिपा असलेला नकाशा देखील महत्वाचा असतो.
१३) अर्धी विजार.
१४) स्वच्छता साहित्य.
१५) प्रथमोपचार साहित्य ( अॅसिडीटी आणि गाडी लागण्याच्या गोळ्या बरोबर असणे जास्त जरुरीचे गरज असेल तर स्नेक बाईट किट).
१६) नोंदवाही व पेन असणे सगळ्यात जरुरीचे.
१७) ओळख पत्र असणे महत्वाचे आहे. ( ड्रायव्हिंग लायसेन्स, किंवा पॅन कार्ड). 
१८) जेवणासाठी लागणारी एक थाळी.
१९) पाणी पिण्यासाठी एखादे भांडे. 
२०) एक छोटा चमचा आणि एक मोठा चमचा.
२१) अंतर्वस्त्रे एक जोडी. 
२२) रुमाल जोडी.
२३) कानटोपी.
२४) कपाळ पट्टी. 
२५) चांगली बॅटरी व तिला लागणारे सेल. 
२६) कंपास (दिशादर्शक).
२७) चाकु ५ से.मी. पातेवला.
२८) पॅालिथिन प्लास्टिक २ x ३ मीटर. 
२९) हलकी सतरंजी किंवा कॅरीमॅट.
३०) चादर किंवा चांगल्या कंपनीची स्लीपिंग बॅग.
३१) तंबू / किंवा एखादे निवाऱ्यासाठी छत्र. 
३२) ५ ते १० मीटर नायलॉन दोरी. 
३३) काडेपेटी व मेणबत्ती. 
३४) रेनकोट किंवा पोंचो (पावसाळ्यामध्ये).
३५) छंदसाहित्य. 
३६) इतर आवश्यक वस्तू (कॅमेरा, दुर्बिण). 
३७) एक 'रोप' असणे गरजेचे आहे.     

ह्या यादीतील सर्वच वस्तू आवश्यक आहेत हे पटवून देणारा एखादा प्रसंग घडण्याची वाट पाहत बसू नका. यादीतील सर्वच वस्तू, साधन-सामग्री ट्रेकदरम्यान सोबत बाळगा. या सोबत एक महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा, जे कोणत्याही लहान मोठ्या ट्रेक, शिबिरादरम्यान तुम्हाला उपयोगी होईल: 'उपायापेक्षा खबरदारी सर्वोत्तम'.

'सुरक्षित गिर्यारोहण' हि गोष्ट आजकाल 'प्रॅक्टीकल' झालेली असल्यामुळे सुरक्षेचे उपाय पुस्तकातून वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष स्थितीत उतरवणे अत्यंत गरजेचे आहे. आपले गिर्यारोहण हे किती सुरक्षित प्रकारे होईल याचा विचार करूनच गिर्यारोहणाला बाहेर पडावे आपल्याला एखाद्या किल्यावर पोहोचायला कितीवेळ लागेल तसेच आपल्यासोबत किती व्यक्ती आहेत याची कल्पना घरच्यांना देणे तसेच ओळखीतल्या व्यक्तींना देणे अत्यंत गरजेचे आहे. 


'सुरक्षित गिर्यारोहण' हि गोष्ट आजकाल 'प्रॅक्टीकल' झालेली आहे.
फोटो:- 'सह्याद्री मित्र' व्हाॅॅट्स एप ग्रुप.

तसेच आपल्या बरोबर जे लोकं गिर्यारोहणाला येणार आहेत त्यांचे फोन नंबर हे आपल्या घरच्यांना आणि ओळखीच्या व्यक्तींना देऊन ठेवणे गरजेचे आहे.  आज जे गिर्यारोहक हे विविध अपघातांमध्ये बळी पडले आहे त्यांची कुटुंबे आजही धक्यातून सावरलेली नाहीत. म्हणूनच आपण योग्य ती सुरक्षितता बाळगून गिर्यारोहणाचा कार्यक्रम आखावा तसेच योग्य सुरक्षितता बाळगूनच एखाद्या अनवट वाटेवरून सह्यभ्रमण करावे. सह्याद्री आजही भटक्यांना साद घालत आहे निसर्गाचा भरभरून आनंद घ्यायचा असेल चला तर मग या रम्य सह्यकड्यांवर 'सुरक्षित भटकंती' करायला...!!!


खालील जागांवर जाण्याचे टाळा:-

१) चिंचोटी धबधबा, वसई
२) कातळधार धबधबा, लोणावळा
३) पांडवकडा, खारघर 
४) देवकुंड धबधबा, भिरा 
५) झेनिथ धबधबा, खोपोली
६) कुंडेश्वर, बदलापूर 
७) कलावंतीण दुर्ग, पनवेल
८) ठोसेघर धबधबा, सातारा
९) माहुली किल्ला, आसनगाव
१०) हरिश्चंद्रगड नळीची वाट आणि आजूबाजूच्या काही घाटवाटा, अहमदनगर 
११) अंधारबन, मुळशी 
१२) प्लस व्हॅॅली, ताम्हिणी घाट 
१३) दुधसागर धबधबा, गोवा
१४) बरकी धबधबा, कोल्हापुर
१५) राऊत वाडी धबधबा, कोल्हापुर 
१६) गाढेश्वर धबधबा, पनवेल
१७) भुशी धरण, लोणावळा
१८) चंदेरी किल्ला, वांगणी 
१९) वाघ दरी, लोणावळा 
२०) उंबरखिंड, खोपोली पाली रस्ता
२१) भिवपुरी धबधबा, भिवपुरी 
२२) विसापूर किल्ला, मळवली 
२३) कोंडाणे लेणी परिसर, कर्जत
२४) पदरगड, भीमाशंकर परिसर 
२५) तोरणा किल्ला मेट पिलावरे वाट
२६) जीवधन किल्ला आणी नाणेघाट परिसर, जुन्नर 
२७) कोंढवळ धबधबा, ताम्हिणी 
२८) माळशेज घाट आणि परिसर
२९) कॅॅनियन व्हॅॅली, लोणावळा

काही महत्वाचे फोन नंबर:-

१) महाराष्ट्र माउंटेनीयर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर:- ७६२०२३०२३१ (२४ तास ७ दिवस)
२) उमेश झिरपे (गिरीप्रेमी संस्था):- ९८९०६२०४९०.
३) सतीश मराठे (गिरीदर्शन संस्था):- ९८५०५२००५८.
४) सुनील गायकवाड (शिवदुर्गमित्र लोणावळा):- ९८२२५००८८४.
५) पोलीस नियंत्रण कक्ष:- २५६५ ७१७१ किंवा २५६७१९६२. 

फोटो:- 'सह्याद्री मित्र' व्हाॅॅट्स एप ग्रुप.

_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

 गिर्यारोहण करताना योग्य गोष्टी समजण्यासाठी छायाचित्र आंतरजालावरून घेतली आहेत . 

                                             


    

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage