लोणावळा - खंडाळ्याच्या कुशीतील दुर्गरत्न ‘मृगगड उर्फ भेलीवचा किल्ला’


लोणावळा-खंडाळा ही सर्वपरिचित ठिकाणे परंतु या या लोणावळा खंडाळ्याच्या कुशीमध्ये असेच एक अपरिचित दुर्गरत्न 'किल्ले मृगगड' उर्फ 'भेलीवचा किल्ला' लपलेला आहे. बऱ्याचदा लोणावळा-खंडाळा परिसरातील किल्ले भटकायचे झाले कि भटक्यांची पावले वळतात ती लोहगड, विसापूर, राजमाची ह्या प्रसिद्ध किल्यांच्या वाटेवर. परंतु तुम्हाला जर निसर्गाचे नवे रूप, निरव शांतता, सह्याद्रीचे उंचच उंच आणि बेलाग कडे, घाट आणि कोकण यांच्यामधली नैसर्गिक विविधता अनुभवयाची असेल तर थोडीशी आडवाट करून तुम्ही 'मृगगड किल्याचा' ट्रेक तुमचा पर्याय बनवू शकता आठवड्याचा सगळा थकवा पळवून 'मृगगडाचा ट्रेक' तुम्हाला नक्कीच सुखावू शकतो.

लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवर उभे राहिले असता खाली जो कोकणाचा प्रदेश दिसतो त्याला 'टायगर्स व्हॅली' असे नाव आहे. या 'टायगर्स व्हॅलीमध्ये' उभा असलेला छोटेखानी ‘मृगगड’ भटक्यांना आजही खुणावत असतो. लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरून हे दुर्गरत्न ओळखायची खूण म्हणजे कोकणातून घाटावर आलेला 'मोराडीचा सुळका' होय या मोराडीच्या सुळक्याला 'स्वयंभू शिवलिंग' असे देखील म्हणतात. या मोराडीच्या सुळक्याच्या बरोबर पायथ्याला छोटासा तीन शिखरांचा डोंगर आहे तो डोंगर म्हणजे ‘मृगगड उर्फ भेलीवचा किल्ला. लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरून तो नुसत्या डोळ्यांनी देखील बघून त्याच्या एरिअल विव्हचे छायाचित्र तुम्ही टिपू शकता.


भेलीव गावातून दिसणारा 'मृगगड किल्ला'.

‘मृगगड उर्फ भेलीवचा किल्ला’ हा पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमारेषेवर उभा आहे. ‘मृगगड किल्ला’ जरी खंडाळ्याच्या कुशीत वसलेला असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी खंडाळा घाट उतरून खोपोलीमार्गे खोपोली-पाली रस्त्यावर यावे लागते. स्वतःची बाईक किंवा कार असणे उत्तम पर्याय तसेच तुम्ही खोपोली बस स्थानकावरून पाली गावाची एसटी किंवा सहा आसनी रिक्षांचा पर्याय आहे. या रस्त्यावरून 'मृगगडला' जाताना अजून एका ऐतिहासिक ठिकाणी आपण जाऊ शकता ती म्हणजे ऐतिहासिक ‘उंबरखिंड’ ही खिंड वाटेत असल्यामुळे हा आपल्यासाठी नक्कीच बोनस ठरू शकतो. 'उंबरखिंड' ते जांभूळपाडा अंतर साधारणतः १० किमी आहे. तेथून पुढे पालीच्या २० किलोमीटर अलीकडे 'जांभूळपाडा' नावाचे गाव लागते. 

या जांभूळपाड्याच्या कमानीमधून  आत शिरल्यावर 'भेलीव गाव' विचारावे. साधारणतः १५-२० मिनिटांत तुम्ही 'भेलीव' या गावात येऊन पोहोचता आणि आपल्या समोर उभा असतो तो 'मृगगड' आणि थोडीशी मान उंच करून बघितली कि दिसतो तो लोणावळ्याचा 'लायन्स पॉईंट' उजव्या बाजूला 'अणघाई किल्ला' साद घालत असतो तर माथ्यावरून 'कोराईगड' कोकणच्या परिसरावर पहारा देत उभा असलेला पहायला मिळतो.


मृगगडाच्या वाटेवरून दिसणारा 'अणघाई किल्ला'. 

'मृगगडाच्या' पायथ्याचे गाव 'भेलीव' आहे. 'भेलीव' गावामध्ये गाड्या लावून आपण शाळेसमोरून जाणाऱ्या पायवाटेने 'मृगगडाच्या' वाटेवर लागावे. एवढ्यात येथे एक व्यायामशाळा बांधलेली असून याच व्यायामशाळेच्या इमारतीच्या मळलेल्या मागच्या वाटेने 'मृगगडावर' जाणारी वाट सुरु होते. या मळलेल्या वाटेवर सध्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या गड संवर्धन करणाऱ्या संस्थेने लोखंडी फलक आणि दिशादर्शक बाण केले असल्याने शक्यतो वाट कुठेही चुकत नाही. गडाच्या पूर्वखिंडीमध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः एक तासाचा अवधी लागतो. या खिंडीमध्ये पोहोचायच्या आधी बऱ्याच ढोरवाटा देखील लागतात परंतु दिशादर्शक बाण सोडू नये. मृगगडाच्या पायथ्याचे जंगल अत्यंत घनदाट आहे.

याच वाटेत साधारणतः २० ते २५ मिनिटे चालल्यानंतर एक मोठे उंबराचे  झाड लागते त्या झाडावर पांढऱ्या रंगाने जुनी खूण केली आहे. या झाडाच्या बाजूने एक पायवाट गडावर जाते ती थेट आपल्याला घेऊन जाते ती मृगगडच्या खिंडीत. ही खिंड म्हणजे नाळ आहे अत्यंत खडी आणि दमछाक करणारी चढण चढल्यावर एक कातळटप्पा आपणांस दिसतो. या कातळटप्प्यामधेच सुबक पायऱ्या खोदल्या आहेत. या पायऱ्या आपणांस खिंडीमधून देखील दिसतात. तिकडे न जाता दरी उजवीकडे ठेवावी आणि कातळाला चिटकून जाणाऱ्या अरुंद वाटेने साधारणतः १५ ते २० मीटर अंतर जावे तेथे आपणास अत्यंत सुबक खोदलेले लेणे बघावयास मिळेल त्या लेण्यामध्ये नीट बघितले असता एक पाण्याचे टाके देखील बघावयास मिळेल.

मृगगडाच्या कातळकोरीव पायऱ्या.

लेणे बघून परत मागे फिरावे कातळटप्यातील कोरीव पायऱ्या चढाव्या आणि माथा गाठावा. माथ्यावर चढताना माथ्याच्या खालच्या टप्यावर तुम्हाला तटबंदीचे अवशेष बघायला मिळतील. तसेच गडाच्या दरवाज्याचे जोते पाहायला मिळते. गडाचा विस्तार अत्यंत छोटा आहे असून 'मृगगड किल्ला' पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. गडावर चढून गेले असता मोराडीचा सुळका लक्ष वेधून घेतो. गडावर प्रवेश केला असता उजव्या हाताला गेल्यावर आपल्याला कड्याच्या काठाला असलेली महिषासूरमर्दिनीची आता भग्न झालेली घुमटी बघायला मिळते. येथे देवीची अत्यंत सुबक मूर्ती असून तिच्या डोक्यावर असलेली महिरप फारच सुंदर दिसते. 

तसेच या देवीच्या शेजारी आपल्याला हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ घेतलेली भैरवाची देखील मूर्ती पाहायला मिळते. तसेच या दोन्ही मूर्तींच्या समोर शिवलिंग देखील पाहायला मिळते. या गडदेवतेच्या घुमटीच्या समोर एक कर्पूरस्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतो. तसेच येथून जवळच गडावर असलेल्या वाड्याचे काही तळखडे देखील पाहायला मिळतात. गडावर असलेल्या घूमटीच्या जवळच उजव्या बाजूला एक चौथरा आपल्याला पहावयास मिळतो त्याच्यामध्ये वेताळदेव स्थानापन्न असून त्याचे स्वतंत्र मंदिर आपल्याला पाहायला मिळते. 


गडदेवता महिषासूरमर्दिनी, शिवलिंग आणि भैरव.

येथून पुढे गेले असता आपल्याला गडावरचे काही महत्वाचे अवशेष देखील पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला दगडात खोदलेले उखळ, वाड्याचे तळखडे, तसेच एक दगडी पाटा देखील या ठिकाणी पाहायला मिळतो.इथेच जवळच आपल्याला पाण्याची तीन टाकी पाहायला मिळतात. यातील एका पाण्याच्या टाक्याला आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील बांधलेल्या पाहायला मिळतात.  याशिवाय दोन टाक्यांच्या शेजारी तिसरे टाके देखील पाहायला मिळते. याच पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी चांगले आहे आणि पिण्यायोग्य देखील आहे. 

येथून आपण थोडेसे चढून उंच गेले असता आपल्याला सदरचे सुस्थितीमध्ये असलेले अवशेष पाहायला मिळतात. तसेच येथे एक दगडी भांडे देखील आहे. गडाचा हा सगळ्यात उंच भाग असल्याने येथून आपल्याला फारच सुंदर नजारा पाहायला मिळतो. किल्यावरुन पूर्वेस बघितल्यास सह्याद्रीची मुख्य रांग दिसते थोडेसे वर बघितले असता मोराडीचा डोंगर, लोणावळ्याचा लायन्स पॉईंट, आणि उजवीकडे दुरवर उंच दिसणारा कोरीगड तसेच पश्चिमेला आंबा नदीचे खोरे हा सर्व परिसर आपणांस दर्शन देत असतो. 

मृगगडावर असलेली पाण्याची टाकी.

इथून थोडेसे पुढे गेले असता आपल्याला आपल्याला दोन घरांची जोती पाहायला मिळतात. तसेच तिथून थोडे खाली गेले असता आपल्याला एक खांब टाके देखील पाहायला मिळते. येथून गडाच्या गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर गेले असता आपल्याला तीन पाण्याची कोरडी टाकी पाहायला मिळतात. तसेच येथे आता एक ध्वजस्तंभ देखील उभारलेला आहे. किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गडावर आपल्याला खूप पोस्ट होल्स सापडतात या पोस्टहोल्सचा उपयोग हा लाकडी खांब रोवून तात्पुरते काही बांधकाम केले जात असावे. तसेच त्यांच्याभोवती आपल्याला पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदलेले देखील आढळतात.

पश्चिमेस टोकावर गेले असता दुरवर ‘सरसगड’ दर्शन देत असतो. किल्यावर असंख्य पोस्टहोल्स आहेत. मृगगडाचे भौगोलिक स्थान बघितले असता हा किल्ला ‘सव घाटावर’ लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा तसेच ‘उंबरखिंडीच्या ऐतिहासिक लढाईमध्ये’ देखील या किल्याचा वापर झाला असावा असे दिसून येते. सभासद बखरीच्या एकूण सहा प्रती आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी 'गड रास पहिली' या प्रकरणात जी गडांची नावे येतात त्यामध्ये ६० क्रमांकावर मृगगड किल्ल्याचा उल्लेख हा 'मृगंगड किंवा पिटगड' असा येतो. बाकी गडाबाबत आजही जास्त इतिहास उपलब्ध नाही.   

मृगगड येथून दिसणारे आंबा नदीचे खोरे.

अश्या प्रकारे गडफेरी पूर्ण करून छोटेखानी मृगगडावरून उतरून खाली येताना आजूबाजूचा परिसर न्याहाळल्यावर मनात नवे चैतन्य साठवत आपण भेलीव गावात यावे आपल्या गाड्या काढाव्यात आणि परतीचा रस्ता पकडून पुढील किल्ल्याचे प्लॅन करत लोणावळा मार्गे पुण्यात यावे. 


मोराडीच्या सुळक्याला 'स्वयंभू शिवलिंग' असे देखील म्हणतात.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१. शिवकालीन दुर्ग व दुर्गव्यवस्था:- महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे.

कसे जाल:-
पुणे – लोणावळा  – खंडाळा – खोपोली – जांभूळपाडा – भेलीव.

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage