'प्राँग्ज' दीपस्तंभ


प्राचीन काळापासून समुद्रामधील 'दीपस्तंभांचे' महत्व आपल्याला दिसून येते. हे 'दीपस्तंभ' आजही आपली फार महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. यासाठी 'दीपस्तंभ' म्हणजे काय हे पण आपल्याला थोडे समजून घेणे महत्वाचे ठरेल. 'दीपस्तंभ' म्हणजे समुद्रातल्या जहाजांना रात्रीच्या वेळेस रस्ता दाखवण्याचे काम हे 'दीपस्तंभ' शतकानुशतके करत आहेत. असाच एक महत्वाचा 'दीपस्तंभ' हा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या 'मुंबई' शहराच्या नैऋत्येस असणाऱ्या 'कुलाबा' येथे आजही उभा आहे. कुलाबा येथील हा दीपस्तंभ 'प्राँग्ज' दीपस्तंभ' म्हणून ओळखला जातो.

मुंबई बेट जेव्हा पोर्तुगीजांकडे होते तेव्हा त्यांनी कुलाब्यापासून साधारणपणे ३.५ किलोमीटर अंतरावर जवळपास १४३ फूट उंचीचा एक दगडी मनोरा उभारला ह्या दगडी मनोऱ्यावर जहाजांना रात्रीचे मार्गदर्शन व्हावे यासाठी आग पेटवली जात असे. पुढे जेव्हा इंग्रजांची सत्ता मुंबईवर आली तेव्हा इंग्रजांनी याच ठिकाणी इ.स. १७६८ साली ५००० रुपये खर्च करून भारतामधील पहिला 'दीपस्तंभ' बांधला. हा दीपस्तंभ नव्याने बांधला तेव्हा या दीपस्तंभाची उंची ही १५० फूट होती. सुरुवातीला ह्या दीपगृहामधला दिवा हा काही काळच चालत असे. इ.स. १७७२ पासून या दीपगृहावर एक तेलाचा दिवा सतत चालू ठेवण्यात आला. पहिल्या वर्षी या दीपगृहावरील तेलाचा खर्च हा जवळपास ६३० रुपये आला होता. या दीपगृहाच्या शेजारून जे जहाज जात असे त्याला या दीपगृहासाठी कर द्यावा लागत असे. हा कर शंभर टनास २ रुपये असा होता.

'प्राँग्ज' दीपस्तंभ. छायाचित्र लांबून झूम करून घेतलेले आहे.

इ.स. १७९७ साली जवळजवळ ६५०० रुपये खर्च करून या दीपगृहावर परावर्तक आरशांचा कंदील बसविण्यात आला तेव्हा या परावर्तक आरशांच्या कंदिलाचा प्रकाश हा आकाश जेव्हा निरभ्र असे तेव्हा त्याचा प्रकाश २१ मैल लांब पर्यंत दिसत असे. सध्याचे नवीन बांधलेले दीपगृह हे समुद्रसपाटीपासून जवळपास १८ फूट उंच खडकावर बांधलेले असून त्याची उंची ही जवळपास १६८ फूट आहे. हे नवीन दीपगृह 'प्राँग्ज' नावाच्या खडकाजवळ बांधले म्हणून याचे नाव 'प्राँग्ज' दीपगृह' असे ठेवले गेले. इ.स. १८७४ साली 'प्राँग्ज' दीपगृह' बांधून पूर्ण केले गेले आणि १ नोव्हेंबर १८७४ पासून या दीपस्तंभामध्ये दिवा लावला गेला. आजही या दीपस्तंभावरील दिवा हा जवळपास ६८ मैल लांबीवरून जहाजांना दिसतो.

इ.स १८७४ साली नव्याने बांधलेल्या या 'प्राँग्ज' दीपस्तंभाला ६,२०,२५५ रुपये खर्च आला. या 'प्राँग्ज' दीपस्तंभामध्ये आठ कोठड्या असून त्याच्या आतमध्ये गोल जिन्यानी प्रवेश करता येतो. या 'प्राँग्ज' दीपस्तंभाच्या आतमध्ये दीपगृहाचे अधिकारी आणि सेवक यांच्या राहण्याची सोय आहे. या दीपस्तंभावरील सध्याचा लाईट हा दर १० सेकंदाला २३ नोटिकल माईल्स म्हणजेच जवळपास 43 किलोमीटर अंतरापर्यंत दिसतो. या दीपस्तंभावर जी स्मारकशिळा आहे ती जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स याचे प्राचार्य लॉकवुड किपलिंग यांनी तयार केलेली आहे.

२५ एप्रिल १८७४ रोजी जॉन्सन विल्यम या ब्रिटीश अधिकाऱ्याने काढलेले छायाचित्र.

असे हे 'प्रॉन्गज दीपगृह' भारतीय नौदलाच्या ताब्यात असल्यामुळे इथे जायचे झाल्यास 'डायरेक्टर ऑफ लाईटहाऊसेस अँँड लाईटशिप्स' तसेच 'पोर्ट ट्रस्ट' आणि 'भारतीय नौदल' यांच्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. असा हा 'प्राँग्ज' दीपस्तंभ आजही भारताच्या नैऋत्य दिशेला उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना दिशा दाखवत आहे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) मुंबईचे वर्णन:- ना. गो. माडगांंवकर, साकेत प्रकाशन, २०११. 
२) मुंबईचा वृत्तांत:- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, १९८०.
३) Photographs of Western India Volume III:- Johnson William, 1874.
          
______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा1 comment:

  1. खुप छान ऐतिहासिक माहिती आणि उपयुक्त आहे.

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage