पुणे शहरामध्ये शिवाजीनगर येथे एक चौक फार प्रसिद्ध आहे. त्या चौकाचे नाव 'सिमला ऑफिस' चौक असे आहे. आता या चौकाचे नाव 'सिमला ऑफिस' असे का पडले याला एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे शिवाजीनगर येथील चौकामध्ये एक इंग्रजांच्या काळातील वास्तू डाव्या बाजूला आपल्याला बघावयास मिळते. इंग्रजांच्या स्थापत्यशैली मधील ही वास्तू म्हणजे 'इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट' म्हणजेच 'भारतीय हवामान विभाग' यांचे ऑफिस येथे उभे आहे.
संपूर्ण भारतामधील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा हि 'मद्रास' म्हणजेच आजचे 'चेन्नई' येथे स्थापन झाली. त्याच्यानंतर अश्याच वेधशाळांची स्थापना 'मुंबई' आणि 'कलकत्ता' या भारताच्या दोन मोठ्या शहरांमध्ये देखील झाली. ह्या वेधशाळांची स्थापना झाल्यानंतर 'इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट' याची स्थापना हि इ.स. १८७५ मध्ये ब्रिटीशांनी केली आणि 'भारतीय हवामान विभाग' याची सुरुवात भारतात झाली. इ.स. १८७८ मध्ये 'सिमला' शहरामधून रोजचे, महिन्याचे आणि वार्षिक हवामान संपूर्ण भारतामध्ये सांगणे सुरु झाले. या महत्वाच्या कामामुळे 'सिमला' शहराची एक वेगळी ओळख निर्माण संपूर्ण भारतामध्ये झाली इ.स. १९०५ सालामध्ये 'सिमला' हे शहर भारतामधले 'इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट' याचे मुख्यालय बनले.
'सिमला ऑफिस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वेधशाळेची इमारत हि मोठी प्रशस्त असून तिचे क्षेत्रफळ हे ७५०० चौरस फुटांचे आहे. 'सिमला ऑफिस' वेधशाळेची इमारत संपूर्ण दगडी असून सिमेंट वापरून तिच्या दरज्या भरलेल्या आहेत. 'सिमला ऑफिस' याच्या इमारतीचे जे जोते आहे त्याच्यावरील बांधकामात काही ठिकाणी वेगळ्या रंगाचे दगड वापरून वास्तू वैभवात भर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. 'सिमला ऑफिसच्या' इमारतीच्या दर्शनी भागामध्ये असलेला घड्याळाचा मनोरा पुण्याच्या मानबिंदूमध्ये भर घालतो. स्थानिक बांधकाम शैली तसेच बांधकामामध्ये ग्रीक आणि रोमन वास्तूशिल्पकलेचा मिलाफ घडवून वास्तूशिल्पकारांनी निर्मितीमधील किमया दाखवलेली आपल्याला दिसते.
'सिमला ऑफिस' परिसरातील काही मापे आणि सर्किट.
'सिमला ऑफिस' या वास्तूच्या तळमजल्यावर दोन कमानीयुक्त बांधणीचे काम तर वरच्या बाजुस सरळ गच्यांची योजना केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रवेश द्वाराजवळ जिना असून त्याला संगमरवरी टप्पे आणि लोखंडी नक्षीदार रेलिंग आहेत. जिन्यामध्ये लिफ्ट असून तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यांसाठी वेगळा जिना बनवलेला आहे. इमारत अधिक उठावदार दिसावी म्हणून सागवानी लाकडाचे दरवाजे आणि खिडक्यांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. प्रवेश द्वाराजवळ संगमरवरी अष्टकोनी फरश्या बसविलेल्या आहेत. 'सिमला ऑफिस' इमारतीच्या छपराचे काम सिमेंट काँँक्रीटचे असून त्याच्यावरील नक्षीकाम हे प्लॅॅस्टर ऑफ पॅॅरीसमध्ये केलेले आपल्याला बघायला मिळते. वाढत जाणाऱ्या कमानी आणि मोकळ्या भागामुळे 'सिमला ऑफिसची' वास्तू दगडी असून देखील तिच्यात एक वेगळेपण जाणवते.
पुण्यामधील शिवाजीनगर येथे उभी असलेली 'सिमला ऑफिसची' सुंदर वास्तू सर्वसामान्य लोकांना बघण्यासाठी वर्षातून दोन दिवस पाहता येते. २८ फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' आणि २३ मार्च 'जागतिक हवामान दिवस' या दोन दिवसात आपल्याला आपल्या परिवारासोबत या सुंदर वास्तूमध्ये जाऊन 'हवामान खाते' कसे काम करते याबाबत खूप माहिती नक्की मिळू शकते. तसेच 'सिमला ऑफिस' येथील ग्रंथालय देखील बघण्यासारखे आहे. अशी हि पुण्याची ऐतिहासिक वेधशाळा 'सिमला ऑफिस' नक्कीच पुण्याचा एक मानबिंदू आहे.
१) शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा खंड १:- संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाऊंडेशन, २०००.
२) नावामागे दडलंय काय?:- सुप्रसाद पुराणिक, मर्व्हेन टेक्नोलॉजीज, २०१९.
३) सफर ऐतिहासिक पुण्याची:- संभाजी भोसले, स्नेहल प्रकाशन, २०१२.
टीप:-
२८ फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' आणि २३ मार्च 'जागतिक हवामान दिवस' यादिवशी कुटुंबासहित ही वास्तू पाहायला मिळते.
कसे जाल:-
पुणे - शिवाजीनगर.
______________________________________________________________________________________________
______________________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment
Thank You For Comment...!!! :)