निजामशाहीच्या अस्ताचा साक्षीदार असलेला 'जीवधन किल्ला'


आपल्या महाराष्ट्र देशामध्ये जवळपास ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत यातील बऱ्याच किल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तर काही किल्ले आजही आपला मूक इतिहास स्वत:जवळ बाळगून बसलेले आहेत. असेच काही प्रसिद्ध किल्ले 'जुन्नरच्या उर्फ जीर्णनगरच्या' आसमंतातत विविध कालखंडात बांधले गेले आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक महत्वाचा किल्ला म्हणजे नाणेघाटाचा अगदी सख्खा शेजारी असणारा आणि आपल्या बेलाग सूळक्याने सगळ्या भटक्यांना खुणावणारा 'जीवधन किल्ला' आजही आपले अस्तित्व आणि आपला इतिहास जपत नाणेघाटाच्या शेजारी उभा आहे. 

सातवाहनकालीन नाणेघाट आणि जीवधन किल्ला हे पाहायचे असल्यास आपल्याला प्राचीन नगरी जुन्नर येथे येऊन आसमंतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या 'शिवनेरी किल्ल्याचे' खालूनच दर्शन घेऊन 'शिवाजी चौकातून' आपटाळे  मार्गे आपल्याला 'जीवधन' किल्ल्याच्या पायथ्याचे 'घाटघर' हे गाव गाठावे लागते. यासाठी आपली स्वत:ची गाडी असेल तर कधीही उत्तम ठरते आपला वेळ देखील वाचतो परंतु ज्यांना बस ने जायचे असेल त्यांनी जुन्नर बस स्थानकावरून 'घाटघर' गावाची बस पकडणे गरजेचे आहे. 'जुन्नर' ते 'घाटघर' हे अंतर जवळपास ३७ कि.मी आहे. आता नाणेघाटापर्यंत डांबरी रस्ता झाला असल्यामुळे स्वत:ची गाडी असल्यास थेट नाणेघाटापर्यंत जाते. अन्यथा बस आपल्याला आजही घाटघर गावाच्या अलीकडे सोडते. बसने आपल्याला जुन्नर पासून जवळपास दीड तासांचा अवधी लागतो. तेथून पुढे ३ किलोमीटर डांबरी रस्त्यावरून चालत आपल्याला नाणेघाटापर्यंत जाता येते. 

नाणेघाट येथून 'जीवधन' किल्ल्याचे रूप हे फार सुंदर दिसते.

नाणेघाट येथून 'जीवधन' किल्ल्याचे रूप हे फार सुंदर दिसते. नाणेघाट परिसरात आता हॉटेल्स झाल्यामुळे फारसा रस्ता चुकत देखील नाही. नाणेघाटाच्या डाव्या बाजूला पठारावरून जीवधन किल्ल्याच्या जवळ व्यवस्थित जायला रस्ता आहे. आता आजूबाजूला हॉटेल्स खूप झाल्यामुळे येथे जेवणाची सोय देखील व्यवस्थित झालेली दिसून येते. पूर्वी येथे हॉटेल्स नसल्यामुळे येथे फक्त 'सुभाष आढारी' यांचे घर होते. जीवधन किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एक 'जुन्नर दरवाजा' आणि दुसरा 'कल्याण दरवाजा'. त्यातील 'जुन्नर दरवाजाचा' मार्ग हा घाटघर गावातून येतो. नाणेघाटावरून 'सुभाष आढारी' यांच्या घराच्या मागून 'जीवधन'  किल्ल्यावर 'कल्याण दरवाजाकडे' जाणारी उजवीकडची वाट पकडावी. 'जीवधन किल्ला' परिसर आता वनखात्याकडे असल्यामुळे जीवधन किल्ल्याच्या पाऊलवाटेवर त्यांनी बाणांंच्या खुणा देखील केलेल्या आपल्याला दिसून येतात. 

'कल्याण दरवाज्याने' वर चढून जाण्यासाठी वनखात्याने आता काही ठिकाणी नैसर्गिक पायऱ्यांंना तारांची वेष्टने लावून मार्ग अधिक सोपा केल्यामुळे रस्ता आजीबात चुकत नाही. पहिल्या तीन पायऱ्या चढून रस्ता डावीकडे वळतो तीच वाट पुढे आपल्याला एका दगडांच्यापाशी घेऊन जाते तेथून आपल्याला सरळ वर चढायचे असते. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. 'जीवधन किल्ल्याच्या' बेचक्यामध्ये घनदाट जंगल असल्यामुळे आपल्याला तेथे 'शेखरू खार' देखील दिसते तसेच 'ब्ल्यू मॉरमॉन' हे फुलपाखरू देखील पाहायला मिळते. याच पाऊलवाटेने थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला जीवधन किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या कोरीव पायऱ्या लागतात. आणि उजवीकडे पाहिले असता दर्शन होते ते बेलाग आणि उंच 'वानरलिंगी सूळक्याचे' 'जीवधन' येथील या कातळात खोदलेल्या पायऱ्या यांची रचना आपण निट पाहिली असता आपल्याला हडसर, केंजळगड येथे असलेल्या पायऱ्यांंशी त्याचे साम्य आपल्याला दिसून येते. 

जीवधन किल्ल्यावर जाताना दिसणारे नाणेघाटाचे विहंगम दृश्य.

या पायऱ्यांच्या डाव्या बाजूने आपण परत वर चढायला लागावे साधारणपणे १५ मिनिटात या पायऱ्या चढून आपण 'जीवधन' किल्ल्याच्या दरवाजाच्या घळीमध्ये येतो. याठिकाणी आपल्याला एक कातळटप्पा लागतो. येथील पायऱ्या या सुरुंग लावून इंग्रजांनी फोडल्यामुळे थोड्याश्या अवघड झालेल्या आहेत. परंतु हा कातळटप्पा अत्यंत अवघड देखील नाही. आता येथे बोल्ट बसवलेला असून छोटा रोप देखील लावलेला आहे. त्यामुळे तो कातळटप्पा चढून जायला सोपे पडते. हा कातळटप्पा पार केल्यावर आपण डावीकडे वळून ३ ते ४ पायऱ्या चढून गेल्यावर आपण थेट समोर उभे राहतो ते 'जीवधन किल्ल्याच्या' 'कल्याण  दरवाजासमोर'. गोमुखी रचना असलेले कातळ प्रवेशद्वार अत्यंत सुंदर दगडात कोरून काढलेले आहे. पूर्वी हा दरवाजा अर्धा गाडला गेला होता परंतु आता वनखात्याने आता त्याचे संवर्धन करून संपूर्ण दरवाजा मोकळा केलेला पाहायला मिळतो आणि आपल्याला संपूर्ण दरवाजाचे दर्शन होते. या कल्याण दरवाजाच्या भव्य प्रवेशद्वारावर आपल्याला चंद्र आणि सूर्य कोरलेले पाहायला मिळतात. यावरून हा दरवाजा हा निजामशाहीच्या कालखंडात बांधला असावा त्या दरवाजाच्या रचनेवरून समजते. त्यासाठी त्या दरवाज्याच्या 'कि-स्टोन' च्या 'आर्च' ची रचना नक्कीच समजून घेणे गरजेचे ठरते. 

या सुंदर दरवाजातून आत आल्यावर आपल्याला उजव्या बाजूस एक देवडी पाहायला मिळते जिची अवस्था आज वाईट आहे. येथून वर चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या वरच्या बाजूस येतो येथून जीवधनच्या जुन्नर दरवाजाचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते तसेच दोन बुरुजांच्या मध्ये असलेला दरवाजा आणि त्याची गोमुखी बांधणीची रचना नक्कीच समजून घेता येते. दरवाजाच्या येथून डावीकडे वर आपण  पठारावर येतो आणि मग आपली गडप्रदक्षिणा चालू होते. येथेच आपल्याला उजव्या बाजूस काही घरांची जोती पहायला मिळतात. तसेच येथून समोरच्या बाजूस खाली नाणेघाटाच्या नानाच्या अंगठ्याचे अप्रतिम दृश्य देखील बघायला मिळते. येथून पुढे डाव्या बाजूला चालत गेले असता काही ठिकाणी तुटक तटबंदी देखील पाहायला मिळते. येथून पुढे चालत गेले असता आपण सरळ कड्याच्या शेवटी येतो आणि तिथून आपल्याला 'वानरलिंगी सूळक्याचे' सुंदर दर्शन घडते. इथेच डावीकडे एवढ्यात संवर्धन करताना सापडलेली एक वाड्याची वास्तू देखील पाहायला मिळते.

जीवधन येथील या कातळात खोदलेल्या पायऱ्या यांची रचना. 

येथूनच डावीकडे वर चढत जावे तेथून आपण गडमाथ्यावर अगदी १० मिनिटात जाऊन पोहोचतो. येथून उजवीकडे पाहिले असता आपल्याला 'दुर्ग आणि ढाकोबा' यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते तसेच त्या भागातून जाणाऱ्या दुर्गम घाटवाटा यांचा देखील नजारा पहायला मिळतो. येथून डावीकडे वळाले असता थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक भग्न मंदिर पाहायला मिळते त्याच्या बांधणीवरून ते पेशवे काळात बांधले असावे असे वाटते. तेथे आपल्याला एक समाधी व 'शिवलिंग' आणि 'नंदी' पाहायला मिळतो येथून पुढे आपण चालट गेले असता आपल्याला आपल्याला एक  मोठे वाड्याचे जोते पाहायला मिळते त्यामध्ये सध्या गडदेवता 'जीवाबाई' हिची मूर्ती ठेवलेली पाहायल मिळते. पूर्वी हि मूर्ती धान्यकोठीच्या जवळ होती आता संवर्धन करताना हि मूर्ती हलवून गडाच्या माथ्यावर असलेल्या वाड्याच्या जोत्यामध्ये ठेवलेली आहे.

या गडदेवता 'जीवाबाईचे' दर्शन घेऊन आपण सरळ बालेकिल्ल्यावरून डाव्याबाजूस उतरलेल्या छोट्या डोंगरधारेवरून उतरावे येथून डाव्या बाजूला आपल्याला पाच पाण्याची टाकी पाहायला मिळतात. तसेच परत येथून उजवीकडे वळून आपण थेट जातो ते 'जीवधन किल्ल्याच्या' धान्यकोठीजवळ. हि धान्यकोठी अर्धी कड्यामध्ये असलेली आपल्याला बघावयास मिळते. अर्धी खोदीव असलेली आणि दर्शनी बांधीव असलेली हि धान्यकोठी खरोखरच अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. ह्या धान्यकोठीच्या दारातून आत गेले असता आपल्याला 'चंद्र आणि सूर्य' तसेच 'गजलक्ष्मी' हि शिल्पे पाहायला मिळतात. येथून आत गेल्यावर आपल्याला ह्या कोठीमध्ये तीन खोल्या खोदलेल्या दिसतात तसेच या खोल्यांच्या बाहेर व्यवस्थित ओसरी देखील बघायला मिळते.

  या पायऱ्या सुरुंग लावून इंग्रजांनी फोडल्यामुळे थोड्याश्या अवघड झालेल्या आहेत.

या कोठीमध्ये संपूर्ण अंधार असल्यामुळे 'टॉर्च' ठेवणे फार गरजेचे आहे.या कोठीमध्ये तीन कमानींंनी युक्त असा दरवाजा आपल्याला पहावयास मिळतो. दरवाज्याच्या वरच्या बाजूस एक पुष्पआकृती देखील बघावयास मिळते. तसेच या कोठीमध्ये आपल्याला सूर्यप्रकाश यावा म्हणून गवाक्ष देखील खोदलेले पाहायला मिळतात. ट्रेकर्स साठी राहायला असलेली गडावरील हि एकमेव वास्तू आहे. हि सुंदर कोठी पाहून आपण कोठीच्या उजवीकडे जावे येथून पुढे काही आपल्याला वाड्यांची जोती पहायला मिळतात तसेच जीवधन किल्ल्याचे खणखणीत बुरुज आणि तटबंदी आपल्याला आजही व्यवस्थित असलेली आपल्याला बघावयास मिळते.

हि तटबंदी आणि धान्य कोठीच्या डाव्या बाजूचे अवशेष बघून आपण परत धान्यकोठीजवळ यावे आणि तेथून डावीकडे जुन्नर दरवाजा बघावयास निघावे.  या धान्यकोठीच्या डावीकडे नुकतेच वनखात्याने 'शौचालये' बांधलेली आहेत. येथूनच पुढे गेले कि आपल्याला पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला मिळतो आणि तेथेच परत एक आपल्याला मोठ्या वाड्याचे जोते देखील बघावयास मिळते. तेथून पुढे जाऊन आपल्याला दगडात खोदलेल्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्या उतरून खाली गेले असता आपण पोहोचतो ते सरळ 'जुन्नर दरवाज्यापाशी' सध्या गडाचा दरवाजा अस्तित्वात नाही परंतु दगडात खोदलेल्या दरवाज्याच्या खुणा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तसेच येथे काही 'पोस्ट होल्स' देखील पाहायला मिळतात याच दरवाज्याच्या उजवीकडे आपल्याला खांबटाके देखील पाहायला मिळते. सध्या जुन्नर दरवाज्याच्या काही कातळातील पायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. पूर्वी 'घाटघर' बाजूने किल्ला चढताना ३ अवघड 'रॉक पॅॅच' होते आता त्याठिकाणी वनखात्याने शिड्या बसवल्या आहेत त्यामुळे घाटघर बाजूने येणारी 'जीवधन किल्ल्यावरील' वाट हि देखील अगदी सोपी झालेली आहे.

कल्याण दरवाज्याची अवस्था व त्यावरील चंद्र आणि सूर्य. 

जुन्नर दरवाजा पाहून आपण आल्या मार्गाने वर यावे आणि उरलेली गडफेरी पूर्ण करत राहिलेले अवशेष पाहून 'कल्याण दरवाज्याने' उतरण्यास सुरुवात करावी किंवा ज्यांना 'जुन्नर दरवाज्याने' घाटघर येथे उतरायचे असेल ते तिकडून देखील उतरू शकतात. जुन्नर दरवाज्याने घाटघर मध्ये उतरून परत पायी चालत नाणेघाटाजवळ यावे लागेल ती मात्र भटक्यांनी तयारी मात्र ठेवावी. गड उतरत असताना आपल्याला दुर्ग, ढाकोबा, हि शिखरे तसेच निमगिरी, हडसर, चावंड यांचे सुरेख दर्शन होते. जीवधन किल्ला पूर्ण बघून परत येताना जेव्हा आपल्याला दरवाज्याजवळील बिकट वाटा येतात तेव्हा त्या उतरून किल्ला पाहून पूर्ण होणे यात एक वेगळी मजा 'जीवधन किल्ला' बघताना अनुभवायला मिळते. इतिहास आणि साहस अनुभवायचे असेल तर जीवधन किल्ला नक्की पहावा आपल्याला किल्ला पाहताना एक वेगळाच अनुभव आपल्या गाठीशी बांधला जातो.

जीवधन किल्ल्याचा इतिहास:-

'जीवधन किल्ला' हा जरी सातवाहन काळातील नाणेघाटाजवळ असला तरी त्याच्या अगदी जवळ असलेला 'जीवधन किल्ला' हा सातवाहन काळात बांधला गेला याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. जीवधन किल्ल्याबाबत सगळ्यात पहिले उल्लेख सापडतात ते 'सय्यद अली तबातबा' लिखित 'बुऱहाने मासीर म्हणजेच 'अहमदनगरची निजामशाही' या ग्रंथामध्ये. इ.स. १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याच्या इतिहासात जीवधन किल्ल्याचा उल्लेख हा 'जुधान' असा येतो. इ.स. १४८२-१४८३ मध्ये 'मलिक नायब' याचा मुलगा 'मलिक अहमद' याने जेव्हा कोकणावर आणि दक्षिणेतील डोंगराळ मुलुखात स्वारी केली तेव्हा त्या मोहिमेचा वृत्तांत हा 'सय्यद अली तबातबा' याने लिहिलेल्या फारसी ग्रंथात आपल्याला मिळतात. यामध्ये या किल्ल्यांवरच्या मोहिमेची पार्श्वभूमी बघणे नक्कीच महत्वाचे आहे.

गोमुखी रचना असलेले कातळ प्रवेशद्वार अत्यंत सुंदर दगडात कोरून काढलेले आहे.

इ.स. १४८२-१४८३ मध्ये मलिक नायबचा मुलगा अहमद याने कोकण आणि दक्षिणेतील डोंगराळ मुलुखात स्वारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या मुख्य पार्श्वभूमीवर मलिक अहमदने या प्रदेशातील मोहीम  हाती घेतली त्याबाबत 'सय्यद अली तबतबा' लिहितो "अह्मदची इच्छा इस्लाम धर्माला उच्च पातळीवर नेण्याची, जिहाद पुकारून 'मुहम्मद पैगंबरांनी' पुरस्कारलेल्या श्रद्धेचा आणि पवित्र तत्वांचा प्रसार करण्याची श्रद्धा आणि आणि नेकी यांचा अभाव असलेल्या काफरांची बंडे आणि दुष्टपणा यांचे समुळ निर्दालन करण्याची होती. कोकण आणि दक्षिणेच्या डोंगराळ मुलुखातील बहुतेक किल्ले हे काफर आणि मुर्तीपुजकांच्या ताब्यात होते म्हणजेच हिंदूंच्या ताब्यात होते. हिंदूंकडून व्यापारी आणि प्रजाजन यांना उपद्रव पोहोचत असे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ते सर्व किल्ले शत्रूच्या ताब्यातून सोडवणे आवश्यक होते. अहमदने हा विचार पार पडण्याच्या हेतूने लष्कराला खूप बक्षिसे दिली आणि थोड्याच कालावधीमध्ये 'घोडदळ आणि पायदळ' यांनी युक्त अशी फौज जमा केली.

यामध्ये जर नीट 'बुरहाने मासीर' हा 'सय्यद अली तबातबा' लिखित ग्रंथ व्यवस्थित पाहिला तर 'सय्यद अली तबातबा' याने 'मलिक अहमद' याच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीचा विपर्यास केलेला आपल्याला दिसून येतो. या मोहिमेच्या मागे जरी धार्मिक कारण दाखवले असले तरी सुद्धा 'बहमनी राज्यातली राजकीय परिस्थिती देखील लक्षात घेण्यासारखी आहे. यामुळे हि पार्श्वभूमी फारशी विश्वसनीय वाटत नाही. 'मलिक अहमद' याने शिवनेरी येथे स्वारी केली. इस्लामच्या सैन्याने शिवनेरी किल्ल्यावर खूप शौर्य दाखवले. त्याचबरोबर काफरांच्या सैन्याने देखील कडवा प्रतिकार केला आणि शिवनेरीला थोडा काळ वेढा पडल्यावर काफरांना शरणागती घेणे भाग पडले.शिवनेरीचा किल्लेदार आणि सैन्याने 'मलिक अहमद' याला शरण जाण्याची तयारी दर्शवली आणि शिवनेरी किल्ल्याचे दरवाजे उघडले.

'जीवधन' किल्ल्यावरून  'वानरलिंगी सूळक्याचे' सुंदर दर्शन घडते.

'मलिक अहमद' याने 'शिवनेरी किल्ल्यामध्ये' प्रवेश करत तकबीर आणि कलमा यांचा घोष केला आणि 'शिवनेरी' किल्ल्यामधील काफिरांची (हिंदूंची) मंदिरे आणि घरेदारे पाडली आणि त्याठिकाणी मशिदी उभ्या केल्या. येथे 'मलिक अहमद' याला खूप लुट मिळाली त्यामध्ये अहमदच्या सैन्याला रत्ने, जडजवाहीर, कपडालत्ता, गुलाम अशी खूप लुट मिळाली. या लुटीपैकी सरकारी खजिन्यात दाखल करण्यायोग्य वस्तू काढून खजिन्यात भरण्यात आल्या आणि बाकीचा माल सैनिकात वाटला अश्या तऱ्हेने  शिवनेरीचा बळकट किल्ला जिंकून त्याने आपला मोर्चा 'जोंड' म्हणजेच 'चावंड' किल्ल्याकडे वळवला हा किल्ला विशेष लढाई न करता जिंकला येथेही त्याच्या हातामध्ये खूप मोठी लुट पडली. 'चावंड किल्ला' जिंकून त्याने किल्ल्याची व्यवस्था आपल्या एका सरदारावर सोपवून 'मलिक अहमद' याने आपला मोर्चा हा 'लोहगड' किल्ल्याकडे वळवला.

अश्या तऱ्हेने 'मलिक अहमद' याने जी स्वारी केली त्यामध्ये त्याने शिवनेरी, जोंड (चावंड), लोहगड, तुंग, तिकोना, कोंढाणा, भोरपगड (सुधागड), मुरुंबदेव (राजगड) हे किल्ले काबीज केले आणि त्या किल्ल्यांवर आपले मातबर सरदार नेमले. त्यानंतर अहमदने 'जुधान' म्हणजेच 'जीवधन' किल्ल्याला वेढा देऊन किल्ल्यावर जारीने हल्ला केला. तसेच किल्ल्यावर सैन्याने जोरदार मारा सुरु केला. 'जीवधन' किल्ल्यावरील शिबंदीने किल्ल्याचा बचाव करण्याची शिकस्त केली परंतु अहमदच्या कडव्या फौजांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि त्यांनी किल्ला ताब्यात देण्याची तयारी दाखवली. किल्ल्यावरील शिपायांना जीवदान देण्यात आले. परंतु 'जीवधन' किल्ल्यातील रहिवाशांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली तसेच त्यांच्या घरादारांचा नाश देखील करण्यात आला. यानंतर अहमदने किल्ल्याची व्यवस्था सरदाराकडे सोपवून तो सैन्यासह खोज (हा कोहोज किल्ला असावा) किल्ल्याच्या दिशेने निघून गेला.

समाधी व 'शिवलिंग' आणि 'नंदी'

'सय्यद अली तबातबा' याने याच 'बुरहाने मासीर' या ग्रंथामध्ये पुढे 'बुरहान निजामशहा' याच्या मृत्यूसमयी निजामशाहीच्या ताब्यात असलेल्या ५८ किल्ल्यांची नावे दिली आहेत त्यामध्ये 'जीवधन' हा किल्ला देखील समाविष्ट आहे. या सगळ्या घडामोडी पाहता दिनांक ३० डिसेंबर १५५३ हे मात्र निश्चित होते. नंतर जीवधन किल्ल्याचा उल्लेख मिळतो तो  निजामशाहीच्या अखेरीस. इ.स. १६३३ मध्ये 'शहाजी महाराज' यांनी 'मुघल आणि आदिलशहा' यांच्या संयुक्त फौजांशी लढाई देत 'निजामशाही' वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये 'शहाजी महाराजांनी' निजामशाहाच्या घराण्यातील 'मुर्तजा' नावाच्या दहा ते अकरा वर्षांच्या मुलाला 'जीवधन' किल्ल्याच्या कैदेतून सोडविले आणि 'पेमगिरी' किल्ल्यावर नेऊन शाहीतख्तावर बसविले. त्याच्यानंतर पुढे सुमारे तीन वर्षे अखंडपणे त्यांनी संयुक्त फौजांशी झुंज दिली. अखेर इ.स. १६३६ मध्ये 'शाहजी महाराजांना' 'माहुली' किल्ल्याच्या  पायथ्याशी शरणागती पत्करावी लागली. त्याच्यानंतर 'शाहजी महाराजांनी' आपली काही विश्वासू लोक आणि किल्ल्यांचा ताबा देण्याविषयी स्वत:ची पत्रे 'काजी अबू सईद' याच्याबरोबर देऊन त्याला मुघल सरदार 'खानजमान' याच्याकडे पाठविले. त्यावेळी त्यांनी जे किल्ले मुघलांच्या हवाली केले त्यामध्ये 'जीवधन' किल्ल्याचा समावेश होता.

शिवाजी महाराजांच्या काळात 'जीवधन' किल्ल्याचा उल्लेख हा कवी 'जयराम पिंडे' याने लिहिलेल्या 'पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' या संस्कृत काव्यग्रंथामध्ये मिळतो. इ.स. १६७२ - १६७३ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाही यांच्या मुलुखातले बरेच किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी सगळ्या किल्ल्यांच्या नोंदी आपल्याला इतिहासात मिळत नाहीत. 'जीवधन' हा किल्ला स्वराज्यात कधी होता का नव्हता हे समजण्यासाठी एकमेव विश्वसनीय साधन उपलब्ध आहे ते म्हणजे 'पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' हा संस्कृत काव्यग्रंथ. त्याचा निर्माता हा 'जयराम पिंडे' हा  शिवकाळाला समकालीन होता तसेच तो तंजावरच्या 'व्यंकोजी राजे भोसले' यांना शिवाजी महाराज हे मुघल आणि आदिलशाहीचे कोणते कोणते किल्ले जिंकले हे सांगत असे आणि लिहून ठेवत असे. त्यामुळे हे साधन फार महत्वाचे ठरते. या 'पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' या संस्कृत काव्यग्रंथात पहिल्या अध्यायातील ३८ व्या श्लोकात कवी 'जयराम पिंडे' 'जीवधन' किल्ल्याचा उल्लेख पुढीलप्रमाणे करतो.

गडदेवता जीवाबाईची जुन्या मूर्तीची अवस्था आणि आत्ताच्या मूर्तीची अवस्था.

ततो जीवधनाख्योसौ यवनानां गिरीर्महान |
  जीवरूपो भवत्येषां तं च भ्योS ग्रहीनृप: ||३८||

अर्थ:-
नंतर जीवधन नावाचा यवनांचा (मुघलांचा) मोठा किल्ला प्राणभूत असा होता. तो सुधा शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून घेतला. 

परंतु या संपूर्ण घटनेला शिवचरित्रातील कोणत्याही साधनामधून दुजोरा मिळत नाही. बऱ्याच बखरींंमधून 'जीवधन' किल्ल्याचे नाव किल्ल्यांच्या यादीत सापडते परंतु या किल्ल्याबाबत एक ओळ देखील सापडत नाही. पुढे 'संभाजी महाराज' आणि 'राजाराम महाराज' यांच्या कारकिर्दीत 'जीवधन' किल्ल्याचे उल्लेख कुठेही मिळत नाहीत. त्यामुळे मधल्याकाळात हा 'जीवधन' किल्ला मराठ्यांच्याकडे आणि मुघलांच्याकडे किती काळ होता याबाबत कुठेही उल्लेख मात्र मिळत नाहीत. 'महाराणी ताराबाई' यांच्या कारकिर्दीत मात्र जीवधन किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला याची नोंद खुद्द 'औरंगजेब' याने संपादित केलेल्या अखबारात घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. अखबारातील नोंद पुढीलप्रमाणे:-

    ता.  ७ मे १७०२:
            बादशहांना पुढीलप्रमाणे कळविण्यात येते की, "जुन्नरजवळ जोधन (जीवधन) किल्ला आहे. मराठ्यांनी तेथील किल्लेदाराला कैद केले आणि किल्ल्याचा ताबा घेतला आहे." बादशहांनी  आज्ञा केली की, "याबाबतीत जुन्नरचा किल्लेदार व फौजदार नस्त्रुुल्लाखान आणि पट्ट्याचा फौजदार लोदीखान यांना लिहिण्यात यावे."


धान्यकोठी किंवा अंबारखाना.

अखबारात 'जीवधन किल्ला' याचा उल्लेख हा 'जोधन' असा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावरून मराठ्यांनी 'जीवधन किल्ला' दिनांक ७ मे १७०२ पूर्वी घेतला असणार हे निश्चित. परंतु 'जीवधन किल्ला' मराठ्यांच्याकडे फार काळ राहिलेला आपल्याला दिसत नाही. साधारणपणे ४ महिन्यांनी 'जीवधन किल्ला' मुघलांनी परत जिंकून घेतल्याचे अखबारीतील नोंदीवरून स्पष्ट होते. त्या अखबारातील नोंदी पुढीलप्रमाणे:-

    १) ता. २१ नोव्हेंबर १७०२:
                              मुहीब अली यास जोधनची किल्लेदारी देण्यात आली. (याकाळात औरंगजेब याचा मुक्काम हा पेडगावच्या बहादूरगडाजवळ होता असे दिसते.)

   २) ता. २३ नोव्हेंबर १७०२:
                               मुहीब विहीशी अली याची जोधनच्या किल्ल्यावर नेमणूक झाली होती. त्याच्या मनसबीत वाढ करण्यात येऊन त्याला निरोप देण्यात आला. (याकाळात औरंगजेब याचा मुक्काम हा पेडगावच्या बहादूरगडाजवळ होता असे दिसते.)

तसेच याच्यापुढे ज्या नोंदी मिळतात त्यामध्ये 'जीवधन किल्ला' मुघलांच्या तर्फे कोणी जिंकला हे देखील समजते परंतु केव्हा ते कळत नाही. त्या अखबारातील नोंदी पुढीलप्रमाणे:-

'जीवधन' किल्ल्याची तटबंदी.

     १) ता. ७ मे १७०३: 
                बक्षी रुहुल्लाखान याने विनंती केली की, "दक्षिणेच्या तोफखान्याचा दारोगा बरमोजखान याने कळविले की, मावळ्यांचा दारोगा अब्दुल करीम याला १०० जात व २०००० स्वार (स्वारांचा आकडा चुकला असावा) अशी मनसब होती. जोधनचा किल्ला फत्ते केल्याबद्दल त्याला १०० जात व १० स्वार अशी मनसब देण्यात आली. काय आज्ञा? 

                 त्यावर बादशहा म्हणाले, "१०० जात याचे २०० केले, १० स्वार योग्य आहेत." (याकाळात औरंगजेब याचा मुक्काम हा पुण्यातील ईदग्याजवळ होता असे दिसते.) 

    २) ता. ७ मे १७०३:
                      मतलब खान (करावल बेगी) याने विनंती केली की, "मावळ्यांचा दारोगा अब्दुल करीम याच्या मनसबीत १० स्वारांनी वाढ करण्यात आली. पण हा परवाना मन्सूरखानाच्या शिक्क्यानिशी आहे, तर सियाहा मध्ये काय नोंद करायची ?" त्यावर बादशहांनी आज्ञा केली की, "१० स्वारांच्या वाढीची नोंद करा."

या दोन पत्रांवरून असे दिसून येते कि औरंगजेबाने  येथे गनिमी काव्याचा वापर करून जीवधन किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला असावा याची जास्त शक्यता आहे. कारण वरील पत्रांमध्ये मावळे आणि दारोगा अब्दुल करीम या दोघांचेही उल्लेख येतात हे फार महत्वाचे आहे.

गडावरील सध्या सापडलेले वाड्यांचे अवशेष.

पुढे पेशवेकाळामध्ये 'जीवधन' किल्ला हा कधी मराठ्यांकडे तर कधी मुघलांकडे होता. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत इ.स. १७४९ च्या मी महिन्यात हा किल्ला मराठ्यांनी मुघलांच्या हवाली केला त्याचा उल्लेख दिनांक ३१ मे १७४९ च्या एका सनदेमध्ये आलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-

रामाजी बापू यास पत्र की, नारो खंडेराव याची गुरे जीवधनकडे चारणीस होती. त्यास जीवधन मोगलास दिली ते समयी लोक किल्ल्यावरून उतरले. त्यांणी किल्ल्यानजीक गावची गुरे धरून चावंडेस (म्हणजेच चावंड किल्ला) आणिली. त्यामध्ये नारो खंडेराव याची गुरे २ गाई १ म्हैस तीन सर आली आहेत. ती फिरोन देवावी म्हणून रा. हरी दामोदर यांनी विनंती केली. त्यावरून सनद सादर केली आहे. तर नारो खंडेराव याची सदरहु गुरे आली असली तर चौकसी करून देणे. 

परंतु याच्यानंतर 'जीवधन' किल्ला मुघलांच्या ताब्यात फार दिवस राहिलेला दिसत नाही. त्याच वर्षाच्या जुलै - ऑगस्ट महिन्यामध्ये तो मराठ्यांच्याकडे आला. दिनांक १० ऑगस्ट १७४९ रोजी चांदवड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याला पाठविलेल्या सनदेमध्ये उल्लेख येतो. यामध्ये लुटीची नोंद केलेली दिसते तिची यादी पुढीलप्रमाणे:-


जीवधन वरील पाण्याची टाकी.

   "किल्ले जीवधन फत्ते केली ते समयी लुटीपैकी जिन्नस लोकांकडे राहिला आहे." 
         १२४ भांडी - तांब्याची ६८, पितळेची  ५०, कांशाची ४,
                                     कथिलाची २.
         १२ लोखंडी दागिने - ४ तवे, ३ कोयते, ३ विळे, 
                       १ कुऱ्हाड, १ पळी साधी. 
            २ किरकोळ दागिने - १ सिंगाडा (?) १. रंजकदाणी (?)
         १५ खिल्लारे सर (पाळीव प्राणी) - १० म्हशी (७ ऐन.
                                                             ३ वासरे सीर खोर)
                                                             ३ टोणगे (१ थोर.
                                                             २ लहान)
                                                             २ गाई (१ ऐन गाय. १ वासरू)
          ४३ सरकारांंत शिलेखान्याकडे (म्हणजेच शस्त्रागारात) दागिने द्यावे.
             ९ बंदुका, १ पिस्तोल, २ तलवारी, १३ निमचे (छोट्या तलवारी) 
             ७ कट्यारी 
                    १ पट्टा मोडका, १ तरकस खोततीर, ४ बर्च्या, २ परज
                    जुने ( १ कट्यारीचा १ निमचाचा), ३ ढाली,
                    याशिवाय सैनिकांनी घेतलेल्या वस्तुंमध्ये - ८ हत्यारे (१ गुर्दा इंग्रजी म्हणजे छोटी आणि दणकट तलवार) २ निमचा, १ कट्यार उणाख, १ ढाल कबज कागदी, १ सुरी काचेच्या मुठीची, २ तिवाशा, २ अंगठ्या (१ सोन्याची अंगठी. वजन ३ मासे, १ चांदीची अंगठी रुपयाभर) १ ज्ञानेश्वरीची संपूर्ण पोथी.


किल्ला ताब्यात घेतल्यावर लुटीच्या वस्तू हस्तगत करून अश्या प्रकारे मोजदाद करत असत याचे हे उत्तम उदाहरण हे 'जीवधन' किल्ल्याबाबतचे पत्र आहे. इ.स. १७६५ साली 'जीवधन' किल्ल्यावर काही कोळ्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध बंड पुकारले होते. असे देखील उल्लेख आढळतात. इ.स. १८१८ साली शेवटच्या इंग्रज - मराठे युद्धामध्ये जीवधन किल्ला कसा जिंकून घेतला याबाबत इंग्रजांनी 'Pendhari And Maratha War Papers', Page No 294. यामध्ये जे लिखाण केले आहे त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे:-

'जीवधन' किल्ल्याच्या जुन्नर दरवाज्याच्या पायऱ्या.

दिनांक ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रीजच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची एक तुकडी जीवधन किल्ल्याजवळ येऊन पोहोचली. दोन दिवसांपूर्वीच किल्ला सोडून देण्याबद्दल जीवधनच्या किल्लेदाराला आज्ञा देण्यात आली होती. परंतु टी किल्लेदाराने नाकारली आणि किल्ला आठ दिवस लढविणार असल्याचे इंग्रजांना कळविले. किल्ल्याचा भेद काढणाऱ्या कॅॅप्टन नटच्या लोकांनी बंदुका व मॅॅच लॉक्स यांनी जीवधन किल्ल्यावर सतत मारा सुरु केला. परंतु त्याने काही हानी झाली नाही. त्यानंतर मॉर्टर  तोफांसाठी जागा निवडण्यात आली आणी तोफांची बातेरी ज्यामध्ये पितळेच्या १२ पौंड क्षमतेच्या दोन तोफा तिथे आणण्यात आल्या. १८ पौंडर तोफ दरवाज्याच्या आसपासच्या तटबंदीवर मारा करण्यापूर्वी त्या १२ पौंडर तोफा माऱ्याच्या जागी हलविण्यात आल्या होत्या. बारा वाजता मॉर्टर्सचा मारा सुरु झाला आणि अंदाजे एका तासाच्या माऱ्यामध्ये २० तोफगोळे डागल्यानंतर किल्ल्यावरून एक माणूस किल्लेदाराचा निरोप घेऊन खाली आला की, किल्ल्यातील सैनिक दरवाजा उघडायला तयार आहेत. बॉम्बे युरोपियन रेजिमेंटने ताबडतोब किल्ल्याचा ताबा घेतला आणि किल्ल्यातील सैनिकांना नि:शस्त्र करून तिथून घालवून दिले. 

या प्रसंगानंतर मेजर एल्ड्रीजच्या सैन्यातील एका अधिकाऱ्याने जीवधन किल्ल्याचे वर्णन केले आहे ते पुढीलप्रमाणे:-

Jivdhan is absolutely impregnable as it had bombproofs for the garrison to retire to. The last flight of steps which lead to the fort consisted 240 rock-cut steps each 1.5 foot high and as steep and hard to climb as a ladder. Midway down the hill on the North West (वायव्येस) a level ran out for 100 yards (1 yard = 0.194 meter) and the mountain then became as steep as before. From the edge of the small level came as steep as before. From the edge of the small level rose a natural pillar of rock (म्हणजेच वानरलिंगी किंवा खडा पारशी सुळका) about 300 feet high nodding over the abyss below. One the South-West (नैऋत्येस) the hill side was so steep that a stone dropped from the hand would reach the Konkan about 2000 feet below. (Bombay Courier, 16th May 1818). 

जीवधन किल्ल्यावरील जुन्नर दरवाज्या जवळ असलेली 'लेणी किंवा खांबटाकी'.

इ.स. १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी 'जीवधन किल्ला' जिंकून घेतला तेव्हा त्यांना किल्ल्यामधील पूर्वाभिमुख लेण्यामध्ये ज्याला सध्या धान्यकोठार म्हणतात त्यात धान्य ठेवत असल्याचे पाहायला मिळाले. आत्तापर्यंत येथील धान्य जळालेली राख तिथे पाहायला मिळत होती परंतु आता ती शिल्लक नाही. 'जीवधन किल्ला' हा इंग्रजांना ठेवायचा नव्हता आणि सोडून देखील द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी इ.स. १८२० साली जीवधन किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या सुरुंग लावून फोडून टाकल्या आणि किल्ल्यावर जाणारा मार्ग अवघड बनला.

असा हा महत्वाचा ऐतिहासिक 'जीवधन किल्ला' आजही 'शहाजी महाराजांच्या' स्वराज्य निर्माण करण्याच्या संकल्पनेची साक्ष देत प्राचीन नाणेघाटावर लक्ष देत आजही एका पुराणपुरुषाप्रमाणे कोकण आणि देशावर लक्ष देत उभा आहे अश्या या थोडासा अवघड बनलेला किल्ला बघणे म्हणजे एक वेगळीच मजा आहे इंग्रजांनी तोडलेल्या पायऱ्यांंमुळे दुर्गम बनलेला 'जीवधन किल्ला' आज संवर्धन संस्थामुळे आणि वनखात्यामुळे नवीन श्वास घेत आहे अश्या या जीवधन किल्ल्याला भेट देणे म्हणजे एक पर्वणीच असते.

'जीवधन' किल्ल्याशेजारी असलेला सातवाहनकालीन प्राचीन 'नाणेघाट' 
              
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) बुरहाने मासीर उर्फ अहमदनगरची निजामशाही:- मूळ लेखक सय्यद अली तबातबा, अनुवाद भ.ग.कुंटे, पान क्रमांक ७-८, १०४.    
२) गुलशने इब्राहिमी:- मूळ लेखक फेरीश्ता, अनुवाद भ.ग.कुंटे, पान क्रमांक २८१.  
३) बसातीनूस्सलातीन उर्फ विजापूरची आदिलशाही:- मूळ लेखक मुहम्मद इब्राहीम अझ्झुबैरी, अनुवाद वा.सी.बेंद्रे, पान क्रमांक ३१५, ३२१-३२२.
४) श्री राजा शिवछत्रपती, खंड १, भाग १:- ग.भा.मेहेंदळे, पान क्रमांक ५७१.
५) पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्:- कवी जयराम पिंडे, संपादक श्री.स.म.दिवेकर, पुनरावृत्ती पान क्रमांक १४.
६) मोगल दरबारची बातमीपत्रे भाग २:- मराठी अनुवाद सेतूमाधवराव पगडी, पान क्रमांक २३२, ३३९-३४०.
७) मोगल दरबारची बातमीपत्रे भाग ३:- मराठी अनुवाद सेतूमाधवराव पगडी, पान क्रमांक ८०, ११५.
८) Gazeteer of the Bombay Presidency Volume XVIII, Part III, Poona 1883. Page No 140.
९) बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी भाग १, कलम ३९ आणि २५८.
१०) सह्याद्री:- स.आ. जोगळेकर पान क्रमांक ७१-७२, ७५, १८०, २८५, ३६५.
११) महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १ व २:- चिं.ग.गोगटे, संपादक अंकुर काळे, संतोष जाधव, संदीप तापकीर, पान क्रमांक ४०.
१२) जुन्नर शिवनेरी परिसर:- सुरेश वसंत जाधव, पान क्रमांक १५.

कसे जाल:-
पुणे – चाकण – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – जुन्नर – आपटाळे – घाटघर.                                
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   


                       
   

                    

    
       
   

2 comments:

  1. Best Information... Heartly Thank you ...

    ReplyDelete
  2. Informative ...amhi attach junnar mage varti chdun kalyan darvaja ne khali alo...sundar anubhav hota ..

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage