सिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठश्यांंवरील 'घुमटी संबंधित महत्वाचे पत्र'


'सिंधुदुर्ग किल्ला' म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एक महत्वाचा मुकुटमणी. जेव्हा शिवाजी महाराजांची नजर मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' पडली तेव्हाच त्यांच्या मनात 'कुरटे बेटाची' जागा मनात भरली आणि 'चौऱ्याऐंंशी बंदरी ऐसी जागा नाही' असा शिवाजी महाराजांनी आदेश दिला. दिनांक १० नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणच्या किनाऱ्यावर श्री गणेशाचे पूजन केले गेले आणि सोन्याचा नारळ समुद्रास अर्पण करून 'सिंधुदुर्ग किल्ल्याची' पायाभरणी सुरु झाली. मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' तीन वर्षांनंतर जवळपास १ कोटी होन खर्च होऊन शिवाजी महाराजांनी बनवलेला 'सिंधुदुर्ग किल्ला' तयार झाला आणि मुरुड जंजीरा येथील सिद्धी, मुंबई मधील इंग्रज, आणि गोव्यातील पोर्तुगीज यांना खूप मोठी जरब बसली. 

मालवणपासून अगदी जवळ असलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून एका महत्वाच्या कारणासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे या एकमेव किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा 'उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा' पाहायला मिळतो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे मंदिर देखील पाहायला मिळते. सिंधुदुर्ग किल्ल्यामधील शिवाजी महाराजांच्या 'उजव्या हाताच्या आणि डाव्या पायाच्या' ठसे असलेल्या घुमटी आपल्याला पहायच्या असतील तर आपण सिंधुदुर्ग किल्ल्यामधील नगारखाना पाहून डाव्या बुरुजाजावळ आलो कि आपल्याला दोन छोट्या घुमट्या पाहायला मिळतात. त्यातील एक घुमटी हि गडाच्या तटावर असून दुसरी घुमटी हि गडाच्या तटाखाली बांधलेल्या आपल्याला पहायला मिळते. सिंधुदुर्ग किल्ल्यामधील अत्यंत महत्वाचे असलेले हे अवशेष आहेत. सध्या या हाताच्या आणि पायाच्या ठसे असलेल्या घूमट्यांना पुरातत्व खात्याने दरवाजे बसवून बंद केले आहेत त्यामुळे शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा असे दोन्ही ठसे हे अत्यंत व्यवस्थित रीतीने सुरक्षित आहेत.

शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला.

शिवाजी महाराजांच्या 'उजव्या हाताच्या आणि डाव्या पायाच्या' ठश्याबद्दल असे सांगितले जाते कि "सिंधूदुर्ग किल्ला उभारत असताना स्वत: शिवाजी महाराज सिंधुदुर्ग किल्ल्याची पहाणी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस चुन्याच्या ओल्या लादीवर शिवाजी महाराजांचा डावा पाय पडला तेथे त्यांच्या डाव्या पायाचा ठसा उमटला आणि तेथून पुढे बुरुजावर जात असताना शिवाजी महाराजांनी मुंढारीचा आधार घेतला  तेव्हा तेथील काम देखील ओले होते म्हणून त्याठिकाणी देखील महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा उमटला. तेथे काम करणाऱ्या गवंड्याने त्याच्यावर थापी न फिरवता ते तसेच राहू दिले." अशी कथा आपल्याला सांगितली जाते. 

परंतु याच शिवाजी महाराजांच्या 'उजव्या हाताच्या आणि डाव्या पायाच्या' ठश्यांवर असलेल्या घुमट्यांंच्या संबंधात एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे. ह्या घुमट्या या छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची पत्नी महाराणी जिजाबाई यांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुभेदार येसाजी शिंदे यांना लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी या 'उजव्या हाताच्या ठश्यावर' गच्ची आणि कोनाडा बांधावा आणि नैवेद्य आणि पूजा चालू करावी अशी आज्ञा पत्रात करण्यात आलेली आहे. या पत्रावरून वरील ठसे हे शिवाजी महाराजांचे आहेत हे तर सिद्ध होतेच परंतु त्याच्यावरील घुमट्या कोणी बांधल्या हे देखील सिद्ध होते. 

शिवाजी महाराजांच्या 'उजव्या हाताचा ठसा'. 

छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची पत्नी महाराणी जिजाबाई यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुभेदार येसाजी शिंदे यांना दिनांक २१ नोव्हेंबर १७६३ रोजी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे:-

श्री  शंभू प्रा ||

        श्री मन्माहाराज मातुश्री ------- आईसाहेब याणी चिरंजीव राजश्री येसाजी सिंदे सुभेदार यासी आज्ञा केली केली यैसीजे. सु|| आर्बा सितैन मया व अलफ. तुम्ही विनंतीपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण जाहला. साहेबाची आज्ञा घेऊन निघालो ते गुरुवारी तडीस राहोन जंजिरातील कारभारी व नाइकवडी भृगुवारी येऊन जंजिरा घेऊन गेले म्हणोन लिहिले. त्यावरून संतोष जाहला. फिरंगी गोमंतकाहून आरमारसुद्धा येऊन जंजिरासी मातवर युध केले. साहेबाच्या सेवक लोकींही त्याचा मार सोसून आपणाकडील जंजिराकडील तोफानी मारगिरी करून पाचच्यारसेहे फिरंगी मारून नेस्तनाबूद केला. तन्मुले फिरंगी कांही लबडी (?) मार न सोसे यास्तव हतधैर्य होत्साता पलायेन संपादिले जंजिऱ्याच्या लोकास येश आले. मदुर्मिची सर्त जाहली. असा आकस्मात दंगा कधीही न जाहला. आणि या प्रमाणेंं गलिमाचे पारिपत्येही केले नाही. साहेबी दोनी हजार स्वर व पाच हजार हशम तयार करून खासा स्वारी सित्ध जाहाली. तो भवानजी कदम यासमागमे किलाची खुशालीची विनंती पत्रे आली. त्यावरून स्वारी तहकुब जाहली. पुढे फौजे रवाना केली आहे ती ही येऊन पावली असल. तीर्थरूप कैलासवासी माहाराज राजश्री-छेत्रपती याचा हात (?) जंजिरा आहे त्याजवरी गची व कोनाडा बांधोन नैव्यद्य व पूजा चाले सारिखी करणे. याविसी अंतर न करणे जाणिजे र|| छ १५ माहे जमादिलावल लेखन सीमा.

                                                                                                                                  लेखन सीमा

पत्राचा आशय:-

दिनांक २१/११/१७६३

पोर्तुगीज आरमाराने जंजिरे सिंधुदुर्गावर कसा हल्ला केला. जंजिऱ्यातील शिबंदीने पोर्तुगीजांचा शौर्याने प्रतिकार करून चार पाचशे फिरंगी कसे ठार केले आणि मग फिरंगी कसे पळून गेले, तो वृत्तांत येसाजी शिंदे सुभेदार यांनी महाराणी जिजाबाई यांना कळविला होता. महाराणी जिजाबाई पत्रोत्ततरी येसाजी शिंदे सुभेदार यास कळवितात की, सिंधुदुर्गच्या कुमकेसाठी सैन्य तयार केले होते. परंतु फिरंगी पळून गेल्याने स्वारी तहकूब केली. जंजिऱ्यात कैलासवासी महाराज राजश्री छत्रपती यांचा हात आहे त्यावर गच्ची व कोनाडा बांधून नैवैद्य व पूजा चालू करावी अशी आज्ञा पत्रात करण्यात आलेली आहे.

यावरूनच सिंधुदुर्ग किल्ल्यामधील शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठश्यांंवरील 'घुमटी संबंधित महत्वाचे पत्र'  आपल्याला किती महत्वाचे आहे हे कळते. या पत्रावरूनच आपल्याला शिवाजी महाराजांच्या 'उजव्या हाताच्या आणि डाव्या पायाच्या ठश्याबाबत' हे पत्र फार महत्वाचे ठरते.

शिवाजी महाराजांच्या 'डाव्या पायाचा ठसा'.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) जिजाबाई कालीन कागदपत्रे:- पान क्रमांक १५७ आणि १५८, डॉ. आप्पासाहेब पवार. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. 

कसे जाल:-
पुणे - सातारा - कराड - कोल्हापूर - फोंडा घाट - रामगड - मालवण
   
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

 लिखाण आणि  छायाचित्रे  © २०१९  महाराष्ट्राची शोधयात्रा             

                

    


                

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage