दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडाचे नामाभिधान' याचा मागोवा


पुणे, ठाणे आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला 'हरिश्चंद्रगड' हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या गडासंबंधित बऱ्याच पौराणिक आख्यायिका आहेत तसेच गडावर प्राचीन मंदिरे देखील आहेत. हा 'हरिश्चंद्रगड' मुळातच प्रसिद्ध आहे तो त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. त्यामुळे या ऐतिहासिक 'हरिश्चंद्रगडावर' कायमच दुर्गभटक्यांची गर्दी असते. याच 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला १३ व्या शतकातील मंदिरे देखील पहावयास मिळतात. अश्या या 'हरिश्चंद्रगडाचे' नामाभिधान' कसे पडले हा प्रश्न नेहमी सर्व लोकांना पडतो त्यासाठी एक आख्यायिका कायम सांगितली जाते. ती सत्यवान 'हरीश्चंद्र' राजाची परंतु त्याला कोणताही पुरावा मिळत नाही.

'हरीश्चंद्र' हा मुख्यत्वे पौराणिक परंपरेनुसार सुर्यवंशातील 'त्रिशंकू' याचा मुलगा. त्याची राजधानी हि 'अयोध्या' होती. या 'हरिश्चंद्र' राजाने दक्षिण भारतामध्ये असलेल्या 'अहमदनगर जिल्ह्यात' किल्ला का बांधावा? हा देखील मोठा प्रश्न आहे. या संबंधात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणे फार महत्वाचे ठरेल. नासिक मधील अंजनेरी गावामध्ये काही वर्षांपूर्वी दोन ताम्रपट सापडले होते. हे ताम्रपट 'हरिश्चंद्रवंशी भोगशक्ती' या राजाचे होते. या 'हरिश्चंद्रवंशी भोगशक्ती' राजाच्या ताम्रपटामध्ये ८ व्या ओळीमध्ये जो उल्लेख आलेला आहे तो पुढीलप्रमाणे:- 

                भोगशक्ती याचा अंजनेरी ताम्रपट पहिली प्लेट 
 ८. हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत: शरदु[प] गमप्रसन्न मन्डलश्चन्द्रमा इव प्र-  
          (यामध्ये ८ व्या ओळीत उल्लेख आहे)

म्हणजेच स्वामीचंन्द्राला 'हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत:' हरीश्चंद्र वंशाला भूषण झालेला असे विशेषण लावलेले दिसते म्हणजेच हा 'हरीश्चंद्र' हा त्याचा पूर्वज असावा असे दिसते. या ताम्रपटांमध्ये 'कलचुरी-चेदि' संवत् ४६१ म्हणजेच इ.स. ७१०-७११ चा उल्लेख आहे. या ताम्रपटाचा उद्देश हा भोगशक्तीने जयपूरनगरात बांधलेल्या नारायणाच्या म्हणजेच विष्णूच्या पूजेकरिता, मार्गशीर्ष महिन्यामधील त्याच्या यात्रेकरिता, देवळाच्या डागडुजीकरिता आणि त्याच्याशी संलग्न असे अन्नछत्र चालविण्याकरिता नासिक जिल्हा आणि उत्तर कोकण या भागातील काही प्रदेशांवर बसविलेल्या करांचा निर्देश करणे हा आहे. तसेच दुसऱ्या एका काळाचा उल्लेख नसलेल्या ताम्रपटात नासिक जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेल्या समगिरीपट्टनातील व्यापाऱ्यांना दिलेल्या काही सवलती आणि तेथील गुन्ह्यांकरिता अपराध्यांना करावयाच्या दंडांंबद्दल दिलेले निर्देश आहेत. 

स्वमिचंद्र याचा मानलेला पूर्वज हा पुराणांंमध्ये प्रसिद्ध असलेला 'हरिश्चंद्र' असावा असे वाटते. परंतु हा पौराणिक राजा नव्हता. 'हरिश्चंद्र' याचे नाव केवळ अकोल्याजवळील पर्वताला दिलेले नसून तिथे 'हरिश्चंद्रेश्वर' नावाचे शंकराचे मंदिर देखील आहे आणि ते मंदिर हे १३ व्या शतकातील आहे हे 'चांगा वटेश्वर' यांच्या  'तत्वसार ग्रंथातील' काही काही उताऱ्यावरून सिद्ध होते याबाबत डॉ. वि. भि. कोलते यांनी हा 'चांगा वटेश्वर' याचा उतारा देखील दिलेला आहे त्यावरून स्पष्ट होतो. 

भोगशक्ती याचा अंजनेरी ताम्रपट दुसरी प्लेट 


हे देवालय 'हरिश्चंद्र' नामक ऐतिहासिक राजपुरुषाने बांधलेले असून तेथे प्रतिष्ठापना केलेल्या भगवान शंकराच्या लिंगाला आपले नाव दिले असे होते असे दिसून येते. महाराष्ट्राच्या नव्हे तर  भारताच्या इतिहासात असे दिसून येते कि प्राचीन देवालये बांधणाऱ्यांंनी त्यातील देवतांना आपली नावे दिलेली दिसतात. म्हणूनच हरीश्चंद्रगडावर असणाऱ्या शंकराच्या लिंगाला 'हरिश्चंद्रेश्वर' आणि 'हरिश्चंद्रगडाला' हरिश्चंद्र नावाच्या ऐतिहासिक पुरुषावरून पडले असावे असे वाटते.

'हरिश्चंद्र' राजाचे राज्य अहमदनगर आणि नासिक या जिल्ह्यांवर असावे असे वाटते. कारण या 'हरिश्चंद्र' राजाच्या नावाने सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला 'हरिश्चंद्रगड' हा अहमदनगर जिल्ह्यात असून त्याच्या वंशजांचे ताम्रपट हे नासिक मध्ये सापडलेले आहेत आणि पुढे त्यांचीच सत्ता हि उत्तर कोकणावर देखील पसरलेली पाहायला मिळते.


भोगशक्ती याचा अंजनेरी ताम्रपट तिसरी प्लेट 

आता हा 'हरिश्चंद्र' राजा कधी होऊन गेला याचा कालखंड निश्चित करणे कठीण आहे परंतु याचा वंशज 'भोगशक्ती' हा इ.स. ८ व्या शतकाच्या सुरुवातीस राज्य करीत होता हे मात्र त्याच्या ताम्रपटावरून समजते. 'भोगशक्तीच्या' अगोदरच्या दोन पूर्वजांचे उल्लेख ताम्रपटात आहेत परंतु त्यांच्या किती अगोदर हा 'हरिश्चंद्र' होऊन गेला याबाबत मात्र निश्चितपणे माहिती मात्र मिळत नाही.  


भोगशक्ती याचा अंजनेरी ताम्रपटावरील लेख.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Corpus Inscriptionum Indicarum Vol. 4 pt 1. Inscriptions of the Kalchuri Chedi Era Page:- Editor V.V. Mirashi 1955. Page No 154 to 159.

२) संशोधन मुक्तावली भाग ६ वा:- पान १५४ ते १५६ , वा.वि. मिराशी १९७२.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

 लिखाण आणि  छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा   

3 comments:

  1. खूप छान माहिती,

    ReplyDelete
  2. धन्यवाद अनुराग या विषयाला चालना दिल्याबद्दल!
    हरिश्चंद्रगड ही महाराष्ट्राची महत्वपूर्ण सास्कृतिक ओळख आहे. १६७०च्या सुमरास मोगलांविरुद्द झंझावात निर्माण करताना शिवाजी महाराजांनी घेतलेल्या गडांत याचाही समावेश होता.

    डॉ. वि.वा.मिराशी यांनी, 'हरिश्चंदगडाच्या नावाचा शोध', हे टिपण लिहून ठेवले आहे. त्यात त्यांनीही अंजनेरी ताम्रपटात उल्लेख असलेल्या भोगशक्ती राजाच्या हरिश्चंद्र राजाने हरिश्चंद्रगड व त्यावरचे हरिश्चंद्रेश्वर देवालय बांधले असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे.
    इसवीसनाच्या पाचव्या शतकात नाशिक प्रदेशावर त्रैकुटकांची सत्ता होते. त्रैकुटकांची राजधानी नाशिकपरिसरातील तीन शिखरांवरून हे त्रैकुटक नाम संबोधन दिल्याचे इतिहासकार मानतात...म्हणजे पाचव्या शतकाच्या वेळी हरिश्चंद्रगडावर किल्ला बांधलेला नसावा. असेल तर त्याचे नाव दुसरे काही असू शकते.
    त्यानंतर नाशिक परिसरावर कलचुरींचे राज्य होते. हे भोगशक्तीचे घराणे कलचुरींचे मांडलीक होते. स्वामीचंद्रन-सिंहवर्मन-भोगशक्ती अशी वंशावळ पाहिली तर पाचव्या शकतानंतर व स्वामीचंद्रनच्या काळापूर्वी हरिश्चंद्रगड व त्यावरील शिवालय बांधले गेले असावे असे अनूमान काढले जाते.
    आता हा हरिश्चंद्र पौराणिक वांङमयात उल्लेख असलेला अयोध्येचा प्रसिद्ध राजा हरिश्चंद्र नाही असे गृहत धरले तरी भोगशक्तीचा ऐतिहासिक वंशज हरिश्चंद्राच्या माहितीची उकल होणे गरजेचे आहे. त्यात्या पत्नीचेही नाव तारामती मुलाचे नाव रोहीदास होते का? हे समजणे गरजेचे आहे. तारामतीचे शिखर हे नाव कशावरून पडले? रोहीदासचा व डोंबाचा डोंगर कोकणकड्याच्या अनुक्रमे डावी व उजवीकडे आहेत. त्यापैकी रोहीदासवर आम्ही यापूर्वी दोनदा जाऊन आलो, परंतू तिथे हरिश्चंद्रगडावर दिसतात तसे बांधकामाचे कुठलेच अवशेष दिसत नाहीत. पाण्याचे एकही टाके नाही की, खडकात खोदलेल्या पायर्‍या.
    या मोसमात आम्ही डोंबाच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या धारखिंड नावाच्या गावात जाऊन आलो, तिथे चौकशी केली तेव्हा डोंबाच्या डोंगरावर कुठलेच अवशेष नसल्याची माहिती मिळाली. अर्थात वर एकदा जाऊन यावे लागेल...तथापी तारामतीच्या शिखरावर जुने शिवलिंग आहे व काही अनगड दैवते आहेत...

    ReplyDelete
  3. खूप छान आणि उपयुक्त माहिती सत्वशील राजा हरीचंद्रचा तसा शोधातून काही सापडत नाही पण जो ताम्रपटात हरीचंद्र कोन हा उनुतरीत प्रश्न
    आमच्याकडे एक अख्याईका सांगितली जाते ती अशी
    हरीचंद्र हा मूळचा आयोध्या येथील, ज्यावेळेस हरीचंद्राची सत्वपरीक्षा पहिली गेली आणि तो हरीचंद्रराजा त्याचा कर्तव्यनिष्ठ आणि सत्य यासाठी खरं ठरला
    मग विश्वमित्र ऋषींनी राजाला हवं ते मागायला सांगितलं
    राजाने अदबीने उत्तर दिलं
    मी राजा होतो मी श्रीमंती खूप पाहिलीय, मला तीही नको
    आणि गरिबी तर इतकी की ती कोणाला येऊ नये म्हणून मला तीही नको
    गरिबी आणि श्रीमंती यात मला आत्मिक समाधान दिसलं नाही
    याचा पेक्षा वेगळे काही असेल तर द्या
    विश्र्वमित्र ऋषींनी याचं दंडक अरण्यात तप केले होते कदाचित ही जागा ती असेलही
    जिथे त्यांनी तप केलं तिथे जाऊन उरलेलं आयुष्य घालवण्यासाठी विश्र्वमित्र यांनी सूचित केले होते
    कदाचित असही होऊ शकते
    आणि ती जागा नंतर ....
    Harichandragad बदलल बरेच प्रस्नं उनुतरित आहेत

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage