डोंगर भटक्यांचा आवडता ट्रेक 'कात्रज ते सिंहगड'


पुणे आणि परिसराला भौगोलिक दृष्ट्या चारही बाजूने टेकड्या लाभलेल्या आहेत तसेच या सर्व टेकड्यांमध्ये  मानबिंदू असलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला हा देखील पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पुणेकरांचे अत्यंत लाडके स्थान आहे. सिंहगडावर जाण्यासाठी प्रचलित मार्ग प्रसिद्ध आहेत परंतु ज्यांना गिर्यारोहणासाठी हिमालयात जायचे असेल किंवा स्वत:चा स्टॅॅमिना पहायचा असेल तर पुण्यातील किंवा मुंबईमधील डोंगर भटक्यांचा अत्यंत आवडता ट्रेक असतो तो म्हणजे 'कात्रज ते सिंहगड'.

आता 'कात्रज' म्हटले कि पुणेकरांना पहिले दिसते ते कात्रजचे 'सर्पोदयान' किंवा कात्रज येथील प्रसिद्ध 'दुध डेअरी'. मात्र 'कात्रज घाटाचे' नाव जरी घेतले तरी प्रत्येक पुणेकराच्या तोंडी येतो तो शिवाजी महाराजांचा पराक्रम. जेव्हा शाईस्ताखान याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिनांक ६ एप्रिल १६६३ रोजी चैत्र शु. अष्टमीच्या दिवशी रात्री लाल महालावर छापा घातला. शिवाजी महाराजांच्या अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये शाईस्तेखानाची तीन बोटे मात्र तुटली. थोडक्यात त्याचे मरण या तीन बोटांवर निभावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे पुण्यामधील लाल महालामध्ये एक ह्ल्लकल्लोळ माजला. 

सर्व टेकड्यांमध्ये  मानबिंदू असलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला हा देखील पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर आहे.

याचाच फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत असलेली मंडळी थेट पळाली ती कोंडाणा उर्फ सिंहगड किल्ल्याच्या दिशेने. जेव्हा मुघलांच्या फौजा या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करत निघाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठरलेल्या बेताप्रमाणे याच 'कात्रज' गावाच्या डोंगरात बैलांच्या शिंगाना पेटते पलिते बांधून उधळवून मोगलांच्या सैन्याच्या दिशेने सोडले. ह्या महत्वाच्या घटनेचे स्मरण करून देणारा हा ऐतिहासिक घाट आजही या घटनेची साक्ष देत आहे. अश्या या ऐतिहासिक कात्रजच्या घाटाने आपल्याला सिंहगडावर जाता येते. 

कात्रजच्या घाटामधून जर सिंहगड आपल्याला गाठायचा असेल तर आपण स्वारगेट येथून सातारा येथे जाणारी एस.टी किंवा नसरापूर या गावी जाणाऱ्या जीप यांनी कात्रजच्या जुन्या घाटाच्या बोगद्याच्या इथे पायउतार व्हावे. एस.टी तसेच जीप आपल्याला या जुन्या कात्रजच्या बोगद्याच्या इथे सोडतात. शक्यतो हा कात्रज ते सिंहगड हा ट्रेक पुणेकर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात करतात. त्याचे कारण असे कि स्वच्छ चंद्रप्रकाशात कुठेही आपल्याला बॅॅटरीची गरज लागत नाही परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅॅटरी सोबत असलेली कधीपण चांगली. 'कात्रज घाटातील' हा बोगदा दळणवळण सुखकर व्हावे यासाठी इ.स. १८६४ साली खोदलेला आहे. इ.स. १९२६ साली या बोगद्यामधून रस्त्याचे डांबरीकरण झाले. येथूनच थोडेसे वर चढून गेले असता आपल्याला जुने वाघजाईचे मंदिर लागते. एवढ्यात या मंदिराची नव्याने बांधणी झालेली आहे.

कात्रज ते सिंहगड करताना रात्री काढलेले छायाचित्र.

'कात्रज' हे भुलेश्वर-सिंहगड डोंगररांगेतील अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. या वाघजाई मंदिराच्या येथून आपल्याला विस्तारलेले पुणे आणि पर्वती यांचा देखणा नजारा पहावयास  मिळतो. रात्रीच्या वेळेस हे दृश्य अत्यंत सुंदर असते. याच वाघजाई मंदिराच्या परीसरात एक पाण्याचे जुने टाके देखील आहे. तसेच या परिसरामध्ये ससे, कोल्हे आणि भेकरे दिसल्याची नोंद देखील वन्यजीव अभ्यासकांनी केलेली आहे. वाघजाई मंदिराच्या इथून सुरु होणारे सिंहगड पर्यंतचे पदभ्रमण हे जवळपास १६ किलोमीटर अंतराचे आहे. त्यामुळे हे 'कात्रज ते सिंहगड' पदभ्रमण करताना कमीत कमी ३ लिटर पाणी जवळ असणे कधीपण आवश्यक आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे वाटेत कुठेही आपल्याला पाणी मिळत नाही. भर पावसाळ्यात हे पदभ्रमण केले तर वेगवेगळी उमललेली फुले आपल्याला बघायला मिळतात.

या 'वाघजाई' मंदिराच्या वाटेवरून थोडे पदभ्रमण करून पुढे आले असता आपण एका जोड शिखराच्या टेकडीवर जातो यातील पूर्वेकडे जे शिखर आहे त्याचे नाव 'गोकूळ' आहे आणि तीव्र उतारावर पश्चिमेकडे आहे ते 'वृंदावन'. अशी या शिखरांची नावे आहेत. यातील 'गोकुळ' शिखराची समुद्र सपाटीपासून उंची हि जवळपास ११५४ मीटर आहे. या 'गोकुळ' शिखरावरून नैऋत्य पश्चिमेला उभा आहे तो प्राचीन 'कोंडाणा' उर्फ 'सिंहगड'. सिंहगड मुळातच प्रसिद्ध आहे तो 'नरवीर तानाजी मालुसरे' यांच्या पराक्रमामुळे. तसेच सिंहगडावर 'नरवीर तानाजी मालुसरे' यांची समाधी देखील आहे. 

कात्रज ते सिंहगड करताना सकाळचा सूर्योदय. 

'गोकुळ-वृंदावन' या जोडशिखरांच्या येथून पदभ्रमण करण्यास सुरुवात केली कि येणाऱ्या जवळपास १३ टेकड्या आपल्याला चालत जायचे असते. 'गोकुळ' शिखरावरून 'वृंदावन' शिखर गाठायला आजिबात वेळ लागत नाही. मात्र याची उतराई जे पहिल्यांदा पदभ्रमणाला आलेले असतात किंवा घाबरणारे असतात त्यांची मात्र टर उडवते हे नक्की अश्या वेळेस या लोकांना नेहमी मदत करून एकमेकांच्या साह्याने खाली घेणे आणी धीर देणे कधीही चांगले असते. येथून खाली आलो असता एक छोटी खिंड आपल्याला लागते. हि खिंड पार केली कि 'ससेवाडी' येथील घरे आपल्याला दिसतात तसेच उजवीकडे कोळीवाड्याची घरे आपल्याला दिसतात. इथे कुठेही आपण न वळता सरळ मधल्या पाऊलवाटेने पुढे चालत गेले असता आपल्याला तेथेच उजवीकडे लांब पसरलेला एक डोंगर दिसतो त्याला 'खंडोबाचा दांड' असे म्हणतात. येथून पुढे आपण सरळ चालत जावे नंतर एक टेकडी चढली कि या टेकडीवरून दुरवर डाव्या बाजूस खेड शिवापूरच्या टोलनाक्याचे सुंदर दृश्य दिसते. 

या टेकडीवरून चार टेकड्या आणि दोन खिंडी आपल्याला ओलांडाव्या लागतात. येथे मध्ये कधी कधी वाटेमध्ये आपल्याला ससे मात्र हळूच दर्शन देऊन जातात. या टेकड्या उतरून आलो कि आपल्याला डावीकडे 'सणसवाडी' गावात जाणारी एक वाट लागते तर उजवीकडे 'नांदोशी' गावाकडे जाणारी पाऊलवाट लागते. परंतु येथे देखील एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे आपल्याला सरळ चालत जायचे आहे कोठेही वळायचे नाही. येथून पुढे गेल्यास एक छातीवर येणारा चढ चढून समुद्रसपाटीपासून जवळपास ११२५ मीटर उंचीचा डोंगरमाथा गाठावा. येथूनच उजवीकडे पाहिले असता आपल्याला संपूर्ण पुण्याला पाणी पुरवणाऱ्या 'खडकवासला' धरणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळते तसेच त्याच्या पलीकडे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' म्हणजेच (National Defence  Academy) याचा 'सुदान ब्लॉक' देखील दिसतो. यासाठी हवा स्वच्छ असणे गरजेचे आहे. एवढे अंतर चालून आलो असताना सिंहगड मात्र आपल्याला सतत खुणावत असतो. 

सकाळी जेव्हा सिंहगडाचे दर्शन होते.

जवळपास अर्धे अंतर चालून आल्यावर थकवा मात्र जाणवायला सुरुवात होते परंतु अजून आपल्याला बरेच चालायचे असते. येथून थोडे पुढे चालत आलो असता आपल्याला आपल्याला 'मुक्तुंग' नावाचे एक शिखर लागते. या शिखरावर जाण्यासाठी आपल्याला एक खोलवर चढ उतार असलेली खिंड वर चढून यावे लागते. या गर्द झाडी असलेल्या खिंडीचे नाव 'सीताबाई' असे आहे. या 'सीताबाईच्या' खिंडीमध्ये एक शेंदूर लावलेला दगड आहे त्याचे 'कोळीबाबा' असे आहे. या सीताबाईच्या खिंडीमधून एक वाट डावीकडे 'आर्वी' या गावात जाते तर दुसरी उजवीकडे जाणारी वाट हि 'डोणजे' गावामध्ये जाते. परंतु आपण या खिंडीमध्ये 'कोळीबाबा' याचे दर्शन घेऊन आपण 'मुक्तुंग' शिखर गाठावे. 'मुक्तुंग' शिखराच्या इथपर्यंत आल्यावर दमछाक नक्कीच झालेली असते. तसेच येथे थांबून थोडी विश्रांती घेऊन आपल्याला 'सिंहगड' कधी गाठतो असे नक्कीच होते.

हे 'मुक्तुंग' शिखर सोडल्यावर एक उतार येतो या उतारावर बरीच झाडी आहेत त्यामुळे थोडे सुसह्य नक्कीच होते. इथून पुढे आपण थोडेसे चालत गेल्यावर आपली मंदावलेली चाल आणि थकलेले शरीर आपल्याला रेटत रेटत 'डोणजे-गोळेवाडी' या गाडी रस्त्यावर नेऊन पोहोचवितात. साधारणपणे 'कात्रज ते सिंहगड' हे अंतर पूर्ण करण्यासाठी आपल्याला ७ ते ८ तासाचा अवधी लागतो. परंतु जेव्हा आपण टेकड्यांच्या शिखरावरून चढ उतार करत जेव्हा गाडी रस्त्याजवळ येतो तेव्हा तो सपाटीचा गाडी रस्ता देखील आपल्याला नको नको होतो. हे सगळे पदभ्रमण करत आपण जेव्हा शेवटी 'सिंहगड किल्ला' गाठतो तेव्हा आपल्याला नक्कीच काहीतरी वेगळे मिळविल्याचा आनंद मिळतो आणी आपण केलेल्या या पदभ्रमणाचे सार्थक होते. 

सिंहगडावरून दिसणारे राजगड आणि तोरणा. 

जेव्हा सिंहगडावर आपण जातो तेव्हा आपली नजर कात्रजच्या डोंगराकडे वळते तेव्हा आपण किती चालत आलो हे नक्कीच लक्षात येते हे पाहत असताना त्याच्या पलीकडे दिसणारे 'पुरंदर आणि वज्रगड' किल्ले बघताना मात्र वेगळाच आनंद होतो हे नक्की. आजही पुण्यातील अनेक जातिवंत भटके हे हिमालयात जाण्याच्या पूर्व तयारीसाठी ह्या 'कात्रज ते सिंहगड' किल्ल्याच्या पाऊलवाटा तुडवीत आणि डोंगरशिखरे पार करतात आणि हिमालयाच्या  शिखरांना गवसणी घालायची तयारी करतात. 'कात्रज ते सिंहगड' हा ट्रेक करताना मात्र अनुभवी माणसांंच्या सोबतच करा नाहीतर या 'कात्रज ते सिंहगड' पाऊलवाटेवर भिंगरीसारखे फिरत राहाल आणि वाटेल कि आपल्याला चकवा तर लागला नाही ना? म्हणून डोंगर भटक्यांचा आवडता ट्रेक 'कात्रज ते सिंहगड' करताना आवश्यक ती काळजी नक्की घ्या आणी सुरक्षित ट्रेक करा.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
स्वारगेट - कात्रज - कात्रजघाट - कात्रज घाट जुना बोगदा तेथून डावीकडे वर चढणे - सिंहगड.     

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________
                                          
लिखाण आणि छायाचित्रे  © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा
              

     

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage