मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील इंग्रजांनी बांधलेला बोरघाटातील 'अमृतांजन पूल'


पुणे-मुंबई या महामार्गावरून सगळेच लोक आज मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-मुंबई या महामार्गावरील बोर घाटामधील रस्ता हा फारच धोकादायक आणि वळणावळणाचा होता. द्रुतगती मार्गामुळे ह्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे महत्व थोडे कमी जरी झाले तरी देखील आजही लोक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. 'बोर घाटातील' या जुन्या मार्गावर एक ब्रिटीश कालीन पूल नेहमी लोकांना खुणावत असतो तसेच एक्सप्रेस वे ने जाताना आपली गाडी या ब्रिटीश काळात बांधल्या गेलेल्या पुलाच्या मधून जाते. आपल्यापैकी अनेक जणांनी हा इंग्रजांच्या काळातील हा पूल बघितला असेल. या पुलाला ओळखतात 'अमृतांजन पूल' या नावाने 

इ.स. १८१८ मध्ये जेव्हा शनिवारवाडा येथे 'युनियन जॅॅक' फडकला आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची राजवट सुरु झाली. या इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांना त्यांचे राज्य स्थिर करण्यात गेला. त्यातच पुणे आणि मुंबई येथे जाणे येणे मोठे कष्टाचे काम होते. इंग्रजांच्या काळात या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला 'पुणे-पनवेल महामार्ग असे संबोधले जात असे. याचे मुख्य कारण असे की पुण्यावरून मुंबईला येथे जाण्यासाठी आधी पनवेल येथे यावे लागे तेथून बोटीने प्रवास करत मुंबईला यावे लागत असे. जेव्हा ब्रिटिशांच्या लष्करी छावण्या या खडकी येथे बनवल्या गेल्या त्याच्यानंतर मुंबई ते खडकी तसेच पुण्यामध्ये येण्यासाठी इंग्रजांनी बोर घाटामधून वाट शोधून काढली. मुंबई पासून पुण्यापर्यंत हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी चार दिवस वेळ लागत असे.  

 बोर घाटामधून घोडा गाडी जाईल अशी वाट शोधून काढली.

हा चार दिवसांचा कालावधीचा वेळ अजून कमी व्हावा यासाठी तसेच मुंबई-पुणे दळणवळण सोपे व्हावे यासाठी इंग्रजांनी पुणे आणि रायगड यांच्या सीमेवर बोर घाटामध्ये घोडागाडी जाईल असा रस्ता बनवला. या रस्त्याचे काम १८३० साली सुरु झाले. तेव्हाच ब्रिटिश काळामध्ये पुण्याची नाळ रायगड जिल्ह्याशी रस्त्याने  जोडली गेली. दिनांक १९ जानेवारी १८३० साली इंग्रज अधिकारी 'सर कॅॅप्टन ह्यूजेस' यांनी बॉम्बे प्रेसिडेंसीचे  तत्कालीन 'गव्हर्नर सर् जॉन माल्कम' आणि 'जी.सी.ई. डॉमेनी' यांच्या मार्गदर्शनाखाली बोर घाटामधील पुलाचे बांधकाम सुरु झाले. हे बांधकाम दिनांक १० नोव्हेंबर १८३० साली - म्हणजे जवळपास दहा महिन्यांच्या आत - पूर्ण झाले.

इ.स. १८५३ साली भारतामध्ये पहिली रेल्वे धावू लागली आणि दळणवळण खूप सोपे झाले. परंतु जेव्हा बोर घाटामध्ये रेल्वेचे काम सुरु झाले तेव्हा तेव्हा साधारण २५ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर जवळपास २०२० फूट उंचीचा चढ होता. हा अत्यंत अवघड चढ रेल्वे एका दमात चढणे अत्यंत अवघड होते म्हणून मुंबई-पुणे महामार्गावर बोर घाटामध्ये एक रेल्वे रिव्हर्सिंग स्टेशनची निर्मिती केली गेली तेव्हा इंग्रजांनी या पुलापाशी  पक्का रस्तादेखील बनवला. तेव्हा या पुलावर रेल्वेचे रूळ देखील टाकण्यात आले होते. इ.स.१९२६ ते १९२८ दरम्यान खंडाळा घाटामध्ये बोगदा क्रमांक २४, २५, २६ यांची निर्मिती केली गेली तेव्हा इ.स.१९२९ सालापासून या पुलावरील रिव्हर्सिंग स्टेशनचा वापर बंद झाला. जवळपास १९२९ पर्यंत या पुलाखालून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील गाड्या देखील जात होत्या आणि वरच्या बाजूने रेल्वे. १९२९ नंतर या पुलाचे परत काम केले गेले आणि त्याच्यावर गाडी रस्ता बनवला गेला.       

डाव्या बाजूला अमृतांजन पुलाचे बांधकाम चालू असतानाचे छायाचित्र. तसेच उजव्या बाजूला अमृतांजन पुलावर बांधलेल्या रिव्हर्सिंग स्टेशनचे इंग्रजांच्या काळातील चित्र.
दोन्ही छायाचित्र आंतरजालावरून घेतलेली आहेत.  

इंग्रजांनी बांधलेल्या पुलाचे महत्व मात्र कमी झाले नाही तर ते दिवसेंदिवस वाढतच गेले. या इंग्रजांच्या काळातील पुलाचे नाव 'अमृतांजन पूल' असे का बरे पडले हा प्रश्न मात्र नक्की तुम्हाला पडेल. या पुलावर 'अमृतांजन'  या प्रसिद्ध औषधी मलमाची जाहिरात होती. या पुलाची 'अमृतांजन पूल' अशी नवी ओळख बनली. या पुलाच्या खालच्या बाजूस मुंबई कडून पुण्याकडे येताना इंग्रजांच्या काळातील संगमरवरी कोनशिला आपल्याला बघायला मिळते. त्या कोनशिलेवर आपल्याला इंग्रजी वाक्य कोरलेली दिसतात.

    मुंबई कडून पुण्याकडे येताना इंग्रजांच्या काळातील संगमरवरी कोनशिला आपल्याला बघायला मिळते.

जवळपास १९० वर्षे आयुष्य असलेला हा 'अमृतांजन पूल' नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आलेला आहे. या पुलावरून खंडाळ्याचे ड्युक्स नोज म्हणजेच नागफणी, बोर घाटामधील विहंगम दृश्य या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच नवीन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे सुंदर दृश्यदेखील येथून आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही दृश्ये आपल्याला इथून पुढे या पुलावरून पाहायला मिळणार नाहीत, कारण महाराष्ट्रातील १९० वर्षे जुना महत्वाचा वारसा आता दिनांक ४ एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० यादरम्यान पाडणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणारे सततचे अपघात आणि होणारी वाहतूक कोंडी.  'अमृतांजन पूल' आता लवकरच लोकांच्या विस्मृतीमध्ये जाणार आहे. परंतु आपण जेव्हा जेव्हा मुंबई-पुणे असा प्रवास करू तेव्हा ज्या पिढ्यांनी हा  'अमृतांजन पूल' पाहिलेला आहे त्यांना त्याची आठवण मात्र सतत येत राहील.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Gazetteer of The Bombay Presidency Poona:- 1885. 

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

दोन छायाचित्र आंतरजालावरून घेतली आहेत. 
लिखाण आणि दोन छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा 

          

2 comments:

  1. खूप सुंदर माहिती

    ReplyDelete
  2. खूप सुंदर माहिती 👌🚩

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage