मावळातील रांजण खळगे 'कुंडमळा'


महाराष्ट्राला जेवढे ऐतिहासिक महत्व लाभले आहे तेवढेच भौगोलिक महत्व देखील लाभलेले आहे. महाराष्ट्रातील पुण्याजवळील मावळ तालुका प्रसिद्ध आहे तो म्हणजे विविध जातीच्या तांदुळासाठी. या मावळ तालुक्यामधून विविध नद्या देखील वाहतात आणि या नद्यांच्या खोऱ्यामध्ये इंद्रायणी, आंबेमोहोर असे प्रसिद्ध तांदुळाचे उत्पादन केले जाते. परंतु या मावळातल्या 'इंद्रायणी' नदीमुळे तळेगाव पासून जवळच सोमाटणे फाट्याजवळ काही निसर्गनिर्मित 'रांजण खळगे' तयार झालेले आहेत.

तसे पहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये निघोज येथील रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. या निघोज येथील रांजण खळग्यांंना सगळेच भेट देतात परंतु पुण्यापासून अगदी जवळ असलेले 'कुंडमळा' येथील इंद्रायणी नदी निर्मित रांजण खळगे आजही उपेक्षित आहेत. तसे पहायला गेले तर 'कुंडमळा' हे 'इंदोरी' आणि 'शेलारवाडी' या गावांच्या सीमेवर वसलेले ठिकाण आहे. पुण्यापासून अगदी जवळ असल्याने स्वतःची गाडी असेल तर उत्तमच परंतु येथे जाण्यासाठी आपण मुंबई-पुणे महामार्गावरील 'बेगडेवाडी' स्टेशन येथे उतरून देखील 'कुंडमळा' येथे जाऊ शकता. 

'इंद्रायणी' नदीमुळे तयार झालेले निसर्गनिर्मित 'रांजण खळगे' 

जेव्हा आपण 'कुंडमळा'येथे जाऊन पोहोचतो तेव्हा हे सर्व ठिकाण नक्कीच आपले चित्त वेधून घेते. मुळातच निसर्गरम्य असलेले 'कुंडमळा' येथे जाताना आपल्याला इंग्रजांच्या काळात 'इंद्रायणी' नदीवर बांधलेला बंधारा देखील बघता येतो. या इंग्रजांच्या काळातील बांधलेल्या बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी आपले मन नक्कीच प्रसन्न करते. याच 'इंद्रायणी' नदीवर बांधलेला एक छोटा पूल देखील आपले लक्ष वेधून घेतो. इंद्रायणी नदीवरील बांधलेल्या या पुलावरून एक दुचाकी जाऊ शकेल एवढा हा छोटा आहे.  इंद्रायणी नदीच्या काठावर किंवा दुचाकीच्या छोट्या सांकवावर उभे राहिले कि 'कुंडमळा' येथील नैसर्गिक आश्चर्य 'रांजण खळगे' आपले लक्ष वेधून घेतात.

'इंद्रायणी' नदीच्या वाहत्या पाण्यामुळे याठिकाणी खूप 'रांजण खळगे' तयार झालेले आहेत हे पाहताना मात्र आपले डोळे नक्कीच थकून जातात. 'इंद्रायणी' नदीमधील हे रांजण खळगे हे वेगवेगळ्या उंचीचे, वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या खोलीचे, कमी जास्त जाडीचे असून 'कुंडमळा' येथील 'रांजण खळगे' हे आपल्याला 'इंद्रायणी' नदीने बनवलेली भूशिल्पे वाटतात. स्थानिक लोकं या रांजण खळग्यांना 'कुंड' असे संबोधतात. म्हणूनच 'इंद्रायणी' नदीच्या या रांजण खळग्यांना 'कुंडमळा' असे नाव पडले आहे. 

'कुंडमळा' येथील रांजण खळगे

'कुंडमळा' येथील रांजण खळगे पाहताना आपल्याला हे देखील समजून घेतले पाहिजे कि नदीमध्ये 'रांजण खळगे' कसे तयार होतात. जेव्हा नदीला पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा नदी ही आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणते तेव्हा त्या पाण्यासोबत नदी अनेक दगड आणि गोटे देखील आपल्या सोबत आणते. तसेच या नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये अनेक भोवरे निर्माण होतात. नदी मध्ये असलेल्या 'कॉम्पॅॅक्ट बेसाॅॅल्ट' या दगडामुळे नदीमध्ये हे भोवरे तयार होतात तेव्हा या भोवऱ्यामध्ये हे सगळे नदीने वाहून आणलेले दगड, वाळू, गोटे हे या भोवऱ्यामध्ये गोल गोल फिरायला लागतात. यामुळे नदीने आपल्या सोबत वाहून आणलेले वाळू, दगड-गोटे हे सगळे गोल गोल फिरून 'कॉम्पॅॅक्ट बेसाॅॅल्ट' याच्याशी होणाऱ्या घर्षणामुळे या रांजण खळग्यांची निर्मिती होते. या रांजण खळग्यांच्या निर्मितीला लाखो वर्षे लागतात. जसे जसे दरवर्षी नदी जे सगळे दगड-गोटे, वाळू वाहून आणते त्याच्याने या रांजण खळग्यांच्या आकारामध्ये वाढ होत जाते आणि ते अधिकाधिक मोठे मोठे दिसायला लागतात.

अश्या या इंद्रायणी नदीवरील रांजण खळग्यांचे महत्व ओळखून पर्यावरणप्रेमी, विज्ञान अभ्यासक तसेच भूगर्भशास्त्र अभ्यासक यांची पावले अभ्यासासाठी आणि निरीक्षणासाठी 'कुंडमळा' येथे वळत असतात. महाराष्ट्रातील या सुंदर भौगोलिक वारसा असलेल्या 'कुंडमळा' येथे भेट देणे आणि यातून आपल्या मुलांना भौगोलिक गोष्टी समजावून सांगणे यामध्ये एक वेगळीच मजा येते. म्हणूनच 'कुंडमळा'येथील हे रांजण खळगे हे मावळातील एक महत्वाचा वारसा ठरतो. म्हणूनच 'कुंडमळा' येथील भौगोलिक आश्चर्याला भेट देऊन आपण भौगोलिक वारसा नक्कीच अभ्यासू शकतो.  

 'कुंडमळा' येथील भौगोलिक आश्चर्याला भेट देऊन आपण भौगोलिक वारसा नक्कीच अभ्यासू शकतो. 

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - पिंपरी - चिंचवड - सोमाटणे - कुंडमळा.
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा                             

1 comment:

  1. छान आहे. दुसरे एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे रांजणखळगे शक्यतो नदीच्या उगमाच्या पहिल्या टप्प्यात दिसतात जिथेजिथ प्रवाहाचा वेग व आघात क्षमता जास्त असते पण कुंडमळ्यात इंद्रायणी नदीचा दुसरा टप्पा असून तुलनेने उगमापेक्षा कमी डोंगराळ भागातून वहात असूनही रांजणखळगे तयार झाले आहेत.
    हे ठिकाण देहुरोड ordinance डेपोच्या हद्दीत येत असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून विकासासाठी मर्यादा येत आहेत.

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage