रामचंद्रदेव यादव याचा कोपराड येथील 'गद्धेगाळ'


आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध राजसत्ता नांदल्या त्यापैकीच एक महत्वाची राजसत्ता म्हणजे देवगिरीचे यादव घराणे. या घराण्यातील 'रामचंद्रदेव यादव' हा सर्वश्रुत आहेच. याच 'रामचंद्रदेव यादव' राजाचा एक महत्वाचा शिलालेख असलेला एक गद्धेगाळ सापडला तो ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कोपराड या गावी. हा शिलालेख महत्वाचा ठरतो याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे  या गद्धेगाळाच्या शिलालेखामध्ये आपल्याला मुसलमानी अधिकाऱ्याचे नाव दिसते त्यामुळे हा शिलालेख अत्यंत महत्वाचा ठरतो.

'रामचंद्रदेव यादव' याचा हा शिलालेख कसा सापडला ते देखील पाहणे आपल्याला फार महत्वाचे ठरेल. इ.स. १९५५ मध्ये तत्कालीन एशियाटिक सोसायटी, मुंबई येथील ग्रंथपाल 'श्री. अ. ना. गोरे' हे जेव्हा कोपराड येथे 'चक्रवर्ती सम्राट अशोक' याच्या ९ व्या शिलालेखाचा पूर्वार्ध शोधायला गेले होते तेव्हा कोपराड गावामध्ये त्यांना 'रामचंद्रदेव यादव' याचा हा शिलालेख मिळाला. हा शिलालेख मिळाल्यानंतर त्यांनी कोपराड या गावामधून ही गद्धेगाळाची शिळा त्यांनी एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे आणली. एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे ही गद्धेगाळाची शिळा जवळपास सहा महिने तशीच होती.

एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे कोपराड येथील शिलालेख ६ महिने ठेवलेला होता.

त्याच्यानंतर इ.स. १९५६ साली ही 'कोपराड' गद्धेगाळाची शिळा ही मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजेच आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे हलविण्यात आली. या नंतर या 'कोपराड' शिलालेखाचे वाचन हे 'श्री. गोरे' यांनी केले तसेच त्यांनी याची छायाचित्रे देखील घेतली. यापूर्वी हा लेख 'डॉ. मो. गं. दीक्षित' यांनी आपल्या लेखमालेत प्रसिद्ध केला होता. परंतु 'डॉ. शं.गो.तुळपुळे' यांनी याचे पुन्हा एकदा वाचन केले.

'कोपराड' येथे सापडलेल्या  गद्धेगाळवरील शिलालेख हा एका साध्या अघोटीव शिळेवर कोरलेला असून शिळेच्या माथ्यावर चंद्र आणी सूर्य कोरलेले आहेत. तसेच लेखाच्या शेवटी गद्धेगाळीचे चित्र कोरलेले आहे. शिलालेखाची लांबी आणि रुंदी ही १'.५" x १'.२" असून शिळेचा गद्धेगाळीचा खालचा भाग हा रिकामा आहे. या 'कोपराड' शिलालेखामध्ये ११ ओळी असून यामध्ये शेवटची ओळ तुटलेली आहे. प्रत्येक ओळीमध्ये साधारणपणे १८ ते २० अक्षरे असून अक्षरांची  उंची ही जवळपास ३/४ " x १/२" इतकी आहे. या शिलालेखाचे खोदकाम चांगल्यापैकी असून अक्षरे तुटलेली दिसत नाही. एकंदरीतच हा शिलालेख सुस्थितीत आहे. या शिलालेखाच्या १० व्या ओळीत थोडी खाडाखोड आहे असा आक्षेप 'डॉ. दीक्षित' घेतात.

'कोपराड' गद्धेगाळ वरील शिलालेख हा देवनागरी लिपीमध्ये असून लेखाचे वळण हे यादवकालीन महाराष्ट्रातील नागरीच्या रूढ वळणांंशी जुळलेले दिसते. या शिलालेखामध्ये पृष्ठमात्रेचा एकदाच वापर झालेला दिसतो तो पण शेवटच्या ओळीमध्ये. शिलालेखामध्ये आलेले 'जयवादे' हा शब्द 'जयवादि' असा वाचावा. वरील शब्दावरून अक्षरवाटिका जुनी आहे हे समजते. 'डॉ. शं. गो. तुळपुळे' यांच्या मते या शिलालेखात अशुद्ध रूपे बरीच आढळून येतात.  

छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे हा शिलालेख आहे.

'कोपराड' येथील शिलालेख हा 'संस्कृत - मराठी' अशा संमिश्र भाषेमध्ये आहे. या शिलालेखाचा पूर्वार्ध हा संस्कृत भाषेत असून या शिलालेखाचा उत्तरार्ध हा मराठी भाषेमध्ये आहे. या शिलालेखामध्ये एक महत्वाचे नाव आपल्याला आढळून येते ते म्हणजे 'मुहुमद'. हे नाव आपल्याला शिलालेखाचा सहाव्या ओळीमध्ये पाहायला मिळते. या मुसलमानी नावाचा उल्लेख 'मुहुमद प्रोस्त्राहि' असा येतो. हा 'मुहुमद' म्हणजे 'रामचंद्रदेव यादव' याचा याचा कोकण प्रांतामधील सर्वाधिकारी 'श्रीकान्हरदेव' याचा मुतालिक अधिकारी असल्याचे दिसते. 'प्रोस्त्राहि' हे अरबी भाषेतील पर्वरिशी या शब्दाचा अपभ्रंश आहे. याचाच अर्थ हा 'पोशिंदा' असा देखील असून  'मुहुमदा' चे हे बिरूद असावे किंवा पदवी असावी असे वाटते. याशिवाय या शिलालेखामध्ये 'मिजिगिति' म्हणजेच 'मस्जिद' हा शब्द 'मशीद' या अर्थाने शिलालेखामध्ये पहावयास मिळतो.

या 'कोपराड' शिलालेखामध्ये काळाचा उल्लेख हा पहिल्या दोन ओळीमध्ये असून 'सकू संवतु १२१९ वरिषे हेमलंन संवत्सरे फाल्गुन वदि १ सुक्रे" असा दिसतो. यातील 'हेमलन' हा शब्द 'हेमलंब' या संस्कृत संवत्सराचा अपभ्रंश आहे. याचा अर्थ असा कि हा शिलालेख शालिवाहानाचा गतशक १२१९, हेमलंब संवत्सर, फाल्गुन वद्य १ शुक्रवार यादिवशी खोदला गेला. इंगजी कालगणनेनुसार या शिलालेखाची तारीख काढली तर २८ फेब्रुवारी १२९८ अशी येते. 'कोपराड' येथील शिलालेख पुढीलप्रमाणे:-

कोपराड शिलालेखाचा ठसा.

शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-

१. छ || स्वस्ति श्री सकु संवतु १२१९ वरिषे | हेमलंन संव
२. त्सरे फाल्गुन वदि सुक्रे अद्येह श्रीमत प्रोढप्रताप
३. चक्रर्वति श्रीरामचंद्रदेव विजयोदये : त्त्पादपद्मो 
४. पजिवि सलकसैन्याधिपति सर्वाधिकारि माहामं
५. डलेस्वर :  श्रीकान्हरदेव तंनिरोपित अधिपाय 
६. ता मुहमद प्रोस्त्राहि : कट्रियपाटकप्रतिबध
७. कोपराठपक्षवाटिकिय : जवलप व्रिति तथा म्हैस
८. व्वणे उभौ व्रिति दोहों आदाया द्रा भूंं अगास श्रा 
९. मिजिगिति प्रतिबद्ध : वेसाज ना सत्रा सूक्ति एआ 
१०. सर्गा षल उद्रे करि लोपि तेहाचि मऐ गाढवु जवे
११. ------ पालिता जयवााद : ||   

अर्थ:-

यादव नृपती रामचांद्रदेव याचा महामंडलेश्वर श्रीकान्हरदेव व त्याचा मुतालिक अधिकारी मुहुमद प्रोस्त्राहि यांनी कशाच्या तरी निर्मितीप्रीत्यर्थ करटी गावाच्या भागाने प्रतिबद्ध असलेल्या कोपराड भागातील वाटिकांंपैकी जवलपे येथील वृत्ती, तसेच म्हैसव्वणे येथील वृत्ती करून देऊन उभय वृत्तीतील १९ द्राम उत्पन्न व अगास येथील मशिदीने प्रतिबद्ध असलेल्या वेसाज (= आगर, शेत) मधील नारळ १७, सुक्ती (एक माप आहे), याप्रमाणे नेमणूक करून दिली. या निर्मितीस (जो) दुष्ट नष्ट करील (किंवा) ती नाहीशी करील त्याच्या आईस गाढव लागेल. (हे) पाळणारा विजयी (होईल).

एकंदरीतच वरील सर्व आशयावरून एवढे समजते कि शके १२१९ मध्ये काही एक 'सर्ग' म्हणजे निर्मिती झाली व या निर्मितीप्रीत्यर्थ जवलपे गावातील म्हैसवणे गावातील एक अशा दोन वृत्ती करून देऊन त्यांच्या उत्पन्नाचे एकूण १९ द्राम व अगासमधील १७ सूक्ति नारळ (?) याप्रमाणे दानपत्र करण्यात आले. निर्मिती कशाची म्हणजे कोणत्या देवस्थानची, झाली हे कळण्यास मार्ग नाही. या शिलालेखात दोन महत्वाच्या गोष्टी दिसतात त्या म्हणजे एक नाव 'मुहुमद प्रोस्त्राहि' हे मुस्लिम अधिकाऱ्याचे नाव तसेच ९ व्या ओळीमधील 'मिजिगिति' हा अरबी किंवा फारसी शब्द. याच्यावरून हे मात्र समजायला मदत होते कि मुसलमानी संस्कृतीची छाया किती जुनी आहे हे या 'कोपराड' येथे सापडलेल्या शिलालेखातून समजते. 

  'मिजिगिति' ह्या शब्दाचा संदर्भ. याच्या आधी हा शब्द कुठे आला आहे.  

या शिलालेखामध्ये जी ग्रामनामे येतात ती पुढीलप्रमाणे:-

'करटी' हे गाव ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात पश्चिम वसईच्या उत्तरेस असलेले सध्याचे 'कराडी' गाव आहे. 'कोपराठ' ठ्ने जिल्हा तालुका वसई येथील सध्याचे 'कोपराड' गाव. 'जवलप' सध्याच्या 'कोपराड' गावाच्या उत्तरेस ५ किंवा ६ मैलांच्या अंतरावर असलेले 'जवलपे' गाव. 'म्हैसव्वणे' सध्याच्या 'कोपराड' गावापासून ५ मैल अंतरावर असलेले 'म्हैसवणे'. 'अगास' म्हणजेच वसई तालुक्याच्या वायव्य कोनात असलेले सध्याचे 'आगाशी'. 

'रामचंद्रदेव यादव' याचा 'कोपराड' येथील गद्धेगाळ हा अत्यंत महत्वाचा असून यामधून आपल्याला मुसलमानी संस्कृतीची छाया किती जुनी आहे हे या 'कोपराड' येथे सापडलेल्या शिलालेखामधून 'मुहुमद' आणि 'मिजिगिति' यांची जी यवनी नावे येतात त्यावरून समजते.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६३.
२) महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची:- शांताराम, भालचंद्र देव, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, १९८४. 
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा
                

                           

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage