ठाणे शहरामधील 'सदाशिव मूर्ती'


महाराष्ट्रातील 'ठाणे' शहर हे कला आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मुळात 'ठाणे' या शहराला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. 'ठाणे' शहराचे प्राचीन नाव हे 'श्रीस्थानक' असे होते. तसेच 'ठाणे' म्हणजेच 'श्रीस्थानक' हे शहर 'शिलाहार' राजांची राजधानी होती. या प्राचीन 'ठाणे' शहरामध्ये 'शिलाहार' काळात विविध मंदिरे उभारली गेली तसेच विविध तलाव देखील खोदले गेले या तलावांच्यापैकी एक महत्वाचा 'मासुंदा तलाव' हा आजही 'ठाणे' शहराची शान आहे. याच 'ठाणे' शहरामध्ये आजही नवीन बांधकामे करत असताना जेव्हा जमीन खोदली जाते तेव्हा देखील 'शिलाहार' कालीन शिल्पे सापडतात त्यापैकीच एक 'सदाशिव' रुपामध्ये असलेले ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे शिल्प आजही 'ठाणे' येथील कलादालनामध्ये जपून ठेवले आहे.


एकेकाळी तलाव ही ओळख असलेले ठाणे शहर आता आपल्याला नवीन रूपामध्ये बघायला मिळते. काही इतिहासामधल्या नोंदीप्रमाणे १६ व्या शतकाच्या सुरुवातीला 'ठाणे' शहरामध्ये जवळपास ६० मंदिरे होती असे उल्लेख सापडतात. पण आज ही प्राचीन मंदिरे मात्र दिसत नाहीत याचे कारण म्हणजे मधल्या काळात ठाणे शहरावर असलेले पोर्तुगीजांचे राज्य परंतु काही प्राचीन मंदिरे ही नव्याने पेशवे काळामध्ये जीर्णोद्धारीत झालेली आपल्याला बघायला मिळतात. परंतु जी मंदिरे मधल्या काळामध्ये पाडली गेली त्यांचे अवशेष मात्र आज देखील 'ठाणे' शहरामध्ये आपल्याला तलावांचा गाळ उपसताना किंवा बिल्डिंगसाठी खोदकाम करताना या प्राचीन मूर्ती आजही सापडतात. या सापडलेल्या मूर्तिंवरून आपल्याला 'ठाणे' शहरामध्ये असलेल्या मंदिरांची कल्पना करता येते.


प्राचीन 'ठाणे' शहराचा एक महत्वाचा वारसा असलेली 'सदाशिव मूर्ती. 

अशीच एक मूर्ती २०१० साली 'ठाणे' शहरातील गोकुळनगर येथील 'गोल्डन डाय' कंपनीच्या मागील आवारामध्ये शिवाची 'सदाशिव' रूपामध्ये असलेली मूर्ती सापडली. ही शिवाची मूर्ती आपण जर नीट बघितली तर 'घारापुरी' येथील लेण्यामध्ये जी 'त्रिमूर्ती' कोरलेली आहे त्या मूर्तीची ही आपल्याला प्रतिकृती वाटते. परंतु ही मूर्ती नीट पाहिली असता आपल्याला तिचे वेगळे रूप बघायला मिळते. सदशिवाच्या या सुंदर शिल्पाकडे आपण नीट पाहिले असता आपल्याला मध्यभागी 'महेशाचे' मुख बघायला मिळते. तसेच 'ब्रम्हा' आणि 'विष्णू' यांची दोघांची मुखे ही अनुक्रमे डावीकडे आणि उजवीकडे असून ही दोन्ही मुखे सारखीच दिसतात. 


तसेच ब्रम्हा, महेश आणि विष्णू या तिघांच्या डोक्यावर आपल्याला करंडक मुकुट पहायला मिळतो. तसेच कानामध्ये कर्णकुंडले पहायला मिळतात. हे 'सदाशिव' शिल्प एकाच दगडात कोरलेले असल्यामुळे ब्रम्हा, महेश, आणि विष्णू यांच्या कानामध्ये असलेली कुंडले ही जरी दोन कोरलेली असलेली तरी तिघांच्या कानामध्ये ती कोरलेली आहेत असा भास होतो. तसेच यामध्ये मधले मुख हे महेश म्हणजेच शिवाचे असून याला आपल्याला मिशी देखील बघायला मिळते. शिलाहार काळामध्ये कोरलेल्या या 'सदाशिव' मूर्तीचे भाव हे संपूर्ण शांत स्वरूपाचे असून हे शिल्प पाहिल्यावर नक्कीच प्रसन्न वाटते. साधारणपणे ही 'सदाशिव' मूर्ती १० व्या किंवा ११ व्या शतकातील असावी असे वाटते. 


'कापूरबावडी' येथील कलादालनामध्ये शिलाहारकालीन शिवाची 'सदाशिव' रूपातील मूर्ती ठेवलेली आहे. 


'गोल्डन डाय' कंपनीच्या आवारामध्ये असलेली ही 'सदाशिव' मूर्ती प्रथम श्री. एकनाथ पवळे यांच्या बघण्यामध्ये आली. ही मूर्ती 'श्री. एकनाथ पवळे' यांनी पाहिल्यावर लगेचच ठाण्यामधील इतिहास अभ्यासक 'श्री. सदाशिव टेटविलकर' यांना फोन करून या 'सदाशिव' शिल्पाबद्दल सांगितले. जेव्हा इतिहास अभ्यासक 'श्री. सदाशिव टेटविलकर' हे तिथे गेले आणि त्यांनी ती 'सदाशिव' रुपातली मूर्ती पाहिली आणि त्यांनी या मूर्तीबद्दल 'ठाणे' येथील प्राच्य विद्या अभ्यासक 'डॉ. दाऊद दळवी' यांना ही 'सदाशिव' मूर्ती दाखवली. तेव्हा कोणत्याही चोराने ही 'शिलाहार' काळातील 'सदाशिव' मूर्ती चोरून नेऊ नये म्हणून 'डॉ.दाऊद दळवी' यांनी तत्कालीन 'ठाणे' शहराचे महापौर 'श्री. अशोक वैती' यांना सांगितले. या गोष्टीची अंमलबजावणी तातडीने करत दुसऱ्याच दिवशी 'ठाणे' शहराचे तत्कालीन महापौर 'श्री अशोक वैती' यांनी 'गोल्डन डाय' कंपनीच्या आवारामध्ये असलेली ही 'सदाशिव' मूर्ती 'ठाणे' येथील 'कापूरबावडी' येथे असलेल्या कलादालनामध्ये नेऊन सुरक्षित ठेवली.


कलादालनामध्ये असलेली शिवाची 'सदाशिव' मूर्ती. 

अश्या पद्धतीने प्राचीन 'सदाशिव' मूर्ती सुरक्षित जागेवर ठेवून 'ठाणे' शहरामधील एक महत्वाचा वारसा नक्कीच जतन केला आहे. 'ठाणे' शहराच्या गतवैभवाची साक्ष देणारी ही शिवाची 'सदाशिव' रूपातील मूर्ती ठाणेकरांचे आकर्षण नक्कीच बनू शकते. आजही प्राचीन ठाणे शहराचा वारसा असलेली ही 'सदाशिव' मूर्ती आपल्याला 'कापूरबावडी कलादालन' येथे पहायला मिळेल. असा हा प्राचीन 'ठाणे' शहराचा एक महत्वाचा वारसा असलेली ही मूर्ती इतिहास अभ्यासकांच्या कडून वाचवली गेली आणि सुरक्षित ठेवली गेली हे एक महत्वाचे उदाहरण नक्कीच म्हणावे लागेल. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) तुमचे आमचे ठाणे:- सदाशिव टेटविलकर, श्रीकृपा प्रकाशन, २०१६. 

कसे जाल:-
पुणे - लोणावळा - खालापूर - वाशी - ठाणे.  

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

 लिखाण आणि छायाचित्र © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage