अमृतेश्वर मंदिर समुहातील सिद्धेश्वर मंदिरातील 'सूर्यमूर्ती'

 

पुणे शहरामध्ये असलेल्या विविध पेठांमध्ये आपल्याला आजही ऐतिहासिक ठिकाणे लपलेली आढळून येतात. मुठा नदीकाठी असलेल्या रस्त्यावरून जेव्हा आपण टिळक पुलाच्या जवळून उजवीकडे शनिवार पेठेकडे वळतो तेव्हा आपल्याला एक पाटी पहावयास मिळते त्याच्यावर शिवपूर्वकालीन मंदिर समूह असे लिहिलेले आपल्याला पहावयास मिळते. हा शिवपूर्वकालीन मंदिर समूह प्रसिद्ध आहे तो अमृतेश्वर मंदिर समूह या नावाने. याच अमृतेश्वर मंदिर समूहाच्या मंदिर परीसरामध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण 'सूर्यमूर्ती' पहावयास मिळते.


तसे पहायला गेले तर शनिवार पेठेमध्ये असलेला अमृतेश्वर मंदिर समूह शोधण्यासाठी फारशी पळापळ करावी लागत नाही. पुणे महानगरपालिकेच्या इमारतीकडून जयवंतराव टिळक पुलावरून नदी ओलांडली असता उजवीकडे येणारा नदीकाठचा रस्ता लागतो याच चौकाच्या उजवीकडे अगदी कोपऱ्यावर आपल्याला सिद्धेश्वर मंदिराचा परिसर पहावयास मिळतो. इथून थोडेसे पुढे जाऊन आपल्याला मंदिराचे प्रवेशद्वार देखील पहावयास मिळते. या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आले असता आपल्याला येथे मारुती मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, अमृतेश्वर मंदिर, सती वृंदावन, माधव विष्णू लक्ष्मी-मंदिर, आणि सिद्धेश्वर मंदिर तसेच काही दगडी शिल्पे आढळून येतात. तसेच आपल्याला सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक सुंदर सूर्यमूर्ती देखील पहावयास मिळते.


शनिवार पेठेमधील अमृतेश्वर मंदिर समूह.

आपण जेव्हा अमृतेश्वर मंदिर समुहाच्या परिसरात फिरत असतो तेव्हा आपल्याला असे आजीबात जाणवत नाही कि आपण गजबजलेल्या पुण्यामध्ये फिरत आहोत. एवढी शांतता आपल्याला या मंदिर समूहाच्या परिसरात अनुभवयाला मिळते. बऱ्याच वेळेस मुठा नदीच्या पलीकडे देखील वृद्धेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिर समूह आहे या नामसाधर्म्यामुळे लोकांचा गोंधळ नक्कीच उडतो. परंतु शनिवार पेठेतील हा मंदिर समूह हा अमृतेश्वर मंदिर समूह म्हणूनच ओळखला जातो. 


अमृतेश्वर मंदिर परिसरातील सिद्धेश्वर मंदिर जर आपण व्यवस्थित पहिले तर आपल्याला दगडी बांधणीच्या या मंदिरामध्ये मंदिराच्या समोरील बाजूस स्वतंत्र नंदीमंडप पहावयास मिळतो तसेच या नंदी मंडपाला आपल्याला कळस देखील पहावयास मिळतात. तसेच सिद्धेश्वर मंदिराला चार दरवाजे असणारा मोठा सभामंडप आपल्याला पहावयास मिळतो. या मंडपाच्या आतमध्ये डावीकडे आपल्याला उजवीसोंड असलेला गणपती म्हणजेच सिद्धीविनायकाची मूर्ती  पहावयास मिळते. तसेच उजवीकडे नागशिल्प किंवा नागयुग्म पहावयास मिळते. 


सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या मागील बाजूस असलेली सूर्यमूर्ती.


जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला आतमध्ये शिवलिंग पहायाला मिळतेच परंतु या शिवलिंगाच्या मागील बाजूस आपल्याला एक सुंदर सूर्यमूर्ती पहावयास मिळते. जवळपास २ फुट उंचीची अत्यंत सुंदर सूर्यमूर्ती  नक्कीच  लक्षवेधक आहे. तसे पहायला गेले तर बऱ्याचवेळेस सूर्यमूर्ती हि द्विभुज आपल्याला पहावयास मिळते परंतु सिद्धेश्वर मंदिरात असलेली मूर्ती हि चतुर्भुज असून हि मूर्ती एकाच दगडामध्ये घडवलेली असावी हे देखील मूर्तीकडे पाहिले असता समजण्यास मदत होते. सिद्धेश्वर मंदिरात असलेली सूर्यमूर्ती आपण नीट पाहिली असता आपल्याला सूर्याच्या मुकुटाभोवती किरणांची प्रभावळ पहावयास मिळते. तसेच आपल्याला सात अश्व देखील पहावयास मिळतात तसेच सूर्याचा सारथी अरुण आणि चवऱ्या ढाळणारे आणि छत्र धरणारे सेवक देखील आपल्याला बसलेल्या सूर्याशेजारी पहावयास मिळतात. 


सूर्याचा सारथी अरुण आणि चवऱ्या ढाळणारे आणि छत्र धरणारे सेवक आपल्याला दिसतात.

असे हे वैशिष्ट्यपूर्ण सूर्याचे शिल्प आपल्याला शनिवार पेठेतील सिद्धेश्वर मंदिरामध्ये पहावयास मिळते. काही अभ्यासकांच्या मते हे सूर्याचे शिल्प १४ व्या किंवा १५ व्या शतकातील असावे तसेच पूर्वी येथे एखादे मंदिर असावे असे काही उल्लेख सापडतात. परंतु जर आपण सूर्याचे हे शिल्प व्यवस्थित पाहिले तर सिद्धेश्वर मंदिरामध्ये असलेले सूर्याचे शिल्प नक्कीच १४ व्या किंवा १५ व्या शतकातले असावे असे नक्की वाटते. असे हे पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूर्यशिल्प पाहण्यासाठी आवर्जून अमृतेश्वर मंदिर समूहाला भेट देणे नक्कीच महत्वाचे ठरते. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे नगर संशोधन वृत्त:- भारत इतिहास संशोधक मंडळ.

२) मुठेकाठचे पुणे:- प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०१५.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा


  

2 comments:

  1. आनंद झाला.. कौतुकास्पद उपक्रम.. शुभेच्छा..

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage