पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'


मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर वसलेले 'पुणे शहर' म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी एवढेच नव्हे तर पुण्याला 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' म्हणून देखील ओळखले जाते. हेच पुणे शहर आता स्वतःची कात टाकत आता 'मेट्रो शहर' बनत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्याचे भाग्य उजळले आणि पेशव्यांच्या कालखंडात पुण्याचे नाव जगाच्या पाठीवर जरी कोरले गेले असले तरी देखील 'पुणे' शहराला प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. 'राष्ट्रकुट' काळापासून पुणे शहराचे उल्लेख आपल्याला आढळतात. परंतु बऱ्याच लोकांना हे माहिती नसते कि पुण्यामध्ये एक किल्ला देखील होता. इ.स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'बहामनी' राजवटीच्या कालखंडात पुणे शहरामध्ये एक 'कोट' उभारला गेला त्यालाच 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' असे म्हटले जाऊ लागले आणि पुणे शहराचे महत्व वाढले.

इ.स. १३१८ साली अल्लादिन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सुरु झाले ते दिल्लीच्या सुलतानांचे. याच कालखंडात पुण्यावर 'सुलतानी' अंमल सुरु झालेला आपल्याला पहायला मिळतो. याच कालखंडात पुण्यामध्ये 'हिस्सामुद्दीन' आणि चार धर्मउपदेशक अरबस्तानातून पुण्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पुण्यामध्ये असलेली प्राचीन 'नारायणेश्वर आणि पुण्येश्वर' ही प्राचीन मंदिरे नष्ट केली आणि तेथे आज या दोन्ही मंदिरांच्या जागी 'थोरला शेख सल्ला' आणि 'धाकटा शेख सल्ला' असे दर्गे स्थापन झालेले आहेत. यातील धाकटा शेख सल्ला दर्गा हा पुण्याच्या प्राचीन कुंभार वेशीच्या इथे म्हणजे आजच्या कुंभार वाड्याच्या समोर आहे तर 'मोठा शेख सल्ला हा नव्या पुलाच्या डाव्या बाजूला आहे.

'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'  याच्या अस्तित्वात असलेल्या 'कोकण दरवाज्याच्या' पायऱ्या 

यानंतर देखील 'पुणे शहराच्या' परिसरात आपल्याला प्रगती झालेली दिसत नाही कारण १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'पुणे' हे अगदी लहान स्वरूपाचे होते. त्या कालखंडात 'पुणेवाडी' नावाची छोटीशी वस्ती होती. या काळात पुणेवाडीच्या आणि मुठा नदीच्या मध्ये एक नैसर्गिक सपाट टेकाड होते आणि या टेकाडावर एक 'बाळोबा मुंजा' नावाचे मुंजाबा मंदिर प्राचीन काळापासून पाराखाली उभे होते. पंचक्रोशीतले पुणेवाडी मधील लोकांची या पारावरच्या मंदिरात ये जा असायची तरीही तो भाग ऊपेक्षित होता. आजही हा 'बाळोबा मुंजा' कसबा पेठेत सूर्या हॉस्पिटलच्या मागे उभा आहे. 

इ.स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'बहमनी' सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली आणि या कालखंडात 'पुणे शहराला' महत्व प्राप्त झाले ते एका 'अरब सरदारामुळे'. बहामनी सुलतानांच्या एका सरदाराची नेमणूक ही पुणे आणि आजूबाजूच्या परिसरावर झाली आणि त्याने पुण्याचे महत्व ओळखले. ह्याच सरदाराला 'बऱ्या (बडा) अरब' म्हणून ओळखले जाते. राज्यकारभार चालविण्यासाठी 'बऱ्या (बडा) अरब' याने 'चाकण' गावी भुईकोट उभारला तोच चाकणचा इतिहासप्रसिद्ध 'संग्रामदुर्ग' होय. तसेच त्याने आपल्या लष्करी तळासाठी पुण्याची निवड केली. पुणेवाडी आणि मुठा नदीच्या मधल्या 'मुंजोबाच्या टेकाडावर' या बऱ्या (बडा) अरबाने एक गढी बांधली याच गढीचे किंवा कोटाचे उल्लेख हे 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट तसेच जुना कोट' असे केलेले आपल्याला मिळतात. हा कोट साधारणपणे इ.स. १४६० ते १४८० या दरम्यान 'बऱ्या (बडा) अरब' याने बांधला. 

'नगर दरवाजा किंवा अहमदनगर दरवाजा' हा मुख्य दरवाजा पवळे चौकात होता.

'बुऱ्हाण अरब' याचे अपभ्रंश होऊन 'बडा अरब' असे झाले. या बऱ्या (बडा) अरबाचे नाव हे 'कासम बेग शफाईतखान' असे होते. हा स्थानिक मुसलमान नव्हता हा अरबस्तान येथून आला असल्यामुळे त्याला 'बडा अरब' असे म्हणत याचे एक मुख्य कारण म्हणजे 'बहमनी सुलतान' यांच्या काळात दक्षिणी मुसलमान आणि अरबस्तान येथील मुसलमान हा फरक मोठ्या प्रमाणत केला जात असे. इ.स. १४८० साली याची पुणे आणि परिसरावर नेमणूक झाली त्याच दरम्यान त्याने 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' बांधला आणि पुण्याचे लष्करी दृष्ट्या महत्व वाढवले. या 'किल्ले हिसारच्या' बांधणीची मापे ही १८८५ च्या 'पुणे गॅझेटियर' च्या वस्तुस्थिती आणि निरीक्षणानुसार असल्याने  विश्वसनीय आहेत. 'किल्ले हिस्सार' याची उत्तर बाजूची तटबंदी ही धाकट्या शेखसल्ला दर्ग्यापासून पश्चिमेला मुठा नदीकाठाने जवळपास २५८ मीटर लांबीची आणि पश्चिम बाजूने ११९ मीटर लांबीची होती. तसेच दक्षिणेला २३८ मीटर तर पूर्व दिशेला १८३ मीटर होती.

जुन्या उल्लेखांनुसार 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याचे वर्णन जे दिसते त्यामध्ये 'बर्या किंवा बड्या अरबाने' पुणे नगराभोवती मातीची भिंत बांधलेली होती आणि त्याला तीन दरवाजे ठेवले या भिंतीच्या आतील गाव 'कसबा' या नावाने ओळखले जात असे. त्यामध्ये प्रामुख्याने मुसलमान आणि त्यांच्या रक्षणार्थ ठेवलेली शिबंदी एवढीच वस्ती होती तसेच हिंदू हे जास्त करून व्यापारी वर्गातील असल्यामुळे या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या बाहेर राहत असत. जसा 'पुणे' शहराचा व्यापार वाढला तश्या 'पुणे' शहरामध्ये चार नविन पेठा वसल्या त्यापैकी दोन पुण्याच्या दक्षिणेला तर एक पेठ पूर्वेला आणि एक पेठ पश्चिमेला वसवल्या गेल्या त्यांची नावे अनुक्रमे 'मोहियाबाद आणि मलकापूर' अशी होती त्यांची हीच नावे आज आपण बुधवार पेठ आणि रविवार पेठ म्हणून ओळखतो. पूर्वेकडील पेठेचे नाव 'अष्टपुरा पेठ' असे होते तीच पेठ आज मंगळवार पेठ म्हणून ओळखली जाते आणि पश्चिमेकडे असलेली पेठचे नाव हे 'मुर्चुदाबाद' असे होते तीच पेठ आज आपण 'शनिवार पेठ' म्हणून ओळखतो. 

पवळे चौकामध्ये सापडलेला 'वीरगळ' आज भारत इतिहास संशोधक मंडळ येथे उत्तम रित्या जपून ठेवलेला आहे.

या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या भिंती या विटामातीच्या होत्या तसेच तटाच्या भिंती या देखी विटामातीच्या बांधकामामधील होत्या.  'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'  याच्या तटाच्या भिंती या १५ फुट उंच आणि ५ फुट जाडीच्या होत्या तसेच त्या १६ फुट उंच जाडीच्या दगडी बांधकामाच्या भक्कम पायांवर उभारलेल्या होत्या तसेच यामध्ये तट आणि बुरुज देखील होते. आजही पुण्याच्या कसबा पेठेमध्ये गेले असता आपल्याला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या पायाचे दगड व्यवस्थित दिसतात आज त्याच भरभक्कम पायावर तिथे वाडे आणि इमारती आहेत.

तसेच 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्यामध्ये तोफा, बाण यांचा मारा करण्यासाठी जंग्या देखील होत्या. या  'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याला दोन दरवाजे होते त्यातील एक कोकण दरवाजा तर दुसरा हा 'अहमदनगर दरवाजा' आज हे दोन्ही दरवाजे जरी नसले तरी कोकणदरवाज्याच्या अस्तित्वाच्या काही खुणा सांगणाऱ्या पायऱ्या मात्र आजही शिल्लक आहेत परंतु लोकांना 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' ह्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे त्या पायऱ्यांचे महत्व कमी झालेले आहे. या पायऱ्यांवरून बऱ्याचदा अनेक पुणेकर लोकं गेलीही असतील परंतु 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याबद्दल माहिती नसल्याने हा पांढरीचा कोट विस्मृतीमध्ये गेला आहे.

'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याचे अवशेष आजही या मोटे मंगल कार्यालयाच्या आतमध्ये आहेत.

'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याचे अवशेष असलेल्या 'कोकण दरवाज्याच्या' पायऱ्या पहायच्या असतील तर शनिवार वाड्याच्या समोरील बाजूस जो नवा (शिवाजी) पूलाचा चढाचा रस्ता आहे तेथील डाव्या बाजूला कसबा पेठेत वळण्यास एक रस्ता आहे तेथून लगेच डाव्या बाजूला एक छोटा रस्ता आत वळलेला दिसतो तेथे या 'कोकण दरवाज्याच्या' पायऱ्या आपल्याला पहायला मिळतात. या पायऱ्या आजही गोमुखी वळणात आहेत आजही त्या पायऱ्यांच्या आजूबाजूला जुने दगड आणि पेशवे काळात झालेल्या काही नवीन वास्तू आणि त्यांच्या विटा आपल्याला दिसून येतात. या पायऱ्या चढून गेले असता आपण सूर्या हॉस्पिटलच्या दिशेने बाहेर देखील येऊ शकतो. कारण हा पूर्वी सगळा भाग या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' म्हणून ओळखला जात असे.

शहरीकरणामध्ये या पायऱ्या आणि कोटाच्या भागातल्या काही वास्तू वाचल्या आहेत हे मात्र पुणेकरांच्या आणि वारसाप्रेमींच्या दृष्टीने महत्वाचे आहे. 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याचा मुख्य दरवाजा हा पवळे चौक आज ज्या ठिकाणी आहे तेथे होता. त्या दरवाजाला 'नगर दरवाजा किंवा अहमदनगर दरवाजा' असे नाव होते. याच पवळे चौकामध्ये एक प्राचीन 'वीरगळ' देखील होता तो 'वीरगळ' आज भारत इतिहास संशोधक मंडळ येथे उत्तम रित्या जपून ठेवलेला आहे. काही जुन्या उल्लेखांवरून येथे एक वेशीवरचा म्हसोबाची घुमटी देखील होती परंतु रस्तेरुंदीमुळे तेथील 'म्हसोबाची घुमटी' हलवली गेली आहे. शिवापूर देशपांडे वहीची जी अत्रे नक्कल आहे त्यामध्ये पृष्ठ क्रमांक १७ - १८ या कोटाबद्दल जे वाक्य लिहिले आहे ते 'कोट पांढरीचा नवीन बांधला त्यांत बालोबादेव मुंजा पुरातन त्याची पूजा धर्माधिकारीकरत होते. कोटाभोवती वस्ती दर्गे व मोहतर्फा देशमुख व देशपांडे व स्थाई उपरी उदमी ऋग्वेदी ब्राम्हणाची घरे धर्माधिकारी याची होती.'

तसेच पुरंदरे दफ्तर भाग ३ पान क्रमांक १२९ यामध्ये आलेला उल्लेख पुढीलप्रमाणे:-

 पुरंदरे दफ्तर ३ मधील 'किल्ले हिस्सार' याचा उल्लेख.

'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'  याच्या परिसरात बांधले गेलेले 'ब्रदर्स देशपांडे चर्च

तसेच उत्तरच्या बाजूला असलेला जो तटामध्ये दोन लहान दरवाजे देखील होते त्यामधल्या पहिल्या छोट्या दरवाज्याच्या पायऱ्या आजही अस्तित्वात आहेत त्यांना पुरंदऱ्यांच्या पायऱ्या असे म्हणतात.  याचे मुख्य कारण म्हणजे इ.स. १७२८ मध्ये जेव्हा थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सरदार पुरंदरे यांना आज्ञा केली तेव्हा सरदार पुरंदरे यांनी या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याची साफसफाई करून कोकण दरवाजा जिथे होता तेथे आपला वाडा बांधला. या भव्य वाड्यामध्ये तिसऱ्या मजल्यावर 'पाचखणी बाराद्वारी' होती जेथून संपूर्ण पुणे आणि शहर परिसर न्याहाळता येऊ शकत होता तसेच या भव्य वाड्यामध्ये एक सुंदर दिवाणखाना देखील होता.

'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या दुसऱ्या छोट्या दरवाज्याच्या पायऱ्या आजही अस्तित्वात आहेत त्यांना सपिंड्या महादेवाच्या पायऱ्या असे म्हणतात त्याचे कारण नदीच्या काठी पेशव्यांच्या काळात येथे एक महादेवाचे मंदिर उभारले गेले त्या मंदिराच्या आवारात पिंडदान विधी केला जात असे म्हणून या मंदिराला 'सपिंड्या महादेव' असे म्हणत असत. या दुसऱ्या दरवाज्याच्या पायऱ्या देखील त्या आपल्याला सूर्या हॉस्पिटलच्या समोरील बाजूस दिसून येतात. इ.स. १८८५ साली मोजमाप करता येईल एवढे कोटाचे बांधकाम शिल्लक होते. या नोंदी आपल्याला 'पुणे गॅॅझेट' यामध्ये मिळतात.

तसेच १९५१ साली आर.व्ही. ओतूरकर यांनी संपादित केलेल्या Poona- Look and Outlook या पुस्तकामध्ये Makers of Poona हे पाचवे प्रकरण हे चिं.ग.कर्वे यांनी लिहिलेले आहे यातील पान  क्रमांक १७  यामध्ये या 'पांढरीच्या कोटाबद्दल' उल्लेख येतो तो असा, 'An Arab commander of small garrison that was left behind by the Pathan Emperor of Delhi, Ala-ud-Din Khalji, erected a smal mud wall on the river-side, known long as, 'Pandhari Kot'. It is said that only the Mohammedan population stayed in this fortified area. '
       
१९६८ ते १९७० यादरम्यान पुण्यामध्ये नदीच्या बाजूने शिवाजी पूल ते संगम पूल असा नविन रस्ता ज्यावेळेस तयार केला गेला तेव्हा जो नदीकाठी भराव टाकला गेला त्याच्यामध्ये हे 'सपिंड्या महादेव मंदिर हे गाडले गेले' ८-१० वर्षापूर्वी पुण्यातील इतिहासप्रेमींनी ही जागा शोधून  काढली आणि जवळपास ५० फुट जमीन खोदून हे 'सपिंड्या महादेवाचे' मंदिर बाहेर काढले गेले. आजही हे मंदिर आपल्याला पहायला मिळते तसेच तेथे काही आजूबाजूला अवशेष देखील पहायला मिळतात.

प्राचीन काळापासून असलेले 'बाळोबा मुंजा' याचे मंदिर.

१२ जुलै १९६१ साली जेव्हा पानशेत धरण फुटले आणि संपूर्ण पुण्यात पूर आला होता तेव्हा या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या तटाच्या भिंतीमुळे आतील पुरंदरे वाड्याला काहीही धक्का देखील लागला नव्हता. १९६८ ते १९७० यादरम्यान पुण्यामध्ये नदीच्या बाजूने शिवाजी पूल ते संगम पूल असा नविन रस्ता ज्यावेळेस बांधला गेला तेव्हा या कोटाच्या तटाच्या भिंती मात्र पाडल्या गेल्या. पुण्याच्या शहरीकरणामुळे पुण्यातील अनेक वाडे, ऐतिहासिक वास्तू या धोक्यात आल्या आहेत त्यामध्ये 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याची देखील तीच अवस्था झाली आहे शनिवारवाड्याच्या आधी बांधलेली ही वास्तू काळाच्या ओघात जरी बऱ्यापैकी नष्ट झाली असली तरीदेखील या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याचे अवशेष आजही पुण्याच्या कसबा पेठे मध्ये आपल्याला डोकावताना आपल्याला दिसतात.

या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'  याच्या परिसरात बांधले गेलेले 'ब्रदर्स देशपांडे चर्च' प्राचीन काळापासून असलेले 'बाळोबा मुंजा' याचे नविन बांधलेले मंदिर तसेच सूर्या हॉस्पिटल आणि परिसर या सर्व परिसरामध्ये या खुणा शिल्लक आहेत तसेच प्राचीन खूण असलेला 'बाळोबा मुंजा' आजही नित्यनियमाने पुजला जात आहे हे मात्र वैशिष्ट्य आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' हा अत्यंत महत्वाचा साक्षीदार हा काळाच्या रूपामध्ये आपल्या काही राहिलेल्या अवशेषांमधून आजही स्वतःचे अस्तित्व दर्शवत आहे. या 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' याच्या अवशेषांच्या अस्तित्वाला जपणे किंवा येणाऱ्या पुढील पिढीला दाखवणे आणि यातून आपला वारसा जपणे हे नक्कीच महत्वाचे ठरेल.

'बाळोबा मुंजा' या मंदिराच्या आवरात असलेला गणपती वीरगळ आणि प्राचीन मंदिरातील मूर्ती आज शेंदूर लावून ठेवलेल्या आहेत.
________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे वर्णन:- ना.वि. जोशी (१८६८).  
२) Poona In Bygone Days:- Raobahaddur Dattatraya Balwant Parassnis.
३) Gazeteers of Bombay Prsidency Poona 1, 2, 3:- Bombay Prsidency, 1885.
४) पुणे नगर संशोधन वृत्त भाग १ ते ४:- चिं.ग. कर्वे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.
५) हरवलेले पुणे:- डॉ.अविनाश सोवनी, उन्मेष प्रकाशन.
६) शिवापूर देशपांडे वही अत्रे नक्कल:-  पृष्ठ क्रमांक १७ - १८.
७) पुरंदरे दफ्तर भाग ३:- पान क्रमांक १२९.
८) Poona: Look and Outlook:- Prof. R.V.Oturkar, The Poona Muncipal Corporation, Poona City, 1951. 

_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि  छायाचित्र © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा        



                       

  

  


9 comments:

  1. So much information. Never knew this side of Pune.
    But please explain about trishunda ganpati mandir. As it is near pawale chowk.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank You Vastrabhramanti for comment please go through the www.maharashtrachishodhyatra.com there is Complete Information about 'Trishunda Ganpati Temple' with detail references. Otherwise please check the below given link:-

      पुण्यनगरीमधील कलात्मक शिल्प मंदिर त्रिशुंड गणपती:-
      http://www.maharashtrachishodhyatra.com/2016/08/blog-post.html

      Delete
  2. नवीन माहिती कळली मी तिथेच राहतो.. खूप मस्त वाटलं वाचून.👍👍

    ReplyDelete
  3. Nice to hear the other side of pune too. so much excited to visit these all places. Thanks a lot, so much informative

    ReplyDelete
  4. I SPENT MY 60 YEAR'S OF LIFE IN KASBA PETH AFTER READING THIS ARTICLE ALL THE SIGNS MENTIONED IN THE ARTICLE ARE RECOLLECTED BY ME I HAVE SEEN MANY OF THESE THINGS ACTUALLY SINCE I WAS LEAVING IN MOTE MANGAL WADA FOR 40 YEAR'S GREATFUL FOR THE INFORMATION

    ReplyDelete
  5. I WAS RESIDENT OF MOTE MANGAL KARYALAYA FOR 40YEARS DUE TO THIS INFORMATION I AM DELIGHTED AND ALL THE PICTURES WHICH I HAVE SEEN ACTUALLY THANKS FOR RECOLLECTING MY MEMORY

    ReplyDelete
  6. Great exclusive information Pune

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage