दामोदर हरी चापेकरांनी स्थापन केलेला 'गोफण्या मारुती'


पुण्यामध्ये विविध मारुती मंदिरे आहेत त्यांची नावे देखील गमतीशीर आहेत जसे की डुल्या मारुती, भांग्या मारुती अश्या या मारुतीच्या नावामागे छोटासा रंजक इतिहास आहे काही ठिकाणी काही अख्यायिका देखील आहेत. अश्या मारुतीपैकी एक महत्त्वाचा मारुती म्हणजे 'गोफण्या मारुती'. आता 'गोफण्या मारुती' का महत्त्वाचा किंवा त्याचे महत्त्व काय असे प्रश्न नक्की पडतील तर या मारुतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मारुतीची स्थापना ही 'दामोदर हरी चापेकर' यांनी केली आहे.

'दामोदर हरी चापेकर' यांचे घराणे हे मूळचे कोकणातले परंतु 'दामोदर हरी चापेकर' यांच्या जन्माच्या आधी त्यांचे वडील 'चिंचवड' येथे येऊन स्थायिक झाले. 'दामोदर चापेकर' यांचा जन्म चिंचवड इथलाच आहे. 'दामोदर चाफेकर' यांचे शिक्षण हे मॅट्रिक पर्यंत झाले होते. त्यांना दोन भाऊ देखील होते एकाचे नाव बाळकृष्ण तर दुसऱ्याचे नाव वासुदेव असे होते. 'दामोदर चापेकर' हे स्वतः किर्तन करत असत आणि त्यांना त्यांचे दोन्ही भाऊ साथ देत असत.

चापेकर बंधू यांचे छायाचित्र.
(छायाचित्र आंतरजालावरून घेतलेले आहे)

'दामोदर चापेकर' हे लहानपणापासून शिपाई बाण्याचे होते. या तीनही भावांची लहानपणापासून देशसेवा करायची ईच्छा होती. लष्करात भरती होण्यासाठी 'दामोदर चापेकर' यांनी खूप प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी क्रांती आणि शस्त्रास्त्रे यांच्याबद्दल अभ्यास करून जाणून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत असे. हीच शिकवण त्यांनी आपल्या भावाला म्हणजेच 'बाळकृष्ण' याला दिली. त्यानंतर 'रँड' याला मारण्यात या भावाने त्यांचे सहाय्य केले होते. जेव्हा 'दामोदर चापेकर' यांचे आत्मचरित्र वाचतो तेव्हा 'रँड' याला कसे मारले त्याला मारण्याची प्रेरणा 'दामोदर चाफेकर' यांना कुठून मिळाली हे सर्व आपल्याला समजण्यास मदत होते.

'दामोदर चापेकर' यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. 'दामोदर चापेकर' हे रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत तसेच रोज दीड तासांत १७ किलोमीटर धावत असत. ही त्यांची दौड लकडी पुलापासून खडकी स्टेशन पर्यंत देखील असे कधी कधी ते चिंचवडपर्यंत देखील जात असत. हे करत असताना त्यांनी मुलांना स्वदेशी खेळांची गोडी लावली कारण त्यांना 'क्रिकेट' हा खेळ आजिबात आवडत नसे 'क्रिकेट' खेळणारी ८ मुले त्यांनी आपल्या बाजूस वळवली.

ह्या मुलांना घेऊन त्यांनी 'पर्वतीच्या' खाली गोफण शिकविणे चालू केले. हे करता करता त्यांच्या भोवती अनेक तरुण जमा झाले. ही संख्या जवळपास १५० मुलांची झाली. यामध्ये त्यांनी मुलांना गोफण फेकण्याचे तीन भाग केले १) भुगामी २) मध्यगामी ३) आकाशगामी याचा उपयोग त्यांनी पुढे ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी केला हे सारे शिकवत असताना त्यांच्या मनात विचार आला की या सगळ्या मुलांना कोणतेतरी दैवत हवे त्याशिवाय त्यांना स्फूर्ती मिळणार नाही म्हणून त्यांनी 'पर्वतीच्या' इथे एक जागा निवडुंग साफ करून स्वच्छ केली आणि तिथे त्यांचे गोफण शिकवणे सुरू झाले.

पर्वतीवर एक लिंबाचे झाड होते तिथे दामोदर हरी चापेकरांनी 'गोफण्या मारुती' स्थापन केला. 

'पर्वतीच्या' इथे एक पाट गेला आहे त्याठिकाणी एक लिंबाचे झाड होते तिथे त्यांनी देव स्थापण्याची जागा बनवली. यासाठी त्यांनी शक्तीदैवत 'मारुती' ठरविले आणि मारुतीची मूर्ती कशी स्थापन करायची या विचारात पडले. तेव्हा ते एकेदिवशी रात्री झोपले असता त्यांना रात्री स्वप्नात मारुतीने दृष्टांत दिला आणि त्यामध्ये त्यांना तो मारुती म्हणाला "तुम्ही जी जागा तयार करीत आहात त्याठिकाणी मी आहे. मला शोधा मी येण्यास तयार आहे." हे स्वप्न पाहिल्यानंतर 'दामोदर चापेकर' हे उठून बसले व हे स्वप्न त्यांनी त्यांच्या भावाला देखील सांगितले तर हेच स्वप्न त्यांच्या भावाला देखील पडले होते.

दुसऱ्या दिवशी पर्वतीच्या इथे साफ केलेल्या जागेवर जे लिंबाचे झाड होते तिथे त्यांनी खड्डा खणायला सुरुवात केली आणि त्याठिकाणी मारुतीची मूर्ती त्यांना मिळाली. जेव्हा ही मारुतीची मूर्ती त्यांनी बाहेर काढली तेव्हा त्याच्यावरचे शेंदूराचे कवच गळून पडले आणि मूळ मूर्ती पाहायला मिळाली. या मारुतीच्या मूर्तीच्या एका हातामध्ये द्रोणागिरी पर्वत होता तर दुसऱ्या हातामध्ये गदा होती तर पायाखाली जंबूमळी होती असे या मूर्तीचे वर्णन 'दामोदर चापेकर' यांनी त्यांच्या आत्मवृत्तात केलेले आहे. याच गोफण्या मारुतीवर त्यांनी आरती देखील रचली ती पुढीलप्रमाणे:-

।। आरती गोफण्यामारुतिची ।। चाल ।। आरती भुवनसुंदराची ।।

आरती मारुति पदकमला करुनी तरु सुखेभवाब्धीला।। धृ ।। जन्माता फलशंके रविला घेतली उडी धरायाला ।। हर्षे भुभूकार केला तो भु भरुनी नभी गेला ।। चाल ।। दचकले सर्व याहूनि सर्व देव हातगर्व, करिती स्तव स्तुतीला, आला मोद बहुत कवीला ।। १ ।। आ ।। तो नर भजेल हनुमंता, तयाची कोण करील समता ।। नसे त्या दैन्य दुरित चिंता भूवरी कोण त्यासी जेता ।। चाल ।। जलधीचे नीर लंघुनि तीर पाऊनी धीर, देत राम सतिला, झाला मोद बहुत कवीला ।। २ आ ।। सूत दामोदर वदला, गोफण्या मारुति मज वळला म्हणुनी आलासी पर्वती पासी, दीन आम्हासी, साह्यकारी झाला म्हणुनी हर्ष आम्हाला झाला ।। आरती मारुती पद ।।

अशी ही गोफण्या मारुतीची आरती रोज पर्वतीच्या खालच्या बाजूस होत असे. 'गोफण्या मारुतीचे' पुढे या मंडळाने मंदिर देखील बांधले तेथे मंदिरावर लिहिण्यात आले 

।। स्वधर्म निधनं श्रेय: पराधर्मो भयावह: गोफण्यामारुति की जय ।।असा हा ऐतिहासिक 'गोफण्या मारुती' सध्या आहे तो पुण्याच्या बुधवार पेठेतील 'फरासखाना पोलीस स्टेशन' मध्ये. काहींच्या मते 'गोफण्या मारुती' हा फरासखान्यामध्ये स्थापन केला गेला कारण तेथे आपल्या बरोबरच्या मुलांना गोफण शिकवण्यासाठी चापेकर यांनी 'गोफण वर्ग' चालू केले परंतु याला कोणताही पुरावा नाही. इ.स. १८१८ नंतर फरासखाना या इमारतीचा उपयोग हा कैदी ठेवण्यासाठी करण्यात आला.

रँड वधानंतर फरासखान्यामध्ये तुरुंगात असताना चापेकरांनी पर्वती येथे स्थापन केलेला हा 'गोफण्या मारुती' मागवून घेतला आणि त्याच्यानंतर तो मारुती तिथेच वास्तव्य करून राहिला असा हा ऐतिहासिक 'गोफण्या मारुती' आपल्याला आजही 'फरासखाना' पोलीस स्टेशन मध्ये पाहायला मिळतो. फरासखान्यातील सर्व पोलीस आजही या मारुतीची नित्यनियमाने पूजा करतात.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) हुतात्मा दामोदर हरी चापेकर यांचे आत्मवृत्त:- संपादक वि.गो.खोबरेकर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, १९७४.

(टीप:- 'गोफण्या मारुती' पाहायचा असल्यास पोलिसांची परमिशन घ्यावी लागते.)

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

 लिखाण आणि  छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage