रामचंद्रदेव यादव याचा चौल येथील 'चेउल शिलालेख'

 

प्राचीन काळापासून 'चौल' हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून अत्यंत प्रसिद्ध होते. 'चौल' या बंदराचे आपल्याला विविध उल्लेख देखील सापडतात. पुराणांमध्ये देखील 'चौल' याचे उल्लेख मिळतात तसेच विविध परदेशी प्रवाशांनी देखील चौलचे उल्लेख हे चेमुला, तिमुला, सिमुला, सैमूर्, जैमुर, चैवाल, खौल, केल असे केलेले आढळून येतात यावरून 'चौल' हे किती महत्वाचे ठिकाण होते हे आपल्याला समजते. याच 'चौल' बंदरावर आणि शहरावर महाराष्ट्रातील विविध राजसत्तांंनी राज्य केलेले आपल्याला वेगवेगळ्या शिलालेख, ताम्रपट किंवा परदेशी प्रवाशांनी केलेली समकालीन वर्णने यावरून 'चौल' येथे राज्य केलेल्या राजसत्ता कोणत्या होत्या हे समजायला मदत होते. महाराष्ट्रामध्ये यादवांची सत्ता जेव्हा होती तेव्हा 'रामचंद्रदेव यादव' याचा एक महत्वाचा शिलालेख हा 'डॉ. शं. गो. तुळपुळे' यांना या इतिहास प्रसिद्ध 'चौल' या गावी मिळाला हाच शिलालेख 'चेऊल शिलालेख' म्हणून प्रसिद्ध आहे.


'चौल' येथे सापडलेला रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख असलेली शिळा ही 'डॉ. शं. गो. तुळपुळे' यांना 'चौल' गावाच्या उत्तर भागात असलेल्या 'मोडकवाडी' येथे रस्त्याच्या बाजूस आडवी टाकलेली सापडली. ही शिळा 'मोडकवाडी' येथे कोठून आली याबाबत कोणालाही माहिती नव्हते. जेव्हा डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी ही शिळा पाहिली तेव्हा त्यांना ती पडलेली शिळा म्हणजे 'गद्धेगाळ' होता हे समजले. 'चौल' येथील रामचंद्रदेव यादव याचा गद्धेगाळ असलेल्या या शिलेची उंची ही जवळपास ६ फुट ४ इंच आणि रुंदी ही १ फुट ४ इंच इतकी असून या शिलेच्या भोवती चंद्र आणि सूर्य यांच्या आकृती असून त्यानंतर लेखाच्या काही ओळी  तसेच गद्धेगाळ आकृती आणि शेवटी लेखाच्या उरलेल्या ओळी याप्रमाणे खोदकाम केलेले आहे. 


'चौल' हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून अत्यंत प्रसिद्ध होते.


या गद्धेगाळावरील लेख हा २४ ओळींचा असून त्याच्या मध्यभागी गद्धेगाळाची आकृती आल्याने या शिलेचा १८ ओळींचा एक आणि ६ ओळींचा एक असे दोन भाग पडलेले आहेत. या दोन्ही भागांची लांबी आणि रुंदी १' ११" x १' ४'' इतकी भरते. लेखाचे खोदकाम चांगले होते परंतु आता तो झिजलेला आहे असे डॉ. शं. गो. तुळपुळे नमूद करतात. या चौल येथे सापडलेला या गद्धेगाळाच्या २४ ओळींच्यापैकी पहिल्या दोन आणि अखेरच्या तीन अशा एकूण पाच ओळी या फार कष्टाने डॉ. शं. गो. तुळपुळे यांना वाचता आल्या आहेत. या ज्या पाच ओळी वाचता आलेल्या आहेत त्याच्या पुढील लेख वाचणे अशक्य आहे असे डॉ. शं. गो. तुळपुळे नमूद करतात. रामचंद्रदेव यादव याच्या या 'चेउल' शिलालेखात अखेरच्या ओळीमध्ये एकच शब्द आलेला असून तो मध्यभागी खोदलेला पहायला मिळतो. 


रामचंद्रदेव यादव याच्या 'चेउल' शिलालालेखाबद्दल कुलाबा गॅॅझेटियरमध्ये देखील कुठेही उल्लेख सापडत नाही. या रामचंद्रदेव यादव या 'चेउल' शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन हे डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी आपल्या 'प्राचीन मराठी कोरीव लेख' या पुस्तकात केलेले आहे. या पुस्तकातून रामचंद्रदेव यादव याचा 'चेउल शिलालेख' पहिल्यांदा सर्वांच्यासमोर उजेडात आला. 'प्राचीन मराठी कोरीव लेख' या पुस्तकात डॉ. शं. गो तुळपुळे यांनी या गद्धेगाळावरील पहिल्या १८ ओळी अस्पष्ट असल्याने त्याचा ठसा पुस्तकात जोडलेला नाही. सहा ओळींचा उत्तरार्धाचा ठसा मात्र त्यांनी पुस्तकात जोडला आहे. 


रामचंद्रदेव यादव याचा 'चेउल शिलालेख' हा देवनागरी लिपीमधला असून शिलेवरील अक्षराचे वळण जुने आहे. या लेखाची काही अक्षरवाटिका ही जुनी असून त्यामधील च, छ, झ, ण ह्या अक्षरांची वळणे प्राचीन आहेत असे डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी नमूद केलेले आहे. प्रस्तुत लेखाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला सर्वत्र पृष्ठमात्रेचा वापर केलेला आढळून येतो. तसेच सर्व शब्दांच्या वरील अनुस्वार हे अर्धशून्याकृती आहेत असे डॉ. शं. गो. तुळपुळे नमूद करतात. या प्रस्तुत 'चेउल शिलालेखाच्या' केवळ पाच ओळीच वाचता आल्या असल्यामुळे लेखनपद्धतीविषयी सांगता येत नाही. 'चेउल शिलालेख' हा संस्कृत-मराठी अशा संमिश्र भाषेत असावा असे वाटते. 'चेउल' येथील शिलालेखातील शेवटच्या दोन ओळीमधील गद्धेगाळ हा मराठी मध्ये आहे. 


'चौल' गावाच्या उत्तर भागात असलेल्या 'मोडकवाडी' येथे असलेला रामचंद्रदेव यादव याचा गद्धेगाळ.
छायाचित्र क्रेडीट / सौजन्य:- हर्षदा विरकुड.  
 

'चेउल' शिलालेखामध्ये जी कालनिश्चिती केलेली आहे त्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये पहायला मिळते. "सकु संवतु विलंब संछरे १२२० चैत्र सुध ११ सोमे" यामध्ये पिले जंत्री प्रमाणे गतशक १२२० मध्ये विलंब संवत्सर असून वरील शक तिथी यांचा देखील मेळ बसतो. तसेच या शिलालेखामध्ये पुढे श्रीरामचंद्रदेव यादव याचा उल्लेख देखील वरील काळाशी बरोबर जुळतो. या 'चेउल' शिलालेखामध्ये आपल्याला संवत्सराचे नाव पहिले पहायला मिळते आणि शकांक नंतर पहायला मिळतो. या 'चेउल' शिलालेखाची इंग्रजी तारीख ही २४ मार्च १२९८ अशी येते.    


शिलालेखाचे वाचन पुढीलप्रमाणे:-


   १. ओं स्वस्ति श्री सकु संवतु विलंब संछरे १२२० चै -

 २. त्र सुध ११ सोमे ---- श्रीमत्प्रौढप्रताप श्रीरामचंद्र-

३. देव------------------------------------------------

४. ---------------------------------------------------

५. ---------------------------------------------------

६. ---------------------------------------------------

७. ---------------------------------------------------

८. ---------------------------------------------------

९. ---------------------------------------------------

१०. --------------------------------------------------

११. --------------------------------------------------

१२. --------------------------------------------------

१३. --------------------------------------------------

१४. --------------------------------------------------

१५. --------------------------------------------------

१६. --------------------------------------------------

१७. --------------------------------------------------

१८. --------------------------------------------------

१९. --------------------------------------------------

२०. --------------------------------------------------

२१. --------------------------------------------स्वद-

२२. त्तां परदत्तां वा यो हरेतु वसुंधरांं | षष्टिंं वर्षसहस्त्राणि वि -

२३. ष्ठायां जायते कृमि: | जो फेडी लोपी तेहाचिए माएसी गाढवु 

२४. झवे |


अर्थ:-

'चेउल' येथे जो रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख सापडलेला आहे त्याच्या जेवढ्या भागाचे वाचन हे डॉ. श. गो. तुळपुळे यांना करता आलेले आहे त्याच्यावरून एवढेच आपल्याला समजते कि ह्या रामचंद्रदेव यादव याच्या 'चेउल' शिलालेखामध्ये शक संवत १२२०, विलंबनाम संवत्सरी, चैत्र शु. ११ सोमवार यादिवशी श्रीमत्प्रौढप्रताप श्रीरामचंद्रदेव (यादव) याच्या राजवटीमध्ये खोदले गेले आहे. आपल्याला या शिलालेखाच्या शेवटी 'स्वदत्तांं परदत्तां' ही गद्धेगाळावर आढळणारी नेहेमीची शापवाणी देखील पहायला मिळते. बाकी 'चेउल' शिलालेखामध्ये लिहिलेला तपशील वाचता येत नाही याचे मुख्य कारण म्हणजे लेख वाचता येत नाही. 


रामचंद्रदेव यादव याचा चौल येथील गद्धेगाळाचा ठसा. 


'चेउल' येथे सापडलेला हा रामचंद्रदेव यादव याचा शिलालेख हा चेउल मध्ये जी प्राचीन मंदिरे आहेत त्यामध्ये सोमेश्वर मंदिर आणि महालक्ष्मी यांची मंदिरे आहेत यांच्यासंबंधीत हा गद्धेगाळ असू शकतो परंतु याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. चेउल मधील सोमेश्वर आणि महालक्ष्मी या मंदिरांच्या प्राचीनत्वाबाबत आपल्याला Gazetteer Of The Bombay Presidency Vol.i Part.ii यामध्ये वाचायला मिळते. परंतु कोणताही पुरावा नसल्यामुळे आपल्याला हा रामचंद्रदेव यादव याचा 'चेउल' शिलालेख कोणत्या मंदिराच्या दानाबद्दल आहे हे मात्र समजत नाही.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) प्राचीन मराठी कोरीव लेख:- डॉ. शं. गो. तुळपुळे, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९६३.
२) महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सूची:- शांताराम, भालचंद्र देव, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, १९८४.
३) An Indian Ephemeris A.D. 700 To A.D. 1799:-  Pillai L.d Swamikannu, Agam Prakashan Delhi, 1922.
४) Gazetteer Of The Bombay Presidency Vol.i Part.ii:- The Govt. Central Press, Bombay, १८९६.
५) Gazetteer Of The Bombay Presidency Vol. XI (Kolaba and Janjira) (Note on Cheul):- The Govt. Central Press, Bombay, १८९६. 
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

एक छायाचित्र हर्षदा विरकुड यांचे आहे.
दोन छायाचित्रे आणि लिखाण © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा

            


     

                                           


              

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage