भाजे लेण्यामधील 'इंद्र आणि सूर्य'


'भाजे लेणी' हि महाराष्ट्रातील पहिली लेणी म्हणून ओळखली जाते. या 'भाजे' लेणीमध्ये आपल्याला सातवाहन काळातील शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. याच भाजे लेणीमध्ये २० क्रमांकाच्या विहारात काही सातवाहन काळातील शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. या विहारामध्ये आपल्याला दोन मोठी शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. हि दोन शिल्पे सध्या प्रचलित नावानुसार 'इंद्र' आणि 'सूर्य' म्हणून संबोधले जाते. हि दोन्ही शिल्पे नक्की 'इंद्र' आणि 'सूर्य' यांची आहेत का हे देखील पाहणे फार गरजेचे आहे.


'भाजे' लेणीमधील विहार क्रमांक २० हे उत्तराभिमुख असून हे विहार १६ फुट ६ इंच x १७ फुट ६ इंच या आकाराचा आहे. मुळात हे विहार इतर विहारांंच्यापेक्षा अधिक सुंदर आणि कोरलेले आहे. यामध्ये आपल्याला काही यक्ष मूर्ती देखील खांबांवर पाहायला मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे सातवाहन काळामध्ये 'यक्ष' संप्रदाय प्रचलित होता. याच विहारामध्ये आपल्याला आपल्याला एक योध्याचे शिल्प पाहायला मिळते हे शिल्प नक्कीच लक्ष वेधून घेणारे आहे. हे योध्याचे शिल्प पाहायला नंतर त्यातील कोरीवकाम समजण्यास मदत होते. हे शिल्प भाजक्या मातीच्या शिल्पाला पाहून बनविले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे. २० क्रमांक विहारातले हे शिल्प जर आपण नीट पाहिले तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे २० क्रमांक लेणीमध्ये हा कोरलेला योद्धा हा समोरच्या बाजूला तोंड करून उभा असून त्याने उजव्या हातामध्ये धनुष्य धरले असून त्याची प्रच्यंता हि जमिनीवर टेकलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच या योध्याचा डावा हात कमरबंधात खोवलेल्या कट्यारीवर ठेवलेला आपल्याला दिसतो.


या 'भाजे' लेणीमध्ये आपल्याला सातवाहन काळातील शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात.


या योध्याच्या शिल्पामध्ये आपल्याला या योध्याच्या डाव्या खांद्याच्या मागे आपल्याला बाणांचा भाता देखील अडकवलेला बघायला मिळतो. तसेच तत्कालीन परिस्थितीमध्ये या योध्याचे केस हे डोक्यावर बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. या योध्याच्या या शिल्पामध्ये अजून काही गोष्टी ठळकपणे आपल्याला बघायला मिळतात त्या म्हणजे योध्याच्या कानामध्ये असलेले कर्णाभरणे, केयूर, वलये रत्नहार हे अलंकार आपल्याला पहायला मिळतात. तसेच या योध्याने आपल्याला 'अधोवस्त्र' नेसले असून त्याच्यावर बांधलेल्या कमरबंधाचे सोगे हे पुढे सोडलेले आपल्याला पहायला मिळतात. भाजे लेणी मध्ये असलेल्या २० क्रमाकांच्या विहारामध्ये असलेले हे महत्वाचे व्यक्तीशिल्प आहे.


याच शिल्पाच्या शेजारी आपल्याला २० क्रमांकाच्या विहारामध्ये दोन मोठे शिल्पपट पहायला मिळतात. या शिल्पपटांमध्ये डावीकडे जे शिल्प आपल्याला पहायला मिळते ते 'सूर्याचे शिल्प' म्हणून सांगितले जाते आणि उजवीकडे जे शिल्प आहे ते 'इंद्राचे शिल्प' आहे असे सांगितले जाते परंतु या शिल्पांवरून आजही तज्ञांमध्ये मतभेद आहेत. २० क्रमांकाच्या विहाराच्या व्हरांंड्यामध्ये डावीकडे असलेल्या शिल्पपटात एक राजपुरुष हा दोन स्त्रियांच्या सोबत चार घोडे जोडलेल्या रथामधून धावत असलेला आपल्याला पहायला मिळतो. रथामध्ये बसलेल्या स्त्रियांच्यापैकी एका स्त्री ने आपल्या हातामध्ये छत्र आणि दुसऱ्या स्त्री ने हातामध्ये चामर धरलेले आपल्याला पहायला मिळते. हा रथ नीट पाहिला तर आपल्याला असेही बघायला मिळते कि हा रथ एका झोपलेल्या विशाल स्त्रीच्या अंगावरून धावत जात आहे. या रथासोबत काही आश्वारूढ स्त्रिया या देखील रथाच्या मागोमाग जात आहेत. या घोड्यावर बसलेल्या स्त्रियांच्या पैकी एका स्त्रीच्या पायामध्ये आपल्याला 'रिकिब' पहायला मिळते. या शिल्पावरून 'रिकिब' प्राचीन काळापासून वापरतात हे समजायला आपल्याला मदत होते.


भाजे लेणीमध्ये या शिल्पांना 'इंद्र' आणि 'सूर्य' असे सध्या संबोधले जाते. 


२० क्रमांकाच्या विहाराच्या व्हरांंड्यामध्ये उजवीकडे असलेल्या शिल्पपटात एक राजपुरुष एका मोठ्या हत्तीवर बसून जात असलेला आपल्याला पहायला मिळतो. या राजपुरुषाच्या मागे त्याचा एक सेवक हातामध्ये एक ध्वज धरून बसलेला आपल्याला पहायला मिळतो. तसेच या राजपुरुषाच्या हत्तीने आपल्या सोंडेमध्ये एक वृक्ष धरलेला आहे असे दृश्य आपल्याला पहावयास मिळते. हे दोन शिल्पपट जर आपण नीट पाहिले तर आपल्याला असे दिसते कि हे दोन्ही शिल्पपट हे मुख्य राजव्यक्तीच्या वाहनाच्या आकारांमुळे अधिक उठून दिसतात.


याच मुख्य दोन शिल्पांच्या बाबत आजही तज्ञांच्या मध्ये एकमत आजिबात नाही. यामध्ये कुमार स्वामी यांच्या मते 'सूर्यदेव आपल्या दोन पत्नींच्या सोबत अंधकार रूपी राक्षसिंचा संहार करीत आकाशामधून आक्रमण करीत आहेत.' असे कुमारस्वामी म्हणतात. तसे पहायला गेले तर 'सूर्याच्या' रथामध्ये सात घोडे दाखविले जातात अशी एक कल्पना आहे परंतु प्राचीन काळामध्ये चारच घोडे दाखविले जात असत. त्यामुळे कुमार स्वामी यांचे म्हणणे तत्वत: मान्य होते. परंतु दुसरा शिल्पपट हा ऐरावतावर बसलेल्या 'इंद्राचा' आहे याबाबत मोठा प्रश्न हा उद्भवतो कि बौद्ध लेण्यामध्ये 'इंद्र' या देवतेचे शिल्प कोरण्याचे प्रयोजन काय आहे हे मात्र कुमारस्वामी यांनी सांगितले नाही. तसेच 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम' याच्या बुलेटीन मधील १ ल्या भागामध्ये पान क्रमांक १५ ते २१ या पान क्रमांकावर या भाजे लेणी मधील शिल्पांवर 'श्री. आर. जी. ग्यानी' यांनी प्रकाश टाकलेला आहे. 'श्री. आर. जी. ग्यानी' यांनी 'Identification of The So-Called Surya and Indra Figures In Cave No 20 of The Bhaja Group' असा लेख लिहून त्यांनी या भाजे लेण्यामधील 'इंद्र' आणि 'सूर्य' ज्या शिल्पांना संबोधले जाते त्या शिल्पांचा संबंध हा 'मांधाता' राजाच्या कथेशी जुळवलेला आहे.


भाजे लेणी मधील एक योध्याचे शिल्प


'मांधाता' राजाने पृथ्वीवरील विदेहादि देश जिंकल्यानंतर 'मेरू' पर्वतावरील समृद्ध असा 'उत्तर कुरु' हा देश जिंकण्याचा निश्चय केला. 'मांधाता' राजा हत्तीवर बसून 'उत्तर कुरु' देशाच्या राजधानीमध्ये प्रवेश करीत असलेला पहिल्या 'भाजे' लेणीमधील शिल्पामध्ये दाखवला आहे. 'भाजे' लेणीमधील या शिल्पपटाला पृष्ठभूमी म्हणून 'उत्तर कुरु' प्रदेशातील लोकांचे जीवन हे कसे सुखी, समृद्धी आणि विलासी आहे हे त्यामध्ये दर्शविले आहे. 'उत्तर कुरु' या देशामध्ये लोकांना 'कल्पवृक्ष' याच्यापासून सर्व उपभोग्य वस्तू प्राप्त होतात हे लेण्यामध्ये कोरलेल्या शिल्पाच्या पृष्ठभूमीमध्ये दाखवले आहे. तसेच 'उत्तर कुरु' भूमी येथील लोकांना सदैव तारुण्य प्राप्त झालेले असते. तसेच प्रणयी युगुले हि 'कल्पवृक्ष' याच्याकडून विविध अलंकार, खाद्य पेये, आणि उत्कृष्ट वस्त्रे हे प्राप्त करून सुखी आणि विलासी जीवन जगत असतात हे विविध शिल्पांनी दर्शविले आहे.


'मांधाता' हा देवांच्या बाजूने भाग घेण्याकरिता आपल्या रथामधून आकाशाकडे जात आहे.


'भाजे' लेणी येथील २० क्रमांकाच्या विहारामध्ये दुसऱ्या शिल्पपटात 'मांधाता' हा देवांच्या बाजूने भाग घेण्याकरिता आपल्या रथामधून आकाशाकडे जात आहे तसेच 'मांधाता' याचा रथ हा एका विशाल देह असलेल्या राक्षसाच्या अंगावरून जात आहे असे दृश्य कोरलेले आहे या राक्षसावर जय मिळवून पुढे 'मांधाता' हा सुधर्मा नावाच्या देवसभेत जातो अशी एक गोष्ट 'दिव्यावदान' या महत्वाच्या बौद्ध ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. यावरून एक महत्वाची गोष्ट समजण्यास आपल्याला मदत होते ती म्हणजे 'मांधाता' याची कथा हि बौद्ध धर्मीयांमध्ये प्राचीन काळात प्रसिद्ध होती. या मांधाता याच्या कथेचे शिल्पपट हे पूर्वी स्तूपांच्या कठड्यांना लावले जात असत. असे काही कठडे हे 'अमरावती' येथील स्तुपांवर बसविले आहेत त्याच्यावर 'मांधाता' याची कथा कोरलेली आहे. म्हणूनच भाजे येथील लेणी क्रमांक २० मधील हे दोन महत्वाचे शिल्पपट हे 'मांधाता' याचे आहेत असे काही तज्ञ आजही मानतात.


'मांधाता' राजा हत्तीवर बसून 'उत्तर कुरु' देशाच्या राजधानीमध्ये प्रवेश करीत आहे असे या शिल्पपटामध्ये दाखविले आहे असे काही तज्ञांचे मत आहे.


अश्या प्रकारे भाजे लेणी मधील २० क्रमांकाच्या विहारामधील दोन शिल्पे सध्या प्रचलित नावानुसार 'इंद्र' आणि 'सूर्य' म्हणून संबोधले जाते. परंतु बौद्ध ग्रंथांच्यामध्ये या शिल्पांची गोष्ट आहे हे देखील महत्वाचे ठरेल. असे हे सुंदर शिल्पपट भाजे लेणी मध्ये गेल्यावर नक्की बघावेत आणि त्याचा अभ्यास नक्की करावा.

______________________________________________________________________________________________


संदर्भग्रंथ:-

१) History of Indian and Indonesian Art:- Ananda K Coomaraswamy, London Edward Goldstone, 1927.    


२.)  Bulletin of the prince of Wales museum of Western India no.1, 1950-1951.   


३) सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख:- वा.वि. मिराशी, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, १९७९.


कसे जाल:-

पुणे - पिंपरी - तळेगाव - भाजे.  


______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-


१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.


२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.


३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.


४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्र © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage