शमीच्या वृक्षाखाली असलेला 'गुपचूप गणपती'


पुणे शहरात फिरण्यासाठी बरीच छोटी मोठी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे देखील आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतात तर शिवकालीन आणि पेशवेकालीन मंदिरे देखील आपल्याला बघायला मिळतात. असेच एक सुंदर मंदिर उत्तर पेशवाई मध्ये पुण्यातील शनिवार पेठेत आपल्याला पहायला मिळते. हे मंदिर म्हणजे‘वरदमूर्ती देवस्थान’ याच गणपतीला आजूबाजूला लोकं ‘गुपचूप गणपती’ म्हणून ओळखतात. 

आपण जेव्हा शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वरकडे जायला निघतो तिथेच उजव्या बाजूला आपल्याला एक पोलीस चौकी लागते त्या पोलीस चौकीला लागूनच काही जुने आणि प्रसिद्ध घाट आहे त्यापैकी एक ‘नेने घाट’ तर खूप प्रसिद्ध आहे याच नेने घाटाकडे जाणाऱ्या उजव्या उजवीकडील रस्त्यावर आपण वळालो कि आपल्याला समोर दिसते ते दगडी चौकटीचे प्रवेशद्वार असलेले ‘गुपचूप गणपती मंदिर म्हणजेच श्री वरद गणपती देवस्थान’.

गुपचूप गणपती देवस्थान पाटी.

शनिवार पेठेमध्ये असलेले हे मंदिर भर वस्तीच्यामध्ये आहे. या मंदिराच्या सुंदर दगडी चौकटीच्या दिंडी दरवाज्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेले असता आपल्याला आत दोन्ही बाजूस देवड्या पहायला मिळतात. येथून तीन दगडी पायऱ्या उतरून आत गेले कि एक छोटेसे सुंदर अंगण लागते येथून डाव्या बाजुला उत्तराभिमुख असलेले सुरेख गणपती मंदिर आपल्याला  पहायला मिळते. याच मंदिराच्या शेजारी एक घर देखील आहे. हे मंदिर पाहायचे असल्यास सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ यावेळेस जाऊन भेट देता येते. गेल्या तीन पिढ्या झाले या मंदिराची देखभाल ‘दीक्षित’ कुटुंबाकडे आहे. 

या देवस्थानातील वरदमूर्ती गणपतीची मूर्ती ही ‘श्री. मोरेश्वर रावजी दीक्षित’ यांनी स्वत: तयार क्कारून त्याची शनिवार पेठेत १२ फेब्रुवारी १८९२ रोजी स्थापना केली त्यावेळेस फॉरेस्ट इंजिनियर असलेल्या चिंचवडजवळील राहणाऱ्या श्री गुपचूप यांनी हे देऊळ बांधले आणि आपले गुरु असणाऱ्या दीक्षितांना त्यांनी हे मंदिर अर्पण केले म्हणून या गणपतीला ‘गुपचूप गणपती’ असे नाव मिळाले. 


मंदिराचा दिंडी दरवाजा.

अत्यंत सुंदर आणि संपूर्ण लाकडी असणारा सभामंडप बांधताना ‘श्री गुपचूप’ यांनी या मंदिराचे सगळे लाकूड हे ब्रिटिशांच्या काळात भोरच्या जंगलातून उत्तम लाकूड आणले आणि संपूर्ण लाकडी सभामंडप हा इ.स. १८९४ साली बांधला. या लाकडी सभामंडपामध्ये आपल्याला प्रसिद्ध चित्रकार श्री राजा रवीवर्मा यांनी काढलेल्या चित्रांच्या फ्रेम्स तिथे आपल्याला पहायला मिळतात. दोन मजली सभामंडप, उंच लाकडी छत, उंच लाकडी खांब तसेच गाभाऱ्याचे जाळीदार प्रवेशद्वार हे आजही तेवढेच सुंदर आहे आणि टिकून देखील आहे. संपूर्ण मंदिराची बांधणी ही लाकडाची आहे. तसेच सभामंडपात आपल्याला आता दुर्मिळ झालेल्या दिव्याच्या हंड्या, झुंबरे हे देखील पहायला मिळते. 


सभामंडपात आपल्याला आता दुर्मिळ झालेल्या दिव्याच्या हंड्या, झुंबरे पहायला मिळतात.

मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ‘श्री वरद गणपतीची’ चतुर्भुज मूर्ती आहे. मूळ ‘श्री गणपतीची’ मूर्ती ही सुमारे ९ इंच उंचीची जरी असली तरी आता त्या मूर्तीवर शेंदूर लेपन केल्यामुळे तिची उंची अजून वाढलेली आपल्याला दिसते. ‘श्री वरद गणपतीची’ मूर्ती ही चतुर्भुज असून अर्धपद्मासनस्थ असून गणपतीचा डावा हात अभयमुद्रेत असून खालच्या उजव्या हातामध्ये आपल्याला मोदक पहायला मिळतो. या मोदकावर गणपतीने सोंड टेकवलेली देखील आपल्याला पहायला मिळते. मूर्तीच्या वरच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला शस्त्रे पहायला मिळतात. मूर्तीला अंगभूत मुकुट नसल्याने गंडस्थळे पहायला मिळतात. तसेच मूर्तीच्या डावीकडे छोटासा उंदीर देखील आहे. मूळ मूर्तीच्या डावीकडे गणपतीच्या दोन संगमरवरी मूर्ती देखील ठेवलेल्या आपल्याला दिसतात. 


‘श्री वरद गणपतीची’ चतुर्भुज मूर्ती.

मंदिराच्या गाभाऱ्याला प्रदक्षिणा वाट असून कळस देखील सुस्थितीत आपल्याला पहायला मिळतो. या मंदिराचे अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणपतीला प्रिय असणारी बरेच जुने शमीचे झाड हे प्रदक्षिणा मार्गावर आहे. या शमीच्या झाडावर न चढता येथे खाली पडलेली पाने ही वापरली जातात. शमी या वृक्षाचे फार महत्व असल्याने या मंदिरातील हे झाड नक्कीच मंदिराचे वैशिष्ट्य ठरते. शमी गणेश अर्थात शमीवृक्षाखालील गणपतीजवळ उपासना केल्यास ति फलदायी असते. आजकाल दुर्मिळ झालेले शमीचे झाड या गणपतीच्या आवारात आपल्याला बघावयास मिळते.  

‘श्री वरद गणपती’ याच्यावर खूप लोकांची श्रद्धा आजही आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी आण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळक या गणपतीच्या दर्शनासाठी येत असत. ताई महाराजांचा जेव्हा खटला चालू होता तेव्हा या खटल्यात लोकमान्य टिळकांना या ‘श्री वरद गणपतीची’ प्रचीती आली होती असे सांगितले जाते. १९६१ साली आलेल्या पानशेत पुरामध्ये मंदिर कळसासकट पाण्याखाली असून देखील मंदिरास हानी पोहोचली नव्हती.
मंदिरात असलेले 'किर्तिमुख'.

‘श्री वरद गणपतीची’ महिन्यात रोज पंचामृत पुजा, माघ महिन्यात गणेश जन्म आणि भाद्रपद महिन्यातील उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. भाद्रपद आणि माघ उत्सवाच्या काळामध्ये ‘श्री वरद गणपतीस’ शेंदूर लावला जातो. असे हे सुंदर लाकडी सभामंडप आणि दगडी दिंडी तसेच शमी वृक्ष असलेले सुंदर मंदिर खर्च आपल्याला प्रेमात पाडते. पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले हे सुरेख मंदिर कायम भेट द्यावेसे वाटते ते त्याच्या निरव शांततेमुळेच. ‘श्री वरद गणपतीचे’ हे उत्तर पेशवाई मधील मंदिर त्याच्या बांधकामाच्या शैलीमुळे नक्कीच पुण्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर ठरते.



_________________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे शहरातील मंदिरे:- डॉ. शां. ग. महाजन.   
२) असे होते पुणे:- म.श्री.दीक्षित.

कसे जाल:-
शिवाजीनगर – बालगंधर्व रंगमंदिर  – ओंकारेश्वर पूल  –  गुपचूप गणपती  –  सासवड.

_________________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात. 

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि  छायाचित्र  © २०१९ महाराष्ट्राची शोधयात्रा     

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage