'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावर असलेला 'कोळगाव दीपस्तंभ'


महाराष्ट्रामध्ये असे बरेच किल्ले आहेत जे आज नामशेष झालेले आहेत परंतु या किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर काही ना काही खुणा या आपल्याला पहायला मिळतात. अश्याच किल्ल्यांच्यापैकी एक किल्ला म्हणजे 'मांडव्याचा किल्ला' उर्फ 'श्रीवर्धनगड'. 'अलिबाग-रेवस' रस्त्यावर असलेला हा किल्ला एकेकाळी अत्यंत महत्वाचा किल्ला होता. 'अलिबाग-रेवस' रस्त्यावरून आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपल्याला एक टेकडी बघायला मिळते. या टेकडीवर आपल्याला एक उंच धुराड्यासारखा चुन्याचा रंग दिलेला मनोरा बघायला मिळतो. तो उंच मनोरा म्हणजे एक इंग्रजांच्या काळातील 'दीपस्तंभ' आहे. हा दीपस्तंभ आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये 'कोळगाव दीपस्तंभ' म्हणून ओळखला जातो. 

'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावरच्या टेकडीवर असलेला 'कोळगाव दीपस्तंभ' 

हा 'कोळगाव दीपस्तंभ' हा 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावरच बांधला आहे. आज जरी मांडवा किल्ल्याचे अस्तित्व आपल्याला सगळे सापडत नसले तरी 'कोळगाव दीपस्तंभ' हा त्याच्यावर असलेल्या महत्वाच्या खुणेपैकी आहे. यावरून आपल्याला 'मांडवा किल्ल्याचे' मध्ययुगीन महत्व समजते. मध्ययुगामध्ये 'मांडवा बंदराला' फार महत्व होते. या 'मांडवा' बंदराच्या संरक्षणासाठी येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कोट बांधला होता त्या कोटाला 'श्रीवर्धनगड' असे नाव दिले गेले. या मांडवा येथील कोटाचा एक उल्लेख जो येतो तो पुढीलप्रमाणे:-

"मांडवीवर सिद्दीने वर्चस्व प्रस्थापित केले होते. नरवाली ताकजीर यानी कोट जर केले आहे. तोफ नेऊन जोडिली आहे. तेण्हे करून सदर व दरवाजा रोखीला आहे. काली आणिक तोफा दोन दादारांवरून आणिल्या आहेत. त्या फोडून मार करितील. ईश्वर इच्छेने व खावंदाचे प्रताप कोट घेतील."

'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावरच्या टेकडीवर असलेल्या 'कोळगाव दीपस्तंभाच्या' आतील बाजू. 

तसेच या 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' येथे 'चिमाजी आप्पा' आणि जंजिऱ्याचा 'सिद्दी सात' यांच्यामध्ये लढाई झाली होती. त्या लढाईमध्ये या 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' या कोटाची लुट केली गेली असे देखील उल्लेख आढळून येतात. आत्ता सध्या 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' याचे जास्त अवशेष आढळून मात्र येत नाही त्या किल्ल्यावर असलेली एकमेव खुण जी शिल्लक आहे ती म्हणजे इंग्रजांच्या काळात बांधला गेलेला 'कोळेगाव दीपस्तंभ' या 'कोळेगाव दीपस्तंभाची रचना ही एका उंच धुराड्यासारखी केलेली असून या दीपस्तंभामध्ये आतल्या बाजूला लोखंडी कड्या असून त्या कड्यांना धरून आपल्याला वरपर्यंत जाता येते. या कोळगाव दीपस्तंभावरून आजूबाजूचा प्रदेश हा अत्यंत सुंदर दिसतो.

असे हे 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावर असलेला एकमेव अवशेष 'कोळगाव दीपस्तंभ' नक्कीच बघण्यासारखा आहे. या 'कोळगाव दीपस्तंभामुळे' आपल्याला 'मांडवा' या बंदरावर लक्ष ठेवणारा 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' येथे किल्ला होता हे समजण्यास मदत होते. असा हा 'कोळगाव दीपस्तंभ' हा 'मांडवा' गावाचा तसेच 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' या किल्ल्याचे अस्तित्व दर्शवणारा एकमेव वारसा आहे आणि हा वारसा आपण जतन करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. जेव्हा कधी अलिबाग परिसरात भटकंती करायला जाल तेव्हा 'मांडवा उर्फ श्रीवर्धनगड' किल्ल्यावर असलेला 'कोळगाव दीपस्तंभ' याला नक्की भेट द्या.  

'कोळगाव दीपस्तंभ' येथून दिसणारे दृश्य.
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) रायगड जिल्हा गॅॅझेटीयर:- संपादक डॉ. कि. का .चौधरी, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, १९९३.     

कसे जाल:-
पुणे - पिंपरी - चिंचवड - तळेगाव - खोपोली - पेण - किहीम - मांडवा.            
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा
                                

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage