नसरापूर येथील उपेक्षित वारसास्थळ 'स्वराज्य स्मारक स्तंभ'


आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावांमध्ये विविध वारसा लपलेला आहे. अशी हि महत्वाची वारसा  स्थळे येता-जाता वाटेवर असूनही ती सहजपणे दुर्लक्षित होतात असेच एक वारसा स्थळ हे 'पुणे - सातारा' रस्त्यावर 'राजगडकडे' जाणाऱ्या 'नसरापूर' बसस्थानकाच्या शेजारी असून हे वारसा स्थळ चारही बाजूने कुंपण असलेल्या एका जागेमध्ये आहे. या चारही बाजूने कुंपण असलेल्या जागेमध्ये एक 'स्मारक स्तंभ' आपल्याला पाहायला मिळतो तोच हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' होय.

बऱ्याचवेळेस अनेक लोक या 'चेलाडी किंवा नसरापूर' फाट्यावरून राजगडाकडे जातात परंतु हा स्तंभ कायम खुणावतो परंतु कोणी या स्मारक स्तंभाकडे फिरकत देखील नाही. तसेच हा स्मारक स्तंभ का उभारला कशासाठी उभारला याबाबत मात्र लोकांना माहिती नसल्यामुळे हे ठिकाण अजून दुर्लक्षित होते. आज आपण या 'स्वराज्य स्मारक स्तंभाबद्दल' माहिती पाहणार आहोत.

'श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव' यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा दगडी स्तंभ उभारला.

हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' भोर संस्थानचे अधिपती 'श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव' यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा दगडी स्तंभ उभारला. हा स्तंभ आपल्याला एका दगडी चौथऱ्यावर उभा केलेला पाहायला मिळतो. जवळपास ९ मिटर उंचीचा हा चौरस चौथरा त्याच्या मध्यभागात अष्टकोनी आणि वर गोल श्रीफळ असलेला शिखराचा दगडी स्तंभ आपल्याला पहावयास मिळतो. या दगडी 'स्वराज्य स्मारक स्तंभावर' आपल्याला या स्तंभावर वेगवेगळे प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात. यामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि इतर माहिती कोरलेली आपल्याला पाहायला मिळते.

या 'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या' खालच्या बाजूस नीट पाहिले असता याच्या खालील बाजूस त्याकाळात भोर संस्थानात समाविष्ट असणाऱ्या किल्ल्यांच्या त्या जागेपासून कोणत्या दिशेला किल्ले आहेत आणि किती मैल लांब आहेत हि अंतरे कोरलेली आपल्याला पाहायला मिळतात. या मध्ये अग्नेय दिशेस पुरंदर किल्ला ६ मैल म्हणजेच ९ किलोमीटर, नैऋत्य दिशेस अंबाड खिंड १६ मैल, भोर ९ मैल, पश्चिम दिशेस रोहीडा किल्ला १२ मैल म्हणजेच, आंबवडे १४.५ मैल म्हणजेच, रायरेश्वर १८ मैल, राजगड १३.५ मैल, वायव्य दिशेस  तोरणा २६ मैल म्हणजेच, उत्तर दिशेस सुधागड ४१ मैल, सिंहगड ११.५ मैल, तुंग किल्ला ३९ मैल आणि तिकोना किल्ला ३५ मैल अशी अंतरे दगडावर नोंदवून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. हि अंतरे मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषांमध्ये संगमरवरी पट्ट्यांंमध्ये कोरून या संगमरवरी  पट्ट्या आपल्याल्या दगडांमध्ये बसवलेल्या पाहायला मिळतात.

 'स्वराज्य स्मारक स्तंभ' याच्यावर आपल्याला भवानी देवीच्या पूजेचा प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा, धनुष्य बाण आणि भाता, धनुष्य बाण आणि भाता हे सगळे आढळून येते.

या 'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या दर्शनी बाजूला आपण निट पाहिले तर आपल्याला वरच्या बाजूस भवानी देवीच्या पूजेचा प्रसंग पाहायला मिळतो तसेच त्याच्या खाली मराठी भाषेमध्ये एक लेख देखील कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. 'स्वराज्य स्मारक स्तंभ' याच्या मागील बाजूला हाच मराठी लिहिलेला शिलालेख संस्कृत मध्ये पाहायला मिळतो तसेच त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा देखील पाहायला मिळते. 'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या' डावीकडे हा मजकूर इंग्रजी मध्ये आपल्याला कोरलेला पाहायला मिळतो तसेच तेथे धनुष्य बाण आणि भाता असे चित्र कोरलेले देखील पाहायला मिळते. 'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या उजव्या बाजूस दर्शनी भागावरील मराठी शिलालेख हिंदी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो याच्या वरच्या बाजूस आपल्याला ढाल आणि तलवार कोरलेली पाहायला मिळते.

'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या' दर्शनी बाजूला असलेला मराठी शिलालेख पुढीलप्रमाणे:-

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी 
महाराष्ट्रातील या प्रदेशात 
स्वराज्याचा पाया घातला. त्या 
घटनेच्या त्रिशत सांवत्सरिक
उत्सवाच्या प्रसंगी हा स्मारकस्तंभ 
भोरचे अधिपती श्रीमंत राजे 
सर रघुनाथराव पंडीत 
पंतसचिव के. सी. आय. ई.
यांनी उभारला 
शके १८६७ (म्हणजे इ.स. १९४५)


 'स्वराज्य स्मारक स्तंभ' याच्यावरील मराठी शिलालेख.  


या 'स्वराज्य स्मारक स्तंभाच्या' बाबत एक कथा सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे:-

जेव्हा 'तोरणा किल्ला' छत्रपती शिवाजी महाराज यांना ताब्यात घ्यायचा होता तेव्हा तोरणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी जे डावपेच आखले गेले ते याठिकाणी अशी हि कथा आजूबाजूला प्रसिद्ध आहे. त्या स्मरणार्थ हा स्तंभ इथे उभारला. परंतु या कथेला काही पुरावे मिळत नाहीत.

असे हे पुणे - सातारा महामार्गावर असलेला 'स्वराज्य स्मारक स्तंभ' नक्कीच पाहण्यासारखा आहे.  राजगड किंवा तोरणा किल्ला किंवा भोर परिसराला भेट देऊन परतत असाल तर या उपेक्षित 'स्वराज्य स्मारक स्तंभाला' नक्की भेट द्या परतिच्या वाटेवर एखादे छानसे वारसास्थळ बघितल्याचे समाधान नक्की मिळेल.

 नसरापूर येथील उपेक्षित वारसास्थळ 'स्वराज्य स्मारक स्तंभ' 
______________________________________________________________________________________________

संदर्भ पुस्तक:-
१) सहली एक दिवसाच्या पुण्याच्या परिसरातल्या:- प्रा. प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन.  
कसे जाल:-
पुणे – खेड शिवापूर – चेलाडी.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   
         

                   

    


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage