'मुंबई' शहरामध्ये जेव्हा रेल्वे येते.


मुंबई मध्ये रेल्वेसाठी लोहमार्ग टाकण्याची सुरुवात हि दिनांक ३१ ऑक्टोबर १८५० रोजी सायन(शीव) येथे नामदार जे.पी.विलधबी यांच्या हस्ते करण्यात आले आणि दिनांक १६ एप्रिल १८५३ या दिवशी संपूर्ण भारतात रेल्वे पहिल्यांदा धावली आणि भारताने यंत्रयुगात प्रवेश केला. जेव्हा मुंबईमधून रेल्वे धावणार होती तेव्हा रेल्वेचे काम चालू असताना मुंबई आणि परिसरात 'रेल्वेच्या' स्वरूपाबद्दल खूप गमतीदार चर्चा चालत असे. 'बैल किंवा घोडे' नसलेले वाफेचे येणारे यंत्र कसे चालणार. लोखंडी रस्ते कसे करणार? काही लोकांना तर असाही प्रश्न पडला होता की ही 'भुताटकी' तर नाही ना? अशी देखील लोकांची चर्चा होत असे. 

मुंबई आणि ठाण्यामधल्या काही लोकांनी अशीही अफवा लोकांमध्ये पसरवली होती की 'लोखंडी सडके वर चालणारी ही वाफेवरची गाडी संपूर्ण भारताला खूप मोठा शाप आहे. 'गोविंद नारायण माडगावकर' यांनी त्यांच्या 'मुंबईचे वर्णन' या पुस्तकात देखील काही किस्से असे लिहिले आहेत की 'जेव्हा लोखंडी सडका बांधण्यास प्रारंभ झाला तेव्हा देखील कित्येक लोकांच्या मनात विकल्प आणण्याचे प्रयत्न मांडिले. कोणी अशी गप उठवावी की, कोठे कोठे दांपत्याचा बळी द्यावी पडती. दुसरी अशी बातमी बातमी सांगतात की कुठे कुठे लहान मुलाला सडकेखाली गाडावी लागतात. अश्या एकापेक्षा एक कल्पना काढून लोकांना घाबरवून सोडले जात होते.

रेल्वेचे पहिले वाफेचे इंजिन. छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. 

जेव्हा खोपोलीचा रेल्वे ट्रॅक बनवला जात होता तेव्हा एक अशी अफवा उठविली गेली ती खूप गाजली. खोपोलीच्या इथे एक राक्षस आहे त्याला बारा दांपत्याचा बळी द्यावा लागत आहे म्हणून शिपाई लोकं रस्त्यावरचे बायका, मुले यांना उचलून नेत आहेत. पण काही लोकांना हा अज्ञानपणा लक्षात आला. काही लोकांनी जे इंग्लंडला जाऊन आले होते त्यांना रेल्वे म्हणजे काय हे समजत होते ते लोकं देखील जनजागृती कारायचा प्रयत्न करीत होते.

इ.स. १८३२ साली इंग्लंड मध्ये रेल्वे सुरु झाली आणि एक महत्वाची क्रांती दळणवळण आणि वाहतुकीच्या साधनांंमध्ये झाली आणि साधारण १० वर्षानंतर भारतामध्ये रेल्वे सुरु करण्याचा विचार झाला आणि 'ग्रेट ईस्टर्न रेल्वे' कंपनीची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रमुख होते ते 'नाना शंकरशेट' आणि 'सर जमशेटजी जीजीभाई'. दिनांक १३ जुलै १८४४ रोजी या योजनेचा एक अर्ज ब्रिटीश सरकारकडे पाठविण्यात आला या अर्जावर 'नाना शंकरशेट' आणि 'सर जमशेटजी जीजीभाई' यांनी सह्या केल्या होत्या. भारतामध्ये जेव्हा रेल्वे आणण्याचा हा प्रयत्न चालू होता तेव्हाच इंग्लंड मधील लंडन येथे जून १८४५ मध्ये 'ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' हि कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीने 'मि. चापमन' यांना भारतामध्ये रेल्वेची पाहणी करण्यासाठी मुंबई येथे पाठविले.

भाईंदर खाडी पुलावरून रेल्वेचे वाफेचे इंजिन आणि रेल्वेचे डबे  धावताना.  
छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.  

थोडेच दिवसात ब्रिटिश लोकांनी वर्तमानपत्रातुन 'रेल्वे' संबंधीत जाहिराती द्यायला सुरुवात केली. ईस्ट इंडिया कंपनी रेल्वे बांधण्याची जबाबदारी घेईल की नाही हा देखील खूप मोठा प्रश्न होता. या बाबत मुंबई येथील टाऊन हॉल मध्ये दिनांक १९ एप्रिल १८४५ रोजी काही समविचारी लोकांची बैठक भरली. जी.टी. क्लार्क आणि हेन्री कॉनिबेअर या स्थापत्य विशारदांनी 'कुर्ला ते ठाणे' हा लोहमार्ग कसा बनवावा याबाबत संपूर्ण आखणी केली. संपूर्ण कुर्ला ते ठाणे या मार्गाचा आराखडा बनवला आणि या बैठकीमध्ये 'इनलँड रेल्वे असोसिएशन' ही रेल्वे संस्था स्थापन करण्यात आली.

'इनलँड रेल्वे असोसिएशन' ही रेल्वे संस्था १८४५ मध्ये स्थापन झाल्यावर मुंबई प्रांताचे मुख्य सचिव जे.पी. विलोबी आणि ए. एस आयर्टन हे तिचे प्रमुख बनले. या संस्थेच्या सदस्यांमध्ये करसेटजी कावसजी, बोमनजी होरमसजी वाडिया, जमशेटजीभाय, व्हीकाजी मेहेरजी, दादाभाई पेरूमजी वाडिया आणि जगन्नाथ शंकरशेट अश्या मोठ्या व्यक्तींचा समावेश होता. कंपनी सरकारने जुलै १८४८ मध्ये ३५ मैल लांबीची रेल्वे बांधण्याची परवानगी कंपनीस दिली. या रेल्वेच्या खर्चाचा अंदाज हा पाच लाख पौंड होता. त्या काळामध्ये कंपनीचे तीस लाख पौंडांचे तीस हजार शेअर्स लगेचच संपले. यामध्ये कंपनीचे भांडवल हे पन्नास लाख होते. याच्यापुर्वीच अमेरिका देशामध्ये रेल्वे सुरु होऊन जवळपास ५७४० मैलाचा रेल्वे लोहमार्ग सिद्ध झाला होता. या योजनेबाबत मुंबई मध्ये सुतोवाच झाले परंतु कंपनी सरकारमधील काही लोकांनी तसेच इंग्लंड मधील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी या नव्या कंपनीची सूत्रे आपल्या हातामध्ये ठेवली आणि कंपनीचे भांडवल हे दहा लाख पौंड केले. या कंपनीची कचेरी हि नाना शंकरशेट यांच्या वाड्यामध्ये ठेवली.   

रेल्वेचे वाफेचे इंजिन. छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.

रेल्वे बाबतचा सगळं तांत्रिक आणि प्रशासकीय अहवाल या समितीने इंग्लिश पार्लमेंट मध्ये मंजुरीसाठी ठेवला आणि दिनांक १ ऑगस्ट १८४९ मध्ये याला मंजुरी मिळाली आणि आशिया मधली पहिली 'दि ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे' बांधण्याचा निर्णय झाला. जेम्स स्टुअर्ट बर्कले, सी.बी.कार, आणि आर. डब्ल्यू. ग्रॅहम हे रेल्वेचे मुख्य अभियंता बनले. पण रेल्वे बाबत आपल्याकडे पसरलेल्या अनेक गैरसमजांनी आपल्याकडे परत अफवांचे पीक उठले. त्यातून परत एक अफवा अशी पसरवली गेली की 'लोखंडी सडका' या इंग्रज लोक मुद्दाम बनवत आहेत कारण या बांधल्यानंतर ते हिंदी लोकांना बुडवणार आहेत हा देशाला खूप मोठा शाप आहे. यात अजून एक अफवा अशी पसरली की इंग्रज लोक भारताला लुटण्यासाठी ही 'लोखंडी सडक' बनवत आहेत म्हणून ते आपल्याकडे द्रव्य मागत आहेत.

या अश्या बऱ्याच अफवा मोठ्या प्रमाणात उठल्या यांच्याकडे लक्ष न देता 'भायखळा येथून कुर्ला मार्गे ठाण्यापर्यंतचा' मार्ग या सगळ्या कालावधीत निश्चित करण्यात आला. तसेच भविष्याचा विचार करून ५ फूट ६ इंच रुंद ब्रॉडगेज लोहमार्ग बांधण्याचे निश्चित केले गेले. 'मेसर्स फॅविल आणि फाऊल्स' या इंजिनिअर असलेल्या ठेकेदारांना रेल्वे बांधण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली. एप्रिल १८५२ मध्ये इंग्लंड येथून समुद्रमार्गाने भारतामधील पहिले रेल्वे इंजिन मुंबई येथे उतरवले गेले.

पारसिकच्या बोगद्यामधून जुने इंजिन धावताना फोटो जवळपास १०० वर्षे जुना आहे.
छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे.

त्याकाळातील मुंबईचे गव्हर्नर 'फॉकलंड' यांचे नाव त्या रेल्वे इंजिनला देण्यात आले. यानंतर या इंजिनच्या काहीकाळ लोहमार्गावर चाचण्या घेतल्या गेल्या आणि लोहमार्ग योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यावर दिनांक १६ एप्रिल १८५३ यादिवशी भारतातील वाहतूक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक नोंद झाली. दुपारी ३.३० वाजता मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर 'फॉकलंड' हे आपल्या मित्र परिवरासह होते. तसेच गव्हर्नर 'फॉकलंड' यांच्यासोबत 'नाना शंकरशेट' हे देखील होते. इंग्लिश अधिकाऱ्यांच्या सोबत ह्या सगळ्या तत्कालीन मोठ्या व्यक्ती भायखळा येथून रेल्वेने ठाण्याकडे रवाना झाले. जेव्हा ही रेल्वे भायखळा येथून निघाली तेव्हा मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर 'फॉकलंड' यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. २१ मैल लांबीचा हा प्रवास १ तास १२ मिनिटांनी पूर्ण झाला.

ठाण्यामध्ये देखील मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर 'फॉकलंड' यांना मानवंदना दिली गेली आणि जेवण देखील दिले गेले. भायखळा येथून निघालेल्या या पहिल्या रेल्वे गाडीला त्याकाळात २० डबे होते आणि या डब्यांमधून दिनांक १६ एप्रिल १८५३ साली ४०० लोकांनी प्रवास केला. जेव्हा ही रेल्वे प्रत्येक स्थानकाच्या परिसरातून धावत होती तेव्हा हजारो लोकं ही रेल्वे बघायला प्रत्येक स्थानकावर जमत होती. प्रत्येक लोकांचा रेल्वे बघताना आश्चर्यकारक भाव आणि पडलेले प्रश्न म्हणजे 'इंजिन इतके मोठे रथ कसे हाकून नेत आहे'. तसेच ही पहिली रेल्वे ज्या स्थानकांवरून जात होती तेथे जमलेले हजारो लोक टाळ्या वाजवून या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करीत होते.

पहिल्या रेल्वेचे इंजिन. छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. 

दिनांक २ मे १८५३ च्या 'ज्ञानोदय' या अंकात या ऐतिहासिक रेल्वे बाबत एक कविता देखील छापून आली आहे ती पुढीलप्रमाणे:-

हिंदुस्थानी आगीची गाडी,
तिला बांधला मार्ग लोखंडी,
मनाचाही वेग मोडी,
मग कैची हत्ती घोडी,
पाहुनि झाली, माणसे वेडी,
पाऊण तासात, ठाण्यास धाडी
अधींं निघाली, युरोप खंडींं,
प्रसार मोठा, तिचा इंग्लंडी 
तेथून आली, भरत खंडी,
ऐशी तिचीही, कथा उदंडी,
अजून पसरेल, पिंडी ब्रम्हांडी,
वृद्ध तथापी, म्हणती लबाडी,
गरीबांचा, व्यापार मोडी,
हिंदूस्थाना, दरिद्र जोडी,
ऐसी म्हणते म्हणती, हिंदूखंडी, 
तिचा महिमा अखंडदंडी,
किती वाणुु मी, पामर तोंडी,
लोखंडी रस्ता झाला, व्यापार वाढवाया,   
सायबाचे पोरं मोठी अकली रे,
बिना बैलाची गाडी कशी हाकली रे।।


१५० वर्षापूर्वीचे ठाणे रेल्वे स्टेशन. छायाचित्र आंतरजालावरून घेतले आहे. 
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुंबईचे वर्णन:- गो. ना. माडगावकर, साकेत  प्रकाशन, २०११.
२) Gazetteer of The Bombay Presidency:- 1885. 
३) The Great Indian Railways:- Arup K Chattergi.
४) ज्ञानोदय अंक:- २ मे १८५३.      
५) India's Railway History:- John Hurd II and Ian J. Kerr.
६) मुंबईचा वृत्तांत:- बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे, संपादक बाबुराव नाईक, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, मुंबई, मूळआवृत्ती १८८९, पुनमुुद्रण २०११. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


4 comments:

  1. धन्यवाद खुप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे
    तरी खंडाळा घाटातील रेल्वे रस्ताबाबतची माहिती द्यावी

    ReplyDelete
  2. छान माहिती.धन्यवाद.

    ReplyDelete
  3. छान माहिती.धन्यवाद.

    ReplyDelete
  4. अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage