ऐतिहासिक सासवड मधील 'बाळाजी विश्वनाथ भट पेशवे' यांची समाधी


प्राचीन काळापासून महत्वाचे ठिकाण असलेले 'सासवड' प्रसिद्ध आहे ते मुळात सोपानदेवांच्या समाधीमुळे. पुरंदर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या 'सासवड' गावाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले ते मध्ययुगात. पुण्यापासून अगदी जवळ असलेले ठिकाण हे आजही महत्वाचे ठिकाण आहे ते तेथील बाजारपेठेमुळे. 'कऱ्हा नदी आणि चांंबळी नदी' यांच्या संगमावर उभे असलेले 'संगमेश्वर मंदिर' म्हणजे सासवड गावातील अत्यंत महत्वाचे स्थान याच मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला 'कऱ्हाबाईचे' देखील मंदिर पाहायला मिळते. याच 'कऱ्हाबाई मंदिराच्या' शेजारी 'भट' घराण्याच्या पेशवाईचे संस्थापक 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची समाधी आहे.

'बाळाजी विश्वनाथ भट' यांचे पणजे 'महादजीपंत भट' इ.स. १५७५ साली श्रीवर्धनच्या देशमुखीचा कारभार पाहत असत. 'महादजी पंत' यांचा जो मुलगा होता 'परशुराम पंत' हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे चाकरीसाठी येणारे पहिले गृहस्थ. 'परशुराम पंत' यांच्याकडे सरदारकी होती. 'परशुराम पंत' यांचे चिरंजीव 'विसाजीपंत' हे देखील सरदार होते यांना ५ मुले होती. १. कृष्णाजी २. जनार्दन ३. रुद्राजी ४. बाळाजी आणि ५. विठ्ठल. यापैकी 'बाळाजी' म्हणजे 'बाळाजी विश्वनाथ पेशवे' हे होय. काही राजकारणामुळे 'जंजिरा' येथील 'सिद्धी' यांची भट घराण्यावर गैरमर्जी झाली म्हणून त्यांना श्रीवर्धन सोडावे लागले. 

'बाळाजी विश्वनाथ भट' यांचे चिपळूण - दाभोळ येथे वास्तव्य ज्यावेळेस होते तेव्हा त्यांचे लग्न झाले असावे. चिपळूणचे बंदर तेव्हा जंजिरा येथील सिद्धी कडे होते. तसेच चिपळूण येथील सुभा हा 'आवजी बल्लाळ' यांच्याकडे होता. 'मीठ - बंदरचा' हवाला 'बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनकर' यांच्याकडे होता. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याकडे 'मीठ बंदर आणि जकात नाका' यांची जबाबदारी असल्यामुळे ते चिपळूण येथे राहत असत. पुढे ते काहीकाळ दाभोळ येथे देखील सभासद होते आणि वास्तव्यास होते. चिपळूण येथे राहत असताना त्यांची 'ब्रम्हेंदस्वामी धावडशीकर' यांच्याशी भेट झाली असावी.

'बाळाजी विश्वनाथ भट पेशवे' यांचा पुतळा.

'बाळाजी विश्वनाथ भट'  यांचे प्रचलित नाव 'बाळाजीपंत नाना' आणि घरगुती नाव हे 'नाना' असे होते. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी चिपळूण येथून देशावर कधी स्थलांतर केले याबाबत नक्की माहिती मिळत नाही. त्याबाबत एक गोष्ट जी आढळून येते ती पुढीलप्रमाणे:-

'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी ज्यावेळेस श्रीवर्धन सोडले त्यावेळेस 'वेळास' या गावी हरी महादेव, बाळाजी महादेव, रामाजी महादेव असे तीन भानू कुलोत्पन्न भावंडे राहत होती. त्यांचा आणि 'बाळाजी विश्वनाथ भट' यांचा लहानपणीपासूनची मैत्री होती. 'वेळास' येथे जाऊन 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी या तिनहि भावंडांना श्रीवर्धन सोडण्याबाबत सांगितले असता हे तिनहि 'भानू' बंधू 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्यासोबत यायला निघाले 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'तिवरे घाटाने' देशावर यायला निघाले होते. 'बाळाजी विश्वनाथ भट' हे चिपळूण येथे येऊन गेल्याचे समजताच तोच ते श्रीवर्धन मधून पळून गेल्याची गोष्ट हि 'जंजिरा' येथील 'सिद्धीस' समजली. 'जंजीऱ्याच्या सिद्धीने' चिडून 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना पकडून आणण्याची आज्ञा हि 'अंजनवेल' किल्याच्या किल्लेदारास दिली. 'अंजनवेलच्या किल्लेदाराने' मोठी खटपट करून 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना कैद केले आणि 'अंजनवेल किल्ल्यामध्ये' आणले. 'सिद्धी' याने 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना 'अंजनवेल' किल्ल्यावर कैद ठेवण्याचा हुकुम दिला. 'अंजनवेल किल्ल्यावर' जवळपास २५ दिवस 'बाळाजी विश्वनाथ भट' हे कैदेत होते. याच काळात 'भानू बंधूनी' किल्लेदारास लाच देऊन 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची मुक्तता केली. 

यानंतर 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'भानू' बंधूंच्या सोबत 'आंबाजीपंत पुरंदरे' यांच्याकडे सासवड येथे गेले. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी आंबाजीपंत पुरंदरे यांना आपला बेत कळवला तो बेत 'आंबाजीपंत पुरंदरे' यांना पसंत पडला आणि मग आंबाजीपंत पुरंदरे, बाळाजी विश्वनाथ भट, आणि भानू बंधू हे सगळे सातारा येथे येऊन पोहोचले. काही दिवस 'आंबाजीपंत पुरंदरे आणि बाळाजी विश्वनाथ भट' हे मक्त्याच्या मामलती करून मोगलाईमध्ये ५०० ते १००० स्वार बाळगून होते. सातारा येथे राहत असताना 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'महादजी कृष्ण जोशी' यांच्यामार्फत 'शंकराजीपंत सचिव' यांच्याकडे मुतालकीची चाकरी देखील केली. इ.स. १६८९ साली 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'रामचंद्रपंत आमात्य' यांच्याकडे नोकरीवर असल्याचे काही उल्लेख देखील मिळतात. 

शाहू बखरी मध्ये याचे उल्लेख पुढीलप्रमाणे येतात:- 

ते समयी  परशराम त्रिंबक कुळकर्णी किनईकर व नारो शंकर कुळकर्णी मौजे गांडेकर व बाळाजी विश्वनाथ भट श्रीवर्धनकर देशमुख हे त्रिवर्ग अमात्य यांची सेवा शागिर्दीची करून होते. त्यांस त्रिवर्गाचे चातुर्य व शहाणपण पाहून कामे योजून त्रिवर्गास सांगितली.    

             १. परशराम त्रिंबक यांस दफ्तरच्या लिहिणीचे काम सांगितले.
           
             १. नारो शंकर यांस पागेचे काम दिले. 

             १. बाळाजी विश्वनाथ यांस कोठीचे लिहिणेचे सांगितले.
            ___ 
              ३ 
साधरणपणे इ.स. १६९४ च्या सुमाराला 'बाळाजी विश्वनाथ भट' हे चांगल्या नोकरीला होते असे दिसते. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्या नोकरीतल्या जबाबदाऱ्या पुढे वाढत गेल्या आणि इ.स. १६९९ ते इ.स. १७०३ मध्ये पुण्याचे 'सरसुभेदार' झाले. याच कालखंडामध्ये 'महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज' हे मोगलांच्या कैदेत असताना देखील मोगल छावणीमध्ये होते. कैदेत असताना देखील 'महाराणी येसूबाई' यांचा मराठ्यांंच्या  मुत्सद्यांशी स्वातंत्र्यलढयाबाबत संपर्क होता तसेच जोत्याजी केसकर, बंकी गायकवाड या मध्यस्थांमार्फत पुणे प्रांताचे सरसुभेदार या नात्याने 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याशी देखील त्यांच्या स्वात्यंत्रलढ्याबाबत संपर्क होत असे.

समाधी जवळ असलेला माहिती फलक.

इ.स. १७०२ साली जेव्हा 'सिंहगड' येथे मोगलांचा वेढा पडला तेव्हा 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'जिवावरच्या खेळात' नाव घेण्यासारखी कामगिरी केली. या काळात त्यांचा उल्लेख हा 'दिम्मत सेनापती' असा उल्लेख आढळून येतो. 'दिम्मत सेनापती' म्हणजे 'सेनापतीच्या वतीने'. 'सिंहगड किल्ला' मोगलांच्या ताब्यात देण्यासाठी एप्रिल सन १७०३ साली किल्ल्यातून बाहेर आलेल्या दोन गृहस्थांपैकी एकाचे नाव 'बाळू पंडित' असे आपल्याला दिसून येते. हे 'बाळू पंडित' नाव असणारे गृहस्थ म्हणजे 'बाळाजी विश्वनाथ भट' हे होय. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी इ.स. १७०५ साली नाशिक जवळील 'वणी' आणि 'दिंडोरी' येथे देखील स्वाऱ्या केल्या होत्या असे उल्लेख आपल्याला मिळतात.

इ.स. १७०३ ते १७०७ साली 'बाळाजी विश्वनाथ भट' हे यादवांची प्राचीन राजधानी असलेल्या 'देवगिरी किंवा दौलताबाद' किल्ल्याचे 'सरसुभेदार' होते. या कालखंडामध्ये त्यांनी या प्रांताची महसूल-व्यवस्था आणि वसुली, न्यायनिवाडे, देवस्थानची इनामे, क्वचित आलेले काही युद्धप्रसंग हि संपूर्ण कामे त्यांनी योग्य प्रकारे सांभाळलेली दिसतात. या सर्व गोष्टींमुळे 'बाळाजी विश्वनाथ भट' यांचे मराठे सरदार, मुत्सदी, आणि अधिकारी यांच्याशी खूप चांगले संबंध होते तसेच या महत्वाच्या धामधुमिच्या काळामध्ये त्यांनी अनेक सरदारांशी मैत्री जोडली अनेक महत्वाच्या मराठे सरदारांचे ते खूप चांगले मित्र होते.

'बाळाजी विश्वनाथ भट' यांची हुशारी पाहून 'आंबाजीपंत पुरंदऱ्यांंना' तसेच 'परशुरामपंत त्रिंबक प्रतिनिधी' यांच्या विशेष शिफारशीवरून मराठ्यांचे अत्यंत महत्वाचे सेनापती 'धनाजी जाधव' यांनी आपल्याकडे नोकरीवर घेतले. यामध्ये जमाबंदीच्या कामाची जबाबदारी त्यांनी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याकडे सोपवली. यामध्ये 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'धनाजी जाधव' यांच्या सरंजामी आणि वतनी गावांचा महसूल जमा करण्याचे काम त्यांच्याकडे होते. 'चासकर-जोशी' यांच्या मध्यस्थीने 'महाराणी ताराबाई' यांनी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची  'रांगणा किल्ल्यावर' नेमणूक केली. तसेच मधल्या काळात जाधवांच्या हाताखाली काम करत असताना 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'गुजराथ' येथे देखील स्वारी केल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात.

समाधीच्या आवारात असलेली विहीर.

'छत्रपती शाहू महाराज' हे जेव्हा मोगलांच्या कैदेतून सुटून आले तेव्हा 'धनाजी जाधव' यांच्या वतीने 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'छत्रपती शाहू महाराज' यांची भेट घेतली. पुढे 'ब्रम्हेंंद्र स्वामी धावडशीकर' यांनी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या पक्षाला मिळण्याचा सल्ला दिला. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनीच 'सेनापती धनाजी जाधव' यांना 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या पक्षात आणले. तसेच इ.स. १७०८ साली 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'छत्रपती शाहू महाराजांच्या' आमात्यांंचे मुतालिक देखील होते असे उल्लेख आपल्याला मिळतात.

मराठ्यांचे 'सेनापती धनाजी जाधव यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा 'चंद्रसेन जाधव' आणि 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्यामध्ये काहीकाळ सेनापतीपदासाठी चुरस देखील होती त्यावेळेस 'छत्रपती शाहू महाराजांनी' सेनापती 'धनाजी जाधव' यांचा मुलगा 'चंद्रसेन' याच्या विरुद्ध 'बाळाजी विश्वनाथ भट' याचा उपयोग करून घेतला आणि नंतरच्या काळात 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची कर्तबगारी पाहून २० ऑगस्ट १७११ साली 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना 'सेनाकर्ते' हा किताब दिला. तसेच २५,१०,२०० रुपयांचा सरंजाम देखील 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना दिला. इ.स. १७१२ साली खटावकरांचे बंड मोडून 'महाराणी ताराबाई' यांच्या पक्षाचा बिमोड करून 'छत्रपती शाहू महाराजांनी' आपले राज्य स्थिर केले.

इ.स. १७१३ साली चौथी, देशमुखी, घासदाणा हे मराठ्यांचे मोगलाई प्रांतात असलेले हक्क व्यवस्थित वसूल होत नव्हते या वसुलीसाठी 'छत्रपती शाहू महाराज' यांनी 'चंद्रसेन जाधव' आणि 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना फौजेसह मोहिमेवर पाठविले. या मोहिमेमध्ये दोघांचेही पटेना तेव्हा 'चंद्रसेन जाधव' यांनी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना आपल्या मुलांसह 'पांडवगड किल्ल्याजवळ' अडवून ठेवले. या बिकट प्रसंगी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची सुटका 'पिलाजी जाधवराव' यांनी केली. नंतरच्या काळामध्ये 'महाराणी ताराबाई' यांच्या पक्षाची बाजू घेऊन लढणाऱ्या 'कान्होजी आंग्रे' यांचा बंदोबस्त करण्यासाठी 'छत्रपती शाहू महाराजांनी' तत्कालीन स्वराज्याचे पेशवे 'बहिरोपंत पिंगळे' यांना पाठवले त्याचवेळेस 'कान्होजी आंग्रे' यांनी 'पेशवे बहिरोपंत पिंगळे' यांना कैद केले. शेवटी 'छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'बहिरोपंत पिंगळे' यांची सुटका केली. यानंतरच्या काळात 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या मनातून  'बहिरोपंत पिंगळे' हे उतरले आणि 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याबद्दल असलेला भरवसा अजून वाढला.

'पेशवे बहिरोपंत पिंगळे' कैद  झाल्यामुळे कोणाकडे तरी पेशवेपद देणे फार महत्वाचे आहे याचा 'छत्रपती शाहू महाराज' विचार करू लागले यावेळी 'अंबाजीपंत पुरंदरे' यांनी 'बाळाजी विश्वनाथ भट' यांचे नाव 'छत्रपती शाहू महाराज' यांना सुचविले. आत्तापर्यंतच्या आयुष्यात 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी ज्या हरहुन्नरी आणि व्यवहारदक्ष पद्धतीने काम केले होते त्यामुळेच 'बाळाजी विश्वनाथ भट' हे 'पेशवे' होण्यासाठी एकदम योग्य असल्याची खात्री  'छत्रपती शाहू महाराज' यांना पटलेली होती. म्हणून 'छत्रपती शाहू महाराज' यांनी स्वराज्याचे 'पेशवेपद' हे 'बाळाजी विश्वनाथ भट' यांना देण्याचे ठरवले. याच्यावर 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याशी 'छत्रपती शाहू महाराज' यांची चर्चा देखील झाली. त्यामध्ये 'छत्रपती शाहू महाराज' यांनी आदेश देखील काढला होता. 'प्रथम पेशवा पद बहाल करूनच मग रवाना करावे, दुसरा पेशवा कायम आहे असे कान्होजीस दिसेल तरच तो नरम येईल'. असे 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'छत्रपती शाहू महाराज' यांना स्पष्ट सांगितले. याच्यावरील पत्र पुढील प्रमाणे:-

पेशवाई देणे बाबतचे पत्र.

'बाळाजी विश्वनाथ भट' यांना पुण्याच्या दक्षिणेला ८ मैल अंतरावर असणाऱ्या 'मांजरी' या गावी पेशवा पदाची वस्त्रे दिनांक १७ नोव्हेंबर १७१३ रोजी मिळाली. त्याचवेळेस रांजणगाव, कुर्डा अश्या पाच महालांची सरदेशमुखी वतन देखील त्यांना लिहून दिले गेले. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांच्याकडे असणारे 'सेनाकर्ते' हे पद 'अनंता होनाजी' यांना मिळाले. 'रामाजीपंत भानू' हे 'फडणीस' झाले. 'अंबाजीपंत पुरंदरे' हे मुतालिक झाले. इ.स. १७१५ साली 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'पुणे प्रांत' हा 'छत्रपती शाहू महाराज' यांच्याकडे घेतला.

'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी राज्यकारभार चालवताना स्वराज्यापासून दुरावलेली माणसे सामोपचाराने जोडून राज्याला बळकट केले. अंतर्गत होणारे विरोध निष्काम करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. याचवेळेस 'कान्होजी आंग्रे' यांचे 'सिद्धीशी' भांडण होते त्यावेळेस 'बाळाजी विश्वनाथ भट' यां 'कान्होजी आंग्रे' यांच्याशी  समेट देखील केला. तसेच 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी 'कान्होजी आंग्रे' यांना हे देखील पटवून दिले कि 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या पक्षात तुम्ही आला तर वाटेल तेवढा पराक्रम गाजवता येईल. अखेरीस या समेटमुळे दिनांक २८ फेब्रुवारी १७१४ रोजी पेशवे 'बाळाजी विश्वनाथ भट' आणि सरखेल ' कान्होजी आंग्रे' यांच्यात सलोख्याचा तह झाला. कोणतीही लढाई न करता वाटाघाटी करून सामोपचाराने 'कान्होजी आंग्रे' यांना स्वराज्यात वळवल्याने तत्कालीन पेशवे 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची प्रतिष्ठा अजूनच वाढली.

इ.स. १७१६ साली दमाजी आणि राजजी या दोन भावंडांनी 'छत्रपती शाहू महाराज' यांच्याविरुद्ध मिरजेच्या आजूबाजूला दंगा करण्यास सुरुवात केली असता 'छत्रपती शाहू महाराजांनी' थोडी लोकं बरोबर देऊन 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांना पाठवले असता. 'दमाजी' याने 'बाळाजी विश्वनाथ भट आणि अंबाजीपंत पुरंदरे' यांना त्यांच्या परिवारासह दिनांक ५ ऑगस्ट १७१६ रोजी 'हिंगणगावच्या गढी' मध्ये कैदेत टाकले. 'बाळाजी विश्वनाथ भट' यांनी पैसा, खंडणी, द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरण्यापर्यंत त्यांचे हाल केले. काही काळाने 'छत्रपती शाहू महाराज' यांनी निरोप पाठविला कि 'खंडणी ठरवून निघावे, पैका तरतूद करून आणतो' असे म्हणून 'आंबाजीपंत पुरंदरे आणि पिलाजी जाधवराव' हे बाहेर पडले. नंतर जो ऐवज होता तो थोरातांना देऊन 'बाळाजी विश्वनाथ भट' आणि त्यांचा परिवार देखील सुटला यावेळी सुटल्यानंतर 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांनी थोरातांचा परभव करून 'पुरंदर किल्ला' जिंकला. यानंतर जंजिरा येथील 'सिद्धीने' बळकावलेले 'सरखेल आंग्रे' यांचे किल्ले परत घेण्यासाठी 'सरखेल आंग्रे' यांनी 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांना मदतीला बोलावले आणि या मदतीमुळे 'सरखेल आंग्रे' यांनी आपले सर्व किल्ले हे जंजिरा येथील 'सिद्धी' कडून परत जिंकले.

 'बाळाजी विश्वनाथ भट पेशवे'

'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांनी सासवड जवळील 'गराडे' गावाची पाटीलकी खरेदी केली होती. त्याचदरम्यान 'छत्रपती शाहू महाराजांनी' 'सासवड आणि सुपे' हि गावे देखील 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांना इनाम दिली. इ.स. १७१८ च्या पूर्वार्धात ते 'सुपे' येथे राहत होते. इ.स. १७१३ नंतर दिल्ली मध्ये खूप अंदाधुंदी माजली असताना जी एक मोहीम निघाली होती तेथे स्वत: 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' हे देखील गेले होते. सगळी प्रकरण शांत करून 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांनी बादशहाकडून 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या नावाने ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या. याच काळात 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांनी आपले वकील देखील दिल्लीला ठेवले.

इ.स. १७२० च्या उत्तरार्धात इस्लामपूरजवळ कोल्हापूर येथील 'संभाजी राजांवर' निर्णायक विजय मिळवल्यानंतर जेव्हा 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' घरी सासवड येथे आले. यानंतर साधारणपणे एक आठवड्याच्या आतमध्ये दिनांक २ एप्रिल १७२० रोजी  शनिवारी (शारवरी नाम संवत्सर, चैत्र शु. ६ शके १६४२) 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांचे निधन झाले. 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांचे व्यक्तिमत्व पाहायला गेले तर अत्यंत विशाल होते. मुळातच गोरा वर्ण आणि रुबाबदार चेहेरा यामुळे त्यांची छाप फार खूप चांगली पडत असे.

अत्यंत तल्लख बुद्धी असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शांतता आणि सुबत्त होती. अश्या या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या माणसाची म्हणजे 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांची समाधी आजही सासवड येथे 'संगमेश्वराच्या' मंदिरासमोर आणि कऱ्हामाई मंदिराच्या अगदी शेजारी असून आजही फारशी लोकं तिथे जात देखील नाहीत या 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' यांच्या समाधीची सर्व काळजी हे 'देवदेवेश्वर संस्थान, कोथरूड' आजही घेत आहे. मराठेशाही मधील 'पेशवे बाळाजी विश्वनाथ भट' या पराक्रमी व्यक्तीच्या समाधीला सासवड मध्ये गेलात तर नक्की भेट द्या.

 'बाळाजी विश्वनाथ भट पेशवे' यांच्या समाधीवर बांधलेला चौथरा.

_________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पेशवेकालीन महाराष्ट्र:- भावे वा.कृ (१९७६).  
२) Gazeteers of Bombay Prsidency Poona 1, 2, 3:- Bombay Prsidency.
४) पेशवे घराण्याचा इतिहास:- प्रमोद ओक, (१९८५). 
५) शाहू रोजनिशी भाग १:- वाड चिमणाजी.
६) मराठी रियासत मध्यविभाग भाग १:- सरदेसाई गो.स.

कसे जाल:-
पुणे – स्वारगेट  – हडपसर –  दिवे घाट  –  सासवड.

_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि  छायाचित्र  © २०१९ महाराष्ट्राची शोधयात्रा        
                 

6 comments:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage