अकोल्याचे उत्कृष्ट शिल्पकलेचे 'सिद्धेश्वर मंदिर'


नगर जिल्हा असे नाव उच्चारले कि सर्वप्रथम डोळ्यासमोर येते ते शिखरसम्राज्ञी 'कळसूबाई' या शिखराचे अत्यंत भौगोलिक वैविध्याने नटलेल्या या नगर जिल्ह्यामध्ये डोंगरांच्या कुशीत 'अकोले' नावाचे अत्यंत सुंदर टुमदार गाव वसलेले आहे. या गावाशेजारून अमृतवाहिनी 'प्रवरा नदी' वाहते तसेच 'अगस्ती ऋषींच्या' वास्तव्याने पावन झालेल्या 'अकोले' ह्या गावामध्ये 'सिद्धेश्वर' नावाचे अत्यंत सुंदर कलाकुसरीचे साधारणतः १३ व्या शतकात एक मंदिर उभारले गेले आहे. 

'सिद्धेश्वर' मंदिराला भेट द्यायची असल्यास संगमनेर मार्गे 'अकोले' हे गाव गाठावे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर गावी जाण्याचा रस्ता तसेच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आपले लक्ष वेधून घेतो 'संगमनेर' या गावापासून अवघ्या २५ कि.मी. वर असणाऱ्या या गावी जाणारा रस्ता देखील अत्यंत चांगला आहे. 'अकोले' या गावी जायला शक्यतो स्वतःचे वाहन असलेले कधीही उत्तम तसेच पुण्यामधून 'अकोले' पर्यंत थेट बससेवा उपलब्ध आहे. आपली स्वतःची गाडी थेट 'सिद्धेश्वर' मंदिरापर्यंत जाते.

 सिद्धेश्वर मंदिराचा शोध हा इ. स. १७८० साली लागला.

शिल्पकलेचे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण असलेल्या ह्या मंदिराचा शोध इ.स. १७८० साली एका शेतकऱ्याला लागला शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ अडकला तेव्हा जिथे नांगराचा फाळ अडकला होता तिथे खोदले असता मंदिराचा भाग दृष्टीस पडला आणि एक जमिनीच्या पोटामध्ये लपलेले मंदिर महाराष्ट्राच्या कलेच्या इतिहासावर आले. जेव्हा या मंदिराला जमिनीमधून बाहेर काढले तेव्हा 'सिद्धेश्वर' मंदिराचे ऐतिहासिक महत्व ओळखून 'अकोले' येथील गावकऱ्यांनी हे मंदिर संपूर्ण स्वच्छ केले.  जेव्हा या 'सिद्धेश्वर मंदिर' परीसरामध्ये स्वच्छतेचे काम गावकरी करीत होते तेव्हा मंदिरामध्ये काही कागदपत्रे तसेच नाणी देखील आढळून आली होती. 

'अकोले' गावामध्ये असलेले 'सिद्धेश्वर मंदिर' याची रचना ही भूमिज शैलीमध्ये आहे. यादवकाळातील कला आणि स्थापत्य यांचा संगम हा आपल्याला 'सिद्धेश्वर मंदिरामध्ये' आपल्याला पहावयास मिळतो. अकोल्याचा वारसा असणाऱ्या या 'सिद्धेश्वर' मंदिराची आपण रचना पहायला गेल्यास 'सिद्धेश्वर मंदिर' हे पश्चिमाभिमुख असून मंदिरामध्ये मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आपल्याला बघायला मिळतात. मंदिर हे उत्तम स्थितीमध्ये असून आपल्याला दुर्दैवाने या मंदिराचे शिखर पहायला मिळत नाही. परंतु अकोले येथील 'सिद्धेश्वर मंदिर' याचे शिखर हे अकोले येथूनच जवळ असलेल्या रतनवाडीच्या 'अमृतेश्वर' मंदिरासारखे असावे.

'सिद्धेश्वर मंदिर' याला आपल्याला पश्चिम आणि पूर्व अश्या दोन बाजूंनी प्रवेश पहायला मिळतो.

'सिद्धेश्वर मंदिर' याला आपल्याला पश्चिम आणि पूर्व अश्या दोन बाजूंनी प्रवेश पहायला मिळतो परंतु मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेश हा पश्चिमेकडून आहे. 'सिद्धेश्वर' मंदिराच्या द्वारशाखा या आजही सुस्थितीमध्ये आपल्याला पहावयास मिळतात. तसेच 'सिद्धेश्वर'मंदिराच्या व्हरांड्यातील स्तंभाचे तळखडे जर आपण नीट पाहिले तर ते चौरस असून आपल्याला त्याच्यावर एक नृत्यगणेशाची मूर्ती पहायला मिळते. तसेच मंदिराच्या बाजूच्या स्तंभावरील नक्षी आणि सुरूच्या झाडाच्या आकाराची रचना देखील बघण्यासारखी आहे ही रचना पेशवेकाळातील वाटते. या 'सिद्धेश्वर' मंदिरातील गोष्टी नीट पाहिल्यावर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजायला मदत होते कि या मंदिराची डागडुजी प्रत्येक कालखंडात वेळ पडल्यावर केली गेली आहे. 

'अकोले' गावामध्ये असलेल्या 'सिद्धेश्वर मंदिर' याचा उंबरठा हा देखील आपल्याला नजरेत येण्यासारखा आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे या मंदिराच्या उंबरठ्याच्या मध्यभागी मंडारकाचे अंकन केलेले असून त्याच्यावर आपल्याला किर्तीमुखांची रंग बघायला मिळते. उंबरठा ओलांडून आपण सभामंडपामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला सभामंडपामध्ये चार मुख्य स्तंभ तसेच भिंतीमध्ये दडलेले सहा अर्धस्तंभ पहायला मिळतात. तसेच दोन स्तंभ बाजूला असलेल्या अर्धमंडपाच्यामध्ये तसेच नंतरच्या काळामध्ये बांधलेले पाच स्तंभ हे मंदिराच्या छताच्या आधारासाठी तयार केलेले आपल्याला पहायला मिळतात. सिद्धेश्वर मंदिराच्या स्तंभांवर आपल्याला गुजरात मधील सोळंकी स्थापत्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो.

 'सिद्धेश्वर' मंदिराच्या द्वारशाखेवरील आणि आतील शिल्प.

'सिद्धेश्वर' मंदिराच्या मूळ स्तंभांंची रचना ही चौरस स्तंभपाद किंवा तळखडा याच्यावर आपल्याला पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, ब्रम्हाणी या स्त्रीदेवता आपल्याला त्यांच्या आयुधांच्या सहित पहायला मिळतात. मंदिराचे स्तंभमध्य हे अष्टकोनी असून त्यामध्ये आडव्या शिल्पपट्टांंत देवदेवतांची शिल्पे आपल्याला पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभांच्या शीर्षावर आपल्याला भारवाहक यक्ष पहायला मिळतात. तसेच मंदिराच्या सभामंडपामध्ये असलेले अर्धस्तंभ हे कमी कलाकुसरीचे असून त्याच्यावर आपल्याला किर्तीमुख कोरलेली पहायला मिळतात. मंदिराच्या स्तंभशिर्षांवर आपल्याला उलटे नाग देखील कोरलेले पहायला मिळतात. 

'सिद्धेश्वर मंदिर' याचे जर आपण वितान पाहिले तर हे करोटक शैलीचे असून वितानाच्या चार तुळयांच्यावर आपल्याला समुद्रमंथन, शेषशायी विष्णू, मिरवणूक, युद्धप्रसंग यांचे शिल्पांकन केलेले आपल्याला पहायला मिळते. मंडपातून आपण जेव्हा गर्भगृहाकडे जातो तेव्हा आपल्याला छोटेसे अंतराळ लागते गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला पत्र, नर, स्तंभ, रत्न, व्याल अश्या पाच द्वार शाखा आपल्याला पहायला मिळतात. या द्वारशाखेच्या तळाशी आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पहायला मिळतात.

सिद्धेश्वर मंदिरातील आतील आणि बाहेरील मूर्ती तसेच देवकोष्ठामधील तांडवनृत्य करणारा शिव.

'सिद्धेश्वर मंदिर' याच्या गर्भगृहातील शिवलिंगाची स्थापना ही खोल भागात केलेली आपल्याला पहायल मिळते. सिद्धेश्वर मंदिराचे गर्भगृहाचे दुसरे प्रवेशद्वार हे  पूर्वेकडे असून तेथे आपल्याला नंदीमंडप पहावयास मिळतो. नंदीमंडपाच्या स्तंभावर आपल्याला देवी-देवता, काही पुराणातील प्रसंग तसेच ऋषीमुनी यांची शिल्पे पहायला मिळतात. नंदीमंडपामध्ये आपल्याला स्तंभांच्यावर जे यक्ष पहावयास मिळतात त्या यक्षांची मुखे ही आपल्याला मूषक(उंदीर) आणि नरसिंह यांची आहेत असे पहायला मिळते. सिद्धेश्वर मंदिराला उत्तर आणि दक्षिण बाजूला अर्धमंडप असून ते साधेच आहेत त्याच्यावर आपल्याला कोणतेही कोरीव कामं दिसून येत नाही. अर्धमंडपाच्या बाह्य भागामध्ये असलेल्या देवकोष्ठामध्ये तांडवनृत्य करणारा शिव आणि दुसऱ्या देवकोष्ठात आपल्याला चामुंडा यांची शिल्पे पहायला मिळतात. 

तसे पहायला गेले तर यादवकाळामध्ये मंदिरांवर जेवढे शिल्पांकन केलेले आपल्याला पहायला मिळते त्याच्यापेक्षा कमी शिल्पांकन आपल्याला या सिद्धेश्वर मंदिरामध्ये पहायला मिळते. मंदिराची रचना आणि आणि त्याच्यावरील नागशिल्पे आणि इतर शिल्पांच्यामुळे मंदिराचा कालखंड हा यादव काळातील किंवा थोडा यादवांच्या उत्तरार्धात बांधले गेले ठरविण्यास आपल्याला मदत होते.

हेन्री कझिन्स याने काढलेले अकोले येथील 'सिद्धेश्वर' मंदिराचा तलविन्यास आणि स्तंभाची रचना यांचे चित्र.  

हेन्री कझिन्स याने लिहिलेल्या 'Mediaeval Temples of The Dakhan' या पुस्तकात पान क्रमांक ५५ वर लिहितो कि या मंदिरामध्ये एक शिलालेख देखील आहे त्याबाबत 'हेन्री कझिन्स' याने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे:-

Mr Sinclair writing of this temple, said "unfortunately the front porch has been restored by some pious blockhead in the Sarasanic style of a handsome modern temple in the village, so that it is not available for purpose of comparison. More than that the vandal threw away the ruins of the old porch on one of which was a long Sanskrit inscription observed but not copied, by Dr. Gibson twenty five years ago. After long search I found that the fragment, on which it was, had been turned face up under a nim tree, and used as a seat by the idlers of the village, who had with their barbarous hinder parts obliterated the inscription (never very deep or clear cut) beyond all hope of transcription or estampage, though it is possible that a competent Sanskrit scholar, with time and the stone before him, might decipher a few words"


सिद्धेश्वर मंदिराचे शिवलिंग आणि मंदिराची रचना तसेच स्तंभांच्यावरील नक्षीकाम. 

परंतु 'हेन्री कझिन्स' ज्या शिलालेखाचा उल्लेख करतो त्याबाबत आपल्याला मंदिरावर असलेल्या शिलालेखाची ओळख मिळत नाही. असे हे  यादव काळातील सिद्धेश्वर मंदिर हे अकोले गावाचे प्राचीनत्व सांगणारा अत्यंत महत्वाचा वारसा आहे या प्राचीन 'सिद्धेश्वर' मंदिराला भेट देऊन या मंदिर स्थापत्याचा अभ्यास नक्कीच करायला हवा.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Notes on the antiquities of the Talukas of Parner, Sangamner, Ankole, and Kopargaum, forming the charge of the second assistant collector, Ahmadnagar:- W. F. Sinclair, Government Central Press, Bombay, 1877.
२) Gazetteer of The Bombay Presidency  Ahmadnagar:- 1884.
३) भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ८३ :- २००६- २००७.
४) Mediaeval Temples of the Dakhan:- पान क्रमांक ५३, ५४, ५५, Henry Coussens, Indian Historical Researches, Vol 27, Cosmo Publication, 1987.
५) Temple Architecture & Sculpture of Maharashtra:- G. B. Deglurkar, Registrar, Nagpur University, Nagpur, 1974.
६) भारतीय मुर्तीशास्त्र:- डॉ. नि. पू. जोशी, प्रसाद प्रकाशन, २०१३. 

कसे जाल:-
पुणे - पिंपरी - चाकण - राजगुरूनगर - नारायणगाव - आळेफाटा - संगमनेर - अकोले.            
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

               








1 comment:

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage