गुंजण मावळातील 'अमृतेश्वर मंदिर'


महाराष्ट्रामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक मंदिरे उभारली गेली काही मंदिरे ही आजही महाराष्ट्रातील आडवाटांंवर असून देखील दुर्लक्षित आहेत. प्राचीन काळात किंवा मध्ययुगात या मंदिरांचे महत्व खूप होते असे आपल्याला त्यांच्या कोरीवकामावरून तसेच मंदिरांच्या बदलत जाणाऱ्या शैलींवरून समजून येते. असेच एक सुंदर मंदिर हे पुण्यापासून जवळच प्रसिद्ध असलेल्या 'बनेश्वर' मंदिरापासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर 'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर'  आजही तसे उपेक्षितच आहे.

'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर'

अमृतेश्वर मंदिराकडे जायचे असेल तर स्वारगेट बस स्थानकामधून 'तांभाड' या गावामध्ये जाणारी बस पकडावी ही 'तांभाड' पुण्यावरून नसरापूर येथून दीडघर, कतकावणे, हातवे बुद्रुक, तांभाड या गावामार्गे मोहरी या गावात यावे. पुणे - सातारा महामार्गावरून भोर फाट्यावरून आत वळावे आणि कासुर्डी गावाजवळील गुंजवणी नदीच्या जवळील अरुंद पुलास उजव्या बाजूला ठेवून हातवे, तांभाड मार्गे मोहरी गाव देखील आपल्याला गाठता येते. या गावाजवळून 'गुंजवणी नदी' वाहते म्हणून या संपूर्ण परिसरास 'गुंजण मावळ' असे संबोधतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिळीमकर, जेधे, बांदल या देशमुखांचे वर्चस्व या 'गुंजण मावळावर' होते. 'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर' हे शिळीमकर देशमुख यांचे कुलदैवत आहे.

'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर' मधील 'नंदीमंडप'

अत्यंत सुंदर असलेल्या या मंदिराचे तीन भाग आपल्याला पहायला मिळतात. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अश्या पद्धतीने हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या चारही बाजूने बंदिस्त आवार असून एवढ्यातच मंदिराचा गावातील लोकांनी जीर्णोद्धार केला असल्याने जुन्या मंदिराला जोडून त्यांनी मोठा सभामंडप उभारलेला आपल्याला पहायला मिळतो तसेच नविन रंगकाम केलेले देखील दिसते. मोहरी गावात असलेल्या 'अमृतेश्वर मंदिर' याच्या डाव्या बाजूला आपल्याला दीपमाळ पहायला मिळते. तसेच 'अमृतेश्वर मंदिर' याच्या आवरात आपल्याला काही भग्न आणि झिजलेल्या काही मध्युगीन मूर्ती ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. आत्ताचे 'अमृतेश्वर मंदिर' पाहिले असता आपल्याला मंदिराचे 'गर्भगृह' आणि  त्याच्या समोरील 'नंदीमंडप' पाहिले असता हे मंदिर साधारणपणे यादव काळातले असावे असे वाटते.

 भग्न आणि झिजलेल्या काही मध्युगीन मूर्ती ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात

'अमृतेश्वर मंदिराच्या' सभामंडपातून अंतराळात जाताना आपल्याला  काही  शिल्प पहायला मिळतात. यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला एका गाईचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प पहायला मिळते यामध्ये या गाईच्या एकाच धडाला पाच मस्तके दाखवलेली आहे हे पहायला मिळते. तसेच डाव्या बाजूला एक शरभाचे शिल्प असून या शरभाने आपल्या चार पायांंमध्ये, शेपटीमध्ये आणि तोंडामध्ये एक एक हत्ती पकडलेला आपल्याला पहायला मिळतो. 'अमृतेश्वर मंदिराच्या' अंतराळात आपण प्रवेश केला असता अंतराळाच्या मध्यभागी आपल्याला एक कासवाचे शिल्प पहायला मिळते. याच्या बरोबर समोरच्या बाजूस मंदिराच्या गर्भगृहाची द्वारशाखा आपल्याला पहायला मिळते. तसेच मंदिराची ही द्वारशाखा ही नविन रूपामध्ये असून यामध्ये आपल्याला विविध मिश्र शिल्प पहायला मिळतात. यामध्ये डाव्या बाजूला असलेल्या स्तंभशाखेवर आपल्याला एक तुरा असलेले शरभाचे शिल्प पहायला मिळते. त्याच्या बरोबर खालच्या बाजूस आपल्याला 'गंडभेरुंड' याचे शिल्प पहायला मिळते.

शरभाने आपल्या चार पायांंमध्ये, शेपटीमध्ये आणि तोंडामध्ये एक एक हत्ती पकडलेला आपल्याला पहायला मिळतो. 

'गंडभेरुंडाचे' एक शिल्प आपल्याला मंदिराच्या बाहेर देखील पहायला मिळते. 'गंडभेरुंड' म्हणजे काय हे देखील आपण समजून घ्यायला हवे. 'गंडभेरुंड' हे अत्यंत प्राचीन शिल्प आहे. 'गंडभेरुंड' म्हणजे दोन मस्तकांचा गरुडासारखा ताकदवान असलेला काल्पनिक पक्षी हा अनेक प्राचीन ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मंदिराच्या द्वारशाखेवर विविध 'मिश्र शिल्पे' देखील पहायला मिळतात. मंदिराच्या उजव्या बाजूच्या स्तंभशाखेवर आपल्याला व्याल, मारुती, आणि सुरुची पाने अशी विविध शिल्पे देखील पहायला मिळतात. 


'अमृतेश्वर मंदिर' येथे कोरलेले 'गंडभेरुंड' याचे शिल्प. 

'अमृतेश्वर मंदिराच्या' अंतराळातून गर्भगृहाकडे जाताना आपल्याला दोन काळ्या पाषाणातील मूर्ती उभ्या केलेल्या पहायला मिळतात. जुने मंदिर पडून नविन मंदिर उभारताना यामूर्ती तेथील स्थानिक लोकांना सापडल्या आहेत त्यांनी त्या मूर्ती मंदिराच्या येथे उभ्या करून ठेवलेल्या आहेत. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार करताना बरेच जुने अवशेष देखील सापडले आहेत. या जुन्या अवशेषांमध्ये एक सुंदर मूर्ती गावकऱ्यांनी आजही मंदिर परिसरात जतन करून ठेवलेली आहे. ही सापडलेली मूर्ती शंकराची असून अत्यंत दुर्मिळ असे हे शंकराचे शिल्प आहे. ही शंकराची मूर्ती भिक्षाटन रूपामध्ये असून या मूर्तीला सहा हात आहेत. यामध्ये डाव्या बाजूच्या तीन हातामध्ये त्रिशूल, कवटी, आणि वाडगा म्हणजेच भिक्षापात्र आपल्याला पाहायला मिळते. तर उजव्या हातामध्ये वरच्या बाजूने खाली डमरू, माळ, परशु अशी आयुधे आपल्याला पहायला मिळतात. तसेच शंकराने आपला उजवा पाय हा वर उचलेला असून त्याच्या पायातील खडावा खाली आपल्याला पाहायला मिळतात. या शंकराच्या मूर्तीला कंबरपट्टा देखील आपल्याला पहायला मिळतो. तसेच या शिल्पामध्ये शंकराने आपल्या अंगावर परिधान केलेली 'नरमुंडमाला' देखील आपल्याला पहायला मिळते. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ असलेली ही मूर्ती नक्कीच पाहण्यासारखी आहे.

भिक्षाटन रूपामध्ये असलेली शंकराची मूर्ती.

तसेच येथे अजून एक मूर्ती असून ती एका स्त्रीची आहे. या मुर्तीमधील आयुधे आपल्याला मूर्तीची झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत. त्यातील फक्त गदा आणि ढाल ही आयुधे आपल्याला दिसून येतात. 'अमृतेश्वर मंदिराच्या' अंतराळाच्या दक्षिणेकडील भिंतीमध्ये आपल्याला 'महिषासूर मर्दिनी' रूपातील देवीची मूर्ती पाहायला मिळते. अंतराळातून खाली पायऱ्या उतरून गर्भगृहात प्रवेश केल्यावर आपल्याला 'अमृतेश्वर' याचे दर्शन घडते. 'अमृतेश्वर' हा  पिंडविरहीत असून शाळुंकेच्या स्वरुपात आपल्याला याचे दर्शन घडते. यादवकालीन असलेल्या या शाळुंकेमध्ये पिंडी बसवण्याच्या पोकळीमध्ये आपल्याला पाणी बघायला मिळते.

मुर्तीमधील आयुधे आपल्याला मूर्तीची झीज झाल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीत.

या शाळुंकेच्या मागील देवकोष्ठामध्ये आपल्याला  'विष्णू आणि लक्ष्मीची' अत्यंत सुबक आणी रेखीव मूर्ती पहायला मिळते. याच मूर्तीच्या खाली मानवरूपातील 'गरुड' आपल्याला पहायला मिळतो. या गरुडाच्या कानात आपल्याला कुंडले तसेच गळ्यामध्ये हार बघायला मिळतो तसेच त्याच्या पोटावर नागबंद देखील आहे. देवकोष्ठामधील विष्णूची मूर्ती ही चतुर्भुज असून या मूर्तीच्या डाव्या बाजूच्या वरच्या हातामध्ये गदा आपल्याला पहायला मिळते. तसेच मूर्तीचा उजवा हात भग्न असल्यामुळे त्यातील आयुध समजत नाही. डाव्या बाजूच्या खालच्या हातामध्ये विष्णूने लक्ष्मीला धरले असून उजव्या हातामध्ये शंख आपल्याला पहायला मिळतो. विष्णूच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली असून तिचा उजवा हात विष्णूच्या गळ्याभोवती असून लक्ष्मीने तिच्या डाव्या हातामध्ये 'पद्म' हे आयुध आपल्याला पकडलेले दिसून येते.

या नव्याने जिर्णोद्धार झालेल्या 'अमृतेश्वर मंदिर' परिसरात मोठ्या प्रमाणात प्राचीन मूर्ती आपल्याला पहायला मिळतात. तसेच या मंदिर परिसराच्या शेजारून एक छोटा ओढा देखील वाहतो या ओढ्यामध्ये देखील एक 'शिवलिंग' आहे. हे 'शिवलिंग' देखील पिंडीविरहीत आहे. उन्हाळ्यात पाणी आटल्यावर एक शिवलिंग आपल्याला पहायला मिळते. या 'शिवलिंगाबद्दल' पंचक्रोशीत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.

या गाईच्या एकाच धडाला पाच मस्तके दाखवलेली आहेत.

आख्यायिका:-

मोहरी गावामधील एका गवळ्याच्या 'दोन गायी' अगदी नित्यनियमाने या ओढ्याजवळ एकेठिकाणी आपला पान्हा सोडीत असत. ही गोष्ट त्या गवळ्याच्या लक्षात आली म्हणून त्या गवळ्याने त्या ठिकाणी खोदून पाहिले असता त्याला तेथे दोन शिवलिंगे मिळाली. ही दोन्ही 'शिवलिंगे' पाहून त्या गवळ्याच्या मनात भक्तीभाव दाटून आला. त्याने विचार केला कि यापैकी एक शिवलिंग वरच्या भागात नेऊन त्याच्यावर मंदिर उभारावे. परंतु काहीकेल्या  ते शिवलिंग त्याला हलवता आले नाही. आपला संकल्प आता पूर्ण होणार नाही म्हणून  तो मनाने खूप दु:खी झाला त्या मनस्थितीमध्ये त्याला शंकराने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितले "ज्या दोन गायी मला नित्यनियमाने दुग्धाभिषेक करतात त्यांचीच दोन खोंड लावून प्रयत्न कर तुला त्यात यश मिळेल." या दृष्टांतानुसार त्या गवळ्याने खोंड लावून प्रयत्न करताच शिवलिंग सध्याच्या जागी नेण्यात आले. तेथेच  त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अशी ही आख्यायिका 'अमृतेश्वर मंदिरा' बाबत सांगितली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी होते.  तसेच त्रिपुरी पौर्णिमेला मंदिराच्या समोरील दगडी दीपमाळेवर त्रिपुर लावला जातो. तसेच मोठा उत्सव देखील असतो. तसेच चैत्री पाडव्याला येथील कावड ही 'शिखरशिंगणापूर' येथे नेली जाते. 

 या ओढ्यामध्ये देखील एक 'शिवलिंग' आहे.

'अमृतेश्वर मंदिर' हे प्राचीन काळापासून 'महास्थळ' म्हणून ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून येथे न्यायनिवाडे होत असल्याचे तसेच दिव्यही केल्याचे उल्लेख आहेत. यासाठी 'दिव्य' म्हणजे काय हे देखील आपल्याला समजून घेण्याचे गरजेचे आहे. 'समजा एखादा वाद मिटला नाही तर दिव्य केले जात असे.' यासाठी एक दिवस आधी पंचांच्या समोर 'दिव्य' करणाऱ्याचे हात बांधले जात असे. दुसऱ्या दिवशी एका खोलगट भांड्यातल्या उकळलेल्या तेलात सोन्याचा तुकडा टाकीत असत. वादी आणि प्रतिवादी यांनी तो सोन्याचा तुकडा उकळत्या तेलामधून बाहेर काढायचा असा नियम होता. हे झाल्यावर या दोघांचेही हात पंचाच्यासमोर पुन्हा बांधले जात असत. यामध्ये ज्या कोणाच्या हाताला फोड किंवा भाजल्याची जखम होत नसे तो या वादात विजयी होत असे. एवढेच नव्हे तर हा निर्णय अंतिम मानला जात असे.

असाच एक न्यायनिवाडा हा 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या' काळात 'अमृतेश्वर मंदिर'  परिसरात झाला असून या न्याय निवाड्याला स्वत: 'छत्रपती शिवाजी महाराज' हजर होते असे म्हणतात. याबद्दल पत्रांमधून काही उल्लेख उपलब्ध आहेत. 'दादाजी कोंडदेव' हे जेव्हा पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होते तेव्हा दिनांक ३० मे १६३१ रोजी कोढीत येथील मुकादमी संबंधी 'बाबाजी नेलेकर' आणि 'जनाजी खैरे' यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचा निर्णय हा मोहरीच्या 'अमृतेश्वर मंदिरामध्ये'  झाला. यामध्ये 'जनाजी खैरे' याने दिव्य केले आणि तो खरा ठरला. याप्रसंगी 'दादाजी कोंडदेव' यांच्या बरोबर मावळातील अनेक मातब्बर 'देशमुख' हजर होते.

'अमृतेश्वर मंदिर' येथे कोरलेले हत्तीचे शिल्प.

असेच अजून एक दिव्य हे इ.स. १६४८ साली 'अमृतेश्वर महादेवाच्या' समोर झाले. मोहरी गावातील 'पानसे आणि खंडेराव' यांच्यातील वादाचा निवाडा हा 'र वा' म्हणजेच सोन्याचा तुकडा दिव्याच्या द्वारे करण्यात आला. या वादाचा निकाल हा पानसे यांच्या बाजूने लागला आणि पानसे यांचा पक्ष खरा ठरला. स्वत: शिवाजी महाराज हे या दिव्याच्या प्रसंगी हजर होते असे म्हटले जाते. 

असे हे निसर्गरम्य शिल्पसौंदर्याने नटलेले प्राचीन 'अमृतेश्वर मंदिर' पाहाणे म्हणजे एक पर्वणीच कारण अश्या या आडवाटेवर असलेल्या श्रद्धास्थानांना इतिहासातील अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. तसेच अश्या या आडवाटेवर असलेल्या प्राचीन 'अमृतेश्वर मंदिर' सारख्या श्रद्धास्थानांना जाऊन तेथील इतिहास समजून घेऊन हा वारसा आपणच जपणे गरजेचे आहे.           

'अमृतेश्वर' हा  पिंडविरहीत असून शाळुंकेच्या स्वरुपात आपल्याला याचे दर्शन घडते.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे – कात्रज – नसरापूर –  दीडघर –  कतकावणे  –  हातवे बुद्रुक – तांभाड – मोहरी.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage