निसर्गरम्य 'निळकंठेश्वर'


पुणे हे जसे ऐतिहासिक शहर आहे तसेच पुणे हे देशातील प्रमुख आय. टी. शहरांपैकी एक प्रमुख शहर आहे. पुण्याची संस्कृती, पुणेरी बाणा हे सगळे या पुण्यात आहे. पुण्याची शान म्हणजे 'सिंहगड' आणि 'शनिवार वाडा'. लोक पुण्यात येतात परंतु त्यांना बाकीच्या लोकांकडून जे कळते ते म्हणजे शनिवारवाड्याबद्दलची माहिती आणि सिंहगडाबद्दल पण सारखे त्याच त्याच ठिकाणी फिरून कंटाळा आला कि नवीन नवीन ठिकाणांचा शोध घेत भटके फिरत राहतात.

मग अश्या भटक्यांसाठी आणि आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी पुण्याजवळ फिरायचा विकेंड ठरवणार असाल तर पुण्याजवळील थोडेसे वेगळे पर्याय देखील तुम्ही ठरवू शकता. असेच एक सुंदर ठिकाण पुण्यापासून हाकेच्या अंतरावर 'पानशेत' आणि 'वरसगाव' धरणांच्या निसर्गरम्य परिसरात एका उंच डोंगरावर ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ वसलेले आहे. 

‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ येथे जाण्याचा रस्ता.

पुण्याहून निळकंठेश्वरला जायला एस.टी. ची सेवा आहे तसेच स्वतःची गाडी घेऊन जाणे देखील उत्तम पर्याय आहे. पानशेतच्या अलीकडे वसलेले ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ एका उंच डोंगरावर आहे. डोंगर भटक्यांच्या दृष्टीने या डोंगरावरील चढाई नक्कीच उत्तम पर्याय आहे.  या ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वरचा’ परिसर निसर्गरम्य आहे तसेच हा डोंगर अत्यंत खडा चढणीचा आहे. परंतु एकदा का वरती पोहोचले तर आजूबाजूचे आणि मावळातील विहंगम दृश्य आपणास बघीतले कि जो काही आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. 

जेव्हा आपण मंदिराच्या जवळ पोहोचतो तेव्हा दोन सुंदर हत्तींचे पुतळे असलेली स्वागत कमान बघण्यासारखी आहे. या स्वागत कमानीमधून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळयांनी नटलेली आहे. या ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ येथील माथ्यावर असलेल्या पुतळ्यांंमध्ये आपल्याला  दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्णलीला, बकासुर वध, अष्टविनायक गणपती, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, संत परंपरा, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारत असे विविध पुतळे आपले लक्ष वेधून घेतात. ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ येथील विविध  प्रसंगांच्या पुतळ्यांंनी  संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखा आपल्याला वाटतो.

‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ येथील विविध  प्रसंगांच्या पुतळ्यांंनी  संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखा आपल्याला वाटतो.

डोंगरावरती पोहोचल्यावर ‘श्री निळकंठेश्वराचे’ अत्यंत सुंदर आणि सुबक मंदिर बघितल्यावर आपला थकवा कुठच्या कुठे पळून जातो. निरव शांतता धार्मिक वातावरण समोर दिसणारे सह्याद्रीचे उंचच उंच कडे तसेच दुरवर दिसणारे ऐतिहासिक 'तोरणा' आणि 'सिंहगड' तसेच 'पानशेतचे धरण' आणि 'वरसगावचे धरण' यांचे दिसणारे दृश्य मनाला सुखावून जाते. 

‘श्री निळकंठेश्वर’ मंदिरातील शिवलिंग. 

या डोंगरमाथ्यावर असलेले हे सुबकसे ‘श्री निळकंठेश्वर’ याचे सुंदर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला लावलेली झाडे आपले मन नक्कीच मोहवून टाकतात. तसेच मंदिराच्या प्रांगणात असलेला सुंदर पाण्याचा हौद हा देखील बघण्यासारखा आहे. बारमाही पाण्याचा हाच एक स्रोत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अश्या या सुंदर ठिकाणी भेट देऊन नव्या जोमाने आणि उत्साहाने आपण आपल्या मुक्कामच्या ठिकाणी परतू शकतो.  

______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
स्वारगेट -  सिंहगड रोड  - खडकवासला धरण - डोणजे फाटा - खानापुर -  पानशेत - निळकंठेश्वर.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा 

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage