मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला 'अहिवंतगड'


प्राचीन कालखंडापासून महाराष्ट्रामधील ‘नाशिक’ शहराला खूप महत्व आहे ‘नाशिक’ आणि संपूर्ण परिसर हा प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. याच उक्तीप्रमाणे ‘नाशिक’ परिसरात विविध कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून विविध किल्ले उभारले. याच ‘नाशिक’ जिल्ह्यातील ‘सातमाळा डोंगररांगेत’ विस्तीर्ण पठार आणि ऐतिहासिक महत्व असलेला ‘अहिवंतगड’ आजही उभा आहे.

नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगर रांगेतील ‘अहिवंतगड’ बघायचा असेल तर आपल्याला नाशिक वरून ‘सप्तशृंग गडावर’ जाणारी किंवा ‘नांदुरी’ या गावाची बस पकडणे कधीही सोयीचे ठरते या बसने आपल्याला नांदुरीच्या अलीकडील ‘दरेगाव’ या गावाच्या अगदी बाहेर उतरता येते. हे ‘दरेगाव’ म्हणजेच ‘अहिवंत’ गडाच्या पायथ्याचे गाव असून वणी – नांदुरी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून अगदी १ किलोमीटर परिसरात ‘अहिवंतगडाच्या’ कुशीत वसलेले एक छोटेसे सुंदर टुमदार गाव आहे.

दरेगाव येथून दिसणारा 'अहिवंतगड'. 

ज्या दुर्गभटक्यांना ‘अचला किल्ला’ पाहून डोंगरयात्रा करत ‘अहिवंतगडावर’ यायचे असेल त्यांनी ‘बिलवाडी’ मार्गे जी नळीची वाट लागते तेथून यावे किंवा वणी - नांदुरी रस्त्यावर ‘अहिवंतवाडी’ येथून देखील येऊ शकतात. तसेच ‘अहिवंतवाडी’ येथील वाट ही अगदी खड्या चढणीची आहे जी चढून जाण्यात नवख्या दुर्गभटक्यांचा कस नक्कीच लागतो म्हणून ‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट नक्कीच सोयीची ठरते.

दरेगाव गावामधील हनुमान मंदिर अत्यंत सुंदर असून येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. ‘अचला किल्ला’ करून आल्यावर जर ‘अहिवंत गड तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा असेल तर हे हनुमान मंदिर मुक्कामासाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. याच हनुमान मंदिराशेजारून वाट ‘अहिवंतगडावर’ जाते. ‘दरेगाव’ मधून साधारणपणे १.३० ते २ तास आपल्याला ‘अहिवंतगड’ गाठण्यास लागतात. ‘अहिवंतगडाच्या’ अगदी शेजारी खेटून असलेला एक डोंगर आपले लक्ष वेधून घेत असतो त्या डोंगराला ‘बुध्या’ असे ओळखले जाते. ‘दरेगाव’ मधून आपण ज्यावेळेस अहिवंत गडाकडे जाण्यास निघतो तेव्हा हा ‘बुध्या’ आणि प्रचंड मोठा विस्तार असलेला ‘अहिवंतगड’ आपले लक्ष वेधून घेत असतो.


‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट आणि उजवीकडे कोपऱ्यात दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.

‘दरेगाव’ येथून मळलेली पाऊलवाट असल्याने ही पाऊलवाट आपल्याला सरळ घेऊन जाते ते ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्यामध्ये असलेल्या घळीमध्ये. येथे एक छोटा आणि सोपा कातळटप्पा चढून गेल्यावर आपण ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्या खिंडीच्या मध्यभागात पोहोचतो या खिंडीच्या मध्यभागी उभे राहिले तर आपल्या डाव्या बाजूला गडाचे काही महत्वपूर्ण अवशेष बाळगलेला ‘बुध्या’ तर उजव्या बाजूस ऐतिहासिक ‘अहिवंतगड’ असे दृश्य आपल्याला पहायला मिळते. ‘अहिवंतवाडी’ येथून येणारी खडी चढण असलेली पाऊलवाट याच ठिकाणी खिंडीत एकत्र येऊन मिळते. याच खिंडीमधून डावीकडे जाणारी पाऊलवाट ही ‘बुध्या’ येथे जाते तर उजवीकडची पाऊलवाट ही ‘अहिवंतगड’ येथे जाते.

पहिले डावीकडे जाऊन ‘बुध्यावर’ असलेले अवशेष पहाणे जास्त सोयीस्कर ठरते. यासाठी बुध्यावर जाणारी पाऊलवाट पकडून थोडे वर गेले असता कातळात खोदलेल्या जवळपास नव्वद अंशातल्या ५ ते ६ पायऱ्या मात्र आश्चर्यचकित करतात. या पायऱ्यांनी वर चढून गेले असता एक छोटी पाऊलवाट पकडून वर चढून गेले असता आपण सरळ उभे राहतो ते एका मोठ्या बुरुजासमोर. ‘बुध्यावर’ असलेला हा बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या बुरुजावर उभे राहिले असता समोर अहिवंतगडाचा पसारा आपल्याला पहायला मिळतो तसेच या बुरुजावरून परत पाऊलवाटेवर येऊन थोडेसे उजवीकडे गेले असता आपल्याला ‘बुध्यावर’ असलेले एकमेव पाण्याचे टाके पहायला मिळते. या पाण्याच्या टाक्याच्या पलीकडे समोर सप्तशृंग गडाचा सुळका मात्र लक्ष वेधून घेतो तसेच बाजूला थोडेसे दुरवर असलेले ओझरखेड धरण देखील आपले लक्ष वेधून घेते. वातावरण जर स्वच्छ असेल तर ‘रामसेज किल्ला’ आणि ‘चामरलेणी’ पर्यंतचा प्रदेश येथून आपल्याला दिसतो.


अहिवंतगडाच्या वाटेवरून दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.

दुर्ग अवशेष बिलगून असलेल्या ‘बुध्यावरून’ उतरून आपण परत खिंडीत यायचे आणि उजवीकडून ऐतिहासिक ‘अहिवंतगडाच्या पाऊलवाटेवरून काही पावट्या (खोबणी मधल्या पायऱ्या) चढून ‘अहिवंतगडाचा’ माथा गाठायचा. ‘अहिवंतगड’ याचा विस्तार फार मोठा असल्याने त्याच्या चारही बाजू दुरवर पसरलेल्या आपल्या पहायला मिळतात. तसेच गडाचे पठार अत्यंत मोठे असून संपूर्ण पठारावर आपल्याला बरेच अवशेष विखुरलेले पहायला मिळतात. गडाच्या पूर्व बाजूची वाट आपण पकडून चालत राहिलो की साधारणपणे २० मिनिटात आपण राजवाड्याच्या चौथऱ्याजवळ येऊन पोहोचतो आजही या वाड्याचे अवशेष आजूबाजूला विखुरलेले आपल्याला दिसतात. हा वाडा पाहून आपण थोडे पुढे गेले असता एक छोटा झरा आपल्याला पहायला मिळतो या झऱ्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

या झऱ्याच्या शेजारून पुढे गेलो असता आपल्याला गडदेवता ‘हनुमान’ आणि ‘सप्तशृंग देवी’ यांची मूर्ती उंचवट्यावर पहायला मिळते. ही ‘सप्तशृंग देवी’ थोडीशी भग्न पावलेली आहे परंतु आजही दरेगाव, अहिवंतवाडी तसेच बेलवडी येथील कोणताही ग्रामस्थ गडावर आले असता या देवतांची पुजा करतात. या दोन्ही मूर्ती आपल्याला उघड्यावर पहायला मिळतात. मध्ययुगामधल्या या शक्तीदेवता आजही उन, पाऊस, वारा खात आजही गडावर उभे आहेत. या मूर्तींचे रक्षण होणे नक्कीच गरजेचे आहे. येथे जवळच एक तळे आपल्याला पहायला मिळते आज ह्या तळयामधले पाणी शेवाळलेले आहे जर हे तळे स्वच्छ केले तर नक्कीच गावातल्या लोकांना याचा वापर करता येईल. येथून पुढे गेले असता आपल्याला अहिवंत गडाच्या मधोमध एक टेकडी लागते याच्यावर देखील काही अवशेष विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच टेकडीच्या डावीकडच्या डोंगर कड्याच्या बाजूने आपण पुढे जायचे आणि दरीच्या काठाने थोडेसे खाली उतरले असता आपण सरळ पोहोचतो ते ‘अहिवंतगडाच्या’ दक्षिणेकडील कड्यामध्ये असलेल्या गुहेत.


दरेगाव येथील वाटेवरून दिसणारा अहिवंतगडाचा 'बुध्या'. 

ही कातळकोरीव गुहा प्रशस्त असून साधारणपणे २० ते २५ लोकं यामध्ये नक्की राहू शकतील तसेच या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके देखील पहायला मिळते परंतु ते कोरडे आहे. ही गुहा किल्ल्याच्या कड्यावर असल्याने सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ही गुहा पाहून झाल्यावर सुरक्षितपणे कडा चढून परत पठारावर यायचे आजूबाजूचे छोटे मोठे पसरलेले अवशेष आणि समोर दिसणारा ‘अचला किल्ला’ नक्कीच आपले लक्ष वेधून घेत असतात. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही या ‘अहिवंतगडाच्या’ या पठारावर असाल तर ‘पश्चिम रंगाने’ न्हाऊन निघालेला ‘अचला किल्ला’ फारच देखणा दिसतो तर दुरवर इंग्रजांच्या काळात उभारलेले ‘चणकापूर’ धरण सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेले असते.

येथून पुढे चालत आले असता आपल्याला एक दगडी कुंड ‘अहिवंतगडावर’ पहायला मिळते. ह्या कुंडातील पाणी देखील पिण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तसेच हे कुंड वर्षाचे १२ महिने थंडगार पाण्याने भरलेले असते. याच कुंडावर एका दगडी चौथऱ्यावर एक शिल्प आपल्याला पहायला मिळते त्यामध्ये घोड्यावर बसलेला एक वीर आणि त्याच्या पाठीमागे एक स्त्री हात जोडून बसलेली आहे असे हे शिल्प आहे. स्थानिक लोकं या शिल्पाला ‘खंडोबा’ असे म्हणतात आणि त्यांची पुजा देखील केली जाते. याच कुंडाच्या जवळून एक वाट खाली ‘बेलवडी’ गावात जाते. या गडाच्या टेकडीवरून फिरून जात असताना आपल्याला एक मोठा तलाव पहायला मिळतो आणि याच तलावाच्या अलीकडे दगडी चौथरा देखील आपल्याला पहायला मिळतो.


अहिवंतगडाच्या बुध्यावर असलेले अवशेष यामध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या, वर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि बुरुज हे अवशेष पाहायला मिळतात.  

येथून जवळच असलेली अहिवंतगडाची माची पाहण्यासारखी आहे. या माचीवर दोन मोठे तलाव खोदलेले आपल्याला पहायला मिळतात यातील पाणी अत्यंत गढूळ आहे. यामध्ये बऱ्याचदा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सोडलेल्या गाई, म्हशी आणि शेळ्यांचा वावर येथे असतो. येथून जवळच ईशान्य दिशेकडे आपल्याला जाताना भग्न दरवाजा पहायला मिळतो तसेच तेथून काही पायऱ्या उतरलेल्या आपल्याला दिसतात. या पायऱ्यांवरून खाली उतरत गेले असता दुसरा भग्न दरवाजा देखील पहायला मिळतो. याच बाजूने थोडे पुढे गेले असता आपल्याला २ पाण्याची टाकी पहायला मिळतात ही टाकी पाहून आपण डाव्या बाजूने जात असताना आपल्याला काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात या उतरून गेल्यावर आपण कड्याच्या बाजूने कातळात खोदलेल्या गुहांच्याजवळ आपण जाऊन पोहोचतो. 

या कातळात खोदलेल्या दोन खोल्या मुक्कामायोग्य आजिबात नाहीत यामध्ये गडावर राहणाऱ्या जनावरांनी अत्यंत घाण केलेली आहे. या गुहा पाहून आपली गडफेरी संपते परंतु हीच पाऊलवाट पकडून चालत जात असता आपण एका ‘बारी’ मध्ये पोहोचतो. ‘बारी’ म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी खिंड. या ‘बारी’ मधून डावीकडे वळाले असता आता मोठा रस्ता झालेला असून हा रस्ता आपल्याला सरळ मागच्या बाजूने ‘दरेगाव’ या अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात घेऊन जातो. असा हा विस्तीर्ण पठार असलेला ‘अहिवंतगड’ नक्कीच त्याच्या अवशेषांनी मनाला भुरळ पडतो. 


'अहिवंत गडाच्या' बुध्यावरून दिसणारा 'सप्तशृंगी गड' 

अहिवंतगडाचा इतिहास:-   

‘अहिवंतगड’ नक्की कोणी बांधला हे निश्चितपणे पुराव्यानिशी सांगता येत नाही. इ.स. १५५३ साली ‘बुरहान निजामशहा’ याच्या ताब्यात नाशिक जिल्ह्यातील २६ किल्ले होते त्यामध्ये ‘अहिवंतगडाचा’ देखील समावेश होता. याचा उल्लेख हा ‘सय्यद अली तबातबा’ याने लिहिलेल्या ‘बुरहान – ई – मासिर’ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. यामध्ये तो ‘अहिवंतगडाचा’ उल्लेख ‘अलहवंन्त’ असा करतो. ‘अहिवंतगड’ अहमदनगरच्या निजामशाह याच्याकडे असताना त्यावेळेस ‘शहाजी महाराज’ हे निजामशाहीचे रक्षण करत होते.

याच कालावधी मध्ये दिल्लीचा बादशाह ‘शहाजहान’ याने ‘शहाजी महाराजांच्या’ पाडावासाठी इ.स. १६३६ मध्ये आपले सरदार खान दौरान, खान अमन आणि शाहिस्तेखान यांना ‘शहाजहान’ याने पाठविले. नाशिक आणि परिसरातील किल्ले मुघलांच्या ताब्यात आणण्याची कामगिरी ‘शहाजहान’ याने ‘शाहिस्तेखान’ याच्यावर सोपवली होती. शाहिस्तेखान याच्या हाताखालील ‘अलीवर्दी खान’ याने इ.स. १६३६ साली ‘अहिवंतगडाचा’ पाडाव केला. इ.स. १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध मोहीम उघडली.  


बुध्यावरून दिसणाऱ्या अहिवंत गडाच्या पायऱ्या आणि 'अहिवंतगड'.
  
या महत्वाच्या मोहिमेमध्ये मराठ्यांचे सेनापती ‘प्रतापराव गुजर’ यांनी नोव्हेंबर १६७० मध्ये ‘अहिवंतगड’ हा मोगलांकडून जिंकून घेतला या लढाईत स्वतः शिवाजी महाराज होते असे उल्लेख आपल्याला मिळतात. ‘अहिवंतगड’ मुघलांच्या जवळील फार महत्वाचा किल्ला होता. गंगथडी आणि आणि खानदेश या दोन्हीकडे जाणारे रस्ते हे अहिवंतगडाजवळून जातात म्हणून या गडाचे महत्व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या काळात खूप जास्त होते. जेव्हा ‘अहिवंतगड’ शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला तेव्हा चांदोर (चांदवड) येथील मुघल सरदार ‘दाऊदखान’ हा खुपच अस्वस्थ झाला औरंगजेबाची आपल्यावर गैरमर्जी होणार हे त्याने ओळखले. कारण या काळात ‘अहिवंतगड’ हा ‘खानदेश आणि गंगथडी’ या दोन्ही भागाचा टेहळणी नाका होता. हवी ती किंमत देऊन ‘अहिवंतगड’ जिंकायचा असे ‘दाऊदखानाने’ ठरविले. ‘अहिवंतगड’ मराठ्यांनी त्याच्याकडून जिंकून घेतला हे त्याचे शल्य ‘दाऊदखान’ याच्या मनात सलत होते.

याचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांनी ‘दाऊदखानाला’ हातोहात बनविले होते ‘मराठे हे बुऱ्हाणपूर येथील पेठ लुटणार आहेत’, अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी सगळीकडे पसरवलेली होती. या बातमीचा परिणाम असा झाला की ‘दाऊदखान’ हा भली मोठी मुघलांची फौज घेऊन बुऱ्हाणपूरकडे निघाला परंतु तो अजिंठ्याच्या लेण्यांच्या जवळ पोहोचला असता त्याला त्याच्या गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की ‘मराठे’ हे ‘अहिवंतगडाच्या’ रोखाने गेलेले आहेत. हे समजल्यावर ‘दाऊदखान’ याने मोठ्या गतीने ‘अहिवंतगडाच्या’ दिशेने वाटचाल सुरु केली. परंतु अर्ध्या रस्त्यात ‘दाऊदखान’ पोहोचल्यानंतर त्याला समजले की मराठ्यांनी ‘अहिवंतगड’ जिंकून घेतला आहे. प्रत्यक्षात लढा न होता ‘अहिवंतगड’ हा मराठ्यांकडे गेला आणि एवढेच नाही तर मुघलांचा सरदार ‘दाऊदखान’ हा प्रसंगी बेसावध होता ही गोष्ट ‘औरंगजेब’ याला पटण्यासारखी आजिबात नव्हती.


अहिवंतगडावरील घरांची जोती आणि अवशेष.  

‘औरंगजेब’ आपल्याला आता बडतर्फ करेल ही भीती ‘दाऊदखान’ याला वाटायला लागली याचदरम्यान ‘औरंगजेब’ हा त्याच्या ‘महाबतखान’ नावाच्या सरदारास दक्षिणेकडे पाठवत असल्याची खबर ‘दाऊदखान’ याला मिळाली या गोष्टीमुळे ‘दाऊदखान’ अधिक बेचैन झाला. या त्याच्या अस्वस्थपणाचा फायदा घेऊन मराठ्यांनी इ.स. १६७१ साली ‘साल्हेर’ हा महत्वपूर्ण किल्ला देखील जिंकून घेतला. ‘साल्हेर किल्ला’ देखील मराठ्यांनी जिंकल्यामुळे ‘दाऊदखान’ याची अवस्था अत्यंत बिकट झाली.

मुळात ‘महाबतखान’ दक्षिणेत येऊन संपूर्ण लढ्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेणार ही कल्पनाच ‘दाऊदखान’ याला सहन होत नव्हती. आपल्याला दिल्लीला परत बोलावून घ्यावे अशी विनंती ‘दाऊदखान’ औरंगजेबास केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘महाबतखान’ इ.स. १६७१ च्या सुरुवातीस महाराष्ट्रात दाखल झाला. ‘दाऊदखान’ आणि ‘महाबतखान’ यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘चांदूर’ येथे भेट झाली. या भेटीमध्ये ‘दाऊदखान’ याने ‘महाबतखान’ याला योग्य वागणूक दिली नाही म्हणून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. हे सर्व वर्णन ‘तारीखे दिल्कुशा’ या ‘भीमसेन सक्सेना’ याच्या ग्रंथात मिळते. ‘भीमसेन सक्सेना’ हा स्वत: ‘दाऊदखान’ याच्याकडे नोकरीस होता.


गडावरील पाण्याचा तलाव आणि मागे 'सप्तशृंग गड'. 

‘चांदूर’ येथील भेटीमध्ये ‘दाऊदखान’ आणि ‘महाबतखान’ यांनी कोणती मराठ्यांच्या विरुद्ध कोणती पावले उचलावीत याचा आराखडा तयार केला आणि ‘अहिवंतगडाला’ वेढा दिला. जवळपास एक महिना हा वेढा रेंगाळत चालला होता. दाऊदखान आणि महाबतखान वेगवेगळ्या दिशांना मोर्चे बांधून हल्ले करत होते परंतु याला काही यश मिळत नव्हते. तेव्हा ‘अहिवंतगडावर’ अगदी अल्पशिबंदी होती पण ही शिबंदी या मोगलांच्या प्रचंड सेनेला आजिबात दाद लागू देत नव्हती. या वेढ्यामध्ये महाबतखान याच्यासोबत कुंवर किशनसिंग हा मुघलांचे मातब्बर सरदार मिर्झा राजा जयसिंग यांचा मुलगा, सुजाणसिंग, शुभकर्ण बुंदेला, राव कर्ण याचा मुलगा अनुपसिंग राठोड, आघारखान, तुर्क ताजखान यांच्यासारखे मातब्बर सरदार होते. या संपूर्ण लढ्याच्या वेळेस ‘तारीखे दिल्कुशा’ याचा लेखक ‘भीमसेन सक्सेना’ स्वतः हजर होता.

‘भीमसेन सक्सेना’ याने या ‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याची तपशीलवार माहिती नोंदवली आहे. महिना होत आला तरी देखील मुघलांना ‘अहिवंतगड’ जिंकून घेण्यात अपयश येत् असल्याचे पाहून ‘दाऊदखान’ खूप कष्टी झाला. ‘दाऊदखान’ याला काय करावे सुचेनासे झाले. त्याच दरम्यान ‘दाऊदखान’ आपल्या शामियान्यामध्ये ‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याबाबत चिंतेने विचार करत बसला असताना त्याच्या एका खिजमतगाराने त्याला सांगितले “आपल्या पदरी जो ज्योतिषी आहे तो आपल्या या ‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याबाबत चिंतेचे नक्कीच निवारण करू शकेल तुम्ही जर आज्ञा केली तर मी त्याला आपल्यासमोर घेऊन येतो”, खिजमतगाराच्या या शब्दांवर ‘दाऊदखान’ विचार करू लागला. अहिवंतगड जिंकण्यासाठी ‘महाबतखान’ स्वत: पराक्रमाची पराकाष्ठा करत आहे तसेच मुघल सैन्य प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून वेढा लढवत आहे तरीदेखील ‘अहिवंतगड’ आपण का जिंकू शकत नाही असे त्याला अनेक प्रश्न पडले.


अहिवंतगडावरील गडदेवता 'हनुमान आणि सप्तशृंग देवी'. 

हे सगळे विचार करत असताना ‘दाऊदखानाने’ आपल्या खिजमतगाराला आज्ञा केली की आपल्या पदरी असलेल्या ‘ज्योतिषाला’ आपल्या शामियान्यामध्ये घेऊन ये. त्यावेळेस ‘तेथे भीमसेन सक्सेना’ हजर होता. ‘भीमसेन सक्सेना’ याने त्या ज्योतिषाला विचारले “किल्ला कधी फत्ते होणार? ते सांग” या गोष्टीवर विचार करत ज्योतिषाने साखर मागवली आणि त्याने मागवलेल्या साखरेपासून ‘अहिवंतगडाची’ छोटी प्रतिकृती बनवली. साखरेची तटबंदी, साखरेचा बुरुज, साखरेचे प्रवेशद्वार असे सगळे त्याने बनवून त्याचे स्वरूप तयार केले. गडावर मराठ्यांचे सैन्य ज्याठिकाणी आहे त्या जागा देखील त्याने त्या साखरेच्या किल्ल्यांमध्ये दर्शविल्या. मुघलांच्या मोर्चाच्या जागा देखील दर्शवल्या. त्याचवेळेस महाबतखान याचा मोर्चा ज्या ठिकाणी ‘अहिवंतगडाच्या’ जवळ जाऊन पोहोचला होता तो देखील ज्योतिषाने या साखरेच्या बनवलेल्या किल्ल्यांमध्ये दर्शवला.

अश्या प्रकारे अहिवंत गडाची प्रतिकृती बनवून झाल्यावर त्या ज्योतिषाने आपल्या जवळ असलेल्या एका पिशवीमधून एक डबी बाहेर काढली आणि त्यातून एक ‘मुंगळा’ बाहेर काढला आणि तो ‘अहिवंतगडाच्या’ साखरेच्या सहाय्याने बनवलेल्या प्रतिकृती मध्ये सोडला. हा सोडलेला ‘मुंगळा’ साखरेच्या वासाने चक्रावून गेला आणि तो अहिवंतगडाच्या प्रतिकृतीमध्ये दाखवलेल्या   महाबतखानाच्या मोर्चाच्या ठिकाणी गेला, नंतर तो त्या ‘अहिवंतगडाच्या’ साखरेच्या प्रतिकृतीच्या तटांरून फिरला नंतर तो ‘दाऊदखान’ याच्या मोर्च्यापाशी आला तेथून हा ‘मुंगळा’ प्रतिकृतीच्या बुरुजावरील ढिगाऱ्यावरून चढून गेला आणि नंतर तेथून बाहेर आला. असे जवळपास २ ते ३ वेळेस झाल्यावर ज्योतिषाने त्या ‘मुंगळ्याला’ आपल्या चिमटीत पकडले आणि परत आपल्या जवळ असलेल्या पिशवीमधल्या डबीमध्ये सोडले.


अहिवंत गडावरील गुहा आणि त्यामधील पाण्याचे टाके.

नंतर ज्योतिषाने एका कागदावर आकडेमोड करायला सुरुवात केली आणि काही गणिते मांडली. हे सगळे करून झाल्यावर ज्योतिषी विचार करू लागला आणि नंतर थोड्यावेळात ज्योतिषी ‘दाऊदखानाला’ सांगू लागला “सहा दिवसानंतर अहिवंतगड तुमचा मोर्चा ज्याठिकाणी आहे त्याठिकाणाहून ताब्यात येईल परंतु मुघलांच्या बाजूने जोरदार हल्ला होईल तो महाबतखानाच्या बाजूने होईल”. ज्योतिषाने केलेली ही भविष्यवाणी ‘दाऊदखान’ याला काही केल्या पटेना. उंच आणि अस्ताव्यस्त पसरलेला ‘अहिवंतगड’ त्याच्या एका अभेद्य असलेल्या बुरुजासमोर आपला  मोर्चा तेथे जायला साधी एक पाऊलवाटपण नाही आणि तिथे हा ज्योतिषी असे भविष्य वर्तवतो की, तुमच्या बाजूच्या मोर्चाने ‘अहिवंतगड’ सर होईल ! ‘महाबतखान’ इतके दिवस झाले गडाच्या समोरील दरवाजापर्यंत जाण्यासाठी धडपडत असताना बुरुजाच्या बाजूने ‘अहिवंतगडावर’ प्रवेश कसा होणार? असे सगळे विचार ‘दाऊदखानाला’ पडले ज्योतिषाचा हा सल्ला त्याला आजिबात पटला नाही.

परंतु हा ‘मुंगळा’ आणि ‘ज्योतिषी’ यांची भविष्यवाणी खरी ठरली बरोबर सहाव्या दिवशी ‘अहिवंतगड’ जिंकण्याच्या उद्देशाने महाबतखानाने जोरदार हल्ला करण्याची तयारी सुरु केली. ती जोरदार हल्ल्याची तयारी मराठ्यांनी ‘अहिवंतगडावरून’ पहिली. ही जोरदार तयारी बघून मुघल ‘अहिवंतगड’ घेणारच अशी चिन्हे दिसू लागली तसेच ‘अहिवंतगडावरील’ अन्नधान्य आणि पाणीसाठा समाप्त झाला होता. याच दरम्यान मुघलांनी केलेल्या हल्ल्यांना तोंड देत असताना  मराठ्यांचे बरेचसे सैन्य जखमी झाले होते आणि हल्ले जसे वाढत होते तसे मनुष्यबळ कमी पडत चालले होते आणि मुघलांचा वेढा अत्यंत कडक असल्याने दुसरी काही मदत यायची शक्यता नव्हती. या सर्व गोष्टींना पाहून ‘अहिवंतगडावर’ असलेल्या मराठ्यांच्या किल्लेदारापुढे फक्त दोन पर्याय उपलब्ध होते ते म्हणजे शरण जाणे किंवा मरणे. शेवटी सर्व विचार करून ‘अहिवंतगडावर’ असलेल्या किल्लेदाराने शरण जाणे हा पर्याय निवडला. 


अहिवंतगडावरील 'खंडोबा'.  

परंतु ‘अहिवंतगडाबाहेर’ कसे पडणार हा देखील मोठा प्रश्न त्या किल्लेदारासमोर उभा होता कारण किल्ल्याच्या दरवाजावर ‘महाबतखान’ सर्व तयारीनिशी बसलेला आहे त्याच्याशी बोलायला गेले तर सर्वांची कत्तल होणार हे नक्की होते म्हणून मराठ्यांच्या किल्लेदाराने एक युक्ती लढवली त्याने ‘अहिवंतगडावरील’ मातब्बर माणसे बुरुजाच्या एका छोट्याश्या पाऊलवाटेवरून समोर मोर्चा देऊन असलेल्या ‘दाउदखानाकडे’ पाठवून दिली. ही बुरुजाची छोटीशी पाऊलवाट ‘दाऊदखान’ याच्या मुख्य शामियान्या मधून दिसत देखील नव्हती. हे सर्व मराठे ‘अहिवंतगडावरून’ कुठून उतरून आले हे पाहून ‘दाउदखान’ याला आश्चर्य वाटले. या सर्व मराठ्यांनी ‘दाऊदखानाकडे’ याचिका केली आणि शरण आले. मराठ्यांनी आपल्याला जीवाचे अभय मिळत असेल तर आम्ही गड मुघलांच्या ताब्यात देऊ असा किल्लेदाराचा निरोप त्यांनी ‘दाऊदखानाला’ सांगितला.

‘दाऊदखानाने’ तला आलेल्या मराठ्यांची विनंती ताबडतोप मान्य केली. मुघलांचे सर्व सैन्य पाठवून त्याने ‘अहिवंतगडाचा’ ताबा मराठ्यांकडून मिळवला आणि गडावरील मराठ्यांना दरवाजातून वाट मोकळी करून दिली. गडावरील एकाही माणसाची कत्तल न कर्ता सर्व मराठ्यांना जीवनदान दिले हे पाहून मात्र इतके दिवस ‘अहिवंतगडाच्या’ दरवाजासमोर ठाण मांडून बसलेला ‘महाबतखान’ मात्र आवाक झाला. या झालेल्या प्रकारामुळे महाबतखान मात्र अस्वस्थ झाला. या सर्व झालेल्या प्रसंगामुळे ‘महाबतखान’ याचा स्वत:च्या डोळ्यांवर आजिबात विश्वास बसत नव्हता. त्याचे मुख्य कारण म्हणजे इतके दिवस ‘महाबतखान’ याने आणि त्याच्या सैन्याने ‘अहिवंतगड’ जिंकण्यासाठी एवढे कष्ट घेतले होते तसेच हाल सोसले होते आणि त्या बदल्यात मला काय मिळाले आणि किल्ला जिंकण्याचे श्रेय कोणाला मिळाले, तर ‘दाऊदखानाला’ या गोष्टीमुळे ‘महाबतखान’ याची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि तेथून ‘महाबतखान’ चिडून आपले सैन्य घेऊन लगेचच नाशिकला निघून गेला.


अहिवंत गडावरून दिसणारा 'अचला किल्ला आणि तौल्या डोंगर.

अश्या प्रकारे ‘दाऊदखानाशी’ वाटाघाटी करून मराठ्यांनी आपला कार्यभाग साधला आणि प्रचंड आकाराचा आणि अभेद्य असा ‘अहिवंतगड’ मुघलांच्या स्वाधीन झाला. ‘अहिवंतगड’ ताब्यात आल्यावर ‘दाऊदखान’ मात्र प्रचंड खुष होता. त्याने आपल्या पदरी असलेल्या ज्योतिषाच्या भविष्यावर प्रचंड मोठे बक्षीस दिले असे ‘तारीखे दिल्कुशा’ या ‘भीमसेन सक्सेना’ याच्या ग्रंथात लिहितो.

हे सर्व झाल्यावर काही दिवसांमध्ये महाबतखान आणि दाऊदखान यांना औरंगजेब याच्याकडून मात्र भलतेच बक्षीस मिळाले. ‘महाबतखान’ याच्या बद्दल कोणीतरी औरंगजेबाकडे चहाडी केली की तो आतून शिवाजी महाराजांना मिळालेला आहे. म्हणून संशयी औरंगजेबाने ‘महाबतखानाला’ सप्टेंबर १६७१ साली परत बोलावून घेतले. परंतु त्याच्याआधीच ‘दाऊदखानाला’ औरंगजेबाने परत बोलावून घेतले होते अश्या प्रकारे ‘अहिवंतगड’ जिंकल्याचे बक्षीस ‘महाबतखान’ आणि ‘दाऊदखान’ यांना मिळाले. ‘अहिवंतगड’ जिंकल्याचे वर्णन ‘भीमसेन सक्सेना’ आपल्या ‘तारीखे दिल्कुशा’ या ग्रंथात असे लिहितो, ‘अहिवंतचा किल्ला म्हणजे गगनाला भिडल्यासारखा. तो सर होईल हे बुद्धीला पटेना. परंतु खरोखरच सहाव्या दिवशी दाऊदखानाच्या मोर्च्यावरून अहिवंतगड सर झाला’.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: लिहिलेल्या पत्रामध्ये काही किल्ल्यांचे उल्लेख केलेले आहेत असे हे नशीब काही किल्ल्यांनाच लाभते त्यापैकी एक नशीबवान किल्ला म्हणजे ‘अहिवंतगड’ होय. इ.स. १६८० च्या जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सावत्र भावाला म्हणजेच तंजावरच्या व्यंकोजीराजांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात “राजश्री मोरोपंत त्या प्रांती पाठविले होते, त्यांणी अहिवंत म्हणजे जैसा काही पनाळा; त्याचे बरोबरी समतुल्य आहे, दुसरा नाहवागड, बागलाणच्या दरम्यान मुलकात आहे, तोही कठीण तोही घेतला. हे दोन किल्ले नामोषाचे पुरातन जागे कबाज केले”. असे वर्णन केलेले आहे. पुढे हा किल्ला मराठ्यांनी लगेचच जिंकून घेतला आणि इ.स. १६८५ सालापर्यंत या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता. इ.स. १७५३-५४ साली निजामाकडून घेतलेल्या नाशिक मधील किल्ल्यांमध्ये ‘अहिवंतगड’ देखील होता.


अहिवंतगडावरून दिसणारा दिंडोरीचा परिसर आणि ओझरखेड धरण.

शेवटी इ.स. १८१८ साली साली ‘कॅप्टन ब्रिग्ज’ याने ‘अहिवंतगड’ इंग्रजांच्या वतीने जिंकून घेतला. जेव्हा ‘कॅप्टन ब्रिग्ज’ याने ‘अहिवंतगड’ जिंकला तेव्हा त्याने किल्ल्याचे वर्णन करताना ‘अहिवंतगडाला’ विशाल आणि आकारहीन डोंगर असे म्हटलेले आहे. किल्ल्यावर प्रवेशद्वाराच्या काही खुणा आणि उध्वस्त झालेल्या भांडार गृहाचे काही अवशेष सोडल्यास बाकी काही नाही. तसेच इ.स. १८२० साली जनरल लेक याने देखील लिहिले आहे की “या किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी इतकी आश्चर्यकारक आहे की मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्याने ती मुद्दाम तयार केलेली आहे असे वाटते”.

असा हा गमतीदार मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला साखरेचा ‘अहिवंतगड’ स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता हे आपल्याला लक्षात येते. अश्या अभेद्य असलेल्या ‘अहिवंतगडाची’ भटकंती नक्कीच करायला हवी.     


अहिवंत गडाचा भग्न दरवाजा आणि पायऱ्या.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) जेधे शकावली, शिवचरित्रप्रदीप, पृष्ठ २५:- भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.
२) शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावली, पृष्ठ ६२:- भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.
३) तारीखे दिल्कुशा, भीमसेन सक्सेना, पृष्ठ ४१:- मोगल आणि मराठे, अनुवादक सेतुमाधवराव पगडी, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, मुंबई.
४) सह्याद्री, पृष्ठ ११५:- स.आ.जोगळेकर, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे.
५) किल्ल्यांच्या कथा आणि व्यथा:- डॉ .प्र. न. देशपांडे, शिव पब्लिकेशन्स, पुणे.
६) साद शिवकालीन दुर्गांची:- महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे.
७) श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ:- सेतुमाधवराव पगडी, परचुरे प्रकाशन, मुंबई.
८) 'बुरहाने मासीर', मूळ लेखक:- सय्यद अली तबातबा; मराठी अनुवाद; 'अहमदनगरची निजामशाही'; अनुवादक:- भ.ग.कुंटे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, मुंबई.
९) गॅझेटीयर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी नासिक सेक्शन:- १८८३. 


कसे जाल:-
पुणे – चाकण  – मंचर – नारायणगाव – संगमनेर – सिन्नर – नासिक – दिंडोरी – दरेगाव.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   

1 comment:

  1. Very well deacribed. I have added this fort visit in my wish list. Thanks

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage