लावण्यवती 'मस्तानीची' उपेक्षित समाधी.


महाराष्ट्रातील दऱ्या खोऱ्यात अनवट वाटांवर वारंवार भटकले तरी भटक्यांची मन हि कायम सह्याद्रीच्या पर्वत रांगांकडे ऐतिहासिक शहरांकडे आपोआप खेचली जातात. शनिवार-रविवार म्हणजे डोंगर भटक्यांचेआवडते दिवस या दोन दिवसांचे प्लॅनिंग सुरु होते ते सोमवार पासूनच एक भटकंती थांबत नाही तोपर्यंत दुसऱ्या भटकंतीचे वेध लागलेले असतातअश्याच अनवट भटकंतीसाठी विविध ऐतिहासिक स्थळे शोधणे अपरिचित वाटांवरून फिरणे आणि निसर्गाचा आणि इतिहासाचा मनमुराद आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच असते. असेच एक सुंदर ऐतिहासिक ठिकाण आजही भटक्यांना खुणावत आहे ते म्हणजे पाबळ गावात असलेली मस्तानीची समाधी’.

पुणे-शिरूर रस्त्यावर शिरूरपासून 'पाबळ' या गावी जाणारा फाटा फुटतो. पाबळ गावी जाण्यासाठी पुण्याहून एस.टी सेवा उपलब्ध आहे परंतु स्वतःचे वाहन असल्यास कधी पण उत्तम असते वाटेतले एखादे अपिरीचीत ठिकाण देखील बघायला मिळते त्याचाही मनसोक्त आनंद आपल्याला लुटता येतो. पुणे शिरूर रस्त्यावर असलेले 'पाबळ' हे गाव जरी इतर चार गावांप्रमाणे दिसणारं असलं तरी ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचं आहे. 'बाजीराव पेशव्यांची' द्वितीय पत्नी असलेल्या मस्तानीची समाधी या गावात आहे.         


मस्तानीचे प्रसिद्ध असलेले छायाचित्र हे चित्र पाबळ येथे देखील आहे.

थोडेसे इतिहासात डोकावून पहिले तर बुंदेलखंडचा राजा छत्रसाल बुंदेला’ यांच्यासारखा पराक्रमी पिता आणि श्रीमंत बाजीराव पेशवेयांच्यासारखा महापराक्रमी जोडीदार लाभूनही आयुष्यभर उपेक्षिता अनुभवलेली लावण्यसुंदर 'मस्तानी' पाबळ या गावी आजही चिरनिद्रा घेत आहे आणि उपेक्षिता अनुभवत आहे. मस्तानीचा अंत केव्हा आणि कसा झाला याबाबत इतिहास आजही मुका आहे. 

बाजीरावांच्या आयुष्यात १५ ते १७ वर्ष वय असलेली मस्तानी आली आणि वयाच्या उमेदीत अवघ्या ४० व्या वर्षी महापराक्रमी बाजीरावांचे निधन झाले. त्याच्यानंतर इ.स. १७४० साली मस्तानीने आपला देह ठेवला. मस्तानीला रहाण्यासाठी पाबळ येथे एक चौबुरुजी बळकट गढी 'पाबळ' या गावी बांधण्यात आली होती. अत्यंत सुंदर असलेली हि गढी आजही बघण्यासारखी आहेया गढीच्या आवारातच लावण्यवती मस्तानीची उपेक्षित समाधी आहे.


मस्तानीच्या समाधीजवळ असणारे दिशादर्शक.

मस्तानीची समाधी ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी समाधीच्या रस्त्याकडे असणाऱ्या बाजूने तीन दरवाजे आपल्याला पहायला मिळतात. त्यामध्ये उजव्या आणि आणि डाव्या बाजूस देखील आपल्याला दरवाजे दिसतात. मस्तानीच्या समाधीच्या चारही बाजूंच्या भिंती या घडीव चिऱ्यांच्या असून बाहेरच्या बाजूंनी फरसबंदी असलेला रस्ता आपल्याला पहायला मिळतो. तीन दरवाज्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस नमाज पढण्यासाठी आपल्याला एक बंदिस्त वास्तू नजरेस पडते तिच्या तीनही भिंतींना सुरेख कलाकुसर केलेल्या नक्षीदार कमानी आपल्याला पहायला मिळतात. 

नमाज पढण्यासाठी बांधलेल्या वास्तूला वरच्या बाजूला जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून त्याच्यावर चिरे पहायला मिळतात.  त्याच्यावर पूर्वी नक्षीदार लाकडी खांब असावेत अशी शक्यता नाकारता येत् नाही.  पायऱ्या चढून जाताना डाव्या आणि उजव्या बाजूला लाकडांचे सुरेख खांब वरच्या बाजूस  नक्षीदार कमानींनी जोडलेले आजही आपले लक्ष वेधून घेतात. संपूर्ण बंदिस्त वास्तूवर जवळपास २ ते २.५ फुट उंचीची सुंदर नक्षीदार कमान देखील आपल्याला पहायला मिळते.  


गढी मध्ये असलेले इस्लामी बांधकाम.

मस्तानीची समाधी अत्यंत साधी असून त्याच्यावर नक्षीकाम आढळून येत नाही. समाधीच्या चारही भिंतीना कमानदार कोनाडे आपल्याला पहायला मिळतात.  मध्यतंरीच्या काळात काही अज्ञात लोकांनी कबरी मध्ये सोने असल्याच्या उद्देशाने हि कबर फोडण्याचा देखील प्रकार केला त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचे नुकसान देखील झाले.

गावकऱ्यांनी थोडीशी या ऐतिहासिक वारश्याची डागडुजी केलेली आपल्याला बघायला मिळते. अशी हि उपेक्षित मस्तानीची समाधी आणि गढी आजही बघण्यासारखी आहे. 'लावण्यवती मस्तानीची' समाधी बघायची असेल तर पाबळ गावाला नक्की भेट द्यावी.


'लावण्यवती मस्तानीची' समाधी______________________________________________________________________________________________

संदर्भ पुस्तक:-
१. सहली एक दिवसाच्या पुण्याच्या परिसरातल्या:- प्रा. प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन.  

महत्वाची टीप:-
मस्तानी बाबत ससंदर्भ इतिहास वाचायचा असल्यास खालील दुव्यावर पहावे. कौस्तुभ कस्तुरे यांचा ब्लॉग:-
  
कसे जाल:-
पुणे – विश्रांतवाडी  – आळंदी –  केंदूर –  पाबळ.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा

9 comments:

 1. वा! छान माहिती दिलीत. काही दिवसांपूर्वी एका यूट्यूबवर एका व्हिडीओत पाहिलं होतं कि मौल्यवान वस्तूंच्या अभिलाषेने मस्तानीबाईंची कबर दोन-तीन वेळा उध्वस्त करण्यात आली होती. तसं असेल तर दुर्दैवी आहे. अश्या ऐतिहासिक वारश्यांचं नीट जतन व्हायला हवं.

  ReplyDelete
 2. छान माहिती आहे एकदा अवश्य भेट देऊ

  ReplyDelete
 3. पाबळच्या जवळच निमगाव आहे. तेथील खंडोबाच मंदिर पाहण्यालायक आहे. मार्च 13/14 तारखेला सूर्यकिरणांचा कवडसा मूर्तीवरून फिरतो. त्या गावी भिमानादीकाठी शनिवार वाड्याची प्रतिकृती आहे.

  ReplyDelete
 4. हे ठिकाण आमच्या राजगुरूनगर गावा पासून जवळ आहे,गावकऱ्यांनी समाधी ची डागडुजी केली आहे,इतिहासाला उजाळा देण्यासाठी खूप मस्त ठिकाण आहे,अवश्य भेट द्या

  ReplyDelete
 5. उपयुक्त माहितीबद्दल अभिनंदन 👌🙏
  जवळ असूनही काही ठिकाणी, माहिती नसल्याने जाता येत नाही. धन्यवाद.

  ReplyDelete
 6. मस्तानी ने मराठ्यांच्या राजकारणात लुडबुड केली नाही. बाजीराव पेशवे आणि इतर मराठा सरदार यांचें मध्ये कधी भांडणे लावलेली दिसुन येत नाही. तिच्या स्वभावाला दाद द्यावी लागेल. पेशवे यशस्वी होण्यामध्ये तिचा महत्वाचा वाटा आहे. तिने राजकारणात रस घेतला असता तर इतिहास काही वेगळा राहिला असता. मस्तानी ्चा आदर राखला पाहिजे.

  ReplyDelete
 7. मस्तानी ने मराठ्यांच्या राजकारणात लुडबुड केली नाही. बाजीराव पेशवे आणि इतर मराठा सरदार यांचें मध्ये कधी भांडणे लावलेली दिसुन येत नाही. तिच्या स्वभावाला दाद द्यावी लागेल. पेशवे यशस्वी होण्यामध्ये तिचा महत्वाचा वाटा आहे. तिने राजकारणात रस घेतला असता तर इतिहास काही वेगळा राहिला असता. मस्तानी ्चा आदर राखला पाहिजे.

  ReplyDelete
 8. खूप छान माहिती ! धन्यवाद!

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage