महाराष्ट्र देशाचे सौंदर्य 'सह्याद्रीमधील किल्ले'



'सह्याद्री' हे नाव घेतले तर आपसूकच आपले मन जाऊन पोहोचते ते दऱ्या-डोंगर, हजारो वर्षे जुनी नदीची खोरी, विविध नैसर्गिक जंगले, विविध संस्कृतींचे शिल्लक राहिलेले अवशेष या सगळ्यांमध्ये आपले मन रमून जाते. सह्याद्रीचे खरे महत्व वाढवले ते तेथील वैशिष्ट्यपूर्ण गिरीदुर्गांनी आणि गिरीशिल्पांनी अश्या वैविध्य पूर्ण गोष्टींनी नटलेल्या ह्या सह्याद्रीला  हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. सह्याद्रीमध्ये फिरताना अनेक नव्या नव्या गोष्टी आपणांस पहावयास मिळतात. सह्याद्रीतील पक्षी, प्राणी हे जसे आपल्याला सह्याद्रीत भटकताना सुखावून जातात तसेच येथील प्रत्येक दगड हा आपल्याला विविध गोष्टींचा इतिहास सांगायचा प्रयत्न करत असतो तो जाणून घेणे तेथे झालेल्या ऐतिहासिक गोष्टी या गावकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यात जी मजा असते ती फार वेगळी असते. हे गावकरी म्हणजे या सह्याद्रीतले पाखरे त्यांच्या हातची चटणी भाकरी खाणे म्हणजे स्वर्गसुख असते.

महाराष्ट्रातील किल्यांवर भटकायला जाणे आणि तिथून वेगवेगळ्या अनुभवाने सह्याद्रीमधील डोंगररांगा पाहणे आणि अनुभवणे तसेच कधी वादळी पावसाचा तडाखा खात खात किल्यांवर पोहोचावे तेथून सह्याद्रीच्या एखाद्या गुहेत जाऊन जरा थोड्यावेळ थांबून हळू हळू एक एक गोष्टींचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास करणे हे सारे सह्याद्री किल्ले एका भटक्याला बरेच काही शिकवतात. बऱ्याचदा अनेक किल्यांवरील शिल्पे हि बघण्यासारखी असतात. त्यामध्ये बऱ्याचदा गुढता लपलेली असते त्या गुढ शिल्पांंमधूनअर्थ शोधून त्याचा अभ्यास करणे आणि हि किल्ल्यांवरील शिल्पे त्याच जागेवर का आहेत याची बऱ्याचदा कोडी उलगडणे हे फक्त शिकायला मिळते ते सह्याद्री मध्येच.

किल्यांवर भटकायला जाणे आणि तिथून वेगवेगळ्या अनुभवाने सह्याद्रीमधील डोंगररांगा पाहणे आणि अनुभवणे एक वेगळाच अनुभव असतो.

आपला महाराष्ट्र देश हा सौंदर्याने नटलेला आहे येथे उत्तुंग हिमालायासारखी बर्फाच्छादित शिखरे नाहीत तर दुथडी भरून वाहणाऱ्या हिमनद्या नाहीत म्हणून काय आपल्या सह्याद्रीत सृष्टीसौंदर्य नाही काय? गुजरात मधल्या दमण पासून ते पार अगदी कारवार पर्यंत सगळी कडे पसरला आहे तो अफाट सह्याद्री. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांमधून पायी फिरावे तेथील प्राचीन आणि मध्ययुगीन घाटवाटा फिराव्यात मध्ये एखादा किल्ला आला किंवा लेणी आली तर त्या किल्यावर किंवा लेणीत जाऊन मुक्काम करावा. तसेच या लेणीमध्ये किंवा किल्ल्यावर थांबून  शिल्प तसेच किल्ल्यांच्या रचनेचा  अभ्यास करावा किंवा आपल्या पूर्वजांच्या वीरगळांपुढे बसून इतिहासाचे मूक साक्षीदार बनावे. परंतु हा सगळा प्रवास आपल्या उघड्या डोळ्यांनी करावा, संवेदना ग्रहण करण्याच्या भावनेने करावा म्हणजे महाराष्ट्राचे आणि सह्याद्रीचे महत्व आणि सौंदर्य आपल्याला नक्कीच समजून घेता येईल.

सह्याद्री मधील डोंगर भटकताना अश्या वेळेस 'समर्थ रामदास स्वामींचे' वाक्य कायम स्मरणात राहते ते म्हणजे 'उदंड देशाटन करावे' ह्याच ओळी आपल्या सह्याद्रीला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतात. आपल्या सह्याद्रीचे सौंदर्य हे क्षणाक्षणाला वेगवेगळे भासते. सह्याद्रीत पावलागणिक विविध कला आपल्याला दिसून येतात याची उत्तम उदाहरणे म्हणजे कळसूबाई, आजोबागड, तेथील बाण सुळका तसेच बागलाणात गेलात तर साल्हेर, मुल्हेर सारखे मोठे  किल्ले डांग्या सुळका, हडबीची शेंडी यासारखे अजस्त्र सुळके हे कायम वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. तर खाली कोकणातील मनमोहक जलदुर्ग किंवा त्याच्या आजूबाजूला तटांवर बांधलेले हे किल्ले हे वैशिष्ट्यपूर्ण किल्ले कायम साद घालत असतात. अश्याच अनवट शिल्पांमध्ये विविध आडवाटेवर असलेल्या 'लेण्या' आणि 'मंदिरे' खुणावतात ठाणाळे, खडसांबळे, पितळखोरे, यांसारख्या सुंदर कातळात कोरलेल्या  लेण्या आणि गोंदेश्वर, कोपेश्वर यांसारखी पाषाणातून बनवलेली मंदिरे यांची अनेक नावे घेता येतील जी आपल्या सह्याद्रीला एका उच्चपदावर नेऊन ठेवतात. 

कातळात कोरलेल्या  लेण्या कायमच भटक्यांना साद घालतात.

सह्याद्रीमध्ये जी जमीन आहे ती सुद्धा कसदार आहे. सह्याद्रीमध्ये जी शेती केली जाते तिला पायऱ्या पायऱ्यांची शेती संबोधतात अशी शेती म्हणजे सह्याद्रीतील कष्टकरू शेतकऱ्याचे ते मुल असते त्या मुलाचे संगोपन हे सह्याद्री करतो. सह्याद्रीतील मावळात जो तांदूळ पिकतो तो अन्यत्र कोठेही पिकत नाही. कोकणासारखा आंबा तुम्हाला उभ्या जगात सापडणार नाही पण तो सह्याद्रीत पिकतो. सह्याद्री आणि महाराष्ट्र यांचे नाव अजरामर करायला अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींचा हात आहे. प्रत्येक स्थळांवर या महापुराषांच्या समाध्या उभ्या आहेत. सह्याद्रीतील अनेक छोट्या छोट्या खेड्यांमध्ये विविध योद्ध्यांच्या वीरगळ आहेत. महाराष्ट्रातील सह्यपुत्रांनी अटकेपर्यंत झेंडे लावले त्याच्या खुणा देखील संपूर्ण भारतात बघायला मिळतात. भारतावर जेव्हा जेव्हा परचक्रे आली तेव्हा त्यांचे निर्मुलन केले हे सह्यपुत्रांनी. एवढेच नाहीतर शक, क्षत्रप, ग्रीक यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंची आक्रमणे महाराष्ट्रातील 'सातवाहन राजांनी' या सह्याद्रीपुत्रांच्या मदतीने परतावली.

'सह्याद्री' आणि 'सातपुडा' हे दोन्ही काटकोनात आहेत परंतु त्यांचे अंतर्याम एकच आहे. आपला सह्याद्री हा ज्वालामुखीपासून तयार झालेला आहे. त्यातून जे खडक बाहेर पडले त्यांना 'कृष्णप्रस्तर' असे भौगोलिक दृष्ट्या संबोधले जाते. या खडकांवर जेव्हा लावा पसरला गेला आणि ज्या प्रदेशात थंड झाला त्याला ' कृष्णप्रस्तर प्रदेश' अशी संज्ञा आहे. सह्याद्रीत किल्ले बांधले गेले हि त्याची दुर्गमता बघून. आता दुर्गमता म्हणजे काय तर दुर्गमता म्हणजे किल्याच्या भोवतालच्या प्रदेशाची दुर्गमता किंवा खुद्द किल्यांची नैसर्गिक जडण-घडण. निबिड अरण्ये आणि किल्याचे भौगोलिक स्थान म्हणून लेण्यांच्या आणि प्राचीन शहरांच्या रक्षणार्थ किल्यांची उभारणी केली गेली. किल्ले साधरणपणे अश्याच ठिकाणी उभारले जातात कि ज्या ठिकाणी एखादी लेणी किंवा प्राचीन शहर तसेच व्यापारी घाटमार्ग आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या किल्यावर ज्याचा हक्क आहे किंवा राज्य आहे त्याच्या प्रदेशातला त्या मुलुखावर हुकुमत गाजवणे हे किल्याचे मुख्य उद्दिष्ट. 

प्राचीन व्यापारी मार्गांवर असलेले  शिलालेख देखील आपल्याला खूप महत्वाचे असतात.

आपल्यातले भटके अनेक किल्ले बघतात किल्यांवर जातात किल्याचा इतिहास वाचतात परंतु वस्तुस्थितीशी कधीच समन्वय घालत नाही. मग एकेक मिथके आपल्याकडे रुजू होतात. उदाहरण द्यायचे झाले तर 'प्रत्येक लेणी हि पांडवांनी एका रात्रीत खोदलेली असते' असे मिथक प्रत्येक लेण्यांवर काहीना काही रुपात आधारित आहे. तसेच तोरणा किल्याचे एक उदाहरण आहे कि 'तोरणा किल्ला' महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'छत्रपती शिवाजी महाराजांनी' जिंकला म्हणून त्यांनी स्वराज्याचे तोरण उभारले परंतु तोरणा किल्ला नीट निरखून पहिला तर आपल्याला तिथे अनेक तोरण जातीचे झाडे दिसून येतात म्हणून त्याचे नाव 'तोरणा' असे आहे हे आपण कधी विचार पण करीत नाही. तसेच मंदिरे हि देखील यादवांचा प्रधान 'हेमाद्री' याने बांधली म्हणून प्रत्येक मंदिर हे 'हेमाडपंथी' म्हणून ओळखले जाते परंतु मंदिर शैली कशी विकसित झाली त्याचे प्रकार कोणते हे मात्र आपल्याकडे फार कमी प्रमाणात अभ्यासले जाते.

या सह्याद्रीत फिरून आपल्याला सह्याद्री काय शिकवतो? ह्या सह्याद्रीत भटकंती केल्यावर आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपली छाती रुंदावून सांगते मी या महाराष्ट्रात आणि सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो हे माझे थोर भाग्य. आपली एकमेकांवरची निष्ठा वाढते. 'टीमवर्क' हे काही 'मॅनेजमेंट' चे कोर्स करून शिकायला मिळत नाहीत ते शिकवतो सह्याद्री. आपली 'श्रमशक्ती' वाढते. थोडक्यात सांगायचे या व्रतांमुळे आपल्या अंगी  मराठी बाणा येतो आणि हा बाणा ज्याच्या अंगी असेल त्याच्याजवळ नाही असे असण्यासारखे काय? आपल्या ह्या सह्याद्रीचे कितीहि गुणगान केले तरी ते फार कमी आहे. प्रत्येक भटक्याने सह्याद्रीत जावे मनमोकळे फिरावे आणि छाती फुलवून अभिमानाने सांगावे कि 'सह्याद्री' हा आपला आहे..!!!

प्रत्येक भटक्याने सह्याद्रीत जावे मनमोकळे फिरावे आणि छाती फुलवून अभिमानाने सांगावे कि 'सह्याद्री' हा आपला आहे.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा 




No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage