ताम्रपटातून येणारे 'पुण्याचे प्राचीन उल्लेख'


पुणे शहर हे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. सर्वोत्तम शिक्षणसंस्था, सुंदर हवामान, आणि पुण्याला होणारा पाणीपुरवठा हे संपूर्ण पुण्याचे वैभव आहे. पुणे शहर आज जरी 'मेट्रो सिटी' म्हणून भारतभर प्रसिद्ध होत असले तरी या शहराचा इतिहास फार मोठा आहे. तसेच या इतिहासाबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपल्याला पुणे आणि परिसराची भौगोलिक माहिती तर नक्की हवी. 

बऱ्याचदा लोकांचा हा प्रश्न असतो कि पुणे नाव कसे पडले किंवा त्या नावामागे काही इतिहास आहे का? परंतु या सर्व माहितीसाठी पुण्याची भौगोलिक रचना आणि इतिहास यांचा मागोवा घेणे आपल्याला महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला पुणे हे शहर समुद्रसपाटीपासून १८३७ फुट उंचीवर वसलेले असून याच्या बाजूला पिंपरी-चिंचवड हि गावे आहेत. इंद्रायणी आणि पवना या नद्या पुण्याच्या वायव्य दिशेकडून वाहतात. पुणे शहरातील सर्वात उंच टेकडी हि वेताळ टेकडी असून हि शहराच्या मधोमध आहे या टेकडीची उंची २६२४ फुट आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेला 'सिंहगड' हा पुण्यातील टेकड्यांमध्ये सर्वात उंच आहे त्याची उंची ४३२९ फुट आहे. 

'सिंहगड' हा पुण्यातील टेकड्यांमध्ये सर्वात उंच आहे त्याची उंची ४३२९ फुट आहे. 

पुणे शहराचा परिसर हा चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेला आहे. या टेकड्या म्हणजे कात्रज, पर्वती, लॉ कॉलेज टेकडी, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, पाषाण टेकडी, औंध टेकडी, लोहगाव टेकडी, महात्मा सोसायटी टेकडी, दिवे घाट आणि बोपदेव घाट अश्या सर्व बाजूने या टेकड्यांनी वेढलेल्या परिसरात पुणे शहर वसलेले आहे. मुळा, मुठा आणि नागझरी या तीन नद्यांच्या तीरावर पुणे शहर वसलेले आहे. 

अश्या या निसर्ग संपन्न पुण्याचा इतिहास हा देखील तसाच आहे. आज जे पुणे शहर उभे आहे याच पुणे शहरामध्ये एक लाख वर्षापूर्वी पुराश्मयुगीन मानवी वस्ती होती. याचे पुरावे हे 'डेक्कन महाविद्यालय' या संस्थेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर संशोधक 'डॉ.ह.धी.सांकलिया' यांना बंडगार्डन या भागात काही प्राचीन दगडी हत्यारे सापडली. या हत्यारांचा काळ हा एक लाख वर्षापूर्वीचा निश्चित करण्यात आला. तसेच पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या 'कोरेगाव' आणि 'इटे' येथे देखील अशीच हत्यारे सापडली. यावरून या तीनही ठिकाणी एकाच नदीच्या किनाऱ्यावर समान संस्कृती नांदत होती याचे पुरावे मिळतात. 

अश्मयुगीन मानवाचे हत्यार. फोटो डेक्कन कॉलेज मधील आहे. 

यानंतर पुण्याच्या संस्कृतीचे पुरावे मात्र उपलब्ध होतात ते इ.स.पू. दुसऱ्या शतकातील बौद्ध लेण्यांमुळे. त्यांनी खोदलेली लेणी आजही आपल्याला पांडवनगर परिसरात पाहायला मिळतात. या लेणीचे सध्या महदेव मंदिर आणि वृद्धेश्वर मारुती मंदिर यामध्ये रुपांतर झालेले आहे. पुणे ते जुन्नर यामार्गावरील या लेण्या असाव्यात हे या वरून समजते. पुण्यातील कसबा पेठेत जुने काळभैरवनाथ मंदिर परिसर , साततोटी चौक ते कसबा गणपती या संपूर्ण परिसरात चार ठिकाणी नवीन इमारतींचे पाया खणताना मातीच्या विटा, मडकी, भांडी, मणी अश्या प्राचीन संस्कृतीच्या खुणा सांगणारे अवशेष सापडले आहेत. 

इ.स. ४६५ मध्ये त्रैकूटक राजांचे या भागावर राज्य होते तेव्हाचा एक पुरावा सापडला तो इंदापूरजवळील 'काझड' या गावाजवळ या गावाच्या परिसरात काही नाणी सापडली असून पुणे आणि परिसरावर त्यांचे राज्य होते हे या नाण्यांवरून दिसून येते. यानंतर पुण्यावर अंमल सुरु झाला तो राष्ट्रकुट वंशाचा ज्या कृष्ण राजाने कैलास लेणेखोदले त्याच्या एका ताम्रपटात पुण्याचा उल्लेख 'पुण्यविषय' या नावाने सर्वप्रथम आपल्याला मिळतो.

कसबा पेठेमध्ये असलेले जुने काळभैरवनाथ मंदिर याच मंदिराच्या परिसरात  मातीच्या विटा, मडकी, भांडी, मणी अश्या प्राचीन संस्कृतीच्या खुणा सांगणारे अवशेष सापडले आहेत.

तसेच पुण्यातील एक जुने रहिवासी हुंडीवाले साठ्ये यांच्याकडे १९१२ साली एक ताम्रपट सापडला. त्या ताम्रपटाचे भाषांतर हे न्यू इंग्लिश स्कूल पुणे मधील संस्कृत प्राध्यापक रा. मोडक यांनी केले. या ताम्रपटामधील तिसऱ्या पत्र्यामध्ये आपल्याला पुण्याचा प्रथम उल्लेख सापडतो. या ताम्रपटामध्ये पुण्याविषयी जो उल्लेख सापडतो तो पुढीलप्रमाणे:-

१) पुण्यविषयांन्तर्गत बोपरखळू:  यस्य पूर्वतो कलस: | दक्षिण
 २) त: नदी मूईला | पश्चिमत: दर्पपुडीका |  उत्त(र) तो भेऊसरी ग्राम: | एवं 
३) आघाटविशुद्ध: वडडीदीक्षित रामदीक्षितपुत्राय | क्रमइत 
४) पुगडिभटाय | ......वशिष्टमैत्रावरुणकौंडीण्य सुचत्राय दत: || स
५) चागामि भद्रनृपतिभि: अस्मद्वंश्यैैरन्यैैवर्वा स्वदायनिर्विशेषं प्रतिपा 
६) लनीय: || उक्तं च भगवता व्यासेन || बहुभिर्वसुधा भुक्ता राजभि: सगरा 
७) दिभी: यस्य यस्य यदा भूमिस्तस्य तस्य तदा फलं || तडागानां सहस्त्रेण 
८) आश्वामेधशतेन च गवांकोटिप्रदानेन भूमिहर्ता न शुध्द्यति || यस्या पद्धूरनुध्द 
९) त: परहितध्यासंगिनी यस्य वा यस्तन्वाप्यपकर्त्तुुमच्छति सुहृद्वर्गस्व का 
१०) स्य धने तेनेन्द्रेण नरेंन्द्रवृन्दमहीत: श्रीकृष्णराजाज्ञया प्रीत्यैै यल्लि
११) खितं तदूत यश: प्रोद्भासन शासनं ||...............||  

अर्थ:-
हा ताम्रपट राष्ट्रकुट नृपती कृष्णराज याने शालिवाहन शके ६८० (इ.स. ७५८) या काळात लिहिलेला आहे. पुगडी भट या ब्राम्हणास राष्ट्रकुट सम्राट कृष्ण याने हे बोपखल हे गाव, अश्विन अमावस्येच्या सूर्यग्रहणाच्या दिवशी (हेमलंबी संवत्सर) इनाम दिले असा याचा अर्थ आहे.  

हुंडीवाले साठ्ये यांच्याकडे १९१२ साली जो ताम्रपट सापडला त्याचा मूळ संदर्भ.

ताम्रपटात वरील मजकूर कोरलेला असून पुण्याचा उल्लेख हा 'पुण्य-विषय' असा स्पष्ट केलेला आहे. तसेच यामध्ये आपल्याला (कलस:) म्हणजेच आजचे पूर्वेला असलेले 'कळस' हे गाव (मूईला) म्हणजे दक्षिणेला असलेली 'मुळा नदी' (दर्पपुडीका) म्हणजेच पश्चिमेला असलेले आजचे दापोडी आणि (भेऊसरी ग्राम:) म्हणजे उत्तरेला असलेले आजचे पुणे नाशिक महामार्गावरील 'भोसरी' हे गाव असल्याचे  उल्लेख आपल्याला मिळतात. याची तारीख जर काढली तर १६ ऑक्टोबर ७५८ अशी येते. 

तसेच आजच्या पुणे - नगर रस्त्यावर असलेल्या तळेगाव ढमढेरे याठिकाणी याच राष्ट्रकुट राजा कृष्ण याचा आणखीन एक ताम्रपट मिळाला असून त्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख हा 'पूनकविषय' असा केलेला आढळतो. या ताम्रपटाचा काळ शके ६९० म्हणजे इ.स. ७६८ असा येतो. या ताम्रपटाच्या तिसऱ्या पत्र्यामध्ये २२ ओळी पासून ३२ ओळी पर्यंत जी 'ग्रामनामे' आणि 'विषय' यांची नावे दिली आहेत त्यामध्ये पुणे शहराचे नाव 'पूनकविषय' असे येते. या ताम्रपटाची भाषा हि संस्कृत असून ती दाक्षिणात्य वळणाची आहे हे त्याच्या अक्षरवाटिकेवरून समजते.


       


राष्ट्रकुट राजा कृष्ण याचा तळेगाव ढमढेरे येथे मिळालेला ताम्रपट यामध्ये ३ ऱ्या पत्र्यामध्ये पुणे शहराचा 'पुणक विषय' असा उल्लेख येतो. 'पूनक विषय' या नावाला चौकोन केलेला आहे.  

सारांश:-

हे शासन कृष्णराज प्रथम याच्या आमदानीतील असून हा ताम्रपट मण्णनगर येथील तळावरून दिलेला आहे. या शासनाचा मुख्य उद्देश पुनक विषयातील कुमारीग्राम, भमरोपरा, अरलवू, सिंदीग्राम, आणि तडवले हि गावे करहाटक, १००० विषयातील ब्राम्हणांना दान दिली. हे नमूद केलेले आहे. या दानाचे दोन भाग हे वासुदेव भट्टासाठी राखून ठेवले होते. हे शासन इंद्र याने लिहिलेले आहे. 

या ताम्रपटामध्ये वर्ष आणि तिथी हि वैशाख अमावस्या असून या दिवशी सूर्यग्रहण होते. संवत्सर हे प्लवंग होते आणि  शके ६९० बुधवार २३ मार्च ७६८ या दिवशी हा ताम्रपट दिला गेला आहे असे लक्षात येते. या ताम्रपटामध्ये जी ग्रामनामे आलेली आहेत ती म्हणजे 'करहाट १०००' सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड भोवतालचा प्रदेश. 'मण्णनगर' म्हणजे 'बंगरूळ' जिल्ह्यातील 'नीलमंगल' तालुक्यातील 'मण्णे' असावे.  'कुमारीग्राम' म्हणजेच 'कऱ्हेगाव'. 'भमरोपरा' म्हणजे 'भोवरपूर'. 'अरलुव' म्हणजे 'उरुळी'. 'सिंदीग्राम' म्हणजे सींंदवणे. 'तडवली' म्हणजेच 'तूरुली'. 'पूनक विषय' म्हणजेच आजचे 'पुणे'. 'खंबग्राम' म्हणजेच 'खामगाव'. 'वोरीमग्राम' म्हणजेच 'बोरी'. 'दाडीमग्राम' म्हणजेच 'दलींब'. 'अलंदीय' म्हणजेच आजचे पुण्याजवळ असलेले 'चोराची आळंदी'. 'थिअुुरग्राम' म्हणजेच आजचे 'थेऊर'.                                                 
   
तसेच प्रभावती गुप्त हिचा एक  महत्वाचा ताम्रपट पुण्यात 'भाऊ बळवंत नगरकर' यांच्याकडे मिळाला हे गृहस्थ मुळचे अहमदनगर मधले असून त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या हा ताम्रपट होता असे समजते.  त्यामध्ये वाकाटक राजांची वंशावळ कोरलेली आहे त्यामुळे हा ताम्रपट फार महत्वाचा ठरतो. हा ताम्रपट मुळात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसिलातील असावा असे वा.वि. मिराशी यांना वाटते. या ताम्रपटामध्ये वाकाटकांची वंशावळ दिलेली आहे.  


 वाकाटकांची राणी प्रभावती गुप्ता हिचा पुणे ताम्रपट प्रा.का.बा.पाठक आणि रा.बा.का.ना.दीक्षित यांनी हा ताम्रपट एपिग्राफिया इंडिका मध्ये ठश्यांंसहित प्रकाशित केला.

पुण्याचा उल्लेख असलेला एक महत्वाचा ताम्रपट हा कुलाबा जिल्ह्यातील 'मुरुड जंजिरा' गावाच्या एका भागामध्ये खणत  असताना सापडला होता. सध्या हा ताम्रपट 'बडोद्याच्या संग्रहालयात' ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये शिलाहार राजांच्या राजवटीमधील 'अपराजित' राजाने 'कऱ्हाडवरून' आलेला ब्राम्हण 'पूणक देशातील' 'खेटक' गावात राहत होता असेही त्यात म्हटलेले आहे. 'खेटक' म्हणजे आजचे खेड(राजगुरुनगर) आणि 'पूणक' म्हणजे पुणे. शिलाहार राजांच्या राजवटीमधील शके ९१५ (इ.स. ९९३) सालचा  ताम्रपट फार महत्वाचा ठरतो यामध्ये आपल्याला पुण्याचे नाव हे 'पुणकदेश' असे मिळते. 


तसे पाहायला गेले तर या 'मुरुड जंजिरा' ताम्रपटाचे तीन पत्रे जवळपास २७.९४ सेमी लांब आणि २२.८६ सेमी रुंद असून ते पूर्वी एका छीद्रातून घातलेल्या कडीत अडकवले होते परंतु कडी आणि त्याला जोडलेली मुद्रा सापडली नाही. हा सर्व लेख ९० ओळींचा आहे तसेच ताम्रपट अत्यंत व्यवस्थित रीतीने कोरलेला आहे. या ताम्रपटाची अक्षरवाटिका हि नागरी लिपीची असून भाषा संस्कृत आहे. या ताम्रपटाचा विषय हा पुढीलप्रमाणे:-


ताम्रपटाचा उद्देश शिलाहार राजा अपराजितदेव याने १४०० गावे असलेल्या 'पुरी-कोकणच्या' 'पाणाड' विषयातील 'सालणक' गावात 'चम्मेलेवाखाडीजवळ' एक आराम दान दिल्याचे नमूद करणे हा होता. हे दान त्या राजाने 'स्थानक' येथे गत शक संवत ९१५ मध्ये विजयी संवत्सर श्रावण अमावास्येस रविवारी झालेल्या सूर्यग्रहण प्रसंगी दिले होते. मागील ताम्रपटातील दान याच दिवशी दिले होते. त्याची तारीख आणि वार २० ऑगस्ट ९९३ अशी आहे. ज्या ब्राम्हणाला दान दिले आहे तो मूळ 'करहाटचा' परंतु नंतर तो 'पुणक' देशातील 'खेटक' गावी वास्तव्य असलेला आणि काही कामानिमित्त 'स्थानकास' आलेला 'गृहीतसहस्त्र हरदत्ताचा पुत्र क्रमविद् कोलम' हा होता. दान देण्याचा उद्देश 'पंञ्चमहायज्ञाचे' अनुष्ठान हे होते. त्यावेळेस राजाचा महामात्य 'केशपार्य' आणि त्याचा सांंधीविग्रहक म्हणजेच परराष्ट्रमंत्री 'झंजमैैय' हा होता. महामात्य हे सध्याच्या कलेक्टर प्रमाणे असत. 


या मुरुड जंजिरा ताम्रपटामध्ये जे स्थानांचे उल्लेख आलेले आहेत ते पुढीलप्रमाणे:-


राजाचे निवासस्थान असलेले 'स्थानक' म्हणजेच आजचे ठाणे हे आहे. 'पाणाड विषय' आणि 'सालणक ग्राम' म्हणजेच आजचे पोयनाड आणि साळिंदे हि गावे आहेत. 'करहाट' म्हणजेच आजचे कऱ्हाड आहे. 'पुणकदेश' म्हणजेच आजचे पुणे आहे. 'खेटक' म्हणजेच आजचे खेड म्हणजेच राजगुरुनगर होय. ज्या ताम्रपटाच्या तिसऱ्या पत्र्याच्या पहिल्या बाजूला उल्लेख आहे तो ताम्रपटपुढीलप्रमाणे:-




शिलाहार राजा 'अपराजित' याचा 'मुरुड जंजिरा' ताम्रपट ज्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख हा 'पुणक देश' असा येतो. सध्या हा ताम्रपट बडोद्याच्या म्युझिअम मध्ये आहे.

आज पुणे हे प्रंचड मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. या वेगवेगळ्या ताम्रपटांंवरून तसेच पुण्याच्या प्राचीनतेचे पुरावे मिळतात. तसेच पुण्याचे नाव काळानुसार कसे बदलत गेले आणि पुणे शहर कसे बनत गेले हे या ताम्रपटांंच्या आधाराने नक्कीच समजते.  
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष १२:- भारत इतिहास संशोधक मंडळ, पान क्रमांक १६७.  
२) पुणे नगर संशोधन वृत्त खंड ३ रा:-  चिं.ग कर्वे, भारत इतिहास संशोधक मंडळ, १९४६, पान क्रमांक १८७  
४) भारताचे सांस्कृतिक वैभव:- डॉ. शोभना गोखले, डायमंड प्रकाशन, २००९.  
५) हरवेलेल पुणे:- डॉ अविनाश सोवनी, उन्मेष प्रकाशन, २०१७.       
५) विवेक इतिहास खंड १:- पान क्रमांक ८०, २००४.  
६) पुणे शहराचा ज्ञानकोश:- डॉ शां.ग.महाजन, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन, २००४. 
७) महाराष्ट्रातील पुरातत्व:- ह.धी.सांकलिया आणि म.श्री.माटे, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९७६.  
८) Sri Pratapsimha Maharaja Rajyabhisheka Granthamala, Important Inscriptions from The baroda State Vol 1:- Memoir No II, A.S.Gadre, Baroda, 1943, Page no 61.
९) Epigraphia Indica Vol.13:- Archeology Survey Of India, 1915-16, Page No 281-282.
१०) Epigraphia Indica Vol.15:- Archeology Survey Of India, 1919-1920, Page No 43.
११) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ:- महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी, नागपूर विश्वविद्यालय, नागपूर, १९५७, पान क्रमांक १८५ ते १९३.
१२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख (खंड २):- महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९७४, पान क्रमांक ४०-४१.
१३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची:- शां.भा. देव, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, १९८४. पान क्रमांक ५८२-५८३.
१४) सार्थवाह (प्राचीन भारत कि पथपद्धती):- डॉ. मोतीचंद्र, बिहार राष्ट्रभाषा परिषद, १९५३.पान क्रमांक २५.      

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

                        लिखाण आणि  छायाचित्रे © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा                     







9 comments:

  1. छान, माहितीपूर्ण लेख. आवडला. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. खुप छान माहिती धन्यवाद

    ReplyDelete
  3. पुणे जिल्हा याची माहिती आणि प्राचीन काळापासून ज्यानी एवढा प्रचंड ऐतिहासिक वारसा २०२०वर्षी सर्व सामा न्याना उपलब्ध करून दिली आहे त्या सर्वांना माझ्या मते दंडवत करतो

    ReplyDelete
  4. पुणे जिल्हा याची माहिती आणि प्राचीन काळापासून ज्यानी एवढा प्रचंड ऐतिहासिक वारसा २०२०वर्षी सर्व सामा न्याना उपलब्ध करून दिली आहे त्या सर्वांना माझ्या मते दंडवत करतो

    ReplyDelete
  5. रोचक माहिती

    ReplyDelete
  6. तुमच्या प्रत्येक लेखा प्रमाणे हा ही भन्नाट...
    भव्य प्राचीनत्व लाभलेल्या पुण्याचे आम्ही नागरिक असल्याचा अभिमान आहे.
    खूप धन्यवाद🙏🏻

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage