सुलतान आणि 'संगीत'


महाराष्ट्राचा मध्ययुगाचा इतिहास पाहिला तर तो आपल्याला रक्तरंजित दिसतो परंतु याच काळामध्ये भारतीय आणि मुसलमान 'संगीत पद्धती' यांचा मेळ होत होता असे दिसते. यासाठी आपल्याला थोडा पूर्व इतिहास पाहणे देखील फार महत्वाचे ठरते. इ.स. ७१२ साली जेव्हा मुहम्मद बिन कासीम याने सिंध प्रांतावर आक्रमण केले तेव्हा त्या युद्धात फार मोठी कत्तल घडवली गेली तसेच खूप मोठा विध्वंस देखील केला गेलेला होता. मुहम्मद कासीम याने नेमलेले अरब सैनिक तेथेच स्थायिक झाले आणि त्यांनी भारतीय स्त्रियांशी लग्ने केली आणि तिथे मुसलमानी वसाहती बनण्यास सुरुवात झाली. मन्सुरा, कुजदार, कदावेल, वैजा, मह्फुजा आणि मुलतान येथील वसाहती विद्येची आणि संस्कृतीची केंद्रे बनली.

याच काळामध्ये मुसलमानांच्या मध्ये खारिजी, जिंदिक, ख्वाजा, शरिया, मुजाहिद, करमातिया असे धार्मिक संप्रदाय निर्माण झाले. हे सगळे संप्रदाय आपल्या आपल्या मतांचे प्रचार सर्वत्र करू लागले. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कि अरबी मुसलमान यांच्यामध्ये आजिबात एकी राहिली नाही. आणि इ.स. ८७१ मध्ये सिंध प्रांत हा खालीफांच्या शासनातून मुक्त झाला आणि स्थानिक अरब वसाहती मधल्या सैनिकांच्या वंशजांंनी आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. 

सुलतान 'महमूद गजनवी'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

याच काळामध्ये या सर्व अरबांना  हिंदू गायक, हिंदू शिल्पकार, तत्वज्ञ आणि विद्वान यांनी खूप प्रभावित केले. ब्राम्हण पंडित आणि बौद्ध भिक्षूंंकडून त्यांनी तत्वज्ञान, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, रसायन अश्या विविध विद्या शिकून घेतल्या. बगदाद येथील राज्यकर्त्यांनी तर भारतातील विद्यांचे अध्ययन करण्यासाठी 'अरबी लोकांना' खूप मोठे प्रोत्साहन दिले. इ.स. ७५३ ते ७७४ काळात भारतीय विद्यांचे अध्ययन करण्यासाठी 'ब्रम्ह सिद्धांत' आणि 'खंड खाद्यक' असे महत्वाचे ग्रंथ भारतामधून अरबांनी बगदाद येथे नेले. 'बरमक' शाखेच्या मुसलमानांनी बऱ्याच अरबांना भारतामध्ये पाठवले आणि भारतीय विद्वानांना बगदाद मध्ये बोलावून तत्वज्ञान, ज्योतिष, गणित, आयुर्वेद, रसायन या विषयांच्यावरील ग्रंथांचे अरबी भाषेत अनुवाद करून घेतले.  अब्बासिया घराण्याचे वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर भारताचा आणि अरबांचा सांस्कृतिक संबंध संपलेला आपल्याला दिसतो परंतु याच काळामध्ये मुसलमानांंचे हल्ले भारतावर सुरु झालेले दिसतात. 

गजनीचा जो बादशहा होता 'सुबुक्तगीन' याने भारतावर इ.स. ९८६-९८७ साली आक्रमण केले आणि दुसरे आक्रमण हे इ.स. ९९७ साली केले. हे आक्रमण करून 'सुबुक्तगीन' याने भारताचा काही प्रदेश जिंकून घेतला.  इ.स. ९९७ मध्येच तो मेला. 'सुबुक्तगीन' याचा मुलगा 'महमूद गजनवी' याने भारतावर इ.स. १००० ते १०२६ यादरम्यान सतरा वेळा आक्रमणे केली आणि प्रचंड लुट घेऊन तो परत गेला. भारतावर राज्य करण्याच्या हेतून आक्रमण करणारा पहिला मुसलमान आक्रमक हा 'मुहंंमद घौरी' हा होता. 'मुहंंमद घौरी' याने 'पृथ्वीराज चौहान' याचा पराभव करून भारतामध्ये मुस्लीम राजसत्तेचा पाया घातला.

सुलतान 'मुहम्मद घौरी'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

'पृथ्वीराज चौहान' याचा पराभव होण्याच्या जवळपास ६ वर्षे आधी 'शेख मुईनुद्दिन चिश्ती' हा सुफी संत 'मुहंंमद घौरी' याच्या सैन्यासोबत येऊन अजमेर येथे स्थायिक झाला. 'शेख मुईनुद्दिन चिश्ती' हा इ.स. १२३६ साली मृत्यू पावला. त्याच्याच मृत्यूच्या जवळपास म्हणजेच इ.स. १२३५ मध्ये 'बहाउद्दीन जकरिया' हा प्रसिद्ध विद्वान आणि संगीतज्ञ असलेला सुफी हा ५३ वर्षांचा होता. याचाच अर्थ 'मुहंंमद घौरी' याच्या काळात 'बहाउद्दीन जकरिया' हा संगीतज्ञ हा तरुण होता आणि 'शम्सूद्दीन इल्तुमिष' याच्या काळात तो प्रौढ झाला होता. 'शेख मुईनुद्दिन चिश्ती' आणि त्यांच्या अनुयायांनी भारतीय भाषा आणि लोकरीती अंगीकारल्या.

'निजामुद्दीन चिश्ती' यांच्या काळात 'चिश्ती' परंपरेने वसंतोत्सव साजरा करायला सुरुवात केली आणि रंग देखील खेळू लागले. मुसलमानांच्या घरात हिंदू स्त्रियांचा प्रवेश झाल्यामुळे संमिश्र रक्ताच्या मुसलमान मुलांमध्ये बरेचसे हिंदू संस्कार आणि रिती रुजलेल्या होत्या. हिंदू गायिका आणि नर्तकी दासी बनवल्यामुळे भारतीय संगीत हे मुसलमानांंच्या घरामध्ये शिरले. मौलवी लोकं हे संगीताला त्याज मानत असत तर सुफी लोकं भक्तीपर संगीत फार महत्वाचे समजत असत. सुफिंच्या सुहरवर्दी परंपरेचा संस्थापक 'शेख बहाउद्दीन जकरिया' संगीताचा खूप मोठा पंडित होता. याच काळात हळूहळू संगीत हे मुस्लीम राजांच्या मनोरंजनाचे एक साधन झाले. 'कैकुबाद' याच्या दरबारात असे काही गायक होते कि जे फारसी गीतांच्या सोबत हिंदी गाणी देखील गात असत. 'अल्लाउद्दिन खिलजी' आणि 'तुघलक' या बादशहांच्या काळामध्ये बरेचसे कव्वाल हे फारसी गजलांंच्या प्रमाणे हिंदी गाणे गात असत.

सुलतान 'अल्लाउद्दिन खिलजी'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

खिलजीच्या काळामध्येच 'अमीर खुस्रो' याने भारतीय रागांचे वर्गीकरण हे अभारतीय दृष्टीकोनातून केलेले होते. जलालउद्दीन खिलजी, अल्लाउद्दिन खिलजी, मुहम्मद तुघलक या बादशाहांच्या दरबारात संगीतावर खूप चर्चा चालत असे. 'निजामुद्दीन चिश्ती' याच्या शिष्यपरंपरेतील लोकं हे सुफी प्रचारासाठी देशभर विखुरली. बहामनी साम्राज्याच्या स्थापनेसोबत या सुफी परंपरेचे पाय देखील दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात रुतले. याच 'चिश्ती' परंपरेच्या संपर्कामुळे पहिला महंमदशहा बहामनी आणि फिरोजशहा बहामनी सुलतान हे संगीताचे मोठे आश्रयदाते झाले. तसेच बहामनी साम्राज्याची शकले उडाल्यानंतर ज्या पाच शाह्या तयार झाल्या त्यापैकी 'महमंद कुली कुतुबशहा' आणि 'इब्राहीम आदिलशहा' हे फार मोठे संगीताचे पंडित होऊन गेले.

याच काळामध्ये काही मुसलमानांनी भारतीय संगीतशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न केला. 'इब्राहीम शार्कीने' कडा येथे मलिक सुलतान नावाचा सुभेदार नेमला होता त्याचा मुलगा बहादूर मलिक याने संगीत शास्त्रावरील ग्रंथ जमा केले आणि संपूर्ण देशातील पंडित बोलावून त्या सगळ्या पंडितांंकडून त्या जमवलेल्या संगीत ग्रंथाच्या आधाराने 'संगीत शिरोमणी' या नावाचा ग्रंथ बनवून घेतला. हा 'बहादूर मलिक' केवळ एक सरदार होता तो बादशहा नसल्यामुळे त्याने केलेल्या प्रयत्नांंचा विशेष उपयोग झाला नाही. मुहम्मद तुघलक याच्या काळामध्ये त्याने दिल्ली वरून आपली राजधानी 'देवगिरी' येथे हलविली होती. याच देवगिरीचे नाव त्याने 'दौलताबाद' असे केले. तुघलकासोबत बरेच लोकं हे दिल्लीवरून 'देवगिरी' येथे आले होते. त्यामध्ये 'बुऱ्हानुद्दिन गरीब' याच्यासारखे सुफी आणि बरेच कव्वाल होते. या सगळ्यांच्यामुळे दक्षिण भारतात गजल आणि कव्वाल्या वाजू लागल्या.

सुलतान 'मुहम्मद बिन तुघलक'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

या सर्व घडामोडी होत असताना विजयनगर साम्राज्य स्थापन होण्याच्या आधी विजयनगरमध्ये सुफी आणि कव्वाली गायक यांनी वसाहती स्थापन करायला सुरुवात केलेली. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे जो भाग मुसलमानी आक्रमक जिंकत असत त्या प्रदेशात ते ताबडतोप मशिदी, शाळा आणि सुफी मठ उभारत असत. हिंदू लोकं सहिष्णू असल्याने कोणीही त्याला सहजासहजी विरोध दर्शवत नसे. विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य हे एकमेकांचे शत्रू जरी असले तरी देखील दोन्ही राज्यांच्या प्रजेमध्ये व्यवस्थित दळणवळण चालू होते. याबाबत दोन्ही राज्यांचे काही प्रतिबंध नव्हते. महमंंदशहा बहामनी  पहिला याने इ.स. १३३६ साली विजयनगरच्या संस्थापक 'बुक्क' याचा पराभव केला आणि त्याच्याकडून आपल्या कव्वालांंना पारितोषिक देण्यासाठी धन वसूल केले. हे जवळपास ३०० कव्वाल होते आणि ते अमीर खुस्रो याच्या कव्वाल गात असत.

इ.स. १३९८ मध्ये विजयनगर येथील सम्राट 'दुसरा हरिहर' राज्यकर्ता असताना 'फिरोजशहा बहामनी' याचा 'काजी सिराज' हा आपल्या साथीदारांच्यासह नर्तकीच्या वेशात विजयनगरच्या शिबिरात शिरला आणि त्याने युवराजाचे मनोरंजन करून त्याचा खून केला. या घटनेकडे नीट पाहिले असता विजयनगरमध्ये मुसलमानांंचे गाणे आणि नाचणे हे लोकप्रिय झाले होते. 'फिरोजशहा बहामनी' याने इ.स. १४०६ मध्ये 'पहिल्या देवरायाचा' पराभव केला आणि त्याच्या कन्येशी विवाह केला. या प्रसंगानंतर बहामनी आणि विजयनगर साम्राज्य यांच्यामध्ये कलेची देवाण घेवाण झालेली दिसते. 'दुसरा अल्लाउद्दिन बहामनी' सुलतानाने विजयनगरचा राज्यकर्ता 'दुसरा देवराय' याचा पराभव केल्यानंतर 'दुसऱ्या देवरायाने' सुलतानाला भेट म्हणून संगीत नृत्यात निपुण असलेल्या दोनशे दासी पाठवल्या होत्या.

'आमीर खुस्रो' याचे चित्र. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

बहामनी साम्राज्याचा पहिला सुलतान 'अल्लाउद्दिन हसन बहादूरशहा' हा संगीतप्रेमी होता. तो 'शेख निजामुद्दीन' याचा शिष्य होता आणि 'अमीर खुस्रो' याचा मित्र होता. हाच याचा संगीतप्रेमाचा फार मोठा पुरावा ठरतो. याच्या पदरी 'शिराज-निवासी हकीम नसीरुद्दीन', समरकंद येथील सदरुश्शरीफ, मौलाना आसामी आणि रजिउद्दीन, आणि जगाजोत यांच्यासारखे मोठे संगीत पंडित हे याच्या दरबारात होते. बहामनी सुलतान 'पहिला महंमदशहा' याच्या दरबारात 'अमीर खुस्रोचे' गजल गाणारे ३०० गायक होते. हि स्थिती दक्षिणेतील संगीतावर मुस्लीम प्रभावाची सूचक आहे. यांच्या बिदागीसाठी विजयनगरकडून याने धन वसूल केले होते. याच काळामध्ये विजयनगरच्या संगीत पद्धतीमध्ये राग वर्गीकरण याच्यावर 'मुक्काम' पद्धतीचा परिणाम झाला. 'मुजाहिदशहा बहामनी' आणि 'दुसरा महंंमदशहा' हे देखील संगीताचे खूप मोठे चाहते होते.

'फिरोजशहा बहामनी' याचे संगीतावर खूप प्रेम होते. फिरोजशहा हा संगीताचा वेडा होता. याच 'फिरोजशहा बहामनी' याच्या काळात इ.स. १४०६ मध्ये 'पहिल्या देवरायाचा' पराभव त्याने केला आणि त्याच्या कन्येशी विवाह केला. या संबंधामुळे विजयनगर येथील संगीतावर खुस्रो परंपरेचा रंग अधिक गडद झालेला आपल्याला दिसतो. याच फिरोजशहाच्या काळामध्ये 'बंदानवाज गेसूदराज' हा दिल्लीवरून गुलबर्गा येथे आला आणि त्याच्या सोबत बरेच त्याचे अनुयायी आले.  सुलतान 'अहमदशहा बहामनी' हा 'बंदानवाज गेसूदराज' याचा परमभक्त होता. त्याला संगीताची प्रचंड आवड होती. 'दुसरा अल्लाउद्दिन बहामनी' जसा क्रूर होता तसा संगीताचाही वेडा होता. एवढाच याचा उल्लेख सापडतो. नंतरच्या बहामनी सुलतानांंना संगीताविषयी प्रेम जास्त दिसत नाही.

'बंदानवाज गेसूदराज'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

पुढे याच बहामनी साम्राज्याचे तुकडे होऊन विजापूर येथील आदिलशाही, गोवळकोंडा येथील कुतुबशाही, अहमदनगर येथील निजामशाही, बिदर येथील बरिदशाही, आणि वऱ्हाड येथील इमादशाही अश्या पाच शाह्या तयार झाल्या. या पाच शाह्यांंमध्ये विशेष करून 'मुहंंमद कुली कुतुबशहा' आणि 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' यांची नवे घ्यावी लागतील. ह्यांचे संगीतावर फार प्रेम होते.

'मुहंंमद कुली कुतुबशहा' याने हैद्राबाद हे शहर वसवून आपली राजधानी बनवले. या 'मुहंंमद कुली कुतुबशहा' याच्या १२ 'प्रियतमा' होत्या ज्यांच्यावर त्याने काव्य बनवली तसेच या त्याच्या पत्नी उत्तम गायिका आणि नर्तिका देखील होत्या. त्याच्या या १२ यांची नावे देखील तो देतो. छोटी, सावळी, कोवळी, प्यारी, गोरी, छबिली, लाला, लालन, मोहन, हैदरमल, महबूब, मुश्तरी अशी त्यांची नावे होती. याच्या व्यतिरिक्त ज्या प्रेमिका होत्या त्यांची देखील तो नावे देतो. बिलकीसजमानी, हातम, बहामनी हिंदू, हिंदी छोरी, पद्मिनी, सुंदर, सज्जन, रंगीली, नुरकी मुरत, कसबिन, नाजनीन, चंचलनयन, माहअबरु, काबारुख, सरो खूषकद, फितना दखन, तिलंगन,  दखनकी पुतली हि अशी नावे तो सांगतो. त्याच्या या प्रेमिकांच्यापैकी काही संगीतात निपुण होत्या तर काही नृत्य आणि शिल्पकलेमध्ये. 'हैदरमहल' हि त्यापैकी एक होती हि 'हैदरमहल' मुखारी, सुहाई, धनाश्री, गौरी, सारंग, मल्हार आणि रामकली हे जे राग गाऊन मन मोहून घेते असे वर्णन 'मुहंंमद कुली कुतुबशहा' करतो. 'मुहंंमद कुली कुतुबशहा' याने आपल्या प्रेमिकांवर काव्य देखील लिहिली आहेत. त्या काव्यांच्यामध्ये पिया, पिउ, सज्जन, साई, गुसाई हे शब्द येतात. मेनका, रंभा, उर्वशी, या अप्सरांची देखील तो नावे लिहितो, इंद्रधनुष्य, वसंत ऋतू, मोर, चकोर, पपीहा, कोकीळ, हंस, भ्रमर हे हिंदू संकेत देखील त्याच्या काव्यांच्यामध्ये आढळून येतात.  सगळे कुतुबशहा हे शिया पंथाचे असल्यामुळे ते 'मर्सिये' ऐकत असत. सर्व कुतुबशाही सुलतान हे संगीतप्रेमी होते.

'मुहंंमद कुली कुतुबशहा'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे. 

जसे सगळे कुतुबशाही सुलतान हे संगीत प्रेमी होते तसेच सगळे आदिलशाही सुलतान हे देखील संगीतप्रेमी होते. परंतु 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' हा संगीत क्षेत्रात अत्यंत प्रसिद्ध सुलतान आहे. याची कारकीर्द हि इ.स. १५८० ते १६२७. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' हा पैगंबरवासी 'बंदानवाज गेसूदराज' याचा भक्त होता. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' हा 'बंदानवाज गेसूदराज' याच्या समाधीवर कायम स्तुतीपर कविता लिहित असे. याच 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याने आपल्या गीतांच्या ग्रंथाचे मंगलआचरण हे 'सरस्वतीच्या स्तुतीने' केलेले आहे. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याने जो 'किताब-इ-नवरस' हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात त्याने 'राग-रागीण्यांचे' चित्रे काढली आहेत. तसेच चित्रांनी युक्त 'रागमाला' याचा प्रवर्तक 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' हाच आहे. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याच्या दरबारात सुमारे चार हजार संगीतज्ञ होते.

महान गायक 'तानसेन' याचा शिष्य 'बख्तरखान' हा 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याचा संगीत गुरु होता. याच 'बख्तरखानाशी' त्याने आपल्या पुतणीचा विवाह देखील करून दिला होता. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याने आपल्या वीणेला 'मोतिखाण' असे नाव दिले होते. या 'मोतीखाण' वीणेची विजापूरमधून हत्तीवरून मिरवणूक निघत असे. 'रागविबोधकार' सोमनाथ हा 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याच्या समकालीन होता. 'दुसरा इब्राहीम आदिलशहा' याने आपल्या 'किताब-इ-नवरस' या ग्रंथात भोपाली, रामकी, भैरव, हाजीज, मारू, आसावरी देसी, पुरबी, बरारी, तोडी, मलार, गौरी, कल्याण, धनश्री, कानरा, केदार, आणि नौरोज हे राग वापरले आहेत आणि त्या रागांना त्याने 'मकाम' म्हटले आहे.

'दुसरा इब्राहीम आदिलशहा'. छायाचित्र अंतरजालावरून घेतले आहे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) किताब नौ-रस:- इब्राहीम आदिलशहा दुसरा, संगीत नाटक अकादमी, दिल्ली.
२) खिलजी कालीन भारत:- अतहर अब्बास रिझवी, इतिहास विभाग, मुस्लीम युनिव्हर्सिटी, अलिगड, २००८. 
३) तुघलक कालीन भारत भाग १ आणि २ :- अतहर अब्बास रिझवी, इतिहास विभाग, मुस्लीम युनिव्हर्सिटी, अलिगड, २०१६. 
४) गुलशने इब्राहिमी:- फेरिश्ता, अनुवाद भ.ग.कुंटे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, १९८२.
५) बहामनी राज्याचा इतिहास:- अनुवाद भ.ग.कुंटे, मॅॅजेस्टिक प्रकाशन, १९६६.    
५) इब्न बतुता कि भारत यात्रा:- मदनगोपाल, १९८८.
६) विजापूरची आदिलशाही म्हणजे बुसातीन-उस-सलातीन:- अनुवाद नरसिंह विठ्ठल पारसनीस, संपादक वा.सी.बेंद्रे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाची ग्रंथमाला क्रमांक १७, १९६८.
७) सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुतुबशाही:- वा.सी.बेंद्रे, १९३४. 
                 
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

                    
                                                                                               

           

3 comments:

  1. एका दुर्लक्षित विषय...सुंदर रीतीने मांडलास 👍🏽

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage