प्राचीन बौद्ध भिक्खूंचे लेण्यांमधील 'वर्षावास आणि उपोस्थ' यांचे महत्व


महाराष्ट्रातील लेणी या सर्व जगभर प्रसिद्ध आहेत. या लेण्या कशासाठी बांधल्या? का बांधल्या हे प्रश्न नेहमी लोकांना सतावत असतात या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला बौद्ध धर्म आणि त्याचे तत्वज्ञान हे देखील जाणून घ्यावे लागते तरच आपल्याला या लेण्यांचे देखील महत्व समजण्यास मदत होते. तसे पहायला गेले तर बौद्ध धर्मात 'उपोस्थ' या गोष्टीला फार महत्व आहे. 'उपोस्थ' या शब्दाचा अर्थ 'जवळ बसणे' असा असून हा शब्द 'उप+स्था' या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. 'जवळ बसणे' या शब्दाला बौद्ध धर्मात फार वेगळेपण आणि महत्वाचे सांगितले आहे. 

भिक्षूसंघाच्या एकसंधपणाच्या आणि शिस्तीच्या दृष्टीने  दोन विधी फार महत्वाचे मानले गेले आहेत. त्यातील पहिला विधी म्हणजे 'उपोस्थ किंवा उपोसथ विधी' हा होय. 'विनय महावग्गातील' वचनानुसार हा विधी मगध राज्याचा राजा 'बिंबिसार' याच्या सांगण्यावरून 'भगवान गौतम बुद्धांनी' आपल्या संघात स्वीकारला होता. जेव्हा 'भगवान गौतम बुद्ध' हे स्वत: 'राजगृह' म्हणजे आजचे बिहार मधील 'राजगिर' येथे राहत असताना दुसऱ्या पंथातील भिक्षुंची संख्या बरीच वाढली होती. हे भिक्षु दर १५ दिवसांनी अष्टमी, चतुर्दशी, आणि पौर्णिमा किंवा अमावस्या या तिथींना आपल्या धर्म पंथांची तत्वे सामान्य लोकांना सांगत असत. अशा रितीने त्यांनी बरेच अनुयायी मिळवले होते. या परीव्राजकांपासून काहीतरी वेगळे असावे म्हणून बौद्ध भिक्षुंंसाठी 'उपोस्थ किंवा उपोसथ' हा विधी अत्यंत महत्वाचा मानला गेला होता.

वर्षावासाच्या काळामध्ये ज्या लेण्यांमध्ये हे बौद्ध भिक्षु राहिले तेथे त्यांनी जगाला आश्चर्यचकित करणारी आणि स्तिमित करणारी सुंदर शिल्पे कोरलेली आपल्याला पहायला मिळतात.

'उपोसथ किंवा उपोस्थ' या विधीच्या वेळेस 'भगवान गौतम बुद्धांनी' सांगितलेल्या विनयनियमांचे किंवा शिक्षापदांचे पठण त्यावेळी अत्यंत आवश्यक होते. या पठणासोबतच दोन उपोसथांच्या मधल्या काळात जे नियमभंग झाले असतील त्यांची कबुली देणेही भिक्षुंसाठी निहित होते. 'प्रतिमामोक्षाच्या' पठणाच्या आधी भिक्षुसंघाच्या एकसंधपणाची खात्री होणे ही आवश्यक गोष्ट होती. त्यासाठी त्या त्या संघातील भिक्षुंची उपस्थिती आवश्यक असे. हे भिक्षु या विधीसाठी स्वत: उपस्थित असत अथवा आजारी असल्यास किंवा काही कारणांनी जाण्यास जमले नाहीत तर त्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवीत असत. यासाठी भिक्षु आणि भिक्षुणी यांच्यासाठी ते राहत असलेल्या आवसाच्या सीमा निश्चित केल्या गेल्या होत्या असे आपल्याला पाहायला मिळते.  'उपोस्थ' या महत्वाच्या  विधीचे परिपालन  करण्यास आपल्या सर्व शिष्यांना गौतम बुद्धांनी सांगितले होते.

गौतम बुद्धांनी धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्षुंंना वेगवेगळ्या देशामध्ये जाण्यास सांगितले. देशाटन केल्यावर हे भिक्षु पावसाळ्यात लेण्यांमध्ये राहत असत. संपूर्ण वर्षातील ८ महिने धर्म प्रसार केल्यानंतर वर्षा ऋतुमधील ४  महिने भिक्षुंनी एकांतात घालवावे त्यामध्ये त्यांनी ज्ञानसाधना करावी, अन्य भिक्षूंच्या समवेत धर्माबद्दल चर्चा करावी, मनन, चिंतन करावे अशी भगवान बुद्धांची शिकवण होती. अश्या तऱ्हेच्या बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्याला बौद्धग्रंथांमध्ये जी व्याख्या दिली आहे त्याला 'वर्षावास' असे म्हणतात. या वर्षावासातील कालखंडात बौद्ध भिक्षुंंनी धर्मचर्चे शिवाय अन्य कामगिरी केल्याचे देखील आपल्याला दिसून येते. या वर्षावासाच्या काळामध्ये ज्या लेण्यांमध्ये हे बौद्ध भिक्षु राहिले तेथे त्यांनी जगाला आश्चर्यचकित करणारी आणि स्तिमित करणारी सुंदर शिल्पे कोरली. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग त्यांनी त्यांनी आपल्या शिल्पकलेच्या कलाकृतीमधून अजरामर केले. दृष्ट लागण्यासारखी चित्रे ही अजिंठा, पितळखोरा, कान्हेरी लेणी तसेच शिवनेरी किल्ल्याच्या पोटामध्ये असणाऱ्या लेणी मध्ये त्यांनी रेखाटली. महाराष्ट्रातील गुंफांमधली शिल्पे अक्षरशः सौंदर्याने न्हाऊन निघालेली आहेत.

'भगवान गौतम बुद्ध' यांनी परीव्राजकांपासून काहीतरी वेगळे असावे म्हणून बौद्ध भिक्षुंंसाठी 'उपोस्थ किंवा उपोसथ' हा विधी अत्यंत महत्वाचा आहे हे सांगितले आहे.

या सर्व महत्वाच्या लेण्यांमध्ये स्तूप आहेत. भव्य अश्वनालाकृतीचे प्रवेशद्वार असलेले चैत्य आहेत आणि विहार आहेत. या सर्व विहारांंमध्ये बौद्ध भिक्षु राहत असत. देशातील निरनिराळ्या भागातून आलेल्या भिक्षुंंना या लेण्यांमध्ये राहायची परवानगी असे. अशा विहारांना 'चातुदिससंघ' असे म्हणत. बौद्ध भिक्षुसंघातील उपोसथ विधी साठी प्रत्येक जिल्ह्यातील ज्येष्ठ भिक्षु बैठक घेत असे आणि त्यादिवशी जे स्थान निश्चित केले जात असे तेथे सर्व भिक्षु जमत असत. हे स्थान म्हणजे विहार असे तसेच एखाद्या पर्वतातील गुहा असे. केवळ आजारी भिक्षुला या बैठकीला अनुपस्थित राहण्याची अनुज्ञा असे. परंतु त्यानेही त्या विशिष्ट मसुद्यात नमूद केलेल्या गोष्टींबद्दल अतिक्रमण केलेले नाही अशा अर्थाचे स्पष्टीकरण त्याच्या अनुयायासोबत पाठविणे गरजेचे होते. जर अशी कबुली ज्या व्यक्तीसोबत पाठवायची असेल अशी व्यक्ती जर नसेल तर त्या आजारी भिक्षुला आसनावर बसवून किंवा शय्येवर झोपवून बैठकीच्या जागी आणण्यात येत असे. त्या भिक्षुची तेथे अगदीच न येण्याची अवस्था किंवा मरणासन्न अवस्था असेल तर भिक्षुसंघातील प्रमुख व्यक्ती तेथे जात असे आणी त्याच्यापासून ती कबुली घेत असे. अशा रीतीने भिक्षुसंघातील सर्व भिक्षुंंनी कोणत्याही प्रकारे बैठकीस हजर राहावयाचे नसे. 

दिव्याच्या प्रकाशात, सभेच्या ठिकाणी कमी उंचीवरील खालच्या आसनांवर भिक्षु विराजमान होत असे  कोणीही सामान्य माणूस नवखा माणूस किंवा भिक्षुणी तेथे आलेली चालत नसे. त्याचे मुख्य कारण म्हणजे संघाचा धर्म हा त्या भिक्षुंंसाठी राखीव ठेवा होता. 'पातीमोक्ख म्हणजे प्रतीमोक्ष' ही गुप्त विद्या आहे असे त्याकाळी मानले जात असे. नंतर मुख्य भिक्षु बोलण्यास सुरुवात करत असे. त्याच्या बोलण्याचा सारांश पुढील प्रमाणे असे "ज्याने अतिक्रमण केले असेल त्याने ते कबुल करावे. ज्याने अतिक्रमण केले नसेल त्याने शांत राहावे". भिक्षूंच्या क्षणात आणि स्तब्ध राहण्यावरून असे समजण्यात येई कि ते पवित्र आहेत. जाणून बुजून केलेले असत्यभाषण हे नाशाला कारणीभूत ठरते. असे भगवान गौतम बुद्ध यांनीच सांगितले आहे. त्याच्यानंतर आचार नियमांच्या अतिक्रमणांची नामावली सुरु होत असे. 

देशाटन केल्यावर हे भिक्षु पावसाळ्यात लेण्यांमध्ये राहत असत.

यामध्ये चार मोठ्या प्रतिषिध्द गोष्टींचा निर्देश येतो. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे दिक्षा घेतलेल्या कोणत्याही भिक्षूने समागम करू नये. दुसरी गोष्ट अशी कि भिक्षुला दिले गेले नाही त्याचा अगदी गवताच्या काडीचाही त्याने परिग्रह करू नये. तिसरी गोष्ट अशी कि अश्या भिक्षुने कोणत्याही प्राण्याची अथवा किड्या मुंगीची देखील हत्या करू नये. चौथी गोष्ट अशी कि कोणत्याही भिक्षुने अतिमानवी सिद्धीची बढाई मारू नये. या चार अतिक्रमणाच्या बद्दल स्पष्ट निर्देश करून नंतर तो भिक्षु तीनदा विचारीत असे "तुम्ही यापासून मुक्त आहात काय?" एखाद्या भिक्षुने वरील चार आचारनियमांचे अतिक्रमण करून पापाचरण केले असेल असेल तर संघ त्या भिक्षुला संघातून काढून टाकत असे. इतर अतिक्रमणांच्या बाबतीत त्याने त्यावेळी आपल्या शेजारच्या भिक्षुला तसे सांगायचे त्यानंतर तो शेजारचा भिक्षु मग त्या अपराधी भिक्षुला कबुली - विधी पूर्ण होण्याच्या आधी तपाचरण करण्यास सांगत असे किंवा नकाराधिकार वापरून त्याच्या बाबतीतली कबुलीमना करत असे. तसेच उपोस्थामध्ये खोटे बोलणे, चहाडी करणे, मनात पाप येणे, मत्सर वतने, आळस येणे या गोष्टी देखील पापासमान मानल्या जात असत.

या सर्व महत्वाच्या लेण्यांमध्ये स्तूप आहेत. भव्य अश्वनालाकृतीचे प्रवेशद्वार असलेले चैत्य आहेत आणि विहार आहेत. या सर्व विहारांंमध्ये बौद्ध भिक्षु राहत असत.

उपोस्थामध्ये मानवी मनाचे फार सुंदर प्रत्यंतर आपल्याला पहायला मिळते. भिक्षूंचे चारित्र्य घडविण्यात उपोस्थाचा फार मोठा वाटा आहे. रोजच्या वागण्यामध्ये आपले माणसाने आपले आचरण कसे करावे हे सांगताना चूक झाली तरी दुरुस्त कशी करता येते हे हे देखील सांगितल्याचे आपल्याला या उपोस्थामध्ये पहायला मिळते. एखादी चूक झाली तरी तिचा दोष कायम राहतो असे नाही. प्रत्येक पंधरवड्यात माणसाला आपल्या वागण्याचा आलेख काढता येणे आणि पुढच्या पंधरवाड्यात तो आलेख वरच्या श्रेणीला नेणे यासाठी त्याला संधी दिली जाते. ही एक फार महत्वाची गोष्ट आपल्याला यातून दिसते. दैनंदिन जीवन स्वच्छ ठेवणे चुकले तरी कायमचा ठपका न ठेवणे आणि पुन:पुन्हा चांगल्याकडे वळविणे हा एक सुंदर संदेश आहे. 

चूक होणे हा मानवी धर्म आहे तसेच चूक कबुल करून ती सुधारता येते यामध्ये जीवनाचे महान तत्वज्ञान आहे. अश्या प्रकारच्या विधीतून भिक्षुंंसाठी विहित अशा नियमांचे दिग्दर्शन आपल्याला दिसून येते तसेच लेण्यांची संकल्पना कशी आली आणि यामागचे बौद्ध तत्वज्ञान  काय होते हे देखील आपल्याला अभ्यासातून समजून येते. यासाठी जेव्हा कोणती लेणी पहायला जात असाल तर त्याच्यामागे असलेली 'उपोसथ किंवा उपोस्थ आणि वर्षावास' या संकल्पना समजून घेणे आपल्याला गरजेचे ठरते. 

गौतम बुद्धांनी धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्षुंंना वेगवेगळ्या देशामध्ये जाण्यास सांगितले आहे.

________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) थेरगाथा:- एन.के. भागवत, मुंबई विद्यापीठ १९३९. 
२) विनयपिटक भाग ५:- ओल्डेनबर्ग संपादित १८७९.
३) बुद्ध संप्रदाय आणि शिकवण:- चि.वि. जोशी, १९६३.
४) बौद्ध धर्म आणि तत्वज्ञान:- डॉ. सिंधू डांगे, १९८०.
   
_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________________________________

एक छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.
लिखाण आणि चार छायाचित्र  © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा
  
               




3 comments:

  1. बौद्ध भिक्षूंचे आयुष्य कसे असेल ह्याबद्दल थोडीफार उत्सुकता असतेच पण माहिती अत्यंत कमी. वास्तविक लेणी पाहतानादेखील अशी माहिती दिली जात नाही. तुम्ही छान सविस्तर माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  2. खुपच छान माहिती👌

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage