किल्ल्यांची भटकंती का करावी?आपल्या महाराष्ट्राला वरदान लाभले आहे ते सह्याद्रीच्या डोंगररांगांचे. या डोंगर-शिखरांच्या भूमीत जायचे म्हणजे मुळात आपल्या मनात असावी लागते ती दुर्दम्य इच्छाशक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि अज्ञात वीरांच्या बलिदानाने पवित्र झालेले हे डोंगर पाहणे म्हणजे तेथील इतिहासाशी एकरूप होऊन जाणे. एखाद्या उघड्या-बोडक्या डोंगरावर जाणे आणि शिवस्पर्शाने पावन झालेला किल्ला पाहायला जाणे याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 'पुरंदर किल्ला' पहायचा आणि 'मुरारबाजी देशपांड्यांच्या' पराक्रमाचे विस्मरण पडू द्यायचे हे कसं शक्य आहे? 'पन्हाळगड' हा किल्ला अवघ्या साठ मावळ्यांसह 'कोंडाजी फर्जंद' यांच्या नेतृत्वाखाली  जिंकून घेतला हि घटना विसरून म्हटले तरी जमणार नाही. ज्या 'नरवीर तानाजी मालुसरेंनी' स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी प्राणार्पण केले त्या सिंहगडावर जाऊन आज आपण काय करतो फक्त मजा?

अर्थात या गोष्टींचा आपण अतिरेक देखील करून चालत नाही. बऱ्याचदा किल्यांवर भ्रमंती करताना डोळे गाळणारे अनेक महाभाग किल्यांवर भेटतात तसेच शिवशाहीच्या इतिहासातील गौरवशाली क्षणांचे साक्षीदार असणारी सोनेरी पान माहिती नसलेली अनेक लोकही भेटतात. ते किल्यांवर येतात ते फक्त मौज मजा मस्ती करायला त्यांना आजिबात कोणत्याही ऐतिहासिक घटनांशी घेणे देणे नसते. त्यांना भटकायचे असते नुसती मजा करायला. मग साहजिकच प्रश्न येतो, किल्यांवर आपण जावेच कशाला...??


'पुरंदर किल्ला' पहायचा आणि 'मुरारबाजी देशपांड्यांच्या' पराक्रमाचे विस्मरण पडू द्यायचे हे कसं शक्य आहे?

या प्रश्नाला उत्तर एकच आहे ते म्हणजे 'आपल्या महाराष्ट्रात किल्ले आहेत म्हणून तिथे जावे' हे किल्ले म्हणजे 'महाराष्ट्राची धारातीर्थे' आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाला मिळाली आहे ती इतिहासाची जोड. आपल्या पुढील पिढ्यांनी अत्यंत अभिमानाने सांगावे असा इतिहास ज्या किल्यांवर घडला आहे तिथे जाणे किती अगत्याचे आहे, नव्हे प्रत्येक मराठी माणसाचे ते आद्य कर्तव्य आहे. पण या हजारो वर्षे जुन्या ऐतिहासिक किल्यांवर फिरताना आपल्याला  इतिहासाची जाणीव  हवी. नाहीतर आज तिथे महाराष्ट्रातील प्रत्येक किल्यावरील ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी आणि ओहोरलेली टाकी आपल्याला त्यांचा इतिहास सांगायचा प्रयत्न करीत असतात आणि आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि किल्यांवर फिरून मजा मस्ती करत  दारूच्या बाटल्या आपल्या किल्यांवर घेऊन जातो आणि ज्या गोष्टींसाठी आपल्या पूर्वजांनी आपले आयुष्य वेचले त्याठिकाणी हे सगळे करून आपल्याला काय आसुरी आनंद मिळतो??

महाराष्ट्रातील हेच ते किल्ले ज्या ठिकाणी या महाराष्ट्र देशातील प्रत्येक योद्धा हा ताठ मानेने वावरला आहे. जगण्यातला अर्थ त्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेतील किल्ले बघितले तर तेथील नक्षीकाम तुम्हाला भुलवून टाकेल त्यांच्या दगडादगडावर कोरीवकाम आहे आतल्या भिंती, दालने, वाडे शाबूत आहेत परंतु या सर्वांची आज किंमत काय आहे? या सर्व गोष्टी फार किंमत देऊन टिकवल्या आहेत. उत्तरेतल्या राजांनी त्यांच्या बायका मुली या सर्व सुलतानांकडे देऊन स्वतःची अब्रू राजांनी वाचवली हि गोष्ट जगजाहीर आहे. हे राजे आणि त्यांचे महाल म्हणजे एखाद्या संग्रहालयातल्या बाहुल्याच आहेत.


हजारो वर्षे जुन्या ऐतिहासिक किल्यांवर फिरताना आपल्याला  इतिहासाची जाणीव  हवी.

परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या रांगड्या किल्याचे असे आजिबात नाही. इथे सापडणारे 'वीरगळ' आणि 'सतीशिळा' हेच महाराष्ट्रातील किल्यांचे 'परमवीर' आणि 'महावीरचक्र'. ज्याला आपण कायम दुषणे देत फिरत असतो तीच या महाराष्ट्र देशाची आणि सह्याद्रीची आभूषणे आहेत. हेच 'वीरगळ' आणि 'सतीशिळा' या आपल्या महाराष्ट्राच्या लढाऊ पणाची जिवंत स्मारके आहेत. इ.स. १८१८ मध्ये शेवटच्या मराठे इंग्रज युद्धामध्ये सर्वात जास्त किल्ले लढवले गेले. या युद्धांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले ते याबळकट आणि  राकट किल्यांचे. हे किल्ले एकावर एक दगड ठेवून बांधले गेले नाहीत तर सर्व मावळ्यांची मने या किल्यांमध्ये गुंतली होती. इंग्रजांना या किल्यांना पाडण्यात यश देखील मिळाले परंतु घामाच्या पावसाने आणि रक्ताचा सडा शिंपून हे सर्व दुर्ग वाचवले गेले टिकवले गेले.

आपल्या महाराष्ट्रातील धारातीर्थांवर आपण बऱ्याचदा जात असतो हि दुर्ग भ्रमंती करताना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. दुर्गभ्रमण करताना इतिहासाचा अभ्यास करणे आणि किल्यांचा अभ्यास करणे याची मजा वेगळीच असते. आपण ज्या किल्यांवर दुर्गभ्रमण करायला जातो त्याच्या आधी नेहमी आपण त्या किल्याचे भौगोलिक स्थान बघावे त्या किल्याचे इतिहासात काय महत्व आहे हे बघावे त्या किल्याचा इतिहास अभ्यासावा आणि माहिती आपल्याकडे जमा करावी आणि तिची नोंद करावी. एखाद्या वहीत आपण या सर्व गोष्टींची टिपणे काढून ठेवावीत. ज्या किल्यावर आपण जाणार आहोत त्या किल्यावर आपल्या आधी जे कोणी गेले आहेत त्यांना भेटावे त्यांच्याकडून त्या किल्याबद्दल किंवा प्राचीन घाटवाटेबद्दल माहिती घ्यावी.


'वीरगळ' आणि 'सतीशिळा' हेच महाराष्ट्रातील किल्यांचे 'परमवीर' आणि 'महावीरचक्र' आहेत.

दुर्गभ्रमण करताना नेहमी गडावर जाणारे मुख्य रस्ते आणि पर्यायी रस्ते यांची माहिती आपल्याकडे लिहून ठेवायचे. एखादा कच्चा नकाशा आपण आपल्या हाताने तयार करून ठेवायचा परंतु आजकाल इंटरनेटच्या सोयीमुळे गुगल मॅप्स वर जाऊन त्या किल्याच्या पायथ्याच्या गावापासूनचा नकाशा काढून त्याची एक प्रिंट आपल्याकडे ठेवायची. या नकाशाचा आपल्याला किल्यावरील विविध गोष्टी पाहण्यासाठी खूप उपयोग होतो. अशा नकाशांचा आपल्याला दुसरे कोणी मित्र त्याच किल्यावर जाणार असतील तर त्यांना देऊन त्याचा उपयोग त्यांच्या दुर्गभ्रमंतीसाठी देखील करता येतो.

बऱ्याचदा दुर्गभ्रमंती करताना असे दिसून येते कि बऱ्याचदा गावकऱ्यांना उलटे-पालटे बोलणे त्यांना आपल्यात सामावून न घेणे असे प्रकार खूप बघावयास मिळतात परंतु तसे कधीच करायचे नाही. गडावर किंवा किल्याच्या घेऱ्यात राहणारी जी काही वृद्ध लोक असतात किंवा गावकरी असतात त्यांच्याकडून आपल्याला किल्याची अजून काही माहिती मिळते का यासाठी त्यांच्याशी मिळून मिसळून वागावे त्यांना योग्य तो मान-सन्मान देणे गरजेचे आहे.


ब्रिटीशांनी काढलेले चित्र. एखादा कच्चा नकाशा आपण आपल्या हाताने तयार करून ठेवायचा.

दुर्गभ्रमंती करताना किल्यावरील वास्तू, दरवाजे, मूर्ती, शिलालेख तसेच विविध पाण्याची टाकी यांचे फोटो काढून आपल्या संग्रहात ठेवणे गरजेचे आहे कारण आज ह्या सर्व गोष्टी दिसत आहे परंतु वर्षानुवर्षे या गोष्टी उन, वारा, पाउस खात ताठ मानेने उभ्या आहेत ह्यांची आता झीज होत चालली आहे ती वाचवणे किंवा जतन करणे हे आता आपल्याच हातात आहे. किल्यांवरील विविध वास्तू बघणे व त्यांचे मोजमाप करून ठेवणे या गोष्टी करणे गरजेचे आहे. किल्यावर आपल्याला एखादी गोष्ट सापडली उदाहरणार्थ 'तोफेचे गोळे' तर ते शक्यतो 'पुरातत्व खाते' यांच्याकडे जमा करावे तेथे त्यांचे जतन होईल आणि आपणास देखील पुरातत्व खात्यातील तज्ञ व्यक्तिंकडून  योग्य ती माहिती त्या वस्तू बाबत  समजेल.

किल्यांवर भटकताना कधीच तिथल्या बुरुजांच्या कडांवर बसू नये कारण बुरुजांचे चिरे हे कधी पण ढासळू शकतात व कोणाचा अपघात देखील घडू शकतो. बऱ्याचदा किल्ले भटकताना काही दृश्ये देखील बघायला मिळाली आहेत कि ज्या ठिकाणी लोकांनी तिथल्या वास्तूंचे दगड उचकटून स्वतःची घरे त्या दगडांनी बांधलेली आहेत किंवा बऱ्याचदा लोक किल्यांच्या भिंतीवर आपण स्वतः तेथे आलो म्हणून खडू, कोळसा, विटकर, खिळा यांनी स्वतःची नावे त्या ऐतिहासिक धारातीर्थांवर कोरून ठेवली आहेत ह्या सर्वांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो किल्यांवर किंवा तेथील ऐतहासिक वास्तूंवर स्वतःची नावे लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?या सर्व प्रकारामुळे किल्यांचे किंवा ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण होते हे कोणाच्याही लक्षात येत नाही. 


किल्यांवर किंवा तेथील ऐतहासिक वास्तूंवर स्वतःची नावे लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

किल्ले पाहायला जाताना आपण 'श्री शिवछत्रपतींच्या मुलुखात' आपण जात आहोत हे ध्यानी घेणे गरजेचे आहे. परंतु तेथे राहण्या-जेवण्याची सोय नाही याची जाणीव हवी. आगदी काडेपेटी पासून आजकालच्या आधुनिक रोप आणि अत्याधुनिक हॅवर सॅक मध्ये बसेल तेवढे आणि महत्व पूर्ण सामान आपल्याबरोबर असणे गरजेचे आहे. बऱ्याच शतकात किल्यांच्या गुहे मध्ये मनुष्य वावर कमी झाल्याने त्यांची जागा विविध साप, विंचू, मधमाश्या यांनी घेतली आहे त्यामुळे त्यांच्या पासून सावध राहणे गरजेचे आहे. ज्या किल्यावरच्या गुहेत किंवा लेण्यात राहणार असाल तिची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. आज त्या गुहेची परिस्थिती काय आहे हे माहिती असणे देखील गरजेचे आहे. तसेच आत मध्ये राहणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

किल्यांवर हिंडताना तुमच्याकडे जर 'हंटर शूज' असतील तर उत्तम नाहीतर 'एक्शन ट्रेकिंग' शूज सारखे उत्तम शूज नाहीत. 'वुडलँड' किंवा 'रिबॉक' शूज वेळेवर अत्यंत घातक ठरू शकतात. किल्यांवरील किंवा घाटवाटांवरील कुसळांपासून किंवा काट्यांपासून वाचवायचे असल्यास फुल पँट घालणे जरुरीचे आहे आणि वेळ पडली तर फुल शर्ट देखील घालावा. म्हणजे आपले या काट्यांपासून संरक्षण होते. डोक्याला टोपी असणे गरजेचे आहे. मुबलक खाणे बरोबर ठेवावे परंतु किल्यावर गेलो म्हणून नुसते खाणे केले मग मजा-मस्ती केली अश्या गोष्टी  करणे अत्यंत चुकीचे आहे.


 'श्री शिवछत्रपतींच्या मुलुखात' आपण जात आहोत हे ध्यानी घेणे गरजेचे आहे. 

दुर्गभ्रमंतीला गेल्यावर मिळणाऱ्या एकांतामध्ये अचकट-विचकट गाणे, गप्पा-गोष्टी नाहीतर ओल्या पार्ट्या करण्यासाठी हि जागा योग्य नाही यासाठी तुम्हाला अन्यत्र ठिकाणे उपलब्ध आहेत. 'सिंहगड' सारख्या ठिकाणी तर रोज हजारोंच्या संख्येत जत्रा भरते आणि ऐतिहासिक 'मढे घाटात' लोक दारू प्यायला बसतात किंवा काही वेळेस हौशी-नवशे ट्रेकर्स ज्यांना ट्रेकिंगचा गंध फक्त पावसाळ्यात येतो असे भटके कुण्या एकाबरोबर किंवा कुण्या एकीबरोबर प्रेमालाप करण्यासाठी किल्यांवर जातात तर त्या सर्वांनी निट समजून घ्यावे कि हि ठिकाणे तुमचे फालतू चाळे करण्याचे नाहीत. हि धारातीर्थे बघायला अनेक लोक आणि गिर्यारोहक मोठ्या भक्तीने बघायला आलेली असतात. गिर्यारोहकांच्या 'आदर्श व्यक्तिमत्वाचा' हा सगळा मुलुख असतो त्या ठिकाणी असले चाळे कोणताही 'गिर्यारोहक' खपवून घेत नाही.

दुर्गभ्रमंती करावी तर ती डोळस करावी. किल्यांवरील निरव शांततेचा भंग न करता तिथल्या वास्तव्यात तेथील 'दुर्गरचना' न्याहाळावी. तिथल्या पशु-पक्ष्यांची-किटकांची गणना करावी त्यांची माहिती शोधावी. आपल्या बरोबरच्या सख्या सोबत्यांना बरोबर घेऊन तिथे घडलेल्या इतिहासाची जाणीव इतरांना करून द्यावी आणि तुम्ही देखील आपल्या या महाराष्ट्र देशाच्या दुर्गांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवावा असे नक्कीच वाटते.


दुर्गभ्रमंती करावी तर ती डोळस करावी.
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे  © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा 

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage